आज, शुक्रवार दिनांक १३ ऑगस्ट २०२१ रोजी नागपंचमी आहे. त्या निमित्ताने विशेष लेख ……
साप हा निसर्गातील एक महत्वाचा घटक आहे. सापामुळे मानवाला खूप फायदे होतात. धान्य उत्पादनापैकी २६ टक्के धान्य उंदीर फस्त करतात. वर्षातून एक उंदराची जोडी ८८८ पिलांना जन्म देते. एका उंदराचे आयुष्य १६ वर्ष असते. जर कां उंदरांवर नियंत्रण ठेवले नाही तर सर्व धान्य उंदीरच साफ करतील. सापांना उंदरांचा कर्दनकाळ समजतात. म्हणूनच साप हा आपला शत्रू नसून तो आपला मित्र आहे, सखा आहे, असे आपण समजले पाहिजे.
सापाच्या विषापासून लस निर्माण करून तिचा वापर सर्पदशांवर तसेच कुष्ठरोगावर, फेफरे, दमा, पाठदुखी यावर औषध म्हणून वापरले जाते. सापाचे रक्त कोड बरे करण्यासाठी सुध्दा वापरले जाते.
जगात सुमारे दोन हजार पाचशे जातीचे साप आहेत भारतात सापाच्या चारशे ते साडेचारशे जाती आढळतात. यापैकी केवळ सत्तर जाती विषारी आहेत. जमिनीवर असलेले चार विषारी साप म्हणजे नाग, फुरसे, घोणस व मण्यार हे होत.
“हायड्रोफीस बेलचरी” हा ऑस्ट्रेलिया जवळच्या समुद्रात आढळणारा साप सर्वात अधिक विषारी म्हणून ओळखला जातो. साप दूध पित नाही.
साप हा मानवासाठी उपयुक्त असला तरी आपल्या मनात सापाबद्दल भीती व तिरस्कार आहे. साप शंभर वर्ष जगतो. परंतु अनेक कारणांमुळे सापाची हत्या झाली त्यामुळे अनेक जाती नष्ट झाल्या आहेत. सापांची संख्या कमी होणे मानवासाठी हानिकारक आहे याची जाणीव पूर्वजांना झाली म्हणून भारतीय संस्कृतीत साप हा देवाचे प्रतिक मानले व “श्रावण शुध्द पंचमीला नागपंचमी” मानून नागाची भक्तीभावाने पूजा करण्याची पध्दत सुरू करण्याची प्रथा सुरू झाली असावी.
साप हा देवाचे प्रतीक आहे ही कल्पना केवळ भारतात नसून जपान, चीन इत्यादी देशांतही रूढ आहे. ‘नागस्तोत्र’ नावाचे स्तोत्र तयार करण्यात आले असून त्यात सापांचे महत्व पटवून दिले आहे.
सापाच्या कातडीपासून कमरेचे पट्टे, पर्सेस, पाकिटे, दिव्यांच्या झडपा इत्यादि शोभेच्या वस्तू बनविल्या जातात. ब्रम्हदेश, चीन इत्यादी देशांत सापाचे मांस खाद्य म्हणून वापरले जाते. माणसाच्या अशा स्वार्थासाठी होणारी सापांची हत्या आपण थांबवली पाहिजे.
साप हे शक्यतो जंगलांत राहतात. सध्या जंगले नष्ट होऊ लागल्यामुळे साप मनुष्य वस्तीत येतात व त्यांची हत्या होते. पर्यावरण प्रेमींनी नागपंचमी हा दिवस सर्प संवर्धन दिन म्हणून साजरा करून ‘मी यापुढे साप मारणार नाही व कोण मारत असेल तर त्यास प्रतिबंध करीन’ अशी प्रतिज्ञा केली तरच सापांचे संरक्षण होईल व माणसाचेही हित साधल्या जाईल.
– लेखन : दिलीप प्रभाकर गडकरी
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
श्री.दिलीप गडकरी यांची सर्पविषयक माहिती अतिशय उपयुक्त.