अतिशय हुशार, शांत, सालस, नम्र व निरपेक्ष भावनेने सामाजिक कार्य करणारे व्यक्तिमत्त्व, पर्यावरणप्रेमी
प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक म्हणजे सातारचे श्री महेश कोकीळ हे होत .
श्री महेश कोकीळ यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील धावडशी या गावी १३ एप्रिल १९७४ रोजी झाला. या गावाला मोठी परंपरा आहे. ब्रह्मेन्द्रस्वामी यांचे भव्य मंदिर येथे आहे. तांबेकुल वीरश्री झाशीची राणीही येथीलच. याच धावडशीतील सामान्य कुटुंबात श्री महेश कोकीळ यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव लिलावती तर वडील गगन कोकीळ. गावात वडिलांचा बांगडीचा व्यवसाय होता.
शिका व मोठे व्हा अशी आधुनिक विचारसरणी असल्यामुळे, त्यांच्या वडीलांनी त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर लक्ष दिले. श्री कोकिळ यांचे प्राथमिक शिक्षण धावडशी येथेच तर माध्यमिक शिक्षण साताऱ्यातील कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी विद्यालयात झाले. लहानपणापासून अतिशय धाडसी व महत्त्वाकांक्षी असलेले महेशजी, १९९८ मध्ये ‘सिव्हिल इंजिनियर’ झाले.
इंजिनिअर जरी झाले तरी नोकरीशिवाय काही पर्याय नव्हता व स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी अनुभवही घ्यायचा होता. त्यामुळे बांधकाम क्षेत्रातील नामवंत बी.जी.शिर्के कंपनीत त्यांनी स्थापत्य कामाचा अनुभव घेतला.
अनुभवाची भक्कम शिदोरी घेऊन त्यांनी सन २००० मध्ये बांधकाम व्यवसायात पदार्पण केले. सामान्य माणसं आयुष्यात घर पुन्हा पुन्हा बांधू शकत नाही. म्हणूनच त्यांना आवडेल असे, तक्रार करावयास कोणतीही जागा न ठेवता ते घर, बंगले अल्पदरात उभारून देऊ लागले. त्यामुळे अनेकांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले. नागरिकांची दुआ त्यांना मिळत गेली.
वन विभाग, शिक्षक बँक कर्मचाऱ्यांची घरे बांधून दिली. आजपर्यंत त्यांनी शंभराहून अधिक बंगले उभे केले आहेत.
अवघ्या पाच – दहा हजारांवर त्यांनी व्यवसाय सुरू केला. दृष्ट लागावी असा व्यवसाय वाढला. अनेक चढ उतारांचा सामना त्यांनी धैर्याने केला. शासनाची कामे घेण्यास सुरवात केली. तो व्यवसाय २००५ पर्यंत बरा चालला. पण बिले थकल्यामुळे आणि इतर गोष्टींमुळे व्यवसायात तब्बल दहा लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला. त्यामुळे काही काळ ते खचून गेले होते. मात्र विश्वासू मित्र, काही प्रामाणिक अधिकारी ह्यांनी त्यांना दिलासा दिला, मदत केली. नातेवाईकांनी व काही मित्रांनी दागिने गहाण ठेवून त्यांना आर्थिक सहकार्य केले. त्यामुळे त्यांचे मनोबल वाढले व पुन्हा त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला.
अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे हे मनाशी पक्के करून न थांबता ते प्रयत्न करत राहिले. त्यामुळे त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिले नाही. आपल्यावर ठेवलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरवला. प्रचंड मेहनत, चिकाटी, जिद्द व आशादायी विचारसरणी असल्याने यशस्वी वाटचाल झाली.
त्यांचा प्रामाणिकपणा आणि कामातील उत्तम दर्जा यामुळे वन विभागाने त्यांना काम करण्याची संधी दिली. त्यांना मायणी अभयारण्यातील काम मिळाले. तेथे त्यांनी कर्मचारी निवासस्थान बांधले. तसेच परिसरातील काही खाजगी बांधकामे ही मिळाली. त्यामुळे कर्जाचा व देणेकर्यांचा भार हलका झाला.
अधिकारी, कर्मचारी व खाजगी नागरिकांची कामे अल्पदरात दर्जेदार करून दिल्याने, कोठेही जाहिरात न करता महेश कोकीळ ह्यांचे नाव सर्वत्र घेतले जाऊ लागले. नागरिकांच्या तोंडी प्रसिद्धी मुळे ते लोकप्रिय झाले. वन विभाग तर त्यांच्या कामावर एवढे खुश झाले की मेढा, महाबळेश्वर अशा जिल्यातील ठिकाणी तसेच सांगली, सोलापूर, पुणे येथे वन विभागाने काम करण्याची संधी त्यांना दिली व या संधीचा त्यांनी सोने केले व स्वतःचे वेगळे अस्तित्व सिद्ध केले. बांधकाम क्षेत्रात आज स्वकर्तुत्वाने समाजात एक वेगळा ठसा उमटला.
श्री कोकिळ यांनी २०१० पासून शासकीय कामांना वाहून घेतले. मायणी अभयारण्याप्रमाणेच माळशिरस येथील वनपर्यटन केंद्र, सांगली, सोळशी, जरंडेश्वर, सुखेड, जांभळी, भैरवनाथ अशी वनपर्यटन केंद्रे तसेच वन विभागाची साताऱ्यातील ‘वनभवन’ ही इमारत, थ्री स्टार हॉटेलला ही लाजवेल असा उच्च दर्जा, आधुनिकता व कल्पकता असा त्रिवेणी संगम साधून महाबळेश्वर येथील ‘हिरडा‘ या विश्रागृहाचे त्यांनी केलेले बांधकाम ही त्यांच्या कल्पकतेची, गुणवत्तेची पोचपावती आहे.
महाबळेश्वर येथील आर्थरसिट पॉइंट, केन्ट्स पॉइंट, सावित्री पॉइंट ही कामेही त्यांनी विकसित केली आहेत. तत्कालीन वनमंत्री डॉ पतंगराव कदम यांनी श्री कोकीळ ह्यांच्या कामाचे दिलखुलास कौतुक केले तो त्यांच्यासाठी एक अविस्मरणीय क्षण आहे असे ते आवर्जून सांगतात.
सर्व बांधकामे करताना कोकीळ ह्यांनी पर्यावरण रक्षणाची दृष्टी ठेवली आहे. प्लॅस्टिक बाटल्या हा पर्यावरणाचा मोठा शत्रू आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी बांधकामात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. कोठेही सापडणाऱ्या बाटल्या जमा करून त्या प्लॅस्टिकचा यंत्राद्वारे चुरा करून तो रस्त्याचे डांबरीकरण करताना त्यांनी आवर्जून वापरला. त्यामुळे रस्त्याच्या कामात मजबुती आली. तसेच प्लॅस्टिकची विल्हेवाट लावण्यात यश आले.या बाटल्यांपासून विटा तयार करून त्या कंपाउंडसाठी वापरण्यात आल्या .
बांधकाम कोणतेही असो पर्यावरण जपण्यात त्यांचा मोठा भर असतो. असा पर्यावरण रक्षणाचा ध्यास जर प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाने घेतला तर भविष्यात
पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, हे निश्चित.
श्री कोकिळ यांनी पाच हजारांवर सुरू केलेला व्यवसाय आता काही कोटींवर पोहचला आहे.
या यशात, सर्व वाटचालीत कुटुंब, मित्र परिवार, वन विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठे सहकार्य केले आहे असे ते प्रांजळपणे सांगतात.
एवढे प्रसिद्ध, प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व असून देखील त्यांना कोणताही गर्व अथवा अहंकार नाही हा त्यांच्यात दुर्मिळ गुण आहे.
मिशन प्रशासन ह्या टीम मध्ये ही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या कासार समाजातील तरुणांना मार्गदर्शन करण्याचे अतिशय मोलाचे काम ही टीम करत आहे.
ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाला आपण काही देणे लागतो असा शुद्ध हेतू मनात ठेवून अनेक गरजवंतांना ते मदत करतात.दानधर्म करताना ह्या हाताचे त्या हाताला कळता कामा नये अशी आपली परंपरा ते जपतात. त्यामुळे कोणतेही फोटो सेशन अथवा मोठेपणा न मिरवता ते सर्व सामाजिक कार्य निरपेक्ष भावनेने करत असतात. हा गुण त्यांच्याकडून घेण्यासारखा आहे.
ज्या गावात ते लहानाचे मोठे झाले त्या जन्मभूमीला, तेथील मुलांना ही विविध शिबिरांद्वारे ते सतत मार्गदर्शन करतात.
त्यांच्या पत्नी सौ सुचेता महेश कोकीळ ह्या वकील आहेत तर मोठी मुलगी मृणाल ही बीबीए (BBA) तर मधली मुलगी नववीत व लहान मुलगी सातवीत शिकत आहे.
भविष्यात अजून काय करण्याची इच्छा आहे हे विचारल्यावर ते सांगतात की पुण्यात व मुंबईत देखील व्यवसायिक दृष्ट्या वाढ करायची आहे जेणे करून सर्वांची प्रगती होईल, तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील स्वावलंबी होऊन त्यांचीही प्रगती होईल.
ते तरुणांना असा संदेश देतात की त्यांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे. नोकरी करण्यापेक्षा व्यावसायिक होण्यावर भर द्यावा जेणेकरून ते इतरांना नोकरी देऊन त्यांना सक्षम करतील.
असे हे महेश कोकीळ ज्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील बांधकाम व्यवसायात आपला आगळावेगळा ठसा उमटवला आहे. प्रचंड इच्छाशक्ती असेल तर अशक्य ही शक्य करण्याचे सामर्थ्य असते हे त्यांच्या यशकथेतून नक्की जाणवते. त्यांच्या कार्याला सलाम व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

लेखन : रश्मी हेडे.
संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.