Wednesday, July 2, 2025
Homeसंस्कृतीआम्ही कर्जतकर....

आम्ही कर्जतकर….

महाराष्ट्रात २ कर्जत आहेत. एक अहमदनगर जिल्ह्यातील, तर दुसरे रायगड जिल्ह्यातील, मुंबई- पुणे रेल्वे मार्गावरील. दुसऱ्या कर्जतचे जेष्ठ साहित्यिक लिहितायत आम्ही कर्जतकर….विषयी.

कर्जतला रेल्वे येईपर्यंत फारसे महत्व नव्हते. तेव्हा “नसरापूर” तालुका होता. नसरापूर मुख्य गाव होते. पेशवे यांचे सरदार पिंपुटकर यांच्या वास्तव्यामुळे “दहीवली” ला खुप महत्व होते. दहीवली गावातील विठ्ठल मंदिराच्या स्थापनेच्या वेळी, सवाई माधवराव पेशवे येथे येऊन गेले असल्याने दहीवलीला विशेष महत्व प्राप्त झाले .

१८५६ च्या सुमारास कर्जत पर्यत रेल्वे आली व पुढे पुढे खंडाळा घाटापर्यंतचे काम पूर्ण होऊन रेल्वे मार्ग पुण्याकडे गेला. सुरवातीला पळसदरीला रेल्वेचे महत्वाचे ठाणे होते, पण कर्जत परिसरात मुबलक मोकळी जागा असल्याने कर्जतला जंक्शन स्टेशन बनवले. १९३० पर्यंत कल्याण येथे आगगाडीला बँकर लागत असे. परंतु १९३० नंतर कर्जतला बँकर लागण्यास सुरवात झाल्यामुळे कोणतीही गाडी पुण्याला जातांना थांबू लागली, आणि कर्जतचे महत्व वाढू लागले.

पुर्वी मारुती मंदिर परिसरातील टेकाडावर सात आठ घरे असलेला भाग म्हणजे कर्जत समजले जायचे. त्या नंतर त्या भागाला पाटील आळी, दगडे आळी व खालच्या भागाला डेक्कन जिमखाना असे म्हणू लागले.

रेल्वेच्या आगमनानंतर शासनातर्फे कर्जत परिसरातील भिडे, गांगल, पाध्ये, काळे, कोडिलकर, मुळे, आरेकर इत्यादी श्रीमंत घराण्यांना ९९ वर्षाच्या कराराने रेल्वे परिसरात मोक्याच्या जागा देण्यात आल्या. त्यांनी तेथे टुमदार घरे बांधली . खंडाळा घाटाचे काम चालू होते तेव्हा तेथे काम करणाऱ्या मजुरांसाठी ठेकेदाराने उल्हास नदीकाठी छोटी छोटी घरे बांधली होती. ते काम पुरे झाल्यानंतर त्या जागा विकण्यात आल्या. तीच सध्याची महावीरपेठ आहे.

१८९३ साली कर्जत येथे “जीवन शिक्षण मंदिर” शाळा सुरू झाली. ह्या शाळेत राम गणेश गडकरी, प्रबोधनकार ठाकरे, र .वा .दिघे यांचे शिक्षण झाल्यामुळे ही शाळा ऐतिहासिक ठरली आहे. १८९३ च्या दरम्यान पोस्टाची व पोलिसांसाठी निवास स्थाने बांधण्यात आली. टेकडीवर मामलेदार कचेरी व पोलिस स्टेशन सुरू झाले.

दहीवली येथील विठ्ठल मंदिर देवस्थानची कर्जतच्या टेकडी परिसरात भात शेती होती. ती देवस्थानने एन. ए. करून प्लॉट पाडून विकली. त्या परिसराला
चिखलवाडी” असे म्हणत असत. १९६६ साली तेथील रहिवाशांनी पालशेतकर वाड्यात, सत्य नारायणाची पुजा करून त्या भागाला “विठ्ठलनगर” असे नांव दिले .

१४ ऑगस्ट १९१९ रोजी कर्जत येथे, आशियातील सर्वात मोठे भात संशोधन केंद्र सुरू झाले. संयुक्त महाराष्ट्र होण्यापूर्वी मोरारजी देसाई मुख्यमंत्री असतांना १९५६ साली कर्जत परिसराला “ग्रीन झोन” म्हणून जाहीर केले. त्यामुळे हा परिसर अद्याप प्रदूषण मुक्त राहिला आहे.

कर्जतचा वडापाव दिवाडकर यांच्यामुळे जास्त लोकप्रिय झाला. त्यानंतर दगडे, मावकर, खोत, सट्टु यांच्यामुळे वडापाव खावा तर कर्जतचा ! असे काही जण म्हणतात, त्यावेळेस कर्जतकरांची मान ताठ होते.
बेडेकर यांचे माक्याचे तेल आणि वैद्य यांची आवळा सुपारी यांनी कर्जतचे नांव अखिल भारतीय पातळीवर नेवून ठेवले.

१९९२ साली कर्जत आणि दहीवली यांची मिळून कर्जत नगरपरिषद स्थापन झाली आणि त्यानंतर कर्जत चा विकास झपाट्याने झाला. पुर्वीचे वाडे जाऊन तेथे तीन चार मजली इमारती झाल्या. पंचवीस वर्षापुर्वी बांधलेल्या इमारती पाडून सध्या तेथे आठ नऊ मजली टोलेजंग इमारती होत आहेत. कर्जत शहर कात टाकत आहे. पुर्वी कर्जत येथे राहणारे अनेक वर्षानंतर कर्जत येथे आले तर त्यांना बदललेले कर्जत आवडेल किंवा नाही याबद्दल दुमत असू शकेल.

कर्जतची टेकडी तशीच असली तरी त्यावर फिरायला जाणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. क्रीडा आणि नाट्य रसिकांची आवडत्या आंबराईला अनेक वर्षानंतर नागरिकांनी केलेल्या पाठपुराव्या मुळे वैभव प्राप्त होणार आहे. येथे मिनी स्टेडियम, क्रीडांगण तयार होत आहे. अर्धवट असलेले नाट्यगृह आकर्षक पध्दतीने बांधले जात आहे.

येत्या पंधरा वर्षात कर्जतसह मोठा परिसर “तिसरी मुंबई” म्हणून विकसित होणार आहे.

असे हे आपल्या सर्वांचे आवडते कर्जत अद्यापही सर्वांना आवडत असेल यात शंकाच नाही.

दिलीप गडकरी

– लेखन : दिलीप प्रभाकर गडकरी
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. सन्मा. दिलीप गडकरींजी,
    जेष्ठ साहित्यिक, यांनी “आम्ही कर्जतकर ” बाबतचे अप्रतिम लेखांकन केले असून श्री भुजबळ साहेबांच्या सकस लेखीनीद्वारे संपादन केले आहे.

    खरं म्हणजे सह्याद्रीच्या रांगेतील एका टेकडीच्या / पर्वताच्या ( बोरघाट ) कुशीतील मुंबई -पुणे रेल्वे मार्गावरील एक छोट्याशा गावाचे महत्व पेशवे काळापासून ते ब्रिटिश साम्राज्य आणि आजच्या काळातही कसे महत्व प्राप्त झाले आहे याबद्दल अतिशय समर्पकपणे रेखांकन केले आहे.

    याशिवाय, जुन्या पिढीतील भिडे, पाध्ये, काळे , मुळे, कोडिलकर, आरेकर यांच्या पासून ते सुप्रसिद्ध वडापाव वाले दिवाडकर यांच्या खास वैशिष्ट्यांसह अप्रतिम वर्णन केले आहे. त्यामुळेच ” आम्ही कर्जतकर” खरोखरच वाचनीय झाले आहे. त्यासाठीच सन्माननीय गडकरी जी यांचे लेखन व भुजबळ साहेबांच्या सुंदर संपादनाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा !!

    राजाराम जाधव,
    उलवे, नवी मुंबई,
    9867262675

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४