स्मिता भागवत लिखित ‘क्रांतिवीराच्या सुरस चित्तरकथा‘, माधवी कुंटे लिखित ‘ज्ञात-अज्ञात‘ कादंबरी, लता गुठे लिखित ‘मन सैरभैर मात्र‘ तर प्रशांत राऊत लिखित ‘आनंद नांदे अंतरी‘ या भरारी प्रकाशनच्या 4 पुस्तकांचा प्रकाशन सोहळा, स्वातंत्र्य दिनी अत्यन्त थाटात झाला.
मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉक्टर स्नेहलता देशमुख, आमदार पराग आळवणी, कवी प्रसाद कुलकर्णी, यांच्या शुभ हस्ते या पुस्तकांचे प्रकाशन झाले.
क्रांतिवीरांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या जीवन प्रवासावर आधारित पुस्तके भरारी प्रकाशन दरवर्षी प्रकाशित करत आहेत, ही फारच स्तुत्य गोष्ट आहे असे डॉ. स्नेहलता देशमुख अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या. “आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत त्यामागे अनेक क्रांतिविरांचे बलिदान आहे ते विसरुन आपल्याला चालणार नाही. प्रकाशिका लता गुठे यांनी प्रत्येक वर्षी 15 ऑगस्टला क्रांतिवीरांवरील पुस्तकं प्रकाशित करण्याचे व्रत घेतलं आहे त्याला सर्वांनी पाठिंबा देऊन जास्तीत जास्त वाचकांपर्यंत व आजच्या तरुण मुलांपर्यंत ही पुस्तके पोहोचली पाहिजेत हीच खरी समाजाची देशाची सेवा आहे.” असे श्री पराग अळवणी त्यांच्या भाषणामध्ये म्हणाले.
यावेळी बोलताना श्रीमती लता गुठे म्हणाल्या, “देहापासून देवाकडे जाण्यासाठी मध्ये एक देश लागतो आणि त्या देशाचे आपण काहीतरी देणे लागतो.” या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वचनाप्रमाणे या समाजाचे, देशाचे ऋण फेडण्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे या उद्देशाने हा उपक्रम सुरु केला. या उपक्रमांतर्गत श्री देवेंद्र भुजबळ यांचे “स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाजवल्य पत्रकारिता” हे पुस्तक प्रथम प्रकाशित करण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता आपटे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी एसीपी अविनाश धर्माधिकारीं, नगरसेविका ज्योती अळवणी, नगरसेवक अभिजीत सामंत, डॉक्टर महेश घाटपांडे, जयश्री संगीतराव, एडवोकेट व्ही व्ही गुठे, डॉ. संपदा पाडगावकर, गुरुनाथ तेंडुलकर, मिलिंद शिंदे, विविध मान्यवर मंडळी उपस्थित होती.
– टीम एनएसटी 9869484800.