समाजकार्याचे शिक्षण घेत असताना आणि आचार्य पदवीसाठी अभ्यास करताना अनेक सामाजिक प्रश्नांचे कोडे समोर येत गेले.मी अभ्यासलेल्या बाल समस्यांच्या प्रश्नाच्या जाळ्यात गुंतलेले काही धागे फार त्रासदायक होते. बालहक्कशी निगडित प्रश्न सुन्न करणारे होते.अनेक अश्या झोपडपट्ट्या ज्या बालहक्काच्या मूळ संकल्पनेवर घाव घालणाऱ्या अनेक समस्या निर्मितीचे कारखाने होत्या. त्या वस्त्यांचा जवळून अभ्यास करताना काही केस वर्क म्हणून अभ्यासलेले अनुभव मी मांडते आहे.
इतकुश्या हातांनी, गुलाबी बोटांनी इटूकल्या पिटुकल्या भांड्यात कच्या शेंगदाण्याचा पक्का खेळ तिला सराव करून देत होता, संसार मांडण्याचा. भातुकली खेळताना ती आईची नक्कल करत असे. त्या एवढयाश्या देहात एकाएकी एक गृहिणी शिरून तिच्या हालचालीवर संपूर्ण ताबा घेत असे. तिचं वागणं, बोलणं एका विशिष्ट वलयात गुरफटून जात असे. खडी साखरेसाठी पाय आपटून हट्ट करणारी चिमुकली, कच्या शेंगदाण्याचा स्वयंपाक सगळ्यांना आनंदाने वाढत असे. पण खेळ संपला की ओढणीची साडी फेकून खळखळून हसत क्षणात आपल्या बाल विश्वात निघून जात असे.
हे दृष्य ती निरागस पोर रोज लपून बघत असे. तिची वस्तीतली, मोडलेली आईच्या फाटक्या साड्यांनी कशीतरी थोपवून धरलेली झोपडी आणि इथल्या टुमदार घरा मध्ये एक मोठी दरी होती. जी एकाच समाजातील दोन वेगळ्या विश्वांची ओळख करून देत होती. नाजो साठी घर, संसार ,नाती हे सगळं स्वप्नं होत. या भातुकलीच्या खेळा मधलं घर मिळण्याच स्वप्न बघण्याचा देखील तिला अधिकार आहे की नाही हे पण तिला कोडं होतं.
मळक्या फ्रॉक ची फाटलेली झालर आपल्या छोट्या छोट्या बोटांनी गुंडाळी करत नाजो आपल्या वस्ती कडे वळली. मागे फिरून बघण्याचा मोह तिला आवरेना…ती मुलं आपल्या वेगवेगळ्या खेळत रमली होती.
नाजोचं चित्त मात्र भातुकलीच्या खेळातच अडकलेलं. तिच्या एवढीच ती लहान मुलगी एका क्षणात आईच्या वेषात शिरते आणि दुसऱ्या क्षणी परत लहान होऊन जाते. ती तिच्या डोळ्या समोरून हले ना. नाजोला तिची आई भातुकलीत कुठं दिसेना. बाबांचा पत्ता नव्हताच. लहान बहीण होती जी सदैव तिच्या काखेला अडकलेली असायची. आई काही घरी भांडी धुण्याची काम करायची नंतर कसली तरी पुडी नाकातून ओढत असे आणि पडली राहत असे झोपडीत.बाहेरून आणलेलं किंवा कोणी दिलेलं जेवण दोन भांड्यात पडलेलं असायचं ते कधी तरी खाऊन घ्यायचं आणि लहान बहिणीला काखेत घेऊन वस्तीत फिरत रहायचं. एवढंच काय ते तिला माहिती होत. ती रोज लपून बघत असलेल्या घराचं चित्र तिला कुठेच दिसेना. त्या मुलांनी घातलेले छान छान कपडे, त्यांची खेळणी एकदा स्पर्शून बघावी असं तिला सारखं वाटायचं.
नेहमी सारखी नाजो आज पण मैदान पार करून त्या मुलांचा खेळ बघायला गेली. तिच्याच वयाची सोनल आज नवीन फ्रॉक घालून होती एकदम परी सारखा. आणि सगळी मुलं तिला मध्ये उभ करून हॅपी बर्थडे च गाणं म्हणत होती. मग तिने सगळ्यांना आपल्या लाहन्श्या गुलाबी बॅग मधून चॉकलेट्स दिल्या. नाजोला तर माहिती पण नव्हतं तिचा वाढदिवस कधी असतो. परी सारखी दिसणाऱ्या त्या मुलीची नजर एकाएकी नाजो कडे गेली.आणि नाजो पटकन फुटक्या भिंती आड लपली. पण ती मुलगी नाजो ला बघण्याचा प्रयत्न करू लागली.ती आपल्या घोळक्यातून निघून नाजोच्या दिशेने चालू लागली. ती त्या फुटक्या भिंती जवळ येऊन थांबली ज्या भिंतीने त्या दोघींचे विश्व दोन वेगळ्या भागात विभागले होते. ती नाजोच्या समोर येऊन थांबली. आणि तिला न्हाळू लागली.मग तिने आपल्या बॅग मधले चॉकलेट्स नाजोच्या हातावर ठेवले. आणि फुटकी भिंत ओलांडून परत निघुन गेली. नाजो तळहातावरच चॉकलेट आणि सोनल कडे आळीपाळीने बघू लागली. अशीच तिच्या स्वप्नातल तिच्या हक्काचं चॉकलेट कोणी फुटक्या भिंतीच्या त्या बाजूने येऊन तिला देईल का ?
नाजो ज्या वस्तीत राहत होती ती विस्कळीत, असुक्षित आणि भरकटलेली होती. सगळ्या प्रकारच्या गुन्हेगारीचे माहेरघर होती. तिची आई आणि तश्या अनेक निराधार स्त्रिया आणि मुलांना वाईट मार्गावर नेणारी ही झोपडपट्टी नाजोला कुठल्या अंधारात नेऊन पोहोचवणार होती हे समजून घेणं कठीण नाही.
स्वतंत्र भारतात जिथे मोठ्या प्रमाणात अनेक सकारात्मक आणि रचनात्मक बदल होत आहेत. आधुनिक युगाकडे यशस्वी वाटचाल होत आहे तिथेच भारताचे भवितव्य असणारी ही बालक अश्या असुरक्षित वातावरणात मोठी होत आहेत.जिथून ती भयाण गुन्हेगारीच्या विश्वात जाण्याचं जणू प्रशिक्षण घेत आहेत. इथूनच या अबोध मुली न जाणे कुठं विकल्या जातात. मुलं कधी अश्या घटनांचा भाग बनून जातील ज्यांना गुन्हा म्हणतात. हे त्यांना कळणार पण नाही.
नाजो चॉकलेट घट्ट मुठीत घेऊन तिच्या अर्धवट उघड्या झोपडीत आली. लहान बहीण कोपऱ्यात फणफणत पहुडली होती. आणि तिची आई तीन माणसांशी बोलत होती.मग त्यातल्या एका माणसाने आईला काही पैसे दिले. आईने ते पैसे कमरेला खोचले आणि त्यांच्या सोबत निघून गेली. नाजो ला काही कळेना.कोण ही माणसं ?आईने यांच्या कडून पैसे का घेतले ? आणि आई कुठे आणि का गेली ? या प्रश्नाच्या जाळ्यात अडकून नाजो तिथेच थबकली.
तेवढ्यात लहान बहिणीने तिच्या पायाला हात लावून तिचं लक्ष वेधून घेतलं. नाजो पटकन खाली बसली आणि तिला आपल्या छोट्याश्या अपुऱ्या मांडीवर घेतलं. बारकीच अंग तापाने फणफणत होत. ती जोर जोरात श्वास घेऊ लागली, नाजो घाबरली तिला कडेवर घेऊन ती बाहेर पडली. शेजारी पण कोणी मदत करणार असं नव्हतं.तिला दवाखान्यात घेऊन जाण्यास नाजो एकटीच झपाझप पावलं उचलू लागली.तिच्या काडी झालेल्या नाजुक देहास बारकीचे ही वजन झेपेना. नाजो जरा रस्त्याच्या कडेला थांबली. तोवर, बारकी हलेनाशी झाली. तिचे हात पाय गार पडले होते. नाजो मदतीसाठी इकडे तिकडे बघू लागली. पण कोणी तसं दिसेना. तिला काहीच सुचेना बारकीचे हात पाय ती तळहातांनी घासु लागली. पण बारकी काहीच हालचाल करेना. तिने कसेतरी बारकिला परत उचलले आणि दवाखान्याच्या दिशेने चालू लागली. कशी बशी पोहोचली
तिथे.डॉक्टरांनी बारकीला बघीतलं आणि कोणी मोठं असेल तर बोलवायला सांगितलं.नाजो नी सांगितलं आई कुठं गेली तिला माहिती नव्हतं. नंतर तिला सिस्टर कडून कळलं बारकी अर्धातास आधीच वारली होती. ती एवढीशी पोर आपल्या मृत बहिणीला छातीशी घेऊन दवाखान्यात आली होती. ती प्रेत घेऊन फिरतेय हे तिला कळलं देखील नव्हत. नाजोनी परत बारकीचा निर्जीव देह अंगावर घेतला आणि वस्तीकडे निघाली.
बरकीचा गार देह आणि डोळ्यातून वाहणारं कोमट खारं पाणी यांची सांगड घालत ती झोपडी पर्यंत आली. तिची आई नेहेमी प्रमाणे अर्धवट जाग्या झोपल्या अवस्थेत पडली होती. तिने आईला सांगितलं बारकी मेल्याच, आणि आई म्हणाली, “आता हिला कुठं पुरायचं. “नाजो आपल्या आईच्या डोळ्यात अश्रू शोधत होती, पण त्या दगडी डोळ्यात फक्त कोरडेपणा होता….
आज १५ अगस्त स्वतंत्र दिवस…एका फाटक्या पिशवीत आपले दोन तीन ठिगळ लावलेले, झालर फाटलेले फ्रॉक भरून नाजो निघाली होती. काळोखाच्या मैदानातून फुटकी भिंत पार करून ती परत त्या मुलांना न्हाळत होती, ती मुलं स्वतंत्र दीन साजरा करत होती, आपल्या नाजूक हातांनी राष्ट्रध्वज उंच फडकवला होता त्यांनी….आणि नाजो तिच्या फाटक्या पिशवी सोबत तिचं भरकटलेलं बालपण सुरक्षित करण्याची मागणी करत होती या सक्षम, स्वतंत्र देशाच्या यंत्रणेला…..

– लेखन : डॉ.राणी खेडीकर, बालमानस तज्ञा
अध्यक्षा: बालरक्षक प्रतिष्ठान महाराष्ट्र
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800