पाउस 🌨आणि हिरवाई 🍀 याचं एक अतूट नातं आहे…….
पावसाळा म्हटलं की सगळं कसं हिरवं गार होतं . हरताळकेच्या आधी मुलींचं आवरण असतं तेव्हा कशी आई आपल्या मुलीला 👧🏻 प्रेमाने न्हाउमाखु घालते, तीचं छान आवरते. तसच काहीसं हा पहिला पाउस येतो आणि सृष्टीला छान न्हाउमाखु घालतो.
सगळीकडे कसं चैतन्य सळसळू लागतं. झाडांवरची धूळ सगळी स्वच्छ होते आणि सारी झाडं कशी छान आवरलेल्या बाळासारखी गोजिरी दिसू लागतात.
पानापानांवर पावसाचे तुषार घरंगळु लागतात. एक अनोखा स्पर्श त्यांना सुखाउन जातो. फुलांच्या 🌼🌸 गालीही हे बिंदु फार सुरेख दिसतात. जवळपासचे उघडेबोडके डोंगर कसे हिरवी शाल पांघरतात जणु. कोवळ्या कोवळ्या गवताची लव्हाळी 🌾नदीकाठी , डोंगरकपारीत सर्वत्र दिसु लागतात.
एका वेगळ्याच प्रसन्नतेचा शिडकावा साऱ्या अवनीवर होतो.
सर्व सृष्टीप्रमाणेच तनामनावर आलेली सारी मरगळ झटकली जाते. आकाशात मेघावली दिसली की मोरही पिसारा फुलवुन नाचू लागतो. सारी सृष्टी जशी या शिडकाव्याने शांत होते. तप्त जमिनीची आग शांत होते. तसच काहीसं मनाचंही होतं .
पावसाच्या आगमनाने मनामध्येही हिरवाई फुलू लागते.
घट्ट बिलगुन पाखरंही तारेवर बसतात तशी कुणीतरी दोघंही आपल्या मनाची, नवलाईची, हिरवाई जपत चिंब चिंब होउन जातात. 👩❤️👨
पावसाच्या आगमनाने हिरवीगार शेतं 🌾🌾झुलू लागतात ती पाहुन शेतकऱ्यांची मनं सुद्धा हिरवीगार होऊन जातात. बांधाबांधावर नेच्याचे हिरवे अंकुर 🌿 उमलु लागतात. जणु परमेश्वराच्या कुंचल्यातुन सर्वत्र हिरवाईच्या विविध छटा रंग घेऊ लागतात.
सृष्टीचं चित्र हळुहळु उमलु लागतं. जमिनीमध्ये पहुडलेल्या कोंबाकोंबातुन हिरवे धुमारे फुटू लागतात. नवसृजनाची चाहुल सर्व सृष्टीमध्ये भरुन राहते.
असंच काहीसं वाग्देवीचा पाउस झरू लागला की भाषेलाही हिरवाई चढते अन् साहित्याचा 📗 मोर कधी थिरकु लागतो कळतही नाही आणि हा पाऊस जसा जसा आपण शोषु लागतो तसा तसा मनमोरही 🦚 एका वेगळ्याच आनंद तरंगावर डोलु लागतो.
हाच पाऊस कवी, लेखक, चित्रकार या साऱ्यांच्या मनात कलेची हिरवाई फुलवु लागतो. प्रत्येकाच्या प्रतिभेला नवोन्मेषाचे धुमारे फुटू लागतात. गायकाच्या गळ्यातुन हि हिरवाई मल्हाराचे रुप घेऊन येते.
एखाद्या गृहिणीच्या मनातली ही हिरवाई एखादा गरम पदार्थ घेऊन येते आणि तो खाऊन तृप्ततेची हिरवाई घरच्यांच्या चेहऱ्यावर विलसु लागते.
प्रत्येकाचा पाऊस वेगळा पण हिरवाईची भावना मात्र सारखीच असते. मनामनांत ना.धो. महानोरांचं हेच गाणं येत असावं हे नक्की .☺️🍀🍀🍀🍀
नभ उतरु आलं
चिंब थरथरवलं
अंग झिम्माड झालं
हिरव्या बहरात
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

– लेखन : शिल्पा कुलकर्णी, अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ +91 9869484800
सुंदर लेख. खरंय, पावसामुळे लेखक, कवी, चित्रकार, गायक सर्वांच्या मनांत हिरवळ उमलते. 👌👌👌
धन्यवाद लिना ताई !
शिल्पा, लेख खूप छान आणि चित्रे सुंदर, समर्पक