सुजाता कोंडीकिरे ही तरुणी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ (पूर्व) शाखेत अधिकारी आहे. तिच्याकडे सध्या स्टेट बँकेच्या (SBI) व्यवसाय वृद्धीची जबाबदारी आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात तिने एसबीआय लाईफचा ५० लाख रुपयांचा तर २०१९-२० या वर्षात १ कोटी रुपयांचा व्यवसाय करून तिला दिलेले उद्दिष्ट साध्य केले. स्वतःच्या कर्तृत्वावर तिने अंबरनाथ येथे बँकेचे गृहकर्ज काढून फ्लॅटपण खरेदी ही केला. हे सर्व वाचून आपल्याला असं वाटेल की, यात काय मोठंसं ? किती तरी मुलं मुली असं सर्व करून दाखवतात. तिने केले तर काय विशेष ? पण सुजाताने जे काही करून दाखवले आहे, ते विशेषच आहे. कारण तिने तिच्या पूर्ण अंधत्ववावर, अंधत्वाने आलेल्या नैराश्यावर मात करत हे यश मिळवले आहे. जाणून घेऊ या, अंध सुजाताची डोळस कहाणी….
सुजाता कोंडीकिरे हिचे वडील बाळासाहेब पोटापाण्यासाठी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील शिंगणापूर हे गाव सोडून अंबरनाथ येथे आले. एका कम्पनीत ते काम करू लागले. आथिर्क परिस्थिती जेमतेमच होती. पण त्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले होते. नातेवाईकांचं म्हणणे न ऐकता त्यांनी तिन्ही मुलींना व मुलाला उच्च शिक्षण दिले. सुजाताचे प्राथमिक शिक्षण अंबरनाथ येथील भगिनी मंडळ शाळेत तर माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालयात झाले. घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे सुजाताला अकरावी साठी सांगली येथे मावशीकडे जावं लागलं. तिथे एकदा पहाटे फिरताना अंधारात तिला मोठे झाड लागले. क्षणार्धात तिच्या डोळ्यापुढे अंधार पसरला. तिची दृष्टी गेली. डोळे चांगले होते पण डोळ्यांपासून मेंदूला दृश्य पोहोचवणारी नस खराब झाली होती.
आईने सुजाताला जगण्याचं बळ दिले –
त्यानंतर २ महिने उपचार घेतल्यावर तिला परत दिसू लागले. सुजाताने २००२मध्ये अर्थ शास्त्र विषयात बी ए पदवी मिळवली. तिला बी एड करायचं होतं पण बिकट आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य झाले नाही. तिने एका खाजगी कंपनीत पॅनेल असेंम्बलिंगचे आणि स्टोअर किपरचे काम मिळवले. पैसे वाचवून तिने बी एड करायचे ठरवले होते. पण २००५च्या अखेरीस तिची दृष्टी पुन्हा जाऊ लागली. त्यामुळे तिला ते काम सोडावं लागलं. २७व्या वर्षी तर तिची दृष्टी पूर्णपणे गेली. तिला काहीच करता येणं अशक्य झाले. अशावेळी मदत करायचे सोडून नातेवाईक मात्र ” तू अंध झाल्याने ,आता काही करू शकणार नाहीस, घरच्यांवर बोजा बनून जगण्यापेक्षा जीव दे” असे सरळ सांगायचे. सुजाताचाही धीर खचून तिच्या डोक्यात जीव देण्याचे विचार यायचे. ती आईला सारखी म्हणायची ,मला विष आणून दे, मी मरून जाते, मला जगायचं नाही म्हणून . पण तिची आई तिला सतत धीर द्यायची. आईने सुजाताला जगण्याचं बळ दिले.
डॉ. गौतम जटाले यांच्याकडे तिने मानसोपचार घेतले. त्यांनी तिला तिचे अंधत्व स्वीकारण्यास तयार केले. पुढे, सुजाता मुंबईतील वरळी येथील नॅशनल स्कुल ऑफ ब्लाइंड या संस्थेत ब्रेल लिपी शिकली.तिथे तिने संगणक प्रशिक्षण घेऊन एम एस सी – आय टी हा अभ्यासक्रम पूर्ण केला. अंधांसाठी असलेल्या संगणक प्रणाली आत्मसात केल्या. तिथे तिला विविध स्पर्धा परीक्षांची माहिती मिळाली. दिवसरात्र अभ्यास करून स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचेच असा निर्धार तिने केला होता. ३ वर्षे ती महाराष्ट्र लोकसेवा आयोग, स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि बँकेच्या स्पर्धा परीक्षा देत राहिली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर निरीक्षकाच्या पहिल्या परीक्षेत ती उत्तीर्ण झाली. पण दुसऱ्या परीक्षेचे पत्र तिला ती परीक्षा झाल्यावर मिळाल्याने ती संधी हुकली. पण ती निराश झाली नाही. परीक्षा देत राहिली. अंतिमतः २०१५ मध्यें तिची निवड स्टेट बँक ऑफ म्हैसूर मध्ये झाली.
सुजाताने दृष्टी नसल्याने सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यास रेडिओ आणि विविध वृत्त वाहिन्यांचे कार्यक्रम ऐकुन केला. तसंच वरळीत तिला शिकवायला येणारे संजय मोरे सर, भरत पांडे सर तिला दूरध्वनीवरून मार्गदर्शन करत. सुजाताची आई,सुजाता सांगेल त्या प्रमाणे नोट्स लिहून घ्यायची. अभ्यासात सतत सुजाताला सोबत करायची. सुजाताच्या वडिलांना २०११ मध्ये अर्धांगवायू झाला. त्यामुळे ते काही नोकरी,व्यवसाय करू शकत नव्हते. तिच्या बँकेच्या परीक्षेदरम्यान त्यांचं निधन झालं. अशा दुःखी परिस्थितीत तिने बँकेची लेखी परीक्षा दिली. परीक्षेचा निकाल लागला. त्यात ती उत्तीर्ण झाली. बँकेच्या मुख्यालयात तिची मुलाखत झाली. नेटवरून तिची निवड झाल्याचे तिला कळाले, त्यावेळेस तिचा विश्वासच बसेना. त्या वर्षी पूर्ण भारतात ७ अंध निवडल्या गेले होते. त्यात सुजाता एकमेव मुलगी होती. त्यात महाराष्टातूनही निवडल्या गेलेली ती एकमेव उमेदवार होती.
सुजाता २०१५ मध्ये बँकेच्या डोंबिवली शाखेत रुजू झाली. अतिशय सक्षमपणे ती आपली सेवा बजावत आहे. मिळालेल्या यशावर समाधान न मानता आता तिची पुढील पदोन्नतीच्या परीक्षेची तयारी सुरु आहे. सुजाताने एक धाडसी निर्णय घेतला आहे. तो म्हणजे,तिला जरी यापुढे दिसू शकणार नाही, म्हणून तिचे डोळे दान करण्याचं तिनं ठरवलं आहे. मार्च २०१७मध्ये मनीष राजपूत या डोळस तरुणाशी तिचा थाटामाटात विवाह झाला. डोळ्यांचे डॉक्टर सोनल शहा, मानसोपचार तज्ञ डॉक्टर गौतम जटाले,वडिलांच्या आजारपणात व मृत्यूनंतर साथ देणारी बहीण ज्योती,तिचे पती संजय भंडारे यांच्याविषयी सुजाता खूप कृतज्ञता व्यक्त करते. अंधारातुन प्रकाशाकडे निघालेल्या सुजाताला भावी वाटचालीसाठीं मनःपूर्वक शुभेच्छा.
– देवेंद्र भुजबळ.9869484800.