रेल्वे गाडीच्या शोधामुळे मानवी जीवनावर दूरगामी परिणाम झाला. त्याचे प्रतिबिंब साहजिकच चित्रपटात पडले.
प्रवासानिमित येणारे अनेक सुख दु:खाचे प्रसंग चित्रपटात चित्रित झाले. प्रवास, सहली, पर्यटन, भेठी गाठी, निरोप, रोमांस, रहस्यमय खून व गुन्हेगारी, शोध मोहिमा, पाठलाग, अपघात यातून अनेक चित्रकथा फुलल्या. त्याचे संस्मरणीय चित्रांकन झालं.
हॉलीवूडच्या ‘दी ग्रेट ट्रेन राँबरी’ पासून शेन कॉनरी अभिनित ‘विथ लव फ्रॉम रशिया’ या जेम्स बॉंड पटापर्यंत, शेकडो चित्रपटात रेल्वे गाडीतील थरार प्रेक्षकांनी अनुभवला.
तसाच भारतीय चित्रपटात तुफान मेल, दी ट्रेन, बर्निंग ट्रेन, शोले ते चेन्नई एक्सप्रेस पर्यंत अनेक चित्रपटांनी हा अनुभव दिला.
भारतीय चित्रपटांचे विशेष म्हणजे त्यातील अवीट गोडीची गाणी. आजच्या चित्रगीतमधून काही अनमोल हिंदी गीतांचा हा सुरेख प्रवास.
या प्रवासाची सुरुवात होते ‘तुफानमेल’ (१९४२) चित्रपटाने. भारत छोडो आंदोलन देशभर सुरु होते. ‘चले जाव’ चा नारा देशभर गुंजत होता. त्याबरोबर ‘कानन देवी’ यांच्या आवाजातील रेल्वेगाडीच्या गतीवर आधारित ‘तुफान मेल दुनिया ये दुनिया तुफान मेल’ हे गीत ही गाजत होते. संगीत कमाल दासगुप्ता. गीत पंडित माथुर.
मग आठवते ‘जागृती’ (१९५४) सिनेमातील कवी प्रदीप यांनी गायलेले ‘आओ बच्चों तुम्हे दिखाऊं, झांकी हिंदुस्तानकी इस मिट्टीसे तिलक करो यह धरती है बलीदान की, वंदे मातरम वंदे मातरम’. हेमंत कुमार यांनी संगीत दिलेल्या या गाण्यात एक शिक्षक रेल्वे प्रवासात विद्यार्थ्याना देशाचा इतिहास व भुगोल उलगडून दाखवितो.
‘देख तेरे संसार की हालत क्या हो गया भगवान, कितना बदल गया इंसान’ हे असेच एक गाजलेले गीत. भारत पाकिस्तान फाळणीवर आधारित ‘नास्तिक’ (१९५४) सिनेमातील. गायक कवी प्रदीप. तर ’बस्ती बस्ती पर्बत पर्बत/ गाता जाये बंजारा लेकर दिल का एक तारा’ आजही अनेकांच्या कानात गुंजतेय. चित्रपट रेल्वे प्लँटफॉर्म (१९५५) आवाज मो.रफी. संगीत मदन मोहन.गीतकार साहिर लुधियानवी. अभिनेते देवानंद आणि वहिदा रेहमान यांच्यावर चित्रित ‘है अपना दिल तो आवारा/ न जाने किसीपे आयेगा’ एक सदाबहार गीत. चित्रपट सोलवां साल (१९५८) आवाज हेमंत कुमार संगीत एस डी बर्मन. गीत मजरूह सुलतान पुरी.
साठच्या दशकात रेल्वे गाडीतील सिनेगीतांची सुरुवात एका मजेशीर विनोदी गीताने होते. कलाकार भारत भूषण. एखादा पुरुष चुकून महिला डब्ब्यात शिरल्यावर काय धमाल होते यावर आधारित हे गीत. ‘औरोतों के डब्बे मे मर्द आ गया/ धोका खा गया मै तो धोका खा गया/बोलो बोलो इसकी सजा क्या है/ पहले ये बता खता क्या है’. चित्रपट ‘मुड मुड के ना देख’(१९६०). मो.रफी आणि सुमन कल्याणपुरकर यांनी गायलेले हे गीत प्रेम धवन यांनी लिहिलेलं. हंसराज बहल यांनी संगीत दिले आहे.
’मै हूं झूम झूम झुमरू हे’ झुमरू (१९६१)चे किशोर कुमार मधुबाला अभिनित विनोदी गीत कोण विसरणार ? दार्जीलिंग रेल प्रवासात चित्रित, मजरूह सुलतानपुरी लिखित या गीताला किशोर कुमार यांनी संगीत दिले आहे. ’मुझे अपना यार बनालो’ हे ‘बाँय फ्रेंड’ (१९६१) सिनेमातील गीत शिवलिक हिमालय पर्वत रांगातून जाणाऱ्या सिमला कालका ट्रेनमध्ये शम्मी कपूरवर चित्रित आहे. मो. रफी, हसरत जयपुरी आणि शंकर जयकिशन यांनी साज दिला आहे.
‘मैं चली मैं चली, पीछे – पीछे जहां/ ये ना पुछो किधर ये ना पुछो कहां’ हे शम्मी कपूर कल्पना यांचा रोमांस दाखविणारे असेच दार्जीलिंग हिमालय रांगेचे दर्शन घडविणारे गीत. चित्रपट: प्रोफेसर. मो. रफी शंकर जयकिशन हसरत जयपुरी हे त्रिकुट.
याच कालावधीत जितेंद्र आणि माला सिन्हा यांचा ‘मेरे हुजूर’ सिनेमातील ‘रुख से जरा नकाब हटा दो मेरे हुजूर’चा रोमान्स भाव खावून जातो. आवाज मो. रफी. जेष्ठ अभिनेते अशोककुमार अभिनित ‘आशीर्वाद’
(१९६८) सिनेमा म्हणजे मुलांसाठी एक ग्रेट भेट. दादामुनीचा आवाज व अभिनयाने नटलेले ‘रेल गाडी छूक छूक’ हे गाणं आजही सर्वाना आपले बालपण स्मरून देते. हरिंद्रनाथ चटोपाध्याय लिखित या गाण्याला वसंत देसाई यांनी संगीत दिले आहे. लहान मुलांसमवेत रेल्वे गाडीच्या इंजिनाची शिट्टी वाजवीत केलेला झुक झुक गाडीचा गीतातील शब्द खेळ म्हणजे धम्माल आहे.
या दशकाचा शेवट गाजतो तो आराधना (१९६९) चित्रपटाने. अभिनेता राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांचा मंदधुंद अभिनय आणि सोबत दार्जीलींगचे निसर्ग रम्य पहाडी वातावरण. रेल्वेगाडीत बसलेल्या नायिकेचा नायक जीपने पाठलाग करीत म्हटलेले ‘मेरे सपनो की रानी कब आयेगी तू/ आये ऋत मस्तानी कब आयेगी तू’ पार वेडावून जाते सर्वाना. किशोर कुमार यांच्या आवाजात आर डी बर्मनने सजविलेले हे गीत आजही तितकेच लोकप्रिय आहे.
सत्तरच्या दशकात दोन गाणी सिनेमा रसिकांना धुंद करतात. ‘दोस्त’ (१९७४) सिनेमातील ‘गाडी बुला रही है सीटी बजा रही है/चलना ही जिंदगी है चलती ही जा रही है’. डोंगराळ भागातून बोगदे पार करीत पुढे जाणारी रेल आणि त्यातून प्रवास करणाऱ्या नायक धर्मेंद्रवर हे गीत चित्रित झालं आहे. जीवनाचं तत्वज्ञान सांगणाऱ्या या गीताला किशोर कुमार यांनी आवाज दिला आहे.
असेच ‘हम दोनो दो प्रेमी दुनिया छोड चले/ जीवनकी हम सारी रस्मे तोड चले/ ये बाबू कहां चले’ हे किशोर आणि लता यांनी गायलेले एक धमाल गीत. राजेश खन्ना आणि झीनत अमन यांनी मालगाडीतील प्रवासात केलेला खटयाळ अभिनय आजही संस्मरणीय आहे.
चित्रपट अजनबी (१९७४) गीत आनद बक्षी. संगीत आर डी बर्मन. ‘होगा तुमसे प्यारा कौन’ हे ‘जमाने को दिखाना’ है (१९७७) ऋषी कपूर पद्मिनी कोल्हापुरे अभिनित एक तुफान गीत. हे गीत लक्षात राहते ते दार्जीलिंगच्या पहाडातून जाणाऱ्या वाफेचे इंजिन असलेल्या रेल्वे गाडीच्या मनमोहक एरीअल शॉटसाठी. चालत्या गाडीच्या टपावर केलेला गीत अभिनय. आवाज शैलेन्द्र सिंग. संगीत आर डी बर्मन.
बर्निंग ट्रेन (१९८०) गाजतो तो त्यातील मल्टी कास्ट स्टारडम आणि थरार बरोबरच त्यातील ‘पल दो पल का साथ हमारा, पल दो पल की याराना’ गाण्यासाठी. आशा भोसले आणि मो.रफी यांनी गायलेले, साहिर लुधियानवी लिखित आर डी बर्मनचे संगीत असलेले गीत म्हणजे जीवन गाणं आहे. एका क्षणाला भेटणारे आपण दुस-या क्षणाला किती दूर जातो याची जाणीव करून देते.
‘हाथो की चंद लकेरों का’ हे विधाता (१९८२) सिनेमातील गाणं दिलीप कुमार आणि शम्मी कपूर या दोन दिग्गज कलाकारांवर चित्रित झालेलं. जीवनाचं तत्वज्ञान सांगणारं हे गीत सुरेश वाडकर आणि अन्वर हुसेन यांनी गायले आहे. गीत आनंद बक्षी. संगीत कल्याणजी आनंदजी. कला सुपर स्टार अभिताब बच्चन यांची .’सारी दुनिया का बोज हम उठाते है’ म्हणत कुली (१९८३) त्यांनी केलेला अभिनय आजही लाजबाब आहे.
रेल्वेतील सामाजिक, आर्थिक वर्गवारीचे दर्शन घडविणारा ‘गंगा जमुना सरस्वती’ (१९८८). त्यातील ‘साजन मेरा उस पार है ‘लता, इंदीवर अनु मलिक यांनी सजविलेले गीत चांगलेच गाजले.
नव्वदीत शाहरुख खान आणि मलायका अरोरा यांनी गाडीच्या टपावर केलेल्या नृत्यातून ‘चल छय्या छय्या छय्या छय्या’ म्हणत प्रेक्षकाचे भरपूर मनोरंजन केले.
‘दिल से’(१९९८) सिनेमातील गुलजार यांच्या लेखणीतून उतरलेल्या या गीताला सुखविंदर सिंग आणि सपना अवस्थीचा सूर लाभला होता. संगीत होतं ए आर रेहमान यांचं.
शाहरुख यांच्या काजोल समवेत दिलवाले दुलहनिया ले जायेंगे, दीपिका पदुकोन बरोबर चेन्नई एक्सप्रेसमध्ये अभिनयाचा सुखद अनुभव दिला.’कब से कर रहे तेरा इंतजार’ कभी हां कभी ना (१९९४) कोकण रेल्वेचे निसर्ग दर्शन घडविते. गोवातील वास्को दी गामा स्टेशनवर चित्रित अमित कुमार आणि उदित नारायण यांच्या आवाजातील गाणं प्रेक्षकांचे मनोरंजन करून गेले. ‘कस्तो माझा हे रेलायमा’ या सैफ आली खान आणि विद्या बालन यांनी अभिनित केलेला परिणीता (२००५), मन्नू भैया क्या करेंगे (२०११), फूलीश (२०१६) पर्यंत हा चित्र प्रवास सुरु आहे.
खरं तर या चित्रपट प्रवासाचा दी एंड होऊच नये असं वाटतं राहतं.

– लेखन : डॉ त्र्यंबक दुनबळे
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800