नमस्कार 🙏
“दोनच दिवसांनी आपापल्या घरांमधून आपल्या सर्वांच्या आवडत्या गणपतीचं आगमन होतंय त्यानिमित्ताने सर्व रसिक श्रोत्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !
“ओठावरलं गाणं” या सदरात आज पाहु या
रा.बा सोमयाजी यांनी लिहिलेलं “तुज मागतो मी आता” हे गाणं.
तुज मागतो मी आता
मज द्यावे एकदंता
हे वरदविनायका, तुझ्या आगमनाची आम्ही या पृथ्वीतलावरील मर्त्य मानव वर्षभर वाट पहात असतो. सगळं जग एका भयानक पण अदृश्य अशा संकटाचा बरेच दिवसांपासून मुकाबला करतं आहे.
भालचंद्रा, आजही तुझ्या चरणांपाशी आमचं एकच मागणं आहे ते म्हणजे आम्हाला या संकटाशी लढण्याचं धैर्य तर मी मागतोच पण त्याच बरोबर आणखी एक मागणं म्हणजे “तथास्तु” या तुझ्या आशिर्वादाचीही आज आम्हाला तितकीच गरज आहे. हे वरदान तुझ्याकडून मिळावं जेणेकरून प्राणपणाने या अदृष्य संकटाचा सामना करता येईल.
तुझे ठायी माझी भक्ती
विरूढावी गणपती
तुझे ठायी ज्याची प्रीती
त्याची घडावी संगती
वरदविनायका, माझी तुझ्यावरती जेव्हढी भक्ती आहे त्याहून जास्त अढळ विश्वास आहे. रोज गणपती अथर्वशीर्ष स्तोत्र म्हणताना तुझी मूर्ती माझ्या डोळ्यासमोर राहू दे. चंद्राच्या कलेप्रमाणेच ही भक्ती निरंतर वाढत रहावी अशीच माझी ईच्छा आहे. विद्येचा दाता आणि चौसष्ट कलांचा अधिपती असणा-या तुझ्याकडून मलाही काही विद्या आणि जीवनोपयोगी कला प्राप्त झाल्या तर तुझ्यावरचा विश्वास आणखीन दृढ होईल.
धरणीधरा ऐसे द्यावे
सर्वांभूती लिन व्हावे
तुज शरण शरण शरण
आलो पतित मी जाण
विघ्नहर्त्या या भूमीचा, चराचराचा तारक तूच आहेस, निर्मिताही तूच आहेस. या भूमीवर जिथे जिथे आदर्श असतील, गुरू असतील, तिथे तिथे सूक्ष्मरूपाने नक्कीच तुझा निवास असणार. अशा विभूतींपुढे मी नेहमीच विनम्र वृत्तीचा स्वीकार करेन. गजानना, याच विनम्र भावनेने मी तुलाही शरण आलो आहे. या शरणागताला तुझ्या चरणांपाशी आसरा देऊन या पामरावर निरंतर तुझी कृपादृष्टी ठेवावी अशी तुला हात जोडून विनंती करतो.
तुझा अपराधी मी खरा
आहे ईक्षुचापधरा
माझी येऊ दे करूणा
जळी स्थळी काष्ठी पाषाणी सगळीकडे अंश रूपात जरी तू असलास तरी तुझे मूर्त स्वरूप आम्हाला गणेश चतुर्थीच्या दिवशी दिसते. मंदिरांमधूनही तुझं दर्शन घ्यावंसं वाटतं तेंव्हा आम्ही तिथेही येतो पण सध्या मात्र आम्ही तुलाच मंदिरांमध्ये डांबून ठेवलं आहे. हेरंबा आम्ही मर्त्य मानव याबद्दल खरोखरच तुझे अनंत अपराधी आहोत. या आमच्या अपराधाबद्दल मी तुझी मनापासून क्षमा मागतो आणि याचं प्रायश्चित्त म्हणून तुझ्यासमोर माझे कान धरून उभा रहातो किंवा देवाधिदेवा, हवं तर तू माझे कान धर.
आर्त विनवणी एकच आहे ती म्हणजे आता तरी आमच्यावर तुझी कृपादृष्टी होऊ दे आणि हे अदृश्य संकट तुझ्या कृपेने लवकरात लवकर दूर होऊ दे म्हणजे समस्त मानव जातीला मोकळा श्वास घ्यायला मिळेल.
ज्येष्ठ संगीतकार ह्रदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आवाजातली ही आर्त विनवणी गजाननाच्या कानी जावी हीच सदिच्छा !

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800.
गाण्याची निवड छान आहे. रसग्रहण खूपच छान त्यामुळे गाणे ऐकताना आणि म्हणताना वेगळाच आनंद मिळतो.
गणपती बाप्पाचे आगमन २ दिवसांनी. गाण्याची निवडही अगदी छान. अथर्वशीर्ष म्हणताना डोळ्यापुढे गणपतीची मूर्ती उभी राहते. रसग्रहण यथायोग्य.
गाण्याची योग्य निवड रसग्रहणही खूप छान
गाणे खूप छान घेतले,रसग्रहणासाठी.
Specifically, शेवटच्या कडव्याचे रसग्रहण परिस्थितीजन्यच.
धन्यवाद आशा 🙏
धन्यवाद विवेकजी 🙏
गणपती उत्सव जवळ आला आहे. आपण केलेली गाण्याची निवड सुयोग्य आहे. कवीचे नाव अपरीचीत आहे. परंतु संगीतकार हृदयनाथ मंगेशकर व लता मंगेशकर यांनी हे गाणं अजरामर केले आहे. आपलं रसग्रहण सुद्धा छान झालं आहे.