महिला कोठेही कमी नाहीत हे त्यांनी नेहमीच त्यांच्या कर्तृत्वाने व हुशारीने सिद्ध केले आहे व आज ही करत आहेत.
अशाच एक आदर्श शिक्षिका, उत्तम निवेदिका, सक्रिय समाजसेविका म्हणून कार्यरत असणाऱ्या पुण्याच्या स्मिताताई धारूरकर ह्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःचे नाव कोरले व समाजात स्वतंत्र ओळख निर्माण केली.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर हे स्मिताताईंचे मूळ गाव. त्यांचा जन्म २० फेब्रुवारी १९७८ चा. त्यांचे आजोबा अण्णा कासार यांनी त्या काळात जन सामान्यांची सेवा करत खूप काम केले. त्यांचा पंचक्रोशीतील कार्यात सक्रिय सहभाग असे आणि सर्वांसाठीच ते आदर्श व्यक्तिमत्व होते. त्यांची ओळख सांगायला स्मिताताईंना अभिमान वाटतो व त्यांचे अनेक गुण हे आपल्यात आहे, असे त्यांना वाटते.
लहानपणापासून हुशार असलेल्या स्मिताताई ह्यांना अभ्यासाची खूप आवड होती. त्यांचे बारावी पर्यंतचे शिक्षण इंदापूर येथे झाले. प्रतिकूल परिस्थितीत १९९७ शारदा नगर, बारामती येथून त्यांनी बी एड केले. दुसऱ्याच वर्षी १९९७ मध्ये त्या पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. हा त्यांच्या आयुष्यातील जणू टर्निंग पॉईंट होता कारण त्या आता स्वावलंबी झाल्या, सक्षम झाल्या. त्यानंतर २००४ मध्ये त्या पुणे महानगरपालिकेच्या शाळेत रुजू झाल्या.
मनुष्य आयुष्यभर शिकतच असतो. मुलांना शिकवता, शिकवता त्यांच्याकडून देखील अनेक गोष्टी शिकत असतो. लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असले म्हटले जाते. कारण मुलं अतिशय निरागस, प्रेमळ, निस्वार्थी व निर्मळ मनाची असतात आणि मुलांमधील सकारात्मक गुण, त्यांच्यातील ऊर्जा आपल्याला सदैव प्रसन्न ठेवते असे त्या म्हणतात.
इंदापूर येथे त्या कार्यरत असतानाच ज्या दिवशी पुणे जिल्हा विकास समितीचे पदाधिकारी आदरणीय राजेंद्रजी अचलारे, माननीय रमेशजी जुन्नरकर, इंदापूर येथे आले असताना त्यांची भेट झाली. तो त्यांच्या मते सामाजिक वाटचालीचा पहिला दिवस होता. तेथुनच त्यांच्या सामाजिक कार्याची खऱ्या अर्थाने सुरवात झाली असे त्यांना वाटते. त्या दिवशी माननीय राजेंद्रजी अचलारे ह्यांनी स्मिताताईंना उकृष्ठ निवेदन केल्याबद्दल सर्वांसमोर १०१ रुपये बक्षीस देऊन जो सन्मान केला तो त्यांच्यासाठी एक अविस्मरणीय क्षण होता. मोठ्यांनी केलेलं कौतुक, दिलेले प्रोत्साहन मनुष्याला खऱ्या अर्थाने घडवते. त्याच्यातील आत्मविश्वास जागरूक करते असे त्या आवर्जून सांगतात. वेळीच मिळालेल्या शाबासकीमुळे त्यांच्यातील कला गुणांना वाव मिळाला, न्याय मिळाला व समाजात एक नवीन ओळख व आदराचे स्थान देखील लाभले.
पुढे, पुणे येथे आयोजित होणाऱ्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग वाढला. वधू वर मेळाव्यात सुत्रसंचलनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली व त्यांनी ती चोख निभावली.
त्यानंतर त्यांनी इंदापूर तालुक्यात संघटन सुरू केले. लहान मुलांपासून ते मोठया पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले व त्याला उत्तम प्रतिसाद लाभला.
कामाविषयी असलेला प्रामाणिकपणा, हुशारी, विविधता, सर्वांना संघटित करण्याचे सामर्थ्य, मनमिळाऊ स्वभाव, धाडसी वृत्ती असल्याने २०१५ साली पुणे जिल्हा विकास समिती महिला कार्याध्यक्ष या पदासाठी स्मिताताईंची नियुक्ती करण्यात आली.
त्यानंतर २०१६ मध्ये सिहंगड गृपच्या माध्यमातून त्यांच्या सामाजिक कार्याची जोरदार सुरवात झाली. सामाजिक कार्य करत अनेक कार्यक्रम घेत, सर्वांच्या मदतीने कार्यक्रमाचे उत्तम नियोजन होत असते. त्यामुळे सिहंगड रोड परिसरातील संघटन सर्वांच्या सहकार्याने उत्तम होत गेले.
त्यांच्या ह्या उत्तम कार्याची दखल घेत पुणे जिल्हा विकास समितीच्या त्या अध्यक्ष झाल्या आणि मध्यवर्ती महिला मंडळाचे कार्यअध्यक्ष पद त्यांना दिले गेले. कुटुंबाची व समाजाची मोलाची साथ असल्याने हे शक्य होऊ शकले असे त्या आवर्जून सांगतात. समाज हेच त्यांचे दुसरे कुटुंब आहे व समाजात कार्यरत रहायला त्यांना फार आवडते. त्यामुळे आत्मिक समाधान व आनंद मिळतो असेही त्या सांगतात.
एकीकडे शिक्षिका म्हणून ही त्यांचे उत्तम काम सुरू आहे. महिला व मुलांसाठी विविध स्पर्धा आयोजित करणे, विविध शिबिरांद्वारे मार्गदर्शन करणे, त्यांच्या कला गुणांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, ज्यामुळे त्यांच्यातील विविध कलागुणांना वाव मिळेल , नवीन ओळखी ही निर्माण होतील, यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात.
शैक्षणिक क्षेत्रात वेगळेपणा दाखवत त्यांच्या स्वतःच्या शाळेत एक छानसा आदर्श वर्ग तयार करावा या इच्छेने शाळेच्या मदतीने आणि शिक्षण अधिकारी तसेच शिक्षक सहकारी यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने एक मॉडेल क्लास तयार केला. याची शाबासकी म्हणून पुणे महानगर पालिका शिक्षण विभागाने पुरस्कार देत त्यांना सन्मानित केले आहे.
मॉडेल क्लास म्हणजे नक्की काय ? हे विचारल्यावर त्यांनी सांगितले, “मॉडेल क्लास हा पाच गोष्टीवर आधारित तयार केला आहे. यासाठी वर्गाच्या चार भिंती आणि फरशी अशा पाच जागांचा उपयोग केला आहे.
१) फरशीवर रचनावादी अध्ययन कृतींची रचना केली.
२) एक भिंत चित्रमय करून आकर्षक पण अभ्यासू केली.
३) एक भिंत टेक्निकल साठी म्हणून तेथे टीव्ही जोडला.
४) एक भिंत शिक्षकाने तयार केलेले साहित्य लावण्यासाठी, जे विषयनिहाय रोज बदलता येईल.
५) एक भिंत विद्यार्थ्यांनी तयार केलेले वेगवेगळे साहित्य प्रदर्शन करण्यासाठी.
अशी ही आधुनिक मांडणी म्हणजे मॉडेल क्लास.ही रचना त्यांनी तयार केली पण त्या वर्गात शिकवण्याची संधी त्यांना मिळाली नाही. कारण त्याच वर्षात सहयोगी दल प्रकल्पात त्यांची निवड झाली.
स्मिताताईंना गायन, वाचन आणि लेखनाची आवड आहे. त्या उत्तम कविता ही करतात. त्यांनी साहित्यिक गृप आणि आर्टिस्ट ग्रुपची देखील स्थापना केली आहे. यामुळे लेखकांना आणि कलाकारांना एक हक्काचे व्यासपीठ मिळाले. त्यांचे हेही काम अतिशय जोमाने चालू आहे.त्यामुळे ह्या कलावंतांची समाजात एक वेगळी ओळख होऊन त्यांची प्रगती होते, त्यांच्यातील कलेला न्याय मिळतो व व्यासपीठ उपलब्ध झाल्यामुळे संधी ही लाभते व प्रसिद्धीही मिळते.
उत्तम व उल्लेखनीय सामाजिक व शैक्षणिक कारकीर्द असल्याने स्मिताताईं अनेक पदांवर कार्यरत आहे. जसे की पुणे महानगरपालिकेत सहयोगी दल प्रकल्पात कार्य, तज्ञ मार्गदर्शक म्हणून शिक्षक प्रशिक्षणात सहभाग, मॉडेल क्लास निर्मिती व सिंहगड ग्रुप अध्यक्ष, महिला अध्यक्ष मध्यवर्ती मंडळ, सल्लागार आळंदी देवस्थान, कार्यकारी संपादक ,समाजोन्नती मासिक,
माजी अध्यक्ष पुणे जिल्हा विकास समिती, महाराष्ट्र कला साहित्य कोअर कमिटी इत्यादींच्या त्या सदस्य आहेत.
जेव्हा त्यांना विचारले की तुम्ही महिलांना कोणता संदेश देऊ इच्छिता ? त्यावर त्यांनी अतिशय सुंदर उत्तर दिले. त्या म्हणाल्या, महिला ही केवळ कुटुंबच एकत्र करते असे नाही तर समाज देखील एकत्र करण्यात तिचा मोलाचा वाटा असतो. त्यामुळे महिलांनी कौटुंबिक जबाबदारी बरोबर समाजासाठी देखील वेळ देऊन आपले अस्तित्व निर्माण करावे, नवीन ओळखी निर्माण कराव्यात व समाजाला एकत्रित करून समाजाची प्रगती साधावी. कारण जेव्हा समाज एकत्र येतो तेव्हा सर्वांची प्रगती होत असते. सर्व महिलांना संघटित करणे हाच त्यांच्या जीवनाचा उद्देश आहे, हेच एकमेव स्वप्न आहे.
अशा ह्या स्मिताताई ज्या समाजाला आपले कुटुंबच समजतात, त्यांनी जणू समाजाला वाहून घेतले आहे. आधुनिक व नवनवीन उपक्रमांनी समाजाला एकत्र करण्याचा जणू त्यांनी हा ध्यास घेतला आहे आणि हेच त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट आहे.
अशा ह्या आधुनिक विचार करणाऱ्या प्रयत्नवादी, आशादायी, कल्पक, कष्टाळू, प्रसन्न, हसतमुख, मनमिळाऊ, महिलांच्या प्रेरणास्थान असलेल्या सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्वाला प्रणाम. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा व त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ह्याच सदिच्छा.
लेखन : रश्मी हेडे.
संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.