Wednesday, February 5, 2025
Homeयशकथाआदर्श शिक्षक : कृष्णकांत सासवडे

आदर्श शिक्षक : कृष्णकांत सासवडे

सह्याद्रीच्या निसर्गरम्य आणि भीमानदी काठी चासकमान धरणाला लागून वसलेले ऐतिहासिक चासकमान गाव ही आदर्श शिक्षक कृष्णकांत सासवडे यांची जन्मभूमी.

सासवडे सरांना चार भावंडे. वडिलांचा पिढीजात बांगड्या भरण्याचा (कासार) व्यवसाय. अन्य काहीही उत्पन्न नाही. त्यामुळे घरची परिस्थिती बिकट. गावोगावी सायकलवर, तर कधी पायी फिरुन वडिलांना व्यवसाय करावा लागे. वडीलांचे ते कष्ट, दमछाक बघून सर्व भावडांना गलबलून यायचे. ७ वी  ८ वीत असल्यापासून सर सुटीच्या दिवशी वडिलांबरोबर जात असत. त्यामुळे त्यांना व्यवसायाचे आणि व्यवहाराचे बाळकडू मिळाले. हाच त्यांच्या भावी यशाचा पाया ठरला.

मुले मोठी होऊ लागली तसा कुटुंबाचा खर्च वाढला परंतु स्वाभिमानी वृत्तीच्या सरांच्या वडिलांनी कधी कोणापुढे हात पसरले नाहीत. एव्हाना एस्. एस् .सी परीक्षा पास झाल्यावर थोरले बंधू रघुनाथराव उर्फ भैय्या (दादा) पुढील शिक्षणास राम राम ठोकून पूर्ण वेळ वडीलांच्या व्यवसायात मदत करु लागले.

वयोमानानुसार भटकंतीमुळे वडिलांना होणारा त्रास व कष्ट कमी करण्यासाठी भैय्यांनी गावात छोटेसे घर विकत घेऊन वडिलांना दुकान टाकून दिले व स्वतः आजूबाजूच्या आठवडे बाजारात व्यवसाय करु लागले.

सर, सन १९७४ मध्ये एस्. एस्. सी. परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर भैय्यांनी त्यांना मंचर येथील काँलेजमध्ये प्री. डिग्री आर्टस् ला प्रवेश घेऊन अभ्यासासाठी खोली घेऊन मंचरला ठेवले. ते पी.डी आर्टस् पास झाले. परंतु आपल्या शिक्षणाचा अवास्तव भार व त्यामुळे वडील आणि भैय्या यांची होणारी ओढाताण त्यांना सहन झाली नाही आणि अर्थांजनासाठी त्यांनी पिंपरी चिंचवड गाठले.

बजाज टेम्पो, बजाज ऑटो, गरवारे वॉल अँड रोप्लास इ. कंपन्यामधून त्यांनी हंगामी स्वरुपाच्या नोक-या करत पुणे विद्यापीठातून बहिःस्थ विद्यार्थी म्हणून त्यांनी शिक्षण चालू ठेवले. वडिलांच्या आणि भैय्याच्या प्रेरणेने ते १९८१ मध्ये बी.ए. परीक्षा द्वितीय श्रेणीत, ५५% गुणांनी उत्तीर्ण झाले.

एम.पी.एस.सी, यु.पी.एस.सी. या सारख्या स्पर्धा परीक्षाकडे आकर्षित होऊन सरांनी २-३ वर्षे परीक्षांची तयारी केली. लेखी परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. परंतु मुलाखतीत निवड होऊ शकली नाही. त्यावेळी वडिलांनी त्यांना धीर दिला आणि स्पष्ट शब्दात सांगितले की, शिक्षक झाला तरी चालेल, परंतु नाउमेद व्हायचं नाही आणि कामाशी नेहमी प्रामाणिक राहायचे. वडिलांच्या ह्या सल्ल्याने सरांचे आयुष्य बदलले.

बी.ए. नंतर १९८४ मध्ये सरांनी माध्यमिक शिक्षक म्हणून हंगामी नोकरी केली. परंतु कायम स्वरूपी
नोकरीसाठी बी.पी.एड्./बी.एड्. करण्याचा निर्णय घेतला. परंतु पुण्यात प्रवेश न मिळाल्याने उस्मानाबाद
जिल्ह्यातील उमरगा येथे बी.एड्. ला प्रवेश मिळाला. तेथेही असंख्य अडचणी आणि संकटाशी सामना करीत एकदाचे ते बी.एड् झाले .

बी.एड. नंतर १९८६ मध्ये कुंडेश्वर विद्यालय, पाईट येथे ते हंगामी शिक्षक पदी रुजू झाले. दरम्यानच्या काळात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागात त्यांची निवड होऊन, जुलै १९८७ मध्ये ते उर्दू माध्यमिक विद्यालय खराळवाडी येथे माध्यमिक शिक्षक म्हणून रुजू झाले.

अमराठी भाषिक विद्यार्थी असूनही वक्तशीरपणा, मनमिळावू आणि मृदूभाषी आणि हसमुख, प्रसन्न व्यक्तिमत्त्व यामुळे अल्पावधीतच सर मुलांच्या गळ्यातील ताईत बनले. परिणामी त्यांच्या विषयाचा एस्.एस्. सी.परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. त्यामुळे १७ माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यामध्ये त्यांचे कर्तृत्व चर्चेचा व कौतुकाचा विषय झाले.

सरांचे नोकरीचे उत्पन्न आणि गावाकडील व्यवसाय यामुळे घरची परिस्थिती हळूहळू सुधारु लागली. परंतु त्याच वेळी १९९२ मध्ये त्यांच्या वडिलांचे छत्र हरपले. कधीही भरून न निघणारे खूप दुःख झाले. विस्मरण काही होईना. काळ हेच औषध समजून ते पुढे जाऊ लागले.

घरची परिस्थिती हळूहळू सुधारु लागली परंतु नियतीला त्यांचे सुख पाहवले नाही. भैय्या दुकानच्या मालाची खरेदी करुन चिंचवडवरुन मोटारसायकल वर गावी जात असताना चाकण येथे त्यांचा भयंकर अपघात झाला आणि कोणीही त्यांना वाचवू शकले नाही. त्यांची पत्नी, ४ मुली, १ मुलगा मागे ठेवून भैय्या १९९६ मध्ये सर्वांना सोडून गेले. त्या धक्क्याने सरांच्या मातोश्री गेल्या. आईचा आधार होता, तो ही गेला. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. परंतु दुःख करण्यालाही वेळ नव्हता. ते एकटेच कमवते होते. अशा बिकट प्रसंगी त्यांनी पत्नीला काही काळ गावाला ठेवले. नोकरी निमित्त सर चिंचवडला राहायचे. शनिवारी, रविवारी आणि सुटीच्या दिवशी गावाला जाऊन हवे नको ते पाहून व सर्वांना धीर देऊन पुन्हा नोकरीवर रुजू होत असत.

काळ जात होता. वडील बंधूंच्या मुलींचे शिक्षण पूर्ण झाल्यावर योग्य वेळी चांगली स्थळे पाहून, वहिनींनींच्या सहकार्याने, कुटुंबियांच्या विचाराने सर्व मुलींची एकापाठोपाठ एक अशी लग्न केली. वडील बंधुंचा एकुलता एक मुलगा अमोलचे शिक्षण पूर्ण करुन, गावातील घराचे नूतणीकरण करुन अमोलला व्यवसायात स्थिर करुन दिले. आज अमोल खेड तालुक्यातील एक प्रथितयश उद्योजक आहे याचा सरांना अभिमान आहे. सर्व मुली त्यांच्या सासरी सुखाने नांदताहेत. हे पाहून भैय्याच्या उपकारातून अंशतः उतराई झाल्याबद्दल सरांना कृतज्ञता वाटते.

सरांचे कुटुंब चिंचवडला असल्याने दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा वाढता खर्च लक्षात घेऊन तसेच दुकानाचा गाळा खरेदी करण्यासाठी बँकेकडून तसेच फ्लॅट खरेदी करण्यासाठी त्यांनी महानगरपालिकेकडून अर्थ सहाय्य घेतले. पत्नीला बांगड्याचे दुकान टाकून दिले. त्यामुळे मुलांना सुसंस्काराबरोबरच चांगले शिक्षण मिळाले.

मा.महापौर योगेश बहल यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारताना कुटुंबासमवेत

सरांना शिक्षकी सेवा काळात आदर्श शिक्षक, गुणवंत कामगार, इ. पुरस्कार कर्तृत्वाच्या जोरावर प्राप्त झाले.
२८ वर्षाच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनंतर सन २०१४ मध्ये यशस्वी शैक्षणिक सेवा देऊन ते सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्ती निमित्ताने तत्कालीन महापौर योगेश बहल,
महाराष्ट्र शासनाचे सचिव मा.रंगनाथ नाईकडे व विविध क्षेत्रातील अनेक नामांकित व्यक्तिंनी काढलेले गौरवोद्गार हीच त्यांच्या सेवाकाळाची पोहोच पावती आहे. त्यामुळे सर स्वतःला कृतार्थ समजतात.

सरांनी सेवानिवृत्तीनंतर सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिले आहे. सर्वश्री. सुरेशभाऊ जुन्नरकर, रमेशतात्या जुन्नरकर, राजेंद्र अचलारे, प्रकाश तवटे यांना ते आपल्या सामाजिक कार्याचे मार्गदर्शक मानतात.

मा.आमदार गौतम चाबुकस्वार  यांच्या समवेत कार्यक्रमात

सरांची सन २०१७ मध्ये पिंपरी चिंचवड शहर सोमवंशीय क्षत्रिय कासार समाज सेवा मंडळाच्या अध्यक्ष पदाची धूरा सोपविण्यात आली. अध्यक्षपद स्विकारल्यानंतर काही दिवसातच न भूतो न भविष्यती असा बाका प्रसंग त्यांच्यासमोर उभा ठाकला. चिंचवड एमआयडीसीने समाजाचे मोहननगर चिंचवड येथील कालिका मंदिर अनधिकृत व अतिक्रमित ठरवून मंदिर पाडण्याची नोटीस बजावली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सरांनी तात्काळ समाज बांधवांची तातडीने सभा बोलावून सर्वांना परिस्थिती विशद केली. सर्वानुमते मंदिर बचाव समिती तयार करून युध्द पातळीवर स्थानिक नगरसेवक, आमदार यांच्यासह खासदार श्रीरंग तथा आप्पासाहेब बारणे यांची भेट घेऊन मंदिरात सभा आयोजित करुन सर्व परिस्थिती समजावून सांगितली.

मा.खासदार श्रीरंग तथा अप्पासाहेब बारणे यांच्याशी मंदिराच्या कठीण समस्ये संदर्भात चर्चा करताना अध्यक्ष श्री सासवडे सर

खासदारांनी ही वेळ न दवडता सहकारमंत्री श्री सुभाष देसाई यांच्या भेटीची वेळ निश्चित केली. शिष्टमंडळासह स्वतः खासदार आप्पा बारणे यांनी मंत्री महोदयांना प्रश्न सोडवण्यासाठी विनंती केली. कालिका मातेच्या कृपेने मंदिराचे बांधकाम वैध ठरत होते. या मुद्यावर मा.मंत्री महोदयांनी मंदिर पाडण्यास स्थगिती दिली. या घटनेमुळे समाज बांधवामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आणि सर्वांच्या सक्रिय सहभागामुळे मंदिराचे नूतनीकरण आणि परिसर सुशोभीकरणाचे काम निःर्विघ्नपणे उत्साहाने पूर्ण झाले. सरांच्या नेतृत्वाची ही जणू परीक्षाच होती पण सर्वांच्या सहकार्याने त्यांनी सर्व परिस्थिती यशस्वीपणे हाताळली.

सर आज पिंपरी चिंचवड सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक संघटनेचे संचालक, पिंपरी चिंचवड शहर कासार सेवा मंडळाचे अध्यक्ष, मध्यवर्ती युवा कासार मंडळ समन्वयक अशा वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत. या व इतर संघटनांच्या माध्यमातून आरोग्य शिबीरे, वृक्षारोपण, वधू- वर मेळावे, आपतग्रस्तांना मदत, गरजू विद्यार्थ्यांना सहाय्य इ. उपक्रम ते सर्वांच्या सहकार्याने आयोजित करीत असतात.

पिंपररी चिंचवड येथे झालेल्या वधू-वर मेळाव्यात मार्गदर्शन करताना

सुविद्य व सुसंस्कारित अर्धांगिनी सौ. कुमुदिनी सासवडे,  हिच्या खंबीर आधाराने आपण जीवन व्यतीत करू शकलो, तिने साथ दिली त्याचमुळे मनासारखे, आनंदी आणि समाजासाठी उपयोगी काम करु शकलो याबद्दल तिचे, तसेच मातृतुल्य वहिनी श्रीमती रुक्मिणी सासवडे यांनीही मोलाचे योगदान दिले, याबद्दल त्यांच्याविषयी सर्व सहका-यांविषयी ऋण व्यक्त करतात.

सरांचा मुलगा स्वप्नील एम कॉम असून एका नामांकित कंपनीत अधिकारी आहे. तर कन्या हर्षदा मास्टर ऑफ आर्किटेक्टचे शिक्षण पुणे येथे घेत आहे.

सेवेत असताना व निवृत्तीनंतर देखील सतत कृतिशील जीवन जगणारे सर, हे खरोखरच आदर्श शिक्षक आहेत. त्यांच्या पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा💐
– देवेंद्र भुजबळ, 9869484800

Devendra Bhujbal
Devendra Bhujbalhttps://newsstorytoday.com
Contact Me : +919869484800 Mail Me : devendrabhujbal4760@gmail.com
RELATED ARTICLES

9 COMMENTS

  1. #माझे वडील (खर तर ते माझे मित्र आहे, नेहमी फ्रीली आणि हसतमुख असे माझे वडील)
    खर तर काय लिहू सुचत नाहीये, कारण कितीही लीहल तरी मनातील सर्व गोष्टी पूर्ण होतील असा नाही.
    नेहमीच सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाण हा त्यांचा गुणधर्म आहे..माणस कसा जोडणे हे मी त्यांच्या कडून शिकले आहे..
    कोणत्याही परिस्थितीत नेहमी हसतमुख राहून त्यावर मात करून पुढे कसा जायचं हे मी त्यांच्या सोबत राहून शिकले आहे..
    बोलण्यातून कोणत्याही वयाच्या व्यक्ती ला सहज ते आपलस करू शकतात.. मग ते लहान मूल असो की वयोवृद्ध व्यक्ती..
    अश्या या प्रेरणादायी माझ्या वडिलांना माझे नमन ..
    We are proud of you 🤗
    We are happy to having you in our life 💯
    – हर्षदा कृष्णकांत सासवडे 😇

  2. गुरुतुल्य आदरणिय सासवडे सरांच्या जीवनपटाला प्रथमतः मी मनापासून सलाम करतो…
    माझा आणि सरांचा सन २०१० पासून नोकरीच्या निमित्ताने खराळवाडी विद्यालयात
    संपर्क आला.सदैव कुटूंब,समाज,नोकरी व सहकारी मित्र यांच्याबाबत सेवा व समर्पभाव जपून सर्वांशी प्रेम व आपलेपणाचा स्नेह वृध्दींगत करणे हा सरांचा खरा स्थायीभाव आहे. जीवनात अथक प्रयत्नांना नेहमीच यशाची किनार असते हेच सरांच्या जीवनसंघर्षावरुन दिसून येते.जीवनात आलेले सुख – दुःख व संकटांपुढे न झुकता जीवननौका प्रयत्न व समर्पितभावाने पुढे घेऊन जाण्यात सर यशस्वी झालेले आहेत…याचा मला सार्थ अभिमान आहे. सरांचा जीवनप्रवास नेहमीच सर्वांसाठी प्रेरणादायी व दिशादर्शक आहे…पुनश्च एकदा सरांच्या आदर्श जीवनप्रवासाला सलाम…
    – नरेंद्र बंड सर

  3. माझे परमस्नेही श्री सासवडे सरांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचा मागोवा घेणारा वास्तववादी आणि प़ेरणादायी लेख वाचला. जुन्या आठवणींचा पट डोळ्यासमोर तर लागत. एक अत्यंत विश्वासू प़ामाणिक पापभिरू आस्तिक सोशिक सात्विक लाघवी उदार कुटुंब वत्सल विद्यार्थी प़िय आणि प़सन्न शिक्षक म्हणून ते सुपरिचित. सरांच्या जीवनातील अत्यंत कसोटीची क्लेशदायक घटना थोरले बंधू कै. भैय्यासाहेब यांचे अकाली अपघाती निधन. अशा बिकट परिस्थितीत ज्या धीरोदात्तपणे कुटुंबाचे पालन केले ते केवळ अतुलनीय. रामायणातील भरताच्या बंधुप़ेमाप़माणे समर्पित जीवन जगणार्या सरांविषयीचा आदरभाव आणखीनच दुणावतो. प़तिकुल परिस्थितीत आत्मविश्वासाने जिद्दीने रात्रंदिवस कष्ट करुन अर्जित सुबत्ता संपन्नता आणि समाजमान्यता ठळकपणे नजरेत भरते. सेवानिवृत्ती नंतरही अतिशय तडफेने तन्मयतेने आणि निरपेक्ष पणे गरजू समाज बांधवांसाठी झोताने पाहून अहंकाराचा वारा न लागो माझ्या मना या संतवचनाप़माणे पाय सतत जमीनीवर असणाऱ्या सरांबद्दल कौतुक वाटते. भावी जिवनात त्यांच्या हातून अशीच समाजसेवा घडावी यासाठी त्यांना दीर्घ आयुरारोग्य चिंततो
    जाधव एन .एच.

  4. Congratulations sir!💐It was a great experience to work with you at Kharalwadi school. Your helpful nature and active team member taught us many new things.we are proud of you.Once again many congratulations

  5. ….सार्वजनिक कामात सातत्याने व्यस्त राहून , मोठ्या कालावधीत नोकरी करून कुठलीही संपत्ती मात्र वाढवता आली नाही. कारण संपत्ती हे कधीच ध्येय नव्हते, आणि असणारही नाही. पण …….आपल्याला प्रामाणिकपणे जे करणे शक्य आहे ते करत राहायचे. एवढच गणित त्यांना माहीत आहे. उभ्या आयुष्यात जे ज्ञान त्यांच्या कडे असेल ते विद्यार्थ्यांना देण्याचा त्यांनी प्रयत्न केला एक नोकरी म्हणून नव्हे तर….एक पवित्र पेशा म्हणून !! शिक्षक म्हणून ज्या दिवशी जबाबदारी घेतली तेव्हा पासून सेवेत असेपर्यंत त्यांनी सर्वात जास्त ….. शाळेचा असणार आहे याची काळजी घेतली.जीवनात आतापर्यंत अनेक प्रकारचे चढ उतार , प्रसंग अनुभवलेत . पण ….अविचल, स्थिर आहेत. कारण प्रत्येक गोष्ट प्रमाणिकपणे करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आणि त्यामुळे इतरांना काय वाटेल? याचा फारसा विचार कधीच करत नाही. प्रत्येकाचे ईश्वराने भले करावे , सर्वाना सद्बुद्धी द्यावी एवढीच त्या करुणाकराकडे प्रार्थना.
    पानसरे एस जी

  6. एक आदर्श मित्र, सहकारी ,शिक्षक आनी प्रेमळ मनाचा निस्वार्थी मार्गदर्शक,समाज कार्याची आवड असणारा म्हणून श्री सासवडे सरांचा उल्लेख करावा लागेल.
    त्यांचे वडील ,आई, आनी मोठा भाऊ हे आमचे कुटुंब चे स्नेही होते
    सर, आनी मी पदवी नंतर नोकरी शोधन्यचे दृष्टीने अधिक जवळ आलो
    अत्यंत चांगला स्वभाव, प्रामाणिक वृति, अहोरात्र कष्ट करण्याची तयारी, हे विशेष गुण आहेत.

  7. आदरणीय श्री. कृष्णकांतजी सासवडे सरानी खरोखर संघर्षमय जीवन जगून
    स्वतःची स्वतंत्र व वेगळी ओळख फक्त कासार समाजापर्यत मर्यादित न ठेवता इतर समाजासाठी एक आदर्श निर्माण केला.

    सतत हसतमुख व परिस्थितीला शरण न जाता कठीण समस्या सोडवत राहिले. समाजातील सर्व थरातील लोकांशी कायमच चांगले संबध व सुंसंवाद ठेवला.

    अशा थोर व्यक्तीला आमचा मानाचा मुजरा.

    श्री. संदिप रांगोळे

  8. आदरणीय श्री. कृष्णकांतजी सरानी खरोखर संघर्षमय जीवन जगून
    स्वतःची स्वतंत्र व वेगळी ओळख फक्त कासार समाजापर्यत मर्यादित न ठेवता इतर समाजासाठी एक आदर्श निर्माण केला.

    सतत हसतमुख व परिस्थितीला शरण न जाता कठीण समस्या सोडवत राहिले. समाजातील सर्व थरातील लोकांशी कायमच चांगले संबध व सुंसंवाद ठेवला.

    अशा थोर व्यक्तीला आमचा मानाचा मुजरा.

    श्री. संदिप रांगोळे

  9. मा.कृष्णकांतजी सासवडे सर यांना मी गेल्या २५ वर्षापासून ओळखत आहे. ते माझे ज्येष्ठ बंधू समान, गुरूसमान असून ते खरोखरच एक सरळमार्गी, कर्तुत्ववान आणि सर्वांच्या उपयोगी पडणारे आदर्श मार्गदर्शक आहेत.
    एक सहकारी शिक्षक व माजी मुख्याध्यापक – श्री. तानाजी अंकुशराव.
    (सचिव)
    सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक असोशियन,
    पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी