Wednesday, July 2, 2025
Homeसंस्कृतीआम्ही अकोटकर

आम्ही अकोटकर

अकोला जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असलेला आणि पीकपाण्याने समृध्द असलेला असा अकोट तालुका आहे.

इंग्रजांच्या काळात शासकीय कार्यालयांचे जसे वेगळेपण होते तसेच वेगळेपण अकोटमधील तहसील कार्यालय राखून आहे. एकदम उंचावर हे कार्यालय असून विविध प्रकारची प्रमाणपत्रे काढण्यासाठी तालुक्यातून लोक तहसील कार्यालयात येत असतात. तसेच जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहारही येथूनच होतात.

अकोट शहरवासियांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषद महत्वाची भूमिका बजावत आहे. शहरात सुमारे 32 वार्ड आहेत. त्यामुळे तितकेच नगरसेवक नागरिकांच्या सेवेत असतात. शिवाय शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर व ग्रामीण अशी दोन पोलिस ठाणी आहेत. सन, उत्सव, मिरवणुका, राजकीय आंदोलने तसेच अन्य प्रकारच्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही पोलीस ठाणी कार्यरत आहेत.

तहसिलदार कार्यालय

अकोट हे मोठे शहर असल्यामुळे येथे पोलिसांचे उपविभागीय कार्यालयही कार्यरत आहे. त्याचप्रमाणे शेतात पिकणाऱ्या अन्नधान्याची खरेदी -विक्री करण्यासाठी बाजार समितीही अस्तित्वात आहे. तसेच प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणाची सोयही अकोटात उपलब्ध आहे.

आजुबाजूच्या परिसरातील प्रवाशांची सोय होण्याच्या दृष्टीने पूर्णा – खंडवा मार्गावर अकोटमध्ये रेल्वेची सोय उपलब्ध आहे. आधी मीटरगेज ही छोटी रेल्वे लाईन होती. मात्र प्रवाशांची गरज आणि विकासाच्या दृष्टीकोनातून आता ब्राॅडगेज लाईन तयार करण्यात आली आहे. अकोट रेल्वे स्थानकातून लवकरच मुंबई, खंडवा, नागपूर, नांदेड, काचीगुडा, दिल्ली अशा लांब पल्ल्याच्या गाड्या धाऊ शकतील.

अकोट रेल्वे

अकोटमध्ये नव्याने रेल्वे स्थानकाची उभारणी करण्यात आली असून नवीन ब्राॅडगेज मार्गावरुन रेल्वे कधी धावते याची प्रवासी वाट पाहून आहेत. थोडक्यात ब्राॅडगेज मार्गाचे प्रवाशांचे हे स्वप्न पूर्ण होणार आहे. शिवाय एसटी महामंडळाच्या बसेस प्रवाशांच्या सोयीसाठी आहेतच.

अकोट आगारातून अकोला, अमरावती, नागपूर, ब्रम्हपुरी, शेगाव, खामगाव, बुलढाणा, जळगाव, भुसावळ, औरंगाबाद, पुणे अशा लांब पल्ल्याच्या बसेस धावतात. त्यामुळे प्रवाशांची चांगली सोय झाली आहे.

शहरातून एकही दैनिक वृत्तपत्र प्रकाशित होत नाही. काही साप्ताहिके प्रसिद्ध होतात. पण तीही बोटावर मोजण्याइतकीच आहेत. अकोला, नागपूर येथून प्रसिद्ध होणारी वृत्तपत्रे अकोटमध्ये येतात. त्यात देशोन्नती, लोकमत, पुण्यनगरी, दिव्य मराठी, दैनिक भास्कर, नवभारत, मतदार ही मराठी भाषेतील तर इंग्रजी मधील हितवाद आदी वृत्तपत्रे अकोटात येतात.

अकोट ते अकोला हे 45 किलोमीटरचे अंतर आहे. सध्या नवीन सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार करण्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. हे कामही येत्या वर्षभरात पूर्ण होण्याची शक्यता आहे.

नंदीकेश्वर मंदिर
अकोट शहरातील गवळीपुरा भागात 450 वर्षांपासून भक्तांचे श्रद्धास्थान असलेले पुराणकालीन नंदिकेश्वराचे मंदिर विदर्भात प्रसिद्ध आहे. हा परिसर नंदिपेठ म्हणून ओळखला जातो. दरवर्षी येथे महाशिवरात्रीला
यात्रा भरते. विशेष करून श्रावणात धारगड येथे खांद्यावर कावड घेऊन भक्तगण पायी जातात. त्याची सुरूवात याच नंदिकेश्वराच्या मंदिरापासून केली जाते. नंदिपेठेत बैलाच्या उंचीएवढा दगडात कोरून म्हणजेच दगडाचा नंदी तयार करण्यात आला आहे. हा नंदी तयार करण्यासाठी व त्याचे कोरीव काम करण्यासाठी शिल्पकारास 365 दिवस लागले, असे सांगितले जाते. विदर्भातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात कुठेच अशाप्रकारचा नंदी नसल्याचे संस्थानात काम करणारे ज्ञानदेव दिंडोकार यांनी सांगितले. त्यामुळे नंदिकेश्वर देवस्थान म्हणजे अकोटच्या आणि विदर्भाच्या लौकिकात भर घालणारे देवस्थान आहे.

या नंदिची भक्तगण मोठ्या भक्तिभावाने पूजाअर्चा करतात. शंकर महादेव म्हणजे भोलेनाथ. म्हणून शंकर भोलेनाथास देवादिकांमध्ये एक वेगळेच स्थान आहे. त्याची प्रचिती आपण उत्तर भारतात उत्तराखंड, काशी- बनारसला गेलो की आल्याशिवाय राहत नाही.

नंदीपेठेत महाशिवरात्री उत्सव, रथोत्सव साजरा केला जातो. या ठिकाणी जुना असा कोरीव रथ तयार करण्यात आलेला आहे. यात्रेच्यावेळी या रथाची मिरवणूक काढण्यात येते. परंतु कोरोनामुळे संस्थानात गेले वर्षभर कोणताही धार्मिक उत्सव झाला नाही.

बुध्दविहार
अकोट शहरात सर्वधर्मीय लोक गुण्यागोविंदाने राहतात. शहरात मंदिर, मस्जिद ही जशी धार्मिक स्थळे आहेत, तशीच बौध्द समाजाची शहरात विहारेही आहेत. खानापूर वेस, सोमवार वेस, शनिवार वेस अशी काही ठिकाणे आहेत जेथे बुध्दविहारे आहेत. विशेषकरून खानापूर वेस येथील बुध्दविहार तालुक्यात व अकोला जिल्हयात प्रसिद्ध आहे.

खानापूर वेस बुद्धविहार

यांनी विहारात भगवान गौतम बुध्दाची मूर्ती बसविण्यात आली आहे तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा आहे. शिवाय जुना असा पिंपळाचा मोठा वृक्ष आहे. पिंपळाच्या वृक्षाखाली गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती झाली होती. त्यामुळे या वृक्षाला फार महत्व आहे. या विहाराचा परिसर मोठा असून याठिकाणी गोरगरिबांची लग्नकार्य होतात. 14 एप्रिल या बाबासाहेबांच्या जयंतीदिनी या विहारापासूनच बाबासाहेबांच्या जयंतीची मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक शहराच्या विविध भागातून जाते आणि तिचा समारोप रात्री 10- 11 वाजेच्या सुमारास याच विहाराजवळ केला जातो. जयंतीनिमित्त दरवर्षी जवळपास एक आठवडा विविध प्रकारच्या स्पर्धा घेऊन विजेत्यांना बक्षिसे दिली जातात. शिवाय दरवर्षी मे महिन्यात येणारी बुध्दपौर्णिमा साजरी केली जाते. येथे वर्गणीतून गोळा झालेल्या पैशातून भंडारा केला जातो. तसेच खीरदान केले जाते. असेच वातावरण शहरातील अन्य बुद्ध विहारांमध्ये असते.

नरसिंग महाराज मंदिर
अकोटमध्ये पुराणकालीन नरसिंग महाराजांचे मंदिर असून नरसिंग महाराजांवर भक्तांची अपार श्रध्दा आहे. दरवर्षी अकोटमध्ये नरसिंग महाराजांची नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात मोठी यात्रा भरते. जवळपास तीन आठवडे ही यात्रा चालते. याच मंदिरात यात्रेनिमित्त नरसिंग महाराज संस्थानकडून महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या महाप्रसादाचा शेकडो भक्तगण लाभ घेतात.

नरसिंग महाराज मंदिर

संपूर्ण अकोला जिल्हयात या मंदिराची ख्याती असून मनातील इच्छा नरसिंग महाराज पूर्ण करतात, असेही म्हटले जाते. तीन आठवडे चालणाऱ्या यात्रेत विविध प्रकारच्या विशेष करून घरगुती वस्तूंची यात्रेत मोठ्या प्रमाणावर विक्री होते. त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी खेळणी, घरासाठी लागणार्‍या सजावटीचे सामान, आकाश पाळणा तर हे यात्रेचे वैशिष्ट्ये आहे. लहान मोठी मंडळी आकाश पाळण्यात बसून आनंद लुटत असतात.

वारीचे धरण
अकोट शहरापासून 30-32 किलोमिटर अंतरावर वारीचे मोठे धरण आहे. अकोट शहराची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 92 हजार इतकी आहे. ही जनगणना होऊन 10 वर्ष झाली. त्यामुळे गेल्या दहा वर्षात लोकसंख्या चांगलीच वाढल्याचे आपल्या लक्षात येईल. ही लोकसंख्या आता सव्वा लाखाच्या आसपास झाली असावी असा अंदाज आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्याचे काम वारीच्या धरणातून केले जाते. अत्यंत चविष्ट अशाप्रकारचे पाणी या धरणातून लोकांना पिण्यासाठी उपलब्ध होते. शिवाय अकोट तालुक्यातील अनेक गावांनादेखील याच धरणातून पाणी पुरवठा केला जातो.

शेषराव वानखेडे

– लेखक : शेषराव वानखेडे
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800.

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. अतिशय सुंदर असा लेख आहे, अकोट बद्द्ल संपुर्ण माहिती थोडक्यात वर्णन करण्यात लेखकाला यश आलेले आहे. सर्व स्थळांन बाबत अतिशय कमी शब्दात अभ्यासपूर्ण वर्णन केलेले आहे. उदा. नंदीकेश्वर मंदिरा बाबत वानखेडे साहेबांनी अतिशय अभ्यासपूर्ण आणि मोजक्याच शब्दात महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यामुळेच या लेखास वेगळेच महत्व आलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४