Thursday, July 3, 2025
Homeबातम्याहिरकमहोत्सवी महाराष्ट्र

हिरकमहोत्सवी महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्याने आपल्या निर्मितीची साठी पूर्ण केली आहे. एखाद्या राज्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी हा काळ तसा फार नाही, मात्र कमी देखील नाही.

महाराष्ट्राला लाभलेल्या संत साहित्याची थोर परंपरा, छत्रपती शिवाजी महाराज या जाणत्या राजाची साथ, समाजसुधारक, विचारवंत तसेच महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी लाभलेली जागरूक पिढी यामुळे राज्याचा पाया हा अधिक मजबूत झाला आणि याच मजबूत पायावर आज आपल्या प्रगतीचा भला मोठा मनोरा उभा ठाकला आहे.

महाराष्ट्राने आपल्या गौरवशाली परंपरेला सदैव कायम ठेवण्याचे प्रयत्न केले आहेत. गेल्या साठ वर्षात महाराष्ट्राने विविध क्षेत्रात उच्चांक गाठला असताना सोबत सामाजिक समतेचे भान देखील जपले आहे. हे संस्कार या मातीतून आपसूकच आल्याचे दिसते.

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचे हीरक महोत्सवी वर्ष यानिमित्ताने दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्राने
ऑनलाइन हीरक महोत्सवी व्याख्यानमाला हा स्तुत्य उपक्रम राबवून राज्याच्या निर्मितीपासून आजतागायत झालेल्या वाटचालीचा विविधांगी धांडोळा घेतला.

या व्याख्यानमालेत 60 व्याख्याने झालीत. शेवटचे 61 वे समारोपीय पुष्प माहिती व जनसंपर्क महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी गुंफले.

महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील दिग्गज, विचारवंत, जेष्ठ पत्रकार, साहित्यिक तसेच वैचारिक तरुण पिढी या व्याखानमालेत सहभागी झाली होती. 19 मार्चपासून सुरू झालेल्या व्याख्यानमालेचा समारोप 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी झाला. मधल्या काळात कोरोनाचा प्रभाव वाढल्याने काही काळ व्याख्यानमालेत खंड पडल होता.

ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या व्याख्यानाने 19 मार्च रोजी व्याख्यान माला सुरु झाली. ‘गेल्या 60 वर्षातील महाराष्ट्राचे समाजकारण व राजकारण’ या विषयावर बोलताना त्यांनी सहकार, उद्योग आदी क्षेत्रात राज्य अग्रेसर असल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर देशाला विविध महत्वाचे कायदे, योजना तसेच सामाजिक व राजकीय दृष्टया नेहमीच दिशा दिली असून देशाला मजबूत करण्यात महत्वपुर्ण योगदान दिले असल्याचे श्री चोरमारे यांच्या व्याख्यामधून पुढे आले.

ज्येष्ठ पत्रकार तथा खासदार कुमार केतकर यांनी ‘मुंबईचा वारसा’ या विषयावर मुंबईची आणि मराठी माणसाची महती विषद केली.

खासदार तसेच दै.सामना चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ‘जगाच्या पाठीवरील मराठी’ हा विषय घेऊन मराठी व्यक्तीचे जगाशी असलेले नाते अधोरेखित केले.

दै. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी ‘महाराष्ट्राचा तर्कवाद‘ मांडला.

चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी ‘उठावा महाराष्ट्र’ देश, हा विषय घेऊन उद्बोधक मांडणी केली.

सकाळ माध्यम समुहाचे संपादक-संचालक श्रीराम पवार यांनी ‘महाराष्ट्राची राजकीय परंपरा आणि विकास’ तर गोव्यातील ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे यांनी ‘ बृन्हमहाराष्ट्रातील महाराष्ट्र‘ या विषयी भाष्य केले.

याबरोबरच ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर, विजय नाईक, व्यंकटेश केसरी, अरूण खोरे यांची व्याख्यानेही दिशादर्शक ठरली.

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ‘महाराष्ट्रातील जमीन विषयक कायदे’ याविषयावर माहितीपूर्ण मांडणी करून महाराष्ट्र शासनाने शेतक-यासंदर्भात घेतलेले निर्णय आणि भूमिहिनांना जमिनीचे पट्टे मिळाल्याने ते कसे लाभान्वित झाले याबाबत माहिती विषद केली.

जेष्ठ साहित्यीक डॉ. विजया वाड यांनी विश्वकोशाबद्दल माहिती दिली. तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे यांनी ‘प्रशासकीय सेवेतील मराठी माणूस’ विषयावर आपले मत नोंदविले.

विचारवंत व राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. अशोक चौसाळकर यांनी ‘लोकमान्य टिळक यांचा वारसा’, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी ‘छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, साहित्यिक श्रीकांत देशमुख यांनी ‘कुळवाडी भूषण छत्रपती शिवराय’, तुषार गांधी यांनी ‘महाराष्ट्र आणि महात्मा गांधी’, ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांनी ‘महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव –वसंतदादा’, वरिष्ठ पत्रकार व लेखक सचिन परब यांनी ‘प्रबोधनकार ठाकरे -महाराष्ट्राला वळण लावणारा विचारवंत’, प्रसिद्ध कवी, लेखक अशोक नायगावकर यांनी ‘महाराष्ट्रातील परिवर्तन’, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. मेधा कुळकर्णी यांनी ‘महाराष्ट्राच्या विकासात स्वयंसेवी संस्थांचे योगदान’, कादंबरीकार संजय सोनवणी यांनी ‘महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इतिहास’ प्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड यांनी ‘महाराष्ट्राची पर्यावरण समृद्धी आणि आव्हाने’ या विषयावर व्याख्याने दिली.

महाराष्ट्र राज्य दिनी, 1 मे रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘महाराष्ट्राची 60 वर्षातील जडणघडण आणि आव्हाने’ याविषयावर प्रकाश टाकला.

संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी ‘महात्मा फुले : एक क्रांतीकारक महामानव’, डॉ अर्जून डांगळे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साामाजिक परिवर्तनाची दिशा’, उल्हास पवार यांनी ‘केशवराव जेधे एक समाजसुधारक’ , डॉ. रणधीर शिंदे यांनी ‘महर्षी शिंदे यांच्या विचारविश्वाची प्रस्तुता’, क्ष‍िप्रा मानकर यांनी ‘महिलांनी घडविलेला महाराष्ट्र’, इतिहास संशोधक डॉ. मंजुश्री पवार यांनी छत्रपती ‘शाहू महाराजांचे स्त्री विषयक कार्य आणि सद्यस्थिती’, डॉ जयसिंगराव पवार ‘छत्रपती शाहू महाराज आणि राष्ट्रीय एकात्मता’, प्रा जयदेव डोळे यांनी ‘अण्णाभाऊ साठे साम्यवादी महाराष्ट्रवादी’, निवृत्त मार्शल अजित भोसले यांनी ‘शिवाजी महाराजांचे नौदल धोरण’ प्रा. दिनेश पाटील यांनी ‘आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण आणि महाराजा सयाजीराव गायवाड’, अशा वैचारिक, सामाजिक विषयावर मान्यवरांनी भाष्य केले.

यासोबतच कृषीतज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी ‘महाराष्ट्रातील बदलेली शेती’ , प्रसिद्ध शाहीर प्रा संभाजी भगत यांनी ‘महाराष्ट्राची शाहिरी परंपरा’, मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभाग प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे ‘महाराष्ट्रातील लोककला आणि प्रबोधन’, डॉ. रामचंद्र देखणे यांनी ‘वारी: परंपरा आणि स्वरूप’, पक्षीतज्ज्ञ मारूती चितमपल्ली यांनी ‘महाराष्ट्राच्या रानवाटा’, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गो-हे यांनी ‘महाराष्ट्रातील प्रबोधनाच्या विचारधारा: काल, आज आणि उद्या’, सामाजिक कार्यकर्ते संजय नहार यांनी ‘महाराष्ट्रातील संत आणि शीख व कश्मिरी तत्वज्ञान’, उदय गायकवाड यांनी ‘महाराष्ट्राची पर्यावरण समृध्दी आणि आव्हाने’ डॉ सदानंद मोरे यांनी ‘महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रवास’ , माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांनी ‘महाराष्ट्राच्या विकासात मराठी पत्रकारितेचे योगदान’, डॉ. शेखर मांडे, महासंचालक सीएसआयआर यांनी ‘महाराष्ट्राचे विज्ञान क्षेत्रातील योगदान’, साहित्यिक तसेच निवृत्त सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी ‘मराठी साहित्य आणि लोकशाही: 1960-2020’ ,
लेखिका डॉ. प्रज्ञा दया पवार ‘महाराष्ट्रातील स्त्री साहित्याचा जागर’, ज्येष्ठ पत्रकार राजू परूळेकर यांनी ‘पुरोगामी महाराष्ट्राचे भविष्य’ , ज्येष्ठ साहित्य‍िक
शरणकुमार लिंबाळे यांनी‘आधुनिक महाराष्ट्रातील मराठी वाड़्मयाची ओळख’, प्रसिद्ध कवी आणि गीतकार प्रा.डॉ. दासू वैद्य यांनी ‘भाषा आणि आपण’ समाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांनी ‘सेनानी साने गुरूजी’, निवृत्त सनदी अधिकारी ई. झेङ खोब्रागडे यांनी ‘संविधान आणि जागरूकता’ , प्रसिद्ध लेखिका व कवयित्री डॉ. अरूणा ढेरे ‘महाराष्ट्रचे लोकसाहित्य व स्त्रियांचे योगदान’ ज्येष्ठ विचारवंत प्रा. सुहास पळशीकर ‘महाराष्ट्राच्या राजकारणाची वाटचाल : धोरणात्मक स्थित्यंतरे आणि आव्हाने’ तसेच प्रसिद्ध लेखिका डॉ. छाया महाजन यांनी ‘बदलती शिक्षण पध्दती’, मानसशास्त्रज्ञ डॉ. वृषाली राऊत यांनी ‘औद्योगिक मानसशास्त्र’, प्रा. उमेश सुर्यवंशी यांनी ‘धार्मिक सदभावना जपणारे संत शेख महंमद’ चित्रपट अभ्यासक डॉ. कविता गगरानी यांनी ‘चित्रपट सृष्टीला कोल्हापूरचे योगदान’ अशी व्याख्याने झालीत.

या व्याख्यानमालेमुळे इतिहासातील घटनांना उजाळा मिळाला व तसेच भविष्यात राज्याची प्रगती अधिक चांगल्या प्रकारे कशी करता येईल याची दिशा मिळाली.

ही सर्व व्याख्याने परिचय केंद्राच्या ‍मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi आणि ‍ इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi वर पाहता येतील. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/ आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi युटयूब चॅनेल वरही संग्रही आहेत.

अंजु निमसरकर

– लेखन : अंजु निमसरकर, माहिती अधिकारी
महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments