उद्या, २२ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. या सणाचे औचित्य साधून, बालपणीच्या अंगणातले निसटत चाललेले अवखळ पात्र, आत्या !
आत्या
“फुलोका तारोका सबका कहना है, एक हजारो मे मेरी बहना है, सारी उमर हमे संग रहना है।”
हे हिंदी गाणं नकळत माझ्या कानावर पडलं, मी मनातल्या मनात हसले आणि मीच माझ्या मनाला प्रश्न केला. खरंच का, आज हे नातं, ह्या गीतातील शब्दांप्रमाणे अर्थमय आहे का ?
नारळी पौर्णिमा म्हणजे वरुण राजासोबत, समुद्राला शांत करण्यासाठी, नारळाला सोन्यासारखा कागदी मुलामा देऊन, तो नारळ समुद्रात अर्पण करावयाचा दिवस होय. कोळीबांधव जहाजांना सजवून, समुद्रात लोटतात व आपल्या मासेमारी व्यवसायाला सुरुवात करतात.
लहानपणी आम्हा मुलींना रक्षाबंधन या सणाची फार उत्सुकता लागून राहत असे. रोज कॅलेंडर पाहून त्या दिवसाची वाट पाहत असू. पंधरा दिवस अगोदरच लाईटच्या लख्ख प्रकाशात राख्यांचा बाजार, डोळे दिपवून टाकत असे. रोज शाळेत जाता-येता त्यावर नजर जात असे.आपसूकच आमचे पाय त्या दुकानांसमोर थबकत असत. मनात भरलेली राखी अगोदरच खरेदी करून, ती कंपासपेटीत जपून ठेवत असू. रोज ती राखी कंपासपेटीतून बाहेर काढून, डोळे भरून पहात रहायचो नि रक्षाबंधन दिवसाकडे डोळे लावून राहत असू.
आज मात्र चित्र पालटलं आहे. मित्रांनो, जस-जसे वय वाढत जाते, तस-तसे हया नात्याबंधनातील उत्साह कमी झालेला दिसतो. प्रत्येक जण स्व:ताच्या संसारात एवढा गुरफटतो की, त्याला या दिवसाचे महत्त्व कमी वाटू लागते. ऑफिस मधून येता-जाता राखी विक्रेत्या मुलाच्या हातातील राख्यांकडे, आवर्जून पाहतात पण मन मात्र विकत घेण्याच्या वृत्तीमुळे वळत नाही.
मनात प्रश्न पडलेले असतात. ‘काय माहित भाऊ, त्या दिवशी घरी असेल का ! त्याचा कुठलातरी बाहेर जाण्याचा प्लान तर नसेल ना !, असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. तात्पर्य काय ! तर, त्या दिवसासाठी भावाची अगोदर अपॉइंटमेंट घ्यावी लागते. एवढी विसंगती निर्माण झाली आहे आज ! नाही का ?
सासुरवाशीण मुलीला वाटतं या निमित्ताने, आज माहेरी जायला मिळेल. तिलाही आपल्या ऑफिसमधून तडजोड करूनच, हा योग आखावा लागत असतो. दोघेही वेळेच्या बंधनात धावणारे घड्याळच असते. त्यामुळेच मोठी होत गेलेली बहीण, कालांतराने ‘आत्याच्या’ नात्यात दिसू लागते.
आई-वडील गेले की, तिचे माहेरपण संपले, असे दिसू लागते. कारण तिची जागा भावाच्या मुलीने घेतलेली असते. त्यामुळे मोठ्या झालेल्या आत्याचे महत्त्व हळूहळू कमी झालेले दिसते. वयानुरूप नात्याचे वय सुद्धा वाढते का ? उलट ते नातं अधिक घट्ट व्हायला हवे ! पण नाही, ते आजच्या घडीला निसटत चाललेलं नातं, असं दृश्य दिसू लागले आहे.
सवडी अभावी, वापरात येणारी दुसरी शॉर्ट पद्धत म्हणजे, कुरियरने किंवा पोस्टाने भावाला राखी पाठवून दिली जाते. कारण कुठेतरी परकेपणाच्या चाहुलीची ही दाट शंका आहे. संस्कृतीने घालून दिलेला पायंडा इतका दुरावला का ? आत्या, हे पात्र एवढे परके झाले का ? आत्या हे पात्र माहेरच्या अंगणाचे महत्त्व वाढवणारा अविभाज्य घटक आहे. या नात्याला आजच्या पिढीने सुद्धा घट्ट बांधून ठेवण्यासाठी, या नात्याची जपणूक केली तर हे नातं अखंडीत राहील, असे मला वाटते.
लग्नापूर्वी तीही या घराची मुलगी होती, आहे व राहील ही भावना पुढच्या पिढीच्या मनात रुजवून देणे, आजच्या भावाची कर्तव्यभावना आहे. आई वडिलांच्या मागे हे नातं तेवढ्याच प्रेरणेने पुढे गेले पाहिजे, तरच आपल्या नात्याचा धागा निश्चितच ह्या बंधनात घट्ट राहील. आत्या या नात्याला जपून ठेवण्याचे मोठे कार्य भावजयच्या हातात असते. प्रेमाचा ओलावा प्रथमता नणंद-भावजय नात्यात निर्माण झाला पाहिजे, तरच ‘आत्या’ हे पात्र टिकून राहील. कारण कधी ज्या घरासमोरील अंगणात, आपलं बालपण भावाच्या सोबतीत उपभोगलं, ते अंगण ‘आत्या’ या पात्राला परके का वाटावे ? तिथली माया प्रेमाचा ओलावा एवढा रुक्ष का वाटावा ? म्हणून ‘आत्या’ या पात्राला जपण्याचे, माहेरपण देण्यास वहिनी या पात्राने साकारले पाहिजे.
निसटत्या ‘आत्या’ पात्राला माहेरपणाला घट्ट बांधून ठेवण्यासाठी, वहिनी या पात्राने प्रेमात ठेवण्यासाठी, मी आखलेला उपक्रम तुम्हाला सांगावासा वाटतो.
राखी पौर्णिमेच्या चार दिवस आधीच, मी आत्याबाईना फोन करून, तिची मी अपॉइंटमेंट घेते. तिला जेवणात किंवा तिचा आवडता पदार्थ यावर विचार करून, तसा पंचपक्वान्नांचा बेत करते. मुलांसमोर, आत्या येणार, असा पाठ म्हणत राहते. त्यामुळे मुलांमध्येही उत्सुकता निर्माण होते. या दिवशी मी आवर्जून सुंदर असा, आत्या नावाचा केक आणून ठेवते. कारण ती जेव्हा हया घरी होती, तेव्हा तिच्या वाढदिवसाला तिला जो आनंद मिळत असे, तो पुन्हा इथे तिला मिळावा हा माझा हेतू असतो.
गप्पांच्या ओघात नणंद-भावजय कधी मैत्रिणींच्या नात्यात गुंग होत जातात, ते कळतच नाही. मुलांच्या उत्साहात आत्या कधी मिसळून जाते, ते तिच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतं. फोटोंच्या वर्षावात भाऊ-बहिणीचा राखी बांधण्याचा थाट सजतो. माझे पती म्हणजे तिचा भाऊ खूप गमतीजमती सांगून, तिच्या चेहऱ्यावर मनसोक्त हास्य- बालपण निर्माण करतात. बोलता-बोलता दोघही बालपणाच्या आठवणीत रमून जाताना दिसतात. बालपणातले किस्से ऐकताना, मुलेही रममाण होताना दिसतात.
आणि मग माहेरपणातील राहून गेलेला तिचा वाढदिवस, साजरा करण्यासाठी आम्ही सारे सज्ज होतो. तेव्हा जो आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडत असतो, तो मुले पटकन फोटोत कैद करून घेतात.
असा हा आगळावेगळा, आत्या पात्राला माहेरच्या प्रेमपाशात आपुलकीने बांधून ठेवण्याचा, हा माझा उपक्रम सर्वांना खूप आवडतो. ती जेव्हा घरी जाण्यास निघते, तेव्हा मुलं म्हणतात, “आत्या लवकर पुन्हा ये, आपल्या घरी !”

– लेखन : सौ. वर्षा महेंद्र भाबल.
– संपादन : अलका भुजबळ 9869484800
फारच सुंदर लेख 🙏
👌👌👌