Wednesday, July 2, 2025

भाषा

आपल्या मनातले विचार, भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणजे भाषा.पण खरे तर याहूनही खूप काही !

आईच्या पोटात असल्यापासून खरे तर भाषेचे संस्कार गर्भावर होत असतात. ही भाषा अनेक माध्यमातून त्याच्यापर्यंत पोहोचत असते. आजूबाजूला बोलल्या जाणाऱ्या संवादातून कानावर पडणाऱ्या आवाजातून वगैरै.

भाषा आपल्याला काय देते ? सर्वप्रथम म्हणजे एक आत्मिक समाधान. आपण आपल्या भाषेत व्यक्त होण्यासारखं सुख नाही. स्वत:ची भाषा सोडून आपण अनेक भाषा शिकतो, प्राविण्यही मिळवतो पण व्यक्त होतानाचे माध्यम जर आपली स्वत:ची भाषा असेल तर तो आनंद वेगळाच असतो. राग व्यक्त करतानाही इतर कोणत्याही भाषेत आपण व्यक्त झालो तरी मातृभाषेतून व्यक्त होणारा सात्विक संताप मन खऱ्या अर्थाने रिकामे करून जातो.

भाषेचा जरा वेगळ्या अंगाने विचार केला तर प्रत्येक गोष्टीची एक भाषा असते. आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी असतात. एखाद्या झाडाला जर पाणी हवं असेल तर ते मलूल होतं. म्हणजे त्याच्या परीने ते व्यक्त होणंचं असतं. त्याला पोषण कमी पडत असेल, सूर्यप्रकाश कमी मिळत असेल तर त्याची पाने पिवळी पडतात. इतकचं काय पाणी जास्त होत असेल तरी ते आपल्याशी व्यक्त होत असतं. ही सारी मूक भाषाच तर आहे. शब्द नसले तरी व्यक्त होणच आहे. नाही का ?

पाऊस येणार आहे हे सांगताना ढग आपला रंग बदलतात. आनंदाचं उधाण येतं तेव्हा इंद्रधनू विलसतं आणि रौद्र रूपातील भाषा तर काय सर्वच जाणतात. विजेचा प्रचंड लखलखाट, वाऱ्याचं बेफाम होणं आणि सागराचं खवळून उठणं.

प्राण्यांचही तसेच तर आहे. मालक आला की कुत्रा प्रेमाने शेपटी हलवतो. बाहेर जायचं असेल की दारावर थापट्या देतो. आपल्याला कदाचित् कळणार नाही पण त्याच्या मालकाला बरोबर समजतं तो काय म्हणतोय ते.

मनाची भाषा एक झाली ना की न बोलताही सर्व कळू लागतं. एखाद्याचं सांत्वन करायला कोणी येतं आणि मायेने फक्त पाठीवरून हात फिरवतं वा हात हातात घेतं, एवढ्याशा कृतीतून खूप खूप काही व्यक्त होतं. तुझं दु:ख मी जाणतो, ते कमी करण्यासाठी जरी मी काही करू शकत नसलो तरी तुझ्या बरोबरच आहे, तुझ्या दु:खाची झळ मी अनुभवतो आहे, तुला यातून बाहेर पडण्यासाठी मी सर्वतोपरी मदत करणार आहे…. इतकं सारं हाताच्या एका स्पर्शातून व्यक्त होतं कारण त्या वेळेला दोन्ही मनांची भाषा एकच असते.

स्पर्शाच्या भाषेवर तर वेगळा लेखच तयार होईल. संशोधक असं म्हणतात डॅाल्फीन्स मध्ये पण भाषा आहे, एकमेकांना नावे आहेत. ते एकमेकांशी बोलतात असेही म्हणतात. अभ्यास चालू आहे. कुणी सांगावे ? डॅाल्फीन्सची भाषा असं पुस्तकही येईल कदाचित !

पुस्तकावरून आठवलं. पुस्तकंही आपल्याशी बोलतात बरं का ? धूळ जमा झालेली पुस्तकं मलूल दिसतात. म्हणजेच ती सांगू पहात असतात की मला हातात घ्या ,मला स्वच्छ करून तुमचे विचारही घासुनपुसून स्वच्छ करा.

स्वरांची भाषा ही अजबच ! ही सांगण्याची नाही तर अनुभवण्याची गोष्ट आहे. तुम्ही फार अस्वस्थ आहात आणि एखादी शांत सुरावट कानी पडली तर मन कसं चटकन् शांत होतं. गाण्यातून जे व्यक्त झालय ते आपल्यापर्यंत पोहोचतं.

वसंत ऋतूत पहाटे पासून पक्षांची भाषा कानावर पडते. ऐकलीत का ? किती गोड आवाजात ती पाखरं व्यक्त होत असतात ? अगदी मंजुळ सुरावट असते. ती ज्या पक्षिणीला कळायची तीला बरोबर कळते.

निसर्गाच्या प्रत्येक घटकाची एक भाषा असते. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रात धरतीच्या व्यक्त होण्याचं एक उदाहरण आहे. तिथली जमीन श्रीपादांच्या पादस्पर्शासाठी तळमळत असल्याने तिच्यातून पिकणारे दोडके कडू होत असत, जेव्हा त्यांचा पादस्पर्श झाला तेव्हा तिच्या वृत्तीत बदल होऊन ती उत्तमरित्या व्यक्त होऊ लागली. म्हणजेच पिक उत्तम निघू लागले.

गाय हंबरते तेव्हा ही तो तिच्या बछड्यासाठी फोडलेला टाहोच असतो. आपला मालक गेल्यानंतर जनावरंही अगदी मूक रुदन करतात. दिसतात ते फक्त त्यांचे अश्रू.

बाळ जरी बोबडे बोल बोलत असेल तरी कोणत्याही आईला त्याची भाषा बरोबर समजते. अगदी ४/६ महिन्याचं बाळ असेल तर ते न बोलताही केवळ त्याच्या रडण्याच्या आवाजावरून तिला समजतं हे रडणं कशासाठीचे आहे ते. भुकेचे, दुखण्याचे का आणखी कसले.

निसर्गात अनेक घटक आहेत जे असे व्यक्त होत असतात. गरज आहे ती त्याची भाषा समजून घेण्याची पात्रता आपल्या मध्ये आणण्याची.

मनाची भाषा कळू लागली ना की मग प्रत्यक्ष शब्दांची गरज राहात नाही. न बोलताही नुसतं डोळ्यात पाहूनही सर्व काही कळु लागतं. पण हो मनात जे भाव आहेत, जे काही खुपतय ते आता सांगून टाक असं सांगणारीही मौनाचीच भाषा असते.

तर अशीही भाषा म्हणजे मोठं गमतीदार माध्यम आहे. सावरणारीही अन् घायाळ करणारी. दुधारीच … ती व्यक्त करणाऱ्याचं मन कसं आहे त्यावर पुढला सारा प्रवास ठरतो.

शिल्पा कुलकर्णी

– लेखन : शिल्पा कुलकर्णी, अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ +91 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. अतिशय सुंदर लेख!!
    खरंच आपली भाषा हेच आपल खरंच व्यक्त होण्याचं माध्यम…
    खूप सुंदर… 👍👍

    प्रकाश फासाटे.
    मोरोक्को
    नॉर्थ आफ्रिका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४