केरळी साहित्य
भारतातल्या इतर भागापासून एका बाजूला असल्यामुळे केरळमध्ये स्वतःची अशी एक खास संस्कृती जपली गेली आहे. जलमार्गाने येणार परदेशीय इथेच स्थायिक झाल्यामुळे विविध प्रकारच्या धर्म आणि संस्कृती यांच्या संगमामुळे केरळची विशेष संस्कृती निर्माण झाली आहे त्याची थोडीफार झलकही इथल्या साहित्यात दिसून येते.
मलयाळम भाषा द्राविडी प्रकारात येते. तमिळ आणि संस्कृत या दोन्ही भाषांचा प्रभाव मलयाळम भाषेवर होता /आहे. साधारण नवव्या शतकानंतर मलयाळम ही स्वतंत्र भाषा म्हणून उदयास येऊ लागली. स्वातंत्र्य पूर्व काळात कोचीन आणि त्रावणकोर राज्यांचे राजे वाङ्ममय, कलेचे आश्रयदाते होते.
१ नोव्हेंबर १९५६ रोजी केरळच्या भाषिक राज्याची स्थापना झाल्यावर साहित्याला उत्तेजन देण्याचे कार्य केरळ साहित्य अकादमीने सुरु केले. संपूर्ण राज्यात साहित्यिक उपक्रम होत असतातच पण केरळच्या बाहेर, देशात आणि परदेशातही मलयाळी लोकं साहित्य विकासाबाबत महत्वाची भूमिका पार पाडत असतात.
प्राचीन कालखंड
प्राचीन काळी साहित्यात पद्यलेखन, गद्यलेखन यापैकी पद्यलेखन जास्त प्रभावी होते. त्याचे तीन प्रकार येतात.
१ – लोकगीते, २ – पाट्टू, ३ – मणिप्रवाळम
१ – लोकगीत
प्राचीन काळापासून जीवनातील विविध पैलुंचे दर्शन घडविण्यासाठी लोकगीतांचा वापर झाला आहे.
उत्तर मलबार मधील मुस्लिमांची माप्पीळपाट्टू लोकगीतेही अतुलनीय आहे.
२ – पाट्टू
रामायणाच्या युद्धकांडावर आधारित बाराव्या शतकातील रामचरीत हा महत्वाचा ग्रंथ. वीरररस, भक्तीभाव यांचे रेखाटन यामध्ये कौतुकास्पद आहे.
निरणम ग्रंथ – राम पणिक्कर, माधव पणिक्कर आणि शंकर पणिक्कर एकाच कुटुंबातील तीन कविंच्या ग्रंथाना निरणम ग्रंथ म्हटले जाते.
राम पणिक्कर यांनी रामायण, महाभारत, भागवत यांचे मलयाळम मध्ये रूपांतर केले आहे.
माधव पणिक्कर यांनी भगवदगीता आणि शंकर पणिकर यांनी महाभारताचे रूपांतर भारतमाला या ग्रंथात केले आहे. चौदाव्या – पंधराव्या शतकांतील या कवींच्या ग्रंथात शब्दालंकार, अर्थालंकार यांचा वापर आणि विविध रस भावना यांचे कौशल्य दिसते.
राम कथा पाट्टू अय्यपिळा या लेखकानी लोक साहित्य परंपरेतील उत्कृष्ट महाकाव्य लिहिले आहे. तमिळ, मलयाळम, संस्कृत तिन्ही भाषेचे मिश्रण करून वाल्मिकीच्या आधारे स्वतःच्या रामायणाची रचना केली. मुख्य घटनेच्या कथा अत्यंत कौशल्याने गुंफत मलयाळम मध्ये अपूर्व साहित्यकृती निर्मिली आहे.
३ – मणिप्रवाळम
पाट्टू बरोबर मणिप्रवाळम हा एक साहित्य प्रकार होता. यात संस्कृत आणि मलयाळमचे मुक्त मिश्रण केले जायचे.
वैशिकतंत्रम तेराव्या शतकात गणिकांची कला आणि कसब या विषयी हे पुस्तक एका अज्ञात लेखकाने लिहिले आहे. दैनंदिन जीवनातील गोष्टींनी चित्रात्मक उपमांनी भरलेले हे पुस्तक आहे.
प्रारंभीची चंपू काव्य ( गद्य पद्य मिश्रित काव्य )
प्रारंभीच्या मणिप्रवाळ काळात अज्ञात लेखकांची तीन चंपू काव्ये आढळतात.
उणिण्यच्चीतचरितम्, उणिणच्चिरचरितम् आणि उणिणयाटीचरितम् ही ती तीन चंपूकाव्ये होती. विख्यात गणिकांच्या स्तुतीप्रित्यर्थ ही काव्ये लिहिली गेली आहेत. अनामिक कविंनी शृंगार रसाचे विविध पैलू सुंदर रीतीने प्रकट केले आहेत.
संदेश काव्य
कालिदासाच्या मेघ संदेशावर बेतलेली अनेक काव्ये मलयाळम मध्ये आहेत. मध्ययुगीन कालखंड १५/१६ व्या शतकात मलयाळम साहित्याचा विकास झपाट्याने झाला. कृष्णगाथा या काव्य रूपाने मलयाळम भाषेला आदर्श रुप प्राप्त झाले. पण आधुनिक मलयाळमचे जनक मानले जाते ते एळूत्तच्चन यांना. संस्कृत शब्द आणि मलयाळम शब्द यांच्या मिश्रणाणे एका काव्यशैलीचा विकास झाला. याचे श्रेय एळूत्तच्चन यांना जाते.
त्यांनी आपल्या कवितांसाठी किळीपाट्टू नावाच्या द्राविड वृत्ताचा वापर केला आहे
आट्टकथा
सतराव्या शतकात कथकली नावाचा दृश्यकलेचा नवीन प्रकार उदयास आला. हा प्रकार रंगभूमीवर सादर करण्यासाठी लिहिलेल्या संगीतिकेच्या पुस्तकांना आट्टकथा म्हणतात.
वेणमणी संप्रदाय शुद्ध मलयाळमचे समर्थक म्हणून वेणमणी संप्रदायची सुरुवात झाली. मलयाळम भाषेची एक लौकिक शैली विकसित करण्यासाठी त्यांनी बोली भाषेतील अनेक शब्द वाक्प्रचार साहित्यात आणले.
आधुनिक कालखंड
एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी मलयाळम मध्ये नवे पर्व सुरु झाले. पद्मनाभ कुरूप यांनी मलयाळमधले पहिले महाकाव्य लिहिले. इथून पुढे मलयाळम स्वछंदपणे उत्कृष्ट रीत्या प्रवाहात आली.
तर मंडळी,अशा केरळच्या अशा थोर साहित्यात रुची घेणार ना ?
– लेखन : सौ.मनिषा दिपक पाटील, पालकाड, केरळ.
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800