सहजच कधीतरी
मनी दाटतात काळे ढग…
मन होतं खिन्न
सारं उदास वाटतं जग…
वाटतं कोणाच्यातरी जवळ
आपलं मन मोकळं करावं…
मनातलं सारं दु:ख आपण
त्याला कथन करावं…
आपलं सारं म्हणणं त्याने
शांतपणे ऐकावं…
मी आहे सोबत म्हणून
आश्वस्त करावं… ||
पण आजकालच्या जगात
असं काही घडत नाही…
समजून घेणारं लांबच
ऐकून घेणारंही भेटत नाही….
जो तो आपल्या दिनक्रमात
इतका व्यस्त असतो…
माझे घर, माझी स्वप्ने
यातच तो पुरता गुरफटून जातो…
दुसऱ्याकडे लक्ष द्यायला
नसतो कोणाकडेही वेळ…
मी नि माझे कुटुंब यातच
संपतो आयुष्याचा खेळ…
जन्मभर धावून देखील
काही मिळत नाही समाधान ..
कारण माणसाचं सुख
माणसांत असतं
याचंच नसतं भान… ||
दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचं हसू
खुप काही देऊन जातं…
दुसऱ्याचं दु:ख हलकं केलं
की समाधान मणभर वाढतं…
एकमेकांना वेळ देऊ
नि घेऊ एकमेकांना समजून…
सुखदुःखे वाटून घेऊ….
आनंदाचं झाड येईल बहरून… ||

– रचना : सायली कुलकर्णी, वडोदरा, गुजरात.
धन्यवाद गौरी ताई…!
किती सात्विक रचना!
Depression आणि इतर नैराश्याने ग्रासणाऱ्या मानसिक व्याधींचे हेच तर उत्तर आहे.
सुंदर कविता👌🏻👌🏻