नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मन:पूर्वक स्वागत !
रेडिओवर लागणा-या असंख्य गाण्यांपैकी श्रावण महिना आला कि हमखास ऐकायला मिळणारं एक गाणं आज आपण पहाणार आहोत……
अगदी बरोब्बर…..मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेल्या या गाण्याचे शब्द आहेत –
“श्रावणात घननीळा बरसला रिमझिम रेशीम धारा
उलगडला झाडातून अवचित हिरवा मोरपिसारा”
हातात चहाचा वाफाळता कप घेऊन खिडकीत उभं राहून श्रावण सरी कोसळताना ते दृष्य पहायला आपल्याला खूप गंमत वाटते. नृत्य करताना जशी पायांमधून लय थिरकत जाऊन दृष्यमान होते त्याचप्रमाणे आकाशातून येणाऱ्या या पर्जन्यधारा एका लयीत बरसत असतात. आपण रंगात येऊन ते दृष्य नजरेत साठवून ठेवत असतानाच अचानक दृष्य बदलतं. रिमझिम रिमझिम अशा तालात नाचत येणाऱ्या या शीतल जलधारा अचानक नाहीशा होतात आणि धरित्री देवी किती ओली चिंब झाली हे पहाण्यासाठी किरणांच्या दूतांसह सहसत्ररश्मी नभोमंडलावर प्रकट होतात. हा नैसर्गिक फिरता रंगमंच फक्त श्रावण महिन्यात कार्यान्वित होतो आणि डोळ्यासमोर दिसणा-या सृष्टीच्या विलोभनीय रूपातून फुलत जाणारा उत्साहाचा, आनंदाचा, चैतन्याचा मोरपिसारा आपल्याही तनामनात नकळतपणे प्रवेश करतो.
जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी
जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी
माझ्याही ओठावर आले नाव तुझेच उदारा
चातक पक्षी ज्या ओढीने पावसाची वाट पहातो त्यापेक्षा अधिक ओढीने या भूतलावरला प्रत्येक जण श्रावण महिन्याची वाट पहात असतो. श्रावणधारा अंगावर घेण्यातलं सुख हे जेव्हढं या धरणीला सुखावतं तेव्हढीच आम्हा पृथ्वीवासियांना ही या श्रावणसरींची भुरळ पडते. शेतकरी, कवीमनाची माणसं, माहेरवाशिणींना मिळणारं माहेरचं सुख अशा त-हात-हातून श्रावण सुखाच्या कल्पना मनाला निश्चितच आनंद देत रहातात. राधेला तिचा बन्सीधर भेटल्यावर होणारा आनंद, सुख आणि समाधान या श्रावणसरींमुळे आम्हाला होत रहातं. श्रावण महिन्यात येणा-या सणांमुळे हा आनंद द्विगुणित होत जातो आणि गोकुळाष्टमीला तर या खट्याळ श्रीकृष्णाचंच नाव प्रत्येकाच्या ओठावर येतं.
रंगांच्या रानात हरवले ते स्वप्नांचे पक्षी
निळ्या रेशमी पाण्यावरती थेंब बावरी नक्षी
गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा
निसर्गही या श्रावण महिन्यात आपल्यावर रंगांची उधळण करत असतो. वृक्ष, वेली आणि भोवतालच्या परिसरावर हिरव्या रंगाची उधळण करत असतो. आपल्या स्वप्नांचे पक्षी कधी या झाडांभोवती घिरट्या घालतात तर कधी आकाशातील इंद्रधनुष्य त्यांना साद घालतं. श्रावण महिन्यातही कधी सातत्याने पाऊस झिमझिमत असतो तर कधी हे स्वप्न पक्षी रिमझिम पावसासोबत साथ करणा-या सोनेरी किरणांवर आकर्षित होतात. या सगळ्या गोष्टींसोबत हवहवासा वाटणारा सुगंध दरवळणारा वारा मात्र जुनी ओळख असल्यासारखा वहात असतो.
पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले
माझ्या भाळावर थेंबांचे फुलपाखरू झाले
मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा
प्रत्येक स्त्रीच्या मनात माहेराचं स्थान हे पाचूच्या तोलामोलाचं असतं. त्यातून ती नुकतीच अंगाला हळद लागलेली नववधू जर असेल तर श्रावण महिन्यात येणा-या मंगळागौर, नागपंचमी, या सणांचं तिला विशेष अप्रूप असतं. अशा वेळेस माहेरच्या रस्त्यावर श्रावणसरींनी जरी तिचं स्वागत केलं तरी तेही तिला हवंहवंसं वाटतं. रिमझिमणा-या श्रावणसरी अंगावर घेत, मधेच उन्हाशी गप्पा मारत, आकाशातलं इंद्रधनुष्य पहाताना चेहे-यावरच्या थेंबांचंही फूलपाखरात रूपांतर झाल्याचा भास तिला होत रहातो आणि घराकडे जाताना येणा-या मातीचा सुवास वा-याच्या मदतीने उंच आभाळातही पोचला असावा असं तिचं मन तिला सांगत रहातं.
पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा
अशा प्रितीचा नाद अनाहत शब्दावाचून भाषा
अंतर्यामी सूर गवसला नाही आज किनारा
या श्रावणधारांमुळे फूलझाडांची, तरूलतांची ही पानं तजेलदार दिसतायत. या पानांचा हा तजेला म्हणजे श्रावण महिन्यातला शुभशकुन आहे. बारीक नजरेनं पाहिलं तर या पानांवरच्या रेषा न् रेषा अगदी स्पष्ट दिसतात. आपल्याला जसा शब्दांची भाषा न वापरताही एकमेकांवरच्या प्रेमाचा अर्थ उमजला तशीच जादू श्रावणसरींमुळे तरूलतांच्या आणि फुलझाडांच्या पानांवर झाली आहे. एकमेकांच्या अव्यक्त भाषेतूनही आपल्याला अंतरीचा सूर गवसला आणि प्रितीचा भक्कम आधार मिळाला.
श्रीनिवास खळे यांच्या संगीताची जादू आणि लता मंगेशकर यांचा मोहक आवाज या दोन्हीची जादू मनाला अशी काही भूरळ घालते कि गाण्यामध्ये आपण पूर्णपणे रममाण होतो.

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
हे गाणे मुळातच इतके श्रवणीय आहे की कधी ही ऐका श्रावणसरी बरसल्याचा अनुभव मिळतोच.
आपण केलेले रसग्रहण खूप छान.ते ही पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटते.
विकसजी ,या गाण्यात आम्ही अगदी चिंबचिंब झालो.
श्रावणधारा अंगावर घेण्याचा जो आनंद असतो ,तोच आपल्या शब्दांमधून मिळाला.
हे गाणे असेच सदाबहार राहो आणि आपले शब्दही!
कधी कधी एखादे गाणे आपण म्हणतो पण अर्थ तितकासा समजूनच घेतलेला नसतो.आज तुम्ही अर्थाकडे लक्ष वेधलेत.गाणे आता अधिकच आवडले.
सूंदर गाण्याचे सूंदर रसग्रहण
विकास सुरेख विवेचन पुढच्या आवृत्ती ची वाट पहात आहे
वाह ,,श्रावणाचे अत्यंत मन रमणीय वर्णन आणि त्याच ताकदीचे आपले रसग्रहण ,,,,,खूप कौतुक आपले ,,,🌹🌹🌹
धन्यवाद तायडे सर🙏
आता श्रावण महिना सुरू आहे त्यामुळे गाण्यातील शब्दांचा उलगडून दाखविलेला अर्थ खूप छान समजतो. खूप छान.
धन्यवाद निलाक्षी🙏
विकासजी,
श्रावण चालूच आहे.त्यात आपण केलेले या गाण्याचे सुंदर रसग्रहण आता गाणे ऐकायला आणखी मजा येईल.
मंगेश पाडगावकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून
उतरलेले असे हे अजरामर गाणे..
श्रावणात घन निळा…
श्रीनिवास खळे यांचे स्वर साज आणि लताचे सूर…निव्वळ अप्रतिम !!
👌👍🌹🙏
विजय म्हामुणकर
धन्यवाद विजयजी 🙏
मंगेश पाडगांवकरांचे शब्द, खळेकाकांच संगीत व लतादीदींचा आवाज म्हणजे एक पर्वणीच. श्रावणातल्या निसर्गाचे वर्णन करणारे हे गाणं व तितकेच सुंदर आपण केलेले रसग्रहण आवडले.
धन्यवाद विवेक🙏
माझ्या प्रचंड आवडीचे सदाबहार गाणे. श्रावणातले सारे रंग, ढंग पाडगावकरांनी टिपले आहेत आणि त्यावर स्वरसाज khale सरांनी चढवला आहे. पाडगावकरांना हे गाणे मे महिन्याच्या उकाड्याच्या दिवसात सायन रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म वर सुचले आहे..त्याचा संदर्भ लेखात हवा होता. बाकी मस्त.
धन्यवाद रामदासजी🙏