जळगाव येथील वृक्षप्रेमी वैद्य दाम्पत्य ५ हजार पेक्षाही जास्त कडुलिंब बीजांचे संकलन करून सध्या रोपे तयार करीत आहे. ही रोपं ते शहरातील नागरिकांना वृक्षारोपण करण्यासाठी पुढील वर्षी ते वाटणार आहेत.
कोरोनाच्या कहरात प्राणवायूची कमतरता अनेक रुग्णांच्या मृत्यूचे कारण बनले. त्यामुळे प्राणवायूचे महत्त्व किती आहे हे प्रत्येक मानवाला आता चांगलेच कळून चुकले आहे.
पृथ्वीवर प्राणवायूचा चांगला आणि एकमेव नैसर्गिक स्त्रोत म्हणजे झाडे होत. त्यामुळे निसर्गाचा समतोल साधावा या जाणिवेतून जळगावातील वृक्षप्रेमी वैद्य दाम्पत्याने पाच हजार पेक्षाही जास्त कडुलिंब बिजांचे संकलन केलं आहे. त्या बियांचे बिजारोपण करून त्याचे वृक्षात रूपांतर करून ते सर्व जळगाव नागरिकांना मोफत वाटण्याचे नियोजनही ते करत आहेत व या निसर्गाच्या कार्यात हातभार लावत आहे.
या बीजारोपनासाठी धान्याची रिकामी गोणी मातीने अर्धी भरून घेऊन त्यात थोडे शेणखत एकत्र करून त्यामध्ये ऐंशी ते शंभर बिया टाकून वरून हलक्या हाताने माती टाकून बिया मातीने झाकल्या व हलकेच त्यावर पाणी शिंपडण्यात आले . बीजारोपण नंतर आठ ते दहा दिवसांनी बियांना अंकुर फुटून त्यातून रोपे तयार होऊ लागली. या रोपांची 10 ते 15 सेंटीमीटर वाढ झाल्यानंतर ती ट्री बॅग मध्ये माती भरून त्यात लावण्यात आली.
या रोपांना वेळोवेळी पाणी देणे, खत देणे तसेच दिवसातून काही वेळ ऊन-सावली येईल अशा ठिकाणी ठेवावे लागते, तेव्हा ते रोप वर्षभरात दोन ते अडीच फूट वाढुन जमिनीत लावण्या योग्य होतील. या वर्षी किमान तीन ते पाच हजार रोपे वरील पद्धतीने तयार करून त्यांचे योग्य संगोपन करून त्यांची जमिनीत लावण्यायोग्य वाढ झाल्यानंतर त्यांचे पुढील वर्षी
जळगावातील नागरिकांना मोफत वाटप करण्याचा वैद्य दाम्पत्यचा संकल्प आहे.
मागील वर्षी अशाच प्रकारे बियांचे रोपण करून 50 कडूलिंब, 50 पिंपळ व 20 वड पिशव्यांमध्ये जगवण्यात आले आहेत, याचेही मोफत वाटप त्यांनी यावर्षी लोकांना केले आहे.
त्याचप्रमाणे आपल्या घराच्या भिंतीवर किंवा आवारात वड पिंपळ औदुंबर यासारखी रोपे आपोआप नैसर्गिकरित्या उगवतात. ती काढून फेकून दिल्यामुळे नष्ट होतात. त्यामुळे असे न करता पिशव्यांमध्ये माती भरून त्यात ती लावावीत व त्यांचे संगोपन करावे.
वैद्य दाम्पत्य ने अशाच प्रकारे भिंतीत उगवलेले एक रोपटे काढून पिशवीत लावले व नंतर थोडे मोठे झाल्यावर परिसरातील जमिनीत लावले आहे. ते वडाचे झाड नऊ वर्षानंतर सुमारे 40 ते 50 फुटापर्यंत वाढले आहे.
याच पद्धतीने वैद्य दाम्पत्याने मागील वर्षी जवळपास ५० ते ७० पिंपळ व वडाची रोपे भिंती मधून काढून ती पिशवीमध्ये लावून जगविली आहेत.
नागरिकांनी शक्यतो मोठी व दीर्घकाळ टिकणारी झाडे लावावी जेणेकरून त्याचा फायदा पशु पक्षी तसेच मानव जातीला चिरंतर काळापर्यंत उपभोगता येईल. झाड जितके मोठे, विस्तीर्ण असेल तितका प्राणवायू जास्त प्रमाणात तयार होतो. तसेच जमिनीची होणारी धूप कमी तर होतेच त्याचबरोबर भूमिगत पाणी पातळी वाढण्यासाठी मोलाची भूमिका आपोआपच पार पाडली जाते.
गेल्या काही वर्षांमध्ये भारतात कडुलिंब पिंपळ, वड झाडे लावण्याचे प्रमाण कमी झालेले आहे.
आपले कडूलिंब, वड, पिंपळ यासारखे देशी वृक्ष इथल्या जैविक विविधतेला आधार देतात. पक्षी, प्राणी, कीटक आणि सगळे जीवजंतू यांच्यावर जगतात.देशी वृक्ष वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वायू मोठ्या प्रमाणात शोषून घेतात व सर्व प्राणी मात्रांना आवश्यक असणारा प्राणवायू सोडतात. म्हणून जर झाडे लावायची असतील तर फक्त देशी झाडे लावा आणि आपले पर्यावरण वाचवा, असे ते सांगतात.
देशी वृक्षांमध्ये औषधी गुणधर्म असल्याने आयुर्वेदामध्ये त्यांना महत्त्वाचे स्थान आहे.
सिमेंटचे वाढते जंगल आणि निसर्गाची झपाट्याने होत असलेली हानी यामुळे तापमानात खूप वाढ झालेली आहे. औद्योगिकीकरणामुळे रस्त्यांचे जाळे पसरलेले असले तरी रस्त्यालगत वृक्षांची वानवा आहे. तर दुसरीकडे दररोज हजारो वाहनांमधून सोडण्यात येणाऱ्या कार्बन डाय-ऑक्साइड वायुचाही परिणाम होत आहे. तापमान रोखण्यासाठी वृक्ष लागवड करून वातावरणातील समतोल राखणे गरजेचे आहे. वृक्ष लागवड करून त्यांची निगा राखण्याची जबाबदारी घेण्यात यावी ज्यामुळे वृक्षांच्या संख्येत वाढ होऊन पर्यावरणात मोठ्या प्रमाणात प्राणवायू तयार होऊन मानव जातीला त्याचा फायदा होईल.
प्रत्येक वेळी नर्सरीतून रोपे विकत आणून वृक्षारोपण केले तर ते खर्चिक असते. त्यामुळे वृक्षारोपणाचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे शक्य असेल तितकी रोपे अत्यंत कमी साधन सामुग्री वापरून आपण घरीच तयार करावीत. त्यासाठी घरात आणल्या जाणाऱ्या फळांच्या बिया संकलित करून ठेवाव्यात.
जांभूळ, आंब्याच्या कोयी, चिकू, चिंचा तसेच आपल्या आसपासच्या परिसरातील देशी वृक्षांच्या बिया संकलित करून त्याची रोपे तयार करावी व जी रोपे तयार होतील ती आपल्या परिसरात लावावीत व या निसर्गाच्या महान कार्यात सर्वांनी हातभार लावावा, यासाठी वैद्य दाम्पत्य प्रयत्नशील आहे.
त्यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या घरी आणल्या जाणाऱ्या फळांच्या बिया व परिसरात सहज उपलब्ध होणाऱ्या बिया एकत्र करून त्यापासून रोपे तयार करावी व आपल्या जवळच्या लोकांना त्यांच्या वाढदिवशी किंवा इतर काही कार्यामध्ये सप्रेम भेट म्हणून द्यावी. त्यामुळे तुमची आठवण त्यांच्याजवळ चिरंतर राहील. व निसर्गालाही त्याचा फायदा होईल. आपला आजूबाजूचा परिसर हिरवागार होऊन परिसरात प्राणवायूचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होईल.
आपल्या या उपक्रमासाठी वैद्य दाम्पत्याने लोकमित्र फाउंडेशन स्थापन केले आहे. या अंतर्गत त्यांनी पाच वर्षापासून अगोदरच शहरात लावलेले 95 वटवृक्ष आज चांगल्या प्रकारे वाढले आहेत. त्यातील 40 वटवृक्ष पंचवीस ते तीस फुटापर्यंत झालेले आहेत.

विशेष म्हणजे वैद्य दाम्पत्य हे सर्व साधारण परिस्थिती असलेले आहे. श्री शेखर प्रकाश वैद्य हे बीएससी झाले असून जळगाव जिल्हा रुग्णालयात काम करतात. तसेच ते कासार सेवा संघ या संस्थेचे सचिव आहेत. तर त्यांची पत्नी सौ समृद्धी या एम ए, बी एड असून मुलांसाठी बालवाडी चालवतात. त्यांनी मुंबई येथील टाटा कॅन्सर रुग्णालयातील रुग्णांसाठी आपले केस दान करण्याची हिम्मत दाखवली आहे. पतीच्या बरोबरीने त्या वृक्षारोपण उपक्रमात हिरीरीने सहभागी झाल्या आहेत.

खरंच, वैद्य दाम्पत्य स्वतःची नोकरी, व्यवसाय सांभाळून पर्यावरण संवर्धनासाठी जे अनमोल कार्य करीत आहे, ते सर्वत्र अनुकरण करावे, असेच आहे. त्यांच्या या उपक्रमाला भरभरून शुभेच्छा 💐

– लेखन : प्रसन्न कासार
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
Best luck for your future plans 😊