शुभांगी आणि शुभांगी या दोन सख्ख्या बहिणी आहेत हे सांगितले तर खरं वाटणार नाही ना तुम्हाला ? पण हे खरं आहे आणि दोघीही महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखिका आहेत ! त्यापैकी एक आहे शुभांगी गोपाळ गान आणि दुसरी बहीण म्हणजे शुभांगी भडभडे.
‘पुस्तकांवर बोलू काही‘ या पुस्तकाच्या संपादनाच्या निमित्ताने माझी शुभांगी गान यांच्याशी ओळख झाली. प्रत्येक लेखकाला आम्ही त्याच्या आवडत्या पुस्तकावर लेख लिहिण्याचे आवाहन केले होते. शुभांगी गान यांनी त्यांची बहीण शुभांगी भडभडे यांच्या ‘दीपशिखा‘ या कालिदासाच्या जीवनावर लिहिलेल्या कादंबरीवर आस्वादात्मक लेख लिहून दिला होता. तर दुसरा लेख होता शंकराचार्यांच्या जीवनावरील कादंबरीवर.
‘अद्वैताचे उपनिषद’ ही शुभांगी भडभडे यांची कादंबरी होती. क्षणभर माझा गोंधळ उडाला. शुभांगी यांनी शुभांगी यांच्याच पुस्तकावर लिहिले ? मग लक्षात आले शुभांगी गान यांनी प्रसिद्ध लेखिका शुभांगी भडभडे यांच्या कादंबर्यांवर आस्वादात्मक परीक्षण लिहिले होते.
शुभांगी गान या ठाण्यातच राहतात. त्यांच्याशी मोकळेपणाने बोलण्याची संधी मिळाली. एकाच परिवारात दोन्ही बहिणीचे नाव शुभांगी कसे ? या प्रश्नावर शुभांगी गान यांनी या रहस्याचा उलगडा केला तो असा.
शुभांगी गान यांचे माहेरचे नाव रंजना आणि बहिणीला शैलाताई म्हणत असत. कागदोपत्री बहिणीचे नाव शुभांगी होते. रंजनाचे लग्न झाले आणि तिच्या मिस्टरांनी तिचं नाव तांदळात लिहिले ते ‘शुभांगी’ असे ! पण कोणाच्या काही लक्षात आले नाही. मोठ्या बहिणीला सगळे शैला हाक मारायचे. रंजना झाली शुभांगी गान आणि पुढे शैलाने साहित्याच्या आणि लेखनाच्या क्षेत्रात पदार्पण करताना कागदोपत्री असणारे शुभांगी भडभडे हे नाव तिने कायम केलं. अशी सिद्धहस्त लेखिका शुभांगी भडभडे हिच्या नावावर ७५ दर्जेदार पुस्तकांची पुंजी आहे.

धाकटी बहीण शुभांगी गोपाळ गान या लग्नानंतर संसारात रमलेल्या होत्या. आपला वाचनाचा छंदही जोपासत होत्या. नारायण धारप यांचे लेखन त्यांना फार आवडायचे. काही इंग्रजी कादंबऱ्यांचे, कथासंग्रहांचे मराठी अनुवादही त्या वाचायच्या. मोठी बहीण शुभांगी भडभडे यांचे लेखन मात्र त्यावेळी जोरात होते. अनेक मासिकांमध्ये अनेक कथा प्रसिद्ध होत होत्या. पुस्तके तयार होत होती. आपल्या बहिणीने देखील लेखन सुरू करावे अशी त्यांची इच्छा होती. ‘दिसामाजी काहीतरी लिहीत जावे’ या रामदासांच्या उक्तीची त्यांनी तिला आठवण करून दिली. ‘जे सुचेल ते लिही, पण सुरुवात कर. तूही लिहू शकतेस, मला विश्वास आहे.’ हे शब्द शुभांगी गान यांनी हृदयात साठवून ठेवले आणि लेखनाची सुरुवात केली. आधी दै. तरुण भारत मध्ये त्यांची बालांसाठी एक कादंबरी क्रमशः प्रकाशित झाली. काही दिवस बालांसाठी लिखाण सुरू राहिले. ‘गढीचे रहस्य’ आणि ‘अपूर्ण राहिलेला शोध’ या दोन कादंबऱ्या प्रकाशित झाल्या.

पुढे काही मासिकात कथालेखन सुरू राहिले. मग त्यातूनच कथासंग्रह प्रकाशित होत गेले. सामाजिक आशयाच्या या कथांना वाचकही भरपूर दाद देत होते. ‘संचित’, ‘कुणाच्या खांद्यावर’, ‘सांज सोबती’, ‘एक वार पंखावरूनी’ असे अनेक कथासंग्रह प्रसिद्ध झाले.
एकदा शुभांगी गान चितोड येथे फिरायला गेलेल्या असताना त्यांनी महाराणी पद्मिनी ची कथा ऐकली. तिने जोहार केला ते स्थळ पाहिले. पद्मिनीच्या व्यक्तिमत्त्वाने त्या भारून गेल्या. लग्नानंतर जेमतेम दोन वर्ष तिने राणी पद उपभोगलं. अतिशय सौंदर्यवती असलेली ही महाराणी बुद्धिमान तर होतीच, पण तलवार, दांडपट्टा यातही निष्णात होती. राजकारण ही तिला कळत होतं. अल्लाउद्दीन खिलजीला तिचा मोह झाला. त्याला तो अभेद्य गड ही हवा होता. हे कळल्यावर राणी पद्मिनी युद्धावर जायला तयार होती. पण राजपूत घराण्यात तशी परवानगी नव्हती. अखेर विटंबना टाळण्यासाठी तिने पतीच्या पश्चात जोहार केला.
या कथेने प्रभावित होऊन शुभांगी गान यांनी पहिली ऐतिहासिक कादंबरी लिहिली. ‘महाराणी पद्मिनी’. महाराणी पद्मिनी वर सर्वात पहिलं काव्य ‘पद्मावत’ हे जवळपास दोनशे चाळीस वर्षांनी मलिक मुहम्मद जायसी यांनी लिहिलं. त्यानंतर तिच्यावर भरपूर लिहिलं गेलं पण कदाचित मराठीत लिहिली गेलेली ही प्रथम कादंबरी असावी. पुढे ‘स्वयंसिद्धा’ ‘कर्मयोगी’, ‘आनंदयात्री’ अशा अनेक कादंबर्या लिहिल्या. ‘तेथे कर माझे जुळती’ या कादंबरीला काही पुरस्कारही मिळाले.
एकदा वर्तमानपत्रात बातमी आली होती की एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा सुनावली गेली. पुराव्याअभावी असे होत असते कधीकधी. शुभांगी गान यांचे मन हळहळले. त्यांनी यावरही कादंबरी लिहिली. ‘मी निर्दोष आहे’.
शुभांगी गान यांच्या ताईने म्हणजे शुभांगी भडभडे यांनी ‘पद्मगंधा प्रतिष्ठान‘ या संस्थेची स्थापना नागपूर येथे करून साहित्यिक कार्यक्रम सुरू केले. अर्थात त्या कार्यक्रमात शुभांगी गान यांचाही सहभाग असायचा. ताईच्या मोठ्या मोठ्या साहित्यिकांशी ओळखी होत्या. त्यांचे येणेजाणे, सहवास याचाही शुभांगी गान यांच्यावर परिणाम होतच होता. दोघींचेही सामाजिक वर्तुळ वाढत गेले. ‘पद्मगंधा प्रतिष्ठान’ तर्फे शुभांगी भडभडे यांच्या ‘नागनिका’ या ऐतिहासिक कादंबरीचं प्रकाशन झालं, त्याचं निवेदन शुभांगी गान यांनी केलं. ‘पद्मगंधा प्रतिष्ठान’ तर्फे अनेक मान्यवर व्यक्तींना ‘जीवनगौरव पुरस्कार ‘देण्याचा कार्यक्रम होत असे. सुनील गावस्कर, अभिनेते दिलीप प्रभावळकर , लेखक मधु मंगेश कर्णिक, यांसारख्या मोठ्या माणसांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देण्यात आले तेव्हा या सर्व मंडळींची भेट झाली. ‘पद्मगंधा प्रतिष्ठान’ ने दोन साहित्य संमेलनेही आयोजित केली होती. त्यावेळी धावपळ करायला शुभांगी गान आणि त्यांचे दोन भाऊ यांचीही मदत झाली.
या दोन्ही लेखिकांचे माहेरचे आडनाव फडणवीस. आई संस्कृतचे शिक्षण घेतलेली सुविद्य महिला! मुलांना इतिहासातल्या आणि पुराणातल्या गोष्टी सांगायची. आईचे सख्खे भाऊ, रा. शं .वाळिंबे हे अतिशय सुप्रसिद्ध समीक्षक! त्यांची नागपुरात अनेक ठिकाणी भाषणे व्हायची. मग आई मुलींना घेऊन त्या भाषणांना उपस्थित रहायची. साहित्याचे संस्कार असे घरातच होत होते. शुभांगीची मोठी बहीण शैला (शुभांगी भडभडे) अकरा वर्षाने ज्येष्ठ ! ती लवकरच लिहिती झाली. नित्यनेमाने पहाटे ५ ते ७ आपली लेखणी चालवायची. पंधरा-सोळा पानं अजूनही लीलया लिहून टाकते. असा रोजचा परिपाठ असल्यामुळे तिची पुस्तकावर पुस्तके प्रकाशित होत असतात. तिच्याजवळ अद्वितीय प्रतिभा आहे हे सर्वांनाच मान्य आहे. शुभांगी भडभडे यांच्या २२ सामाजिक कादंबऱ्या, २३ चरित्रात्मक कादंबऱ्या, १२ कथासंग्रह अशी एकूण ७७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ललित, बालवाङ्मय, नाटके असेही त्यांचे लिखाण आहे. त्यांच्या चरित्रात्मक कादंबऱ्यांचा हिंदीतही अनुवाद झालेला आहे.
शुभांगी आणि शुभांगीताई यां दोघींचे पीएच. डी. करणे मात्र राहून गेले.पण विशेष म्हणजे शुभांगी भडभडे यांच्या साहित्यावर काही विद्यार्थ्यांनी पी.एच. डी. आणि एम.फिल.सुध्धा केले आहे. अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित झाल्या आहेत.

शुभांगी सांगतात “घरात वागताना ताई आपले मोठेपण बाजूला ठेवते. घरात नातलगांचे गोतावळे, सण समारंभ सुरू असताना तितकाच आनंद घेते.”
शुभांगी भडभडे यांची दोन नाटके प्रसिद्ध आहेत. त्यांचे अनेक प्रयोग झाले आहेत. ‘इदं न मम’ या नाटकाचे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरही प्रयोग झाले. तसेच ‘स्वामी विवेकानंद’ या नाटकाचे हिंदी भाषांतर होऊन त्याला परदेशातही मागणी आली. एकदा गुजरात मध्ये ‘स्वामी विवेकानंद’ या नाटकाचा हिंदी मध्ये प्रयोग असताना समोर मोदीजी येऊन बसले होते. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते.
शुभांगी गान यांची देखील कथासंग्रह, कादंबऱ्या, बालवाङ्मय अशी एकूण १७ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. नुकतीच शुभांगी गान यांनी ‘सम्राट समुद्रगुप्ता’ वर कादंबरी लिहून पूर्ण केली आहे. भारताच्या सुवर्णयुगाचा निर्माता समुद्रगुप्त याने ४० वर्षात २४ लढाया जिंकल्या. उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत आपले साम्राज्य स्थापन करून उत्तम प्रशासक म्हणून नाव मिळवले. याचा अभ्यास पुढील पिढीने करायला हवा असे त्यांना वाटते. अशा प्रकारची ऐतिहासिक कादंबरी लिहिण्यासाठी खूप संशोधन करावे लागते. मॉरीस कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख श्री.अंधारे सर यांनी त्यांना खूप मदत केली असे शुभांगी गान सांगतात. ‘सम्राट समुद्रगुप्त’ ही कादंबरी आता प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
खूप खूप शुभेच्छा शुभांगी मॅडम !

– लेखन : मेघना साने
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800