आदिवासी, कष्टकरी, आणि समाजाच्या रांगेतील शेवटी असणाऱ्या गोर गरीबांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणारे, त्यांच्या जीवनातील दारिद्र्य आणि भूक या प्रश्नाच्या भोवती फिरणारे “आम्ही काय रं चिखुल खावा ?” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच भाईंदर येथे संपन्न झाला.
यावेळी बोलताना “माझे आयुष्य बदलून टाकणाऱ्या ज्या व्यक्ती मला माझ्या जीवनात भेटल्या त्या व्यक्ती या पुस्तकाच्या रूपाने वाचकांना भेटतील” असे सांगून श्री विवेक पंडित पुढे म्हणाले, जी माणसे मला भेटली त्यांनी एकत्र येऊन संघर्ष केला आणि त्यांचे आयुष्य बदलले, हे मी पाहिले याचा मला अभिमान वाटतो. या पुस्तकातील प्रत्येक कथा दारिद्र्य आणि भूक याच्या भोवती फिरणारी आहे. समाजातील प्रत्येक माणूस जो पर्यंत स्वतंत्र होत नाही तोपर्यंत खरं स्वतंत्र नाही. त्यासाठी प्रत्येकाने लढावे लागेल. या पुस्तकाच्या शिर्षकातील “आम्ही” म्हणजे आम्ही भारताचे, दुर्लक्षित, गरीब लोक, यांचे प्रतीक असल्याचे श्री पंडित यांनी सांगितले.
सोहळ्याचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक श्री. दीनानाथ मनोहर यांनी “समाजाला जो बदलतो तो खरा समाज सेवक, विवेक हा त्यातील एक” असे गौरवोद्गार काढत विवेक पंडितांच्या संघर्षाच आलेख मांडत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
ज्येष्ठ साहित्यिक अशोक बागवे यांनी आपल्या खुमासदार शैलीत पुस्तकाच्या अनुषंगाने समाजातील वेगवेगळ्या विषयांबाबत आपले मत व्यक्त केले. विवेक पंडित यांच्या विषयी सुरवातीपासून ते आजपर्यंतच्या वाटचालीतील आणि त्यांना साथ देणाऱ्या विद्युल्लता पंडित यांनी मिळून गरीब दुर्बलांच्या आयुष्यात उजेड आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या पराकाष्टांची कहानी आणि त्या दरम्यान आलेले प्रत्यक्ष अनुभव व वास्तवाचे चटके या पुस्तकात आहेत. यातील पाटीलबावा हा सत्तेचा प्रतीक असून, आदिवासीं दुर्बलांच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याचे कथन, सत्य घटनांवर आधारलेले पुस्तक आहे. असे मत अशोक बागवे आणि लता भिसे-सोनावणे यांनी व्यक्त केले.
खासदार राजेंद्र गावित, आमदार कपिल पाटील, मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त श्री दिलीप ढोले यांनी देखील विवेक भाऊ व त्यांच्या पुस्तकाविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
श्री. पंडित यांनी मराठी व इंग्रजीत विपुल लेखन केले आहे. अत्याचार प्रतिबंधक कायद्यावरील मार्गदर्शक पुस्तिका, बंधमुक्ती, परिघावरून, अखेर सावळ्या जिंकला, माणूस म्हणून जगण्यासाठी ही त्यांची पुस्तके लोकप्रिय झाली आहेत. त्यानंतर आता त्यांचे “आम्हीं काय रं चिखुल खावा ?” हे पुस्तक नक्कीच वाचकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास डिंपल पब्लिकेशनचे श्री अशोक मुळे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, श्रीमती अश्विनी भोईर यांनी केले तर, सामाजिक कार्यकर्त्या डॉमनिका डाबरे यांनी आभार मानले. या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर, श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार, डिंपल पब्लिकेशनचा संपूर्ण परिवार उपस्थित होता.
– देवेंद्र भुजबळ, 9869484800