Wednesday, September 17, 2025
Homeसाहित्यमनातील कविता

मनातील कविता

कविवर्य विंदा करंदीकर
महाकवी गोविंद विनायक करंदीक, उर्फ कविवर्य विंदा करंदीकर यांची कविता ही ‘बंड पुकारणारी‘ आहे. मग ते बंड सामाजिक, राजकीय, साहित्यिक, वैयक्तिक, धार्मिक, कोणतेही असो. पारंपारिक मुळे कवितेत जरूर आहेत, भाव आहे परंतु त्याचे व्यक्तीकरण मात्र पुन्हा धोपटमार्गा विरुद्ध बंड पुकारणारेच ! अशा या थोर कवीची जयंती २३ ऑगस्ट रोजी आहे…..

कविवर्य विंदा करंदीकर यांचा जन्म २३ ऑगस्ट १९१८ रोजी झाला. ते इंग्रजीचे प्राध्यापक होते. त्यांची साहित्य संपदा विशाल आहे. त्यांनी ४५० च्या आसपास कविता लिहिल्या. १५० च्या आसपास बाल कविता लिहिल्या. ‘ स्वेदगंगा ‘ ,’ मृद्गंध ‘, ‘ धृपद ‘, ‘ जातक’ , ‘ विरुपिका ‘ , असे त्यांचे कविता संग्रह आहेत. त्यांनी अनेक प्रकारचे बाल साहित्य लिहिले.  ‘राणीची बाग ‘, ‘ एकदा काय झाले , ‘ एटू लोकांचा देश ‘ सशाचे कान ‘, ‘ परी ग परी ‘, ‘ अजबखाना ‘, ‘ सर्कसवाला ‘, ‘ पिशी मावशी आणि तिची भुतावळ ‘, ‘ अडम् तडम् ‘ , ‘ टॉप ‘,’ सात एके सात ‘, ‘ बागुलबोवा ‘, ‘ अलख बिलंदर ‘ असे त्यांचे प्रकाशित बाल साहित्य आहे.

ललित निबंधात ‘ स्पर्शाची पालवी ‘, ‘ आकाशाचा अर्थ ‘, याचा समावेश होतो. याखेरीज अनेक अनुवाद, अनेक अर्वाचीनकरणे, इंग्रजी समीक्षा, असे लेखन आहे. त्यांचे साहित्य अन्य भाषांतही भाषांतरित झाले आहे. अनेक लघु निबंध, अनेक पुस्तकांचे अनुवाद असे गद्य लेखनही त्यांनी विपुल प्रमाणात केले आहे.

विंदांची कविता देशभरात अनेक भाषेत उपलब्ध झाली आणि वाचली गेली. राज्य शासनाचे आणि विविध संस्थांचे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले. कुसुमाग्रज पुरस्कार, जनस्थान पुरस्कार, कबीर पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार याचे ते मानकरी आहेत. त्यांना राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारही मिळाले. साहित्य अकादमीची फेलोशिप आणि अत्यंत मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार हे विशेष उल्लेखनीय आहेत.

दुर्गम वाट असावी, काळोख पसरलेला असावा, गलितगात्र करणाऱ्या पर्जन्य धारा अखंड चालू असाव्यात, जीव अगदी भांबावून जावा, पावले पुढे टाकण्याची हिंमत होत नसावी आणि इतक्यात एक लखलखती वीज अशी चमकावी की तिच्या प्रकाशाने वाट उजळून जावी, पायांना आणि मनाला  धैर्य मिळावे, लक्ष्य नजरकक्षेत यावे आणि पावले त्या दिशेने पुन्हा झपाझप पडु लागावीत. ही लखलखती वीज म्हणजे महाकवी विंदा करंदीकरांची कविता !

‘ डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे
हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे!’
मग्रूर प्राक्तनांचा मी फाडला नकाशा
विझले तिथेच सारे ते मागचे ईशारे…’

भावनेचा फुटलेला बांध व्यक्त करून, अंतरी चाललेली घालमेल ईश्वरी शब्दातून जेंव्हा रूप घेते, तेंव्हा त्याची ‘ कविता ‘ होते. म्हणजे ‘ भावनात्मकता ‘  हा बहुतांशी कवितांचा पाया असतो. कवीवर्य करंदीरांच्या कवितांमध्ये भावनात्मकता जरूर आहे परंतु ती फार क्वचित ‘ मी आणि माझे ‘ यात अडकून पडते. ईश्वरी शब्दही आहेत परंतु त्याचे ध्येय केवळ स्वतःच्या व्यक्तित्वाचा साक्षात्कार जगास घडवणे, एवढेच नाही. त्यात आहे चिंतनशीलता, वैश्विक भाव आणि विज्ञानवादी दृष्टिकोन! म्हणजे ही कविता केवळ भावनेवर आधारलेली नाही, तर ती संदेश देणारी आहे, अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करण्यास प्रवृत्त करणारी आहे.
कवीवर्य करंदीकरांच्या कवितेमध्ये साम्यवाद, मानवतावाद अन्यायाबद्दल असंतोष आणि त्याविरुद्ध बंड पुकारणेही आहे. त्यांच्या ‘ स्वेदगंगा ‘ ह्या काव्यसंग्रहातील बहुतांशी कविता ह्याच विषयांवर भाष्य करणाऱ्या आहेत.

‘ स्वेदाची ही अखंड गंगा
देश, धर्म, रक्ताचे सारे
फोडित धरणें नी बंधारे
भिजवित माती काळी गोरी,
पहा धावते अखिल जगावर
जीवन नौका नाचे त्यावर… ‘

संघटनेचा नवा सागर शोधत, नव्या स्वातंत्र्य सूर्याचा, नव्या युगाचा शोध घेणारी ही कविता. स्वेदगंगा या काव्यसंग्रहातील, ‘ कालीचे संदेश ‘, ‘ मुंबई ‘, ‘ संजीवनी मंत्र ‘, ‘ समतेचे हे तुफान उठले ‘, ‘ लोकशक्ती ‘ ह्या आणि इतर कविता अशाच प्रकारच्या संदेश देणाऱ्या कविता आहेत.

‘ स्वेदबिंदू ‘ ही त्यातीलच आणखी एक कविता; श्रमशक्ती, संघटित शक्ती याचा पुरस्कार करणारी, कष्टकरी समाजास प्रेरणा देणारी, ऐक्याचे महत्व सांगणारी, समूह निष्ठा दर्शविणारी आणि क्रांती चा मूलमंत्र देणारी!

‘ रूढी-धर्म-नीतीची बेडी
तुम्हां बांधूनी इतरां सोडी.
हातोडा हाणाच तयांवर
पाय मोकळे तुमचे होता
ध्येय गाठता येईल सत्वर…

बुध्दीवाद हा झेंडा तुमचा;
बुध्दी मिळवा, मिळेल सिद्धी…

मूर्ख अशा या आशा सोडा.
सर्वस्वास्तव सर्व जणांनीं
क्रांतीशी मग नातें जोडा….’

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारप्रणालीशी साधर्म्य दर्शवणारा, भविष्य घडवणारा ‘ रंग ‘ नव्हे, तर ते घडवणारी ‘ रग ‘ असणारे हे काव्य आहे .
त्यातीलच ‘ प्रणाम ‘ नावाची एक कविता. अध्यात्म, परमेश्वरवादी वृत्ती आणि सश्रद्ध जीवनपद्धतीचा पवित्र आणि सखोल अर्थ उलगडून दाखवणारी ही कविता.

‘ कांचनगंगेहुन जी सुंदर,
भागिरथीहुन जी पावनतर,
परमेशाहुन जनहिततत्पर,
त्या गंगेतिल स्वेदबिंदुंनो!
प्रणाम माझा तुम्हां निरंतर.

पवित्र मज स्वेदाचे बिंदू
ज्यातून निपजे जीवनसिंधू;
या बिंदुंची माळ जयांवर
त्रिवार वंदन त्या संतांना
विजय तयांचा! त्यांचे जीवन!! ‘

कवीवर्यांची सामाजिक ओढ, जाणीव दर्शवणाऱ्या, दुर्बल, शोषित यांना बळ देवून क्रांती घडवणाऱ्या अनेक कविता आहेत. त्यातील एक म्हणजे ‘ मानवांनो आत या रे! ‘ मानवतावादी, साम्यवादी विचारांचे अतिशय उत्कट आणि आर्त प्रकटीकरण असणारी ही कविता !

‘ पर्वतांनो दूर व्हा रे ! सागरांनो दूर व्हा रे !
उघडिलें मी दार माझें; मानवांनो आंत या रे…’

आज माझा देह साधी
विश्वऐक्याची समाधी;
कोंडले जातील आतां मानवा या कोंडणारे.

दुर्बलांना, दु:खितांना,
शापितांना, शोषितांना
आज क्षितिजाच्या करांनी देत मी आलिंगना रे. ‘

विंदांच्या कवितेला कोणत्याही एका शैलीत बांधणे अशक्य आहे. ‘या कवितेचा हाच पिंड आहे’, असे ठरवणे अवघड नव्हे, चूक आहे. कारण त्यांनी सर्व प्रकारच्या शैली, सर्व प्रकारचे विषय आणि सर्व प्रकारचे संदर्भ हाताळले आहेत. व्यामिश्रता, संदर्भ बाहुल्य आणि बुद्धीवाद हीच त्यांच्या कवितांची वैशिष्ट्ये आहेत.

संत वाड़मय, पारंपारिक कविता, नवकविता, पाश्चात्त्य साहित्य असे हर तऱ्हेचे संस्कार विंदा करंदीकरांच्या काव्यावर झालेले दिसून येतात. प्राचीन तत्वज्ञान, अर्वाचीन विचार प्रणाली, पाश्चात्त्य तत्त्वज्ञ आणि त्यांचे सिद्धांत यांच्या अभ्यास पश्चात सृजन पावलेली ही कविता आहे. सर्वांगीण अभ्यास, सर्वांगीण समीक्षा आणि सर्वांगीण विकास याचे समर्थन करणारी ही कविता आहे.

माझी एक आवडती कविता..
.’तुकोबाच्या भेटी शेक्स्पीअर आला ‘
त्यात कवीवर्य लिहितात…

‘ तुका म्हणे “विल्या,
तुझे कर्म थोर |
अवघाची संसार| उभा केला” ||…

शेक्स्पीअर म्हणे,| “तुझ्या शब्दांमुळे
मातीत खेळले| शब्दातीत”||
तुका म्हणे, “गड्या| वृथा शब्दपीट |
प्रत्येकाची वाट |वेगळाली ||
वेगळीये वाटे| वेगळाले काटे |
काट्यासंगे भेटे| पुन्हा तोच||….

दोघे निघोनिया| गेले दोन दिशा|
कवतिक आकाशा| आवरेना|| ‘

संदर्भ कोणता, तर विल्यम शेक्सपियर; त्याचे साहित्य आणि तुकाराम महाराजांचे अभंग, त्यांची एकमेकांशी उरा उरी चाललेली तुलना, त्यात, ‘ विल्या ‘ असा तुकारामांच्या रांगड्या अभंगातून प्रतीत होणाऱ्या; त्यांच्याच रांगड्या वृत्तीचे द्योतक असलेला, कदाचित कवीवर्यांच्या स्वतःच्याही वृत्तीशी मेळ असणारा आणि छंद रचनेचे दृष्टीने चपखल बसणाऱ्या शब्दाची योजना आणि हे सारे करताना कवितेचा जपलेला पवित्र आत्मा; ‘ कर्मवादातून परमेश्वर प्राप्ती!’

कवीवर्य विंदा करंदीकरांच्या देशप्रेम व्यक्त करणाऱ्या, राष्ट्रवाद जोपासणाऱ्या ही अनेक कविता आहेत. उदाहरणार्थ ‘ प्रार्थना ‘ नावाची कविता…

‘ प्रीति न स्वर्गावरती माझी; प्रीति न मुक्तीवरती !
इतकेंच मला रुचते;
इतकेंच मला पुरते;
दे, इतकें दे, देवा! ज्यास्तव हृदय सदोदित झुरतें,
वदन मला दे भारतभूचें विजयगीत गाण्याला;…’

साम्यवादाच्या लढ्यातही महाकवी विंदा सक्रिय होते. मनुष्य, त्याचे व्यक्तीमत्व, त्याच्या वृत्ती आणि त्याचा विकास याच्या आजुबाजूस फिरणारे विंदांचे चिंतन होते. त्याच्या प्रकटीकरणासाठी त्यांनी प्रतिमांचे अनेक पैलू हाताळले. परंपरावाद न मानणारे, स्वायत्त, स्वयंभूत्वावर श्रद्धा असणारे, मनाच्या कोतेपणास अव्हेरणारे असे त्यांचे काव्य आहे. पूर्वजांच्या पुण्याईचे भांडवल न करता, स्वकर्तृत्वाने जीवन जगावे असे शिकवणारी कविता, ‘ एवढे लक्षात ठेवा ‘

‘ उंची न आपुली वाढते, फारशी वाटून हेवा ।
श्रेय ज्याचे त्यास द्यावे; एवढे लक्षात ठेवा ॥…

ती पूर्वजांची थोरवी, त्या पूर्वजांना गौरवी ।
ती न कामी आपुल्या, एवढे लक्षात ठेवा ।।…

शेवटच्या कडव्यात कवीवर्य जीवनाचा एक महामंत्र देतात…

माणसाला शोभणारे, युद्ध एकच या जगी ।
त्याने स्वतःला जिंकणे; एवढे लक्षात ठेवा ॥’

बहुआयामी अश्या प्रकारची विंदांची कविता आहे. वैविध्यपूर्ण आहे. कवितेची रूपे, तिचे सारे पैलू म्हणजे प्रतिमा, रूपके, आशयपूर्णता, लयबद्धता, गेयता, छंद- बंध सारेच त्यांच्या कवितेत आहे आणि तरीही ही कविता फार गूढ नाही, फार दुर्बोध नाही. वास्तववादी दृष्टिकोन ठेवून आणि बुध्दी प्रामाण्यवादाचा पुरस्कार करून मनुष्य जीवनाचे समग्र दर्शन देणारी ही कविता आहे. ‘ देणाऱ्याने देत जावे ‘ म्हणणारी कविता! ह्या कवितेचा आवाका अवाढव्य आहे. त्यामुळे त्याला एका शब्दात किंवा एका वाक्यात बंदी करणे अशक्य आहे. एक मात्र नक्की, खऱ्यास खरे, बऱ्यास बरे आणि बुऱ्यास बुरे म्हणणारी ही कविता आहे. रोखठोक आहे. रांगडी आहे.

कवीवर्य करंदीकरांच्या प्रेमकवितांमधील अभिव्यक्तीही अशीच रांगडी, निःसंकोच, बेदरकारपणे केलेली. देहिक प्रेमाची आसक्ती त्यांनी कधीही नाकारली नाही. स्री शरीर आणि त्याचे सौंदर्य याचे वर्णन त्यांच्या काव्यात आढळते. मात्र त्यात अनादर कुठेही नाही. शारीरिक आसक्ती हा देखील प्रेमाचाच पवित्र रंग असल्याची भावना रुजवणारे हे काव्य आहे. ‘ तुझ्या देहाचीच ज्योत ‘, ‘ घेरी ‘, ‘ कांटे ‘, ‘ तीर्थाटण ‘, या आणि इतर काही काव्यात स्त्री पुरुष संबंधाचे रेखाटन आहे.

‘ उन्माद ‘ कवितेतील…

‘ छे, अन्न कशाला? मला न त्यांतिल गोडी;
आलिंग मला; मग भूक मला नच थोडी.

हें मद्य कासया? ओठच दे तव बाले;
या विश्वावरती झिंगुन घेइन झोले….’

अशी प्रेमाची मादक छटा रंगवणारे कवीवर्य ‘ अपुरे प्रेम ‘ ह्या कवितेत ह्याच्या अगदी उलट व्यक्त होताना दिसतात.

‘ तें सापडतां, नच सापडतें;
हुरहुर अखंडच मग उरते…

विसरुन जाशिल का मम प्रीती?
क्षणभर संशय, क्षणभर भीती;
भीती लोपते, आणिक चित्तीं
ती भीतीच अभया आणविते!

सर्वस्वाचें न घडे मीलन;
असेंच राही अपुरें जीवन;
अनंत असतें ना अपुरेंपण?
मी अनंत अपुरें प्रेम पितें! ‘

याचबरोबर त्यांच्या कित्येक कवितांमधून त्यांनी स्त्रीत्वाचा, मातृत्वाचा निरातिशय आदर केला आहे.

‘ सत्ययुगाच्या अखेर झाली
‘ प्रेम ‘, ‘ द्वेष ‘ यांच्यात लढाई:
द्वेष जाहला विजयी आणिक
प्रेम लपे आईच्या हृदयी! ‘
‘शेवटचा लाडू ‘ नावाची त्यांची एक भावविभोर करणारी कविता. सुटी संपवून कोकणातून देशावर परत आलेल्या मुलाने आपल्या आईचे केलेले स्मरण त्यात आहे. ‘ आज हा शेवटचा लाडू संपला, आता उद्यापासून पुन्हा माधुकरी आणि वारावर जेवणे ‘ असं सांगणाऱ्या कवीने आपली खरी व्यथा शेवटच्या कडव्यात मांडली आहे.

‘ उजाडेल उद्यां आणखी भूक मला खाई;
उजाडेल उद्यां आणखी लाडू मज नाहीं.
मिळेल जो मजला उद्यां तो मी गिळणे घांस
मिळेल ना कोठें असा हा, आई, तव भास ! ‘

विंदा करंदीकर यांचे बाल साहित्य ही विपुल आहे. ‘ राणीची बाग ‘ सारख्या त्यांच्या अनेक प्रसिद्ध बालकविता आहेत. त्यातही त्यांच्या प्रसन्न चित्तता, विनोद बुध्दी आणि स्वच्छंदी वृत्तीचेच दर्शन घडते.

कवीवर्य विंदांना संगीताचेही शास्त्रशुध्द ज्ञान असणार ह्यात शंका नाही. त्यांच्या अनेक कवितांमधून असे संदर्भ, उपमा आलेल्या आहेत. उदाहरणार्थ, ‘ अन् पहिल्या भेटींतच ‘ ह्या कवितेत, ‘आळविशी तीच तीच कॉफींतील कां ठुमरी…’, तसेच, ‘ तुझें नि माझें अपुरें मीलन ‘ या कवितेतही मीलन दिनाची आस जगाच्या अंतापर्यंत पहाण्यास तयार असणाऱ्या प्रियकराच्या ओळी आहेत,

‘ मी गातो स्वप्नांचें संगित
तव साथीविण रंग नसे;
अखंड आलापीची वळवळ
परंतु मज ना सम गवसे,…’

किंवा ‘ ओंजळींत स्वर तुझेच ‘ ही कविता किंवा ‘ झपताल ‘, ‘ दीपचंदी ‘,’ दादरा’, ‘ रूपक ‘ह्या कविता किंवा एकूणच ‘ तालचित्रे ‘ हा संग्रह..’ किंवा ‘ जातक ‘ मधील ‘ बंदीश: एक स्वरचित्र’ ह्या साऱ्या त्यांची संगीताची आवड आणि ज्ञान याची ग्वाही देणाऱ्या रचना आहेत.

आणखी एक कविता, जिचा उल्लेख अपरिहार्य आहे. हे काव्य म्हणजे केवळ ‘ पंक्ती ‘ नसून ‘ वृत्ती ‘आहे! महाकवी विंदांनी जोपासलेली आणि तिचे संस्कार केलेली.  या कवितेतील प्रत्येक ओळ म्हणजे जणू विंदांच्या अंगठ्याचा ठसा आहे. कवितेचे नाव ‘ प्यालों किती तरीही ‘
वरकरणी पाहता ‘ दारू ‘ या विषयावरील भासणारी परंतु महान तत्त्वज्ञानाचा स्त्रोत असणारी ही कविता.

‘ प्यालों किती तरीही प्याले न मोजितों मी;
आहे पिता-पिवविता तो एक, मानतों मी।… ‘

ही कविता आपल्या अंतरात सामावून घ्यायची असेल तर दुसऱ्या कडव्यातील दोन ओळी आधी वाचाव्यात…

‘ अवकाश हाच प्याला अन् काळ हीच दारू;
थेंबात सांडलेल्या ग्रहगोल पाहतो मी।…’

पहिल्या श्वासापासून अंतिम श्वासापर्यंतचा प्रत्येक जीवास प्राप्त झालेला काळ म्हणजे आपले आयुष्य आणि हे आयुष्य हीच ‘ दारू ‘, जीवन हीच ‘ नशा ‘ आणि ‘ पिता-पिवविता ‘ म्हणजे जगन्नियंता; ह्या जगताचा पिता आणि त्यानेच दिलेले हे आयुष्य!

‘ जो बाटलीत आहे, आहेच तो बुचात :
हें सत्य नास्तिकांच्या डोक्यांत हाणतों मी…’

ह्या ओळीतून ईश्वराचा श्रद्धेने केलेला स्वीकार, त्याच्या चिरंतन अस्तित्वाची दिलेली साक्ष वाचकाला स्तिमित करणारी.

कवीवर्य विंदा करंदीकरांची कविता आणि ते कवीवर्य म्हणून स्वतः नक्की कोणत्या ‘ स्वभावधर्माचे ‘ आहेत, हे सांगायचे असेल तर मला त्यांच्याच कवितेचा आधार घ्यावा लागेल. ती कविता म्हणजे ‘ पवित्र मजला

‘ पवित्र मजला जळजळीत ती
भूक श्रमांतुन पोसवणारी;
पवित्र मजला दगडी निद्रा
दगडाची दुलई करणारी;

पवित्र उपभोगाची इच्छा;
पवित्र मज शरिराचें जीवन;
पवित्र तुसड्या वैराग्याहून
प्रीतीच्या धुंदींतिल मीलन;

पवित्र मज यंत्राची धडधड
समाजहृदयांतिल हे ठोके;
पवित्र मजला सत्यासाठी
धडपडणारें स्वतंत्र डोकें

पवित्र सुखदु:खाची गाणी
वेदांतिल सार्‍या मंत्रांहुन;
पवित्र साधा मानवप्राणी
श्रीरामाहुन, श्रीकृष्णाहुन;

पवित्र मज पोलादी ठोसा
अन्यायाच्या छातीवरचा,
पवित्र मजला आणिक गहिंवर
माणुसकीचा, माणुसकीचा. ‘

प्रेमाची, विरह वेदनेची आणि मनात असणारे प्रेम आणि आकर्षण तीव्रतेने जपूनही संयमाने सामोरे जाण्याची अभिव्यक्ती करणाऱ्या ‘ मध्य (गझल) ‘ मधील ‘नसतें पुन्हां का जन्मणें ‘, ‘हलले जरासे चांदणे’, ‘ मागू नको सख्या रे ‘, ‘ लागेल जन्मावें पुन्हां ‘, ‘ माझ्या घरी मी पाहुणी ‘ ह्या आणि इतर अनेक गझल आहेत.

आणि आता सरतेशेवटी माझ्या मनातली त्यांची सर्वात लाडकी कविता…

कधी वाटतें, वाटतें
तुला द्यावे असे काही;
ज्यांत लपेल आकाश,
लोपतील दिशा दाही.

असें काही तुला द्यावें:
भाबडें नी साधें-भोळे,
राधेचीही पडो दृष्ट,
द्रौपदीचे दिपो डोळे.

माझे नसून मीं द्यावें,
तुझें व्हावें दिल्यावीण.
पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे,
जन्म टाकावा गहाण. ‘

कवीवर्य विंदा, आपल्या कवितेला कोणत्याही समर्पक आणि सर्वस्वी पद्धतीने वर्णन करण्याची माझी योग्यता नाही. आपले कार्य आणि आपली कविता भव्य आहे. त्या भव्यास माझा प्रणाम। 🙏🏻
आपल्या ‘ आततायी अभंगामध्ये ‘ आपण म्हटले आहे

‘ विश्वाचा हा घोडा | आडदांड झाला;
ब्रह्माच्या खुंटाला | आवरेना. ‘

१४ मार्च २०१० रोजी अनंतात विलीन झालेल्या विंदांचे
वैश्विक ऐक्याचे, मांगल्याचे परमेश्वराने पाहिलेले आणि आपल्या काव्याद्वारे आपण फुलवलेले स्वप्न आज नक्की कोणत्या दिशेस आहे त्याची छटा असणारे गाऱ्हाणे ‘ रे भगवन् !’ या माझ्या कवितेद्वारे मी करते आहे. ते आपल्या चरणी अर्पण करते.

रे भगवन् !

गंध तुझ्या पूजेचे आम्ही ज्या कपाळी लावतो,
हात मारून त्यावरीच नित बोल तुजला लावतो.

स्वार्थांध जमाव येथला; का उगा दिशा दावतो?
छे! कर्म कुठले; आम्ही तर कुंडली मागे धावतो.

ढोंग तुझ्या प्रार्थनेचे; नाद दमड्यांचाच भावतो,
षडरिपु ने पिसाळून आम्ही एकमेकांस चावतो.

रुप दिले तू साजिरे; आम्ही त्यावरी चेहरे लावतो,
प्रत्येक कृतीपूर्वी कसा मायावी रावण पावतो!

पाषाणा देवून नाव तुझे; पुरा विसर्जिला भाव तो,
नको शोधू माणसे; वसला बहुरूप्यांचा गाव तो.

रे भगवन्! हरलास की तूच मांडलेला डाव तो,
निर्मिती तुझीच तरीही मिळणार नाही ठाव तो.

डॉ गौरी जोशी – कंसारा

– लेखन : डॉ. गौरी जोशी- कंसारा, न्यू जर्सी, अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ +91 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !