नक्कीच मिळेल न्याय तिला
स्वतःवर विश्वास ठेव
स्वतःला स्वावलंबी बनव
आणि मुलीला स्वावलंबी जगव…..
किती काळ मांडणार वेदना
ऐकणारे बहिरे आहेत
त्या वेदनेचे करून ज्वालामुखी
तुच न्यायाचे अमृत पाजव. …
नको गाऊस गीत अबलेचे
तुच झाशी होतीस सखे
गरज पडल्यास शस्त्र उचलून
इथे सत्याचे धडे गिरव. ….
बलात्कार शरीरावर नसतो होत
मनावर बलात्कार होतात नेहमी
शरीर नाजूक आहे तुझे
मनाला तु कणखर घडव. …..
तुच जन्मदाती आहे
शिवाजी निर्माण केला तुच
जन्मदेणारी आई अग तु
यमालाही ह्रदयात बसव. …
कोण करेल तुला बंदिस्त
पोटच्या पोरीला स्वतंत्र कर
घरकाम शिकवताना तिला
पंख पसरून आकाशात उडव. …..
कमजोर नाही तुझी जात
कशाला यातना मांडायच्या
परंपरेच्या रक्ताला वाहुन जाऊदे
नव्या रीतीने परतुन उगव. …..

– रचना : सौ. संगीता चव्हाण, गोवा