देशाला माता मानून तिच्या स्वातंत्र्यासाठी अनेक जणांनी प्राणार्पण केले. सत्याग्रह झाले. देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले.
भारतासारख्या देशामध्ये सर्वात मोठी लोकशाही अवतरली. रहाणे, बोलणे, शिक्षण, नोकरी साऱ्या गोष्टींचे स्वातंत्र्य ! काही काळ समाजाला निर्भरतेची झिंग आली. आत्मविश्वास वाढला. पण तो सुखी झाला कां ?
पुराणकाळी स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेल्या स्त्रीवर जगभर बंधने वाढली. स्तुती केवळ सौंदर्याची, अपेक्षा अपार कष्टांची आणि सुगृहिणी, माता या अदृश्य बेड्यांनी (खरं तर चूल आणि मूल) पार बांधून टाकली.
किती वर्षे तिलाच याची जाण नाही, हेही दुर्दैवच ! पण तिच्या शिक्षणासाठी अडथळे, नकार येऊ लागल्यावर ती जागी झाली, सजग झाली. अखेर स्त्री ही स्वतंत्र जाहली. एकही क्षेत्र असे नाही राहिले की तिथे ती नाही !! आई -वडिलांनीच ठरविलेल्या वधूशी /वराशीच लग्न करण्याची परंपरा कित्येक वर्षे !
जग रहाटीप्रमाणे मुलांना जन्म देणे, जवळपासच्या शाळेत घालणे, पदवीधर होऊन त्याने /तिने ही लग्नबंधनात अडकणे, रीतसर संसार सुरु करणे… हेच जीवनाचे इतिकर्तव्य ! यातून बाहेर पडून, आई-वडिलांनी सांगितलेल्याच शाखेत शिक्षण घेऊन पदवीधर होणे. पण ही परंपरा मोडून आज मुले /मुली स्वतःला हवे तेच शिक्षण घेण्यास सिद्ध झाली आहेत. हे स्वातंत्र त्यांना त्यांच्या पालकांनी स्वखुशीने, स्वखर्चाने बहाल केले.
तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले. भ्रमणध्वनी मुळे जग मुठीत आले. घर बसल्या सर्व माहिती मिळू लागली. खरेदीही त्यावरच ! स्वस्त विमानसेवा, जगभ्रमण याने लहान बालकापासून वयोवृद्धांपर्यंत सारे आत्मविश्वासपूर्वक वागू, बोलू, फिरू लागले. आता माणूस पूर्णपणे स्वतंत्र झाला असे वाटू लागले. खरेच झाले कां असे ? की तो ही आभास ?
पूर्वीही घड्याळे होती पण आता तीन वर्षांच्या बालकापासून सारेजण घड्याळाचे गुलाम झाले. शिक्षण, क्लास, नोकरी, धंदा… सारे काही घड्याळाच्या तालावर. पैसा हवा जगण्यासाठी, सुखसोयींसाठी. पाच दिवस राब राब राबायचे नि आठवड्याची अखेर मनाप्रमाणे, अगदी स्वतंत्रतेने “एन्जॉय” करावयाची ! येथे कुटुंब अधिकच दुरावले जात आहे. एकत्र कुटुंब कधीच लोपले पण आता नवरा नि बायको इतकेच. मूल १२ वी पर्यंतच. त्याचेही स्वतंत्र विश्व फारच लहान वयापासून ! नंतर तर शिक्षणासाठी जगाच्या पाठीवर कोठेही, मग नोकरी अन् संसारासाठी पूर्ण स्वातंत्र आणि स्वातंत्र व स्वैराचाराच्या मधील भिंती पडल्या. आता फक्त पुसट रेषा राहिल्या.
व्यक्तिस्वातंत्र्य! कोणी कोणाला कुठे, कधी जाणार विचारायचे नाही. यातून उत्तम संगतीने चांगले नागरिक घडतात आणि वाईट संगतीने स्वतःची अधोगती करतात. ‘सातच्या आत घरात’ सारखे सिनेमे काढायची वेळ आली अन् “वाजले की बारा, जाऊ द्या ना घरी” हेही ऐकू येऊ लागले..
स्त्री मुक्तीसाठी लढा दिलेल्या स्रिया आज ७५/८० वर्षांच्या झाल्या आहेत आणि नवीन पिढीच्या स्वातंत्र्याच्या कल्पनांमुळे एकट्या पडल्या आहेत. दिवसेंदिवस वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे. स्वातंत्र्य पाहिजे म्हणून लग्नापूर्वीच मुलगी ठरविते, नाही रहायचे सासू सासऱ्यांबरोबर !
पूर्वी मुले वडिलधाऱ्यांसमोर व्यसने करायला धजावत नसत, आज बाप-बेटेच काय त्यांच्या बायकाही “चियर्स” करायला तयार ! लहान मुले हेच बघत मोठी होतात.
फक्त एकट्याचा /स्वतःचा विचार करायचा… इतकं स्वातंत्र्याचे टोक गाठलंय अन् हवे ते नाही मिळालं की फटकन आत्महत्या करायची. मागचा पुढचा, कुटुंबाचा विचार न करता जीव द्यायचं हे स्वातंत्र्य !!
आणि अशा प्रकारची विविध स्वातंत्र्ये उपभोगताना खरंच माणूस स्वतंत्र झालाय ? निदान स्वतःपुरता तरी ?
खरं तर छोट्या छोट्या गोष्टींपासून मोठ्या प्रकल्पापर्यंत टेक्नॉलॉजीचा गुलाम झालाय. घरी-दारी, कोठेही पहा, जो तो मोबाईलमध्ये डोकं घालून. घरात चारजणं असतील तरी चार बेटांवर असल्याप्रमाणे. तेच नव्हे सारी दुनिया आज गुगल, फेसबुक, व्हाट्सअॅप चे गुलामच नाहीत कां ?

– लेखन : नीला बर्वे, सिंगापूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ, +91 9869484800