Wednesday, July 2, 2025
Homeसाहित्यमनातील कविता

मनातील कविता

कविवर्य वा.रा.कांत
कविवर्य वामन रामराव कांत अर्थात, वा.रा.कांत
भावपूर्ण, आशयगर्भ रचनांचे सर्जनकार होत ! ‘दोनुली’, ’पहाटतारा’, ’बगळ्यांची माळ’, ‘मरणगंध’, ‘मावळते शब्द’, ‘रुद्रवीणा’, ‘वाजली विजेची टाळी’, ‘वेलांटी’, ’शततारका’ , ’सहज लिहिता लिहिता’ असे काव्य संग्रह, ‘ एक चादर मैली सी ‘, ‘ मध्यस्थ ‘, ‘ मालिनी ‘ यासारख्या अनुवादित कादंबऱ्या, ‘ सुलताना रझिया ‘ सारखी ऐतिहासिक अनुवादित कादंबरी, अनेक समीक्षणे, अनेक ललित लेख, दोन नाटके अशी त्यांची साहित्य निर्मिती आहे.

वा. रा. कांतांनी विपुल कवितालेखन केले. स्वत:च्याच कवितेवर त्यांनी नित्य नूतन प्रयोग केले. जवळपास सहा दशके ते साहित्य सृष्टीत कार्यरत होते.  कांतांनी  ‘नाट्यकाव्य‘ स्वरूपाच्या कविता आणि ‘दोनूली’ हे नवे काव्यप्रकार मराठी साहित्यात आणले. त्यांच्या काव्य संग्रहांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले.  त्यांनी ‘अभिजित ‘, ‘ रसाळ वामन ‘ ह्या नावांनीही काही ललित लेखन केले.

आजवर मी, माझ्या आकलनशक्तीप्रमाणे, माझी संवेदनशीलता आणि बुद्धिमत्ता यांच्या कुवतीप्रमाणे थोर कवी/कवयित्री यांनी लिहिलेल्या कविता आत्मसात करण्याचा आणि तो अनुभव, तो परमानंद रसिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आले आहे. अर्थात, आपल्यातले अनेक वाचक माझ्यापेक्षा अधिक अधिकार प्राप्त आहेत. ‘अधिकार ‘ म्हणजे मला कोणतीही बौद्धिक, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक उंची संबोधित करायची नाही. हा  ‘अधिकार’ शब्द केवळ ‘मनाच्या सजाणपणाच्या’  अधिकारास सूचित करतो. तर आपण सर्व वाचक माझ्याहून अधिक गुणीजन आहात.

काही काव्य जाणीवेतून जन्म घेते आणि काही नेणीवेतून ! परंतू बरसणाऱ्या धारांना शोषून घेण्यासाठी माती असावे लागते, पाषाणाचे ते काम नव्हे. पडणारे जलाचे थेंब; माती शोषून घेते, तिचे ठायी ओलावा येतो आणि ती सृजनशील होते. अगदी त्याप्रमाणे, सामोऱ्या येणाऱ्या दिव्य काव्याने आपल्यात ओलावा येण्यासाठी मूळात आपल्यात ती ग्रहणशीलता असायला हवी. अशी परमोच्च ग्रहणशीलता असल्याने  ‘अधिकारप्राप्त’ असणारे असे अनेक रसिक आहेत. त्यामुळे ह्या माझ्या लेखनाद्वारे कोणतेही उद्बोधन, प्रबोधन करण्याचा माझा उद्देश नसतो. हे मी गुंफत असलेले प्रत्येक पुष्प म्हणजे माझा स्वतःलाच काव्य प्रवासास नेण्याचा प्रयत्न आहे, असे म्हणू हवे तर !

तर, मी जेंव्हा जेंव्हा अशा प्रकारचे लेखन करते त्यावेळी माझ्या लेखनात जाणीवपूर्वक कवी-कवयित्री यांचे वैयक्तिक आयुष्य, स्वभावधर्म असे उल्लेख किंवा संदर्भ टाळते. का ? याचे प्रामाणिक उत्तर म्हणजे मला प्रत्येक कवी-कवयित्री यांची जन्म-मृत्यूची स्थाने, त्यांची आर्थिक-कौटुंबिक परिस्थिती, त्यांचे वैयक्तिक वर्तन, त्यांनी अर्थप्राप्ती साठी केलेल्या इतर कार्यालयीन सेवा अशी कोणतीही माहिती नाही.

मग कुठेतरी वाचलेली माहिती पुन्हा उतरवणे हे माझ्या मनास पटत नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे  ‘कविता’  हा आम्हाला जोडणारा धागा आहे. त्यामुळे त्यांचे जे कवितेतून व्यक्त होणे आहे, तेच माझ्यासाठी त्यांचे व्यक्तित्व आहे, तेच त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे आणि तीच माझीही त्यांच्याबद्दलची व्यक्तीनिष्ठा आहे. यासाठीच मी ह्या काव्यदैवतांना मिळालेल्या पदव्या, पुरस्कार याचा उल्लेख परिचय स्वरूपात जरी लिहित असले तरी त्या पदव्या – पुरस्कार आणि त्यांचे प्रसिद्धीचे वलय हे माझ्यासाठी त्यांच्या काव्याच्या भव्यतेचे मापदंड कधीही नव्हते.

तथापि, आज मात्र मी ज्या कविवर्यांबद्दल लिहिते आहे त्यांचे काव्य, त्यांचे साहित्य, याच्या भव्यतेने भारावून जावून प्रत्येक वेळी एक विलक्षण हळहळ मनात उत्पन्न होते ती म्हणजे, जे प्रतिभा सामर्थ्य त्यांचे ठायी होते त्यामानाने पुढल्या पिढ्यांना त्यांचे नाव काही अंशी अनभिज्ञ राहिले. अनेक पैलूंनी युक्त असणाऱ्या त्यांच्या काव्य रचना ज्या प्रमाणात पोहोचायला हव्या होत्या त्या पोहोचू शकल्या नाहीत. कदाचित हे आपलेच दुर्दैव !

हे कवी म्हणजे ६ ऑक्टोबर १९१३ रोजी पृथ्वीतलावर येवून  ‘अंबरात बगळ्यांची माळ फुलवणारे’  कवीवर्य वा. रा. कांत.

‘ बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात
भेट आपुली स्मरशी काय तू मनात ?…’

एक अजरामर कविता, अजरामर भावगीत.

‘ त्या गाठी, त्या गोष्टी, नारळिच्या खाली,
पौर्णिमाच तव नयनी भर दिवसा झाली !
रिमझिमते अमृत ते विकल अंतरात ?…

तू गेलिस तोडुनि ती माळ, सर्व धागे,
फडफडणे पंखांचे शुभ्र उरे मागे,
सलते ती तडफड का कधि तुझ्या उरात ?’

एकमेकांच्या आकंठ प्रेमात असणारे दोन जीव आणि त्यांची झालेली ताटातूट. त्याचे हे असे चटका लावणारे वर्णन वाचल्यावर अनुभवास येते ती, ज्यांना आयुष्यात त्यांचे प्रेम मिळाले त्यांनी एकमेकांचे हात हातात घट्ट धरून त्याबद्दल पुन्हा एकदा दर्शवलेली कृतार्थता आणि दुर्दैवाने ज्यांच्या नशिबी ती ताटातूट आली त्यांच्या जीवाची पंखांप्रमाणे चाललेली तडफड.

ही एकाकीपणाची तडफड, किंवा कदाचित सुरुवातीस मी व्यक्त केलेली हळहळ कुठेतरी कविवर्यांच्याही मनाचा भाग असावी.

वेलांटी‘ ह्या त्यांच्या काव्य संग्रहात ‘पुतळा’  नावाची एक कविता आहे. त्यातल्या काही ओळी अश्या…

‘ रिता एकाकी मी
धरित्रीचा एक श्वास
नियतीचा एक उच्छवास- विरणारा…’

किती नेमकेपणाने वापरलेले हे शब्द आहेत. धरित्रीचा श्वास, श्वास जो जिवंत ठेवतो, जो सृजनाचे प्रतीक, श्वास म्हणजे अस्तित्वात येणे, म्हणजे धरित्रीची असणारी मातृत्व भावना परंतू नियतीचा मात्र उच्छवास… उच्छवास… शरीराबाहेर फेकला जाणारा, अव्हेरला जाणारा, निष्कामी, त्यक्त, बहिष्कृत असणारा आणि हळूहळू लोप पावून नष्ट होणारा.

‘ शून्य निळाईत एका क्षणाच्या
हजार डोळे भोवती बघतात
पण कोणीच ओळखत नाही…

केवळ वस्त्रांचे प्रदर्शन करणारा
अनोळखी हातांतला
प्राणहीन पुतळा – ‘

आसपास असणाऱ्या सग्या सोयऱ्यांपैकी तरी किती लोक आपणास खरोखर ओळखतात? किती लोक आपले शब्द खऱ्या अर्थाने वाचू शकतात? अंतरीची घालमेल किती जण आरपार पाहू शकतात…ती घालमेल, जी असते ह्या वस्त्रांच्या आत…ती म्हणजे आपले असणे…आपले जिवंत असणे…ती जो वाचू शकतो तो आपला जीव जाणतो, बाकी लोकांसाठी आपण एक पुतळाच नाही का?

आणखी एक अजरामर भावगीत…
‘आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको
कालचे वेड्या फुलांचे रंग तू मागू नको.

पाकळयांचे शब्द होती तू हळू निश्वासता
वाजती गात्री सतारी नेत्रपाती झाकता
त्या फुलांचे त्या स्वरांचे गीत तू मागू नको…

काय बोलू श्वासभारे चांदणे डहूळेल का ?
उमलण्याचे सुख फिरुनी या फुला सोसेल का ?
नीत नवी मरणे मराया जन्म तू मागू नको
आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको. ‘

याशिवाय, ‘ त्या तरूतळी विसरले गीत ‘, ‘ खळेना घडीभर ही बरसात ‘, ‘ राहिले ओठांतल्या ओठात वेडे शब्द माझे ‘ अश्या अनेक रचनेत एक हुरहुर, एक पोकळी, एक अभाव आणि त्या अभावाचे अत्यंत भावपूर्ण व्यक्तीकरण.

वेलांटी ‘ मधील ‘ तुला झोपेत हसू आले ‘ सारख्या काही रचना मात्र अतिशय तरल, मोरपंखी अश्या

‘ मिठीत साऱ्या विरून व्यथा
उरल्या चंद्रा अमृताच्या कथा
अरध्या रात्री शिणल्या गात्री सुखSदुःख फुला आले
एका रात्रीत माझ्या बाहूत तुला झोपेत हसू आले. ‘

भावविभोर रचनांप्रमाणेच अनेक रचना अतिशय आशयगर्भ आहेत. त्यात प्रतिमा रूपके आहेत. ‘ चकमक झडली आहे ‘ ही तशीच रचना. तसेच ‘दोनुली‘ हा काव्यप्रकार म्हणजे एकच मूळ असणारा परंतू दोन दले दाखवणाऱ्या रोपाप्रमाणे. एकाच आत्म्याची दोन रूपे असल्याप्रमाणे हे काव्य. ‘दोनुली’ संग्रहात सुरुवातीला ‘देठाचं मनोगत’ नावाचे असलेले निवेदन, ह्या द्विदल काव्यामागचा उदारपणाने स्पष्ट केलेला कल्पना आणि हेतू थक्क करणारा आहे.

कोण्या एका क्षणी भाव कवितेच्या पलीकडे जाणारे काहीतरी लिहावे असे त्यांना वाटले. भाव कवितेचा हळवेपणा, सौंदर्य या पलीकडे जाणारी आकाशाची अथांग स्थिती शोधावी असे वाटून त्यांनी ‘ मरणगंध ‘ ची रचना केली. ‘नाट्यकाव्य’ अशा स्वरूपाचे हे काव्य आहे. या संग्रहात, त्यांनी महाभारतातील नाट्यकाव्यांचे संकलन केलेले आहे. महाभारतातील काही व्यक्तींच्या मृत्यूच्या क्षणांच्या गूढतेचे हे वर्णन आहे. पंडू, माद्रि, धृतराष्ट्र, गांधारी आणि श्रीकृष्ण यांचे चित्र काव्यात्मक पद्धतीने ह्यात रेखाटलेले आहे.

ह्यात आहे त्यांचा ह्या साऱ्या घटनाक्रमांकडे पहाण्याचा उदात्त दृष्टीकोन, त्यातील भाषाशैली, श्रीकृष्णाचे ‘विसर्जनातील सर्जन ‘, त्याच्या जीवनातील राधेच्या भूमिकेचा वैयक्तिक आणि अध्यात्मिक पातळीवर केलेला विचार, ‘ राधा नावाचं सृजन स्वप्न ‘, श्रीकृष्णाचे महान जीवन आणि अत्यंत शूद्र मृत्यु आणि ‘ मिथ ‘ असे त्यास दिलेले संबोधन…

हे सगळं केवळ ‘ कवी ‘ पदवीपुरतं मर्यादित आहे ?
अशा प्रकारचे चिंतन, हा उहापोह, हा दृष्टिकोन, हे एकाच वेळी उठलेलं बौद्धिक आणि भावनिक वादळ, हे मला त्यांच्या स्वतःच्या ‘ कवी ते महर्षी ‘ ह्या ‘ मिथ ‘ सारखं वाटतं.

त्यांची ‘ स्वप्नांत मी तुझ्या रे ‘ नावाची एक गझल सदृश, संवादात्मक कविता आहे. अतिशय सुंदर अभिव्यक्ती असलेली ही कविता…

‘ ती: स्वप्नांत मी तुझ्या रे, येवून रोज जातें;
तो: असतील पाय थकले, देऊं चुरून का ते ?

तो: स्वप्नांतल्या जगाच्या वाटाच लांब लांब;
संपून स्वप्नवाटा अन् पाहणें रहातें.

ती: तुज निष्ठुरा प्रवास कळतो न वेदनांचा;
मी अश्रूच्या खुणाही मार्गीं पुसून जाते.

तो: हातीं न दान येई, स्वप्नांत तू दिलेलें;
निथळून चांदण्याने नभ कोरडें रहातें.

ती: अदृश्य पुष्पगंध नाही फुलानिराळा;
समजून घे सख्या रे या मर्मबंधनातें.

तो: प्रेमांत का मिळावा मज गाव वेदनेचा ?
ती: रात्रीमधी अशा या जखमांस फूल येतें. ‘

पुन्हा तोच अभाव, मिळूनही सर्वस्वी न मिळाल्याचं शल्य, काहीतरी अधुरेपण आणि त्याची इतक्या नाजूक, हळव्या शब्दांत केलेली मांडणी.

याशिवाय ‘हरवलेले आकाश‘  नावाच्या पुस्तकात, आकाश हरवलेली माणसे अशा प्रस्तावना स्वरूप प्रथम लेखाने केलेली सुरुवात, त्यातील मुंबईचे केलेले वर्णन आणि याशिवाय महाकवी गालिब, त्यांचे शेर,  रवींद्रनाथ टागोर, स्वातंत्र्यवीर सावरकर, बा भ बोरकर, केशवसुत, इंदिरा संत, कुसुमाग्रज यांच्यासारख्या अनेक महान व्यक्तिमत्त्वांच्या पैलूंचा घेतलेला अभ्यासपूर्ण मागोवा. हे सारे कल्पनातीत आहे.

आता माझी अतिशय आवडती कविता…
‘गाते कोण मनात, कळेना, गाते कोण मनात ?

जरी शतावधि कविता लिहिल्या
शंभरदा वाचिल्या गायिल्या
शब्द कुणाचा? सूर कुणाचा? अजुनि मला अज्ञात…

अभिमानाने कधी दाटता
“रचिले मी हे गाणे” म्हणता
“गीतच रचिते नित्य तुला रे” फुटे शब्द ह्रदयात

गाते कोण मनात, कळेना, गाते कोण मनात ? ‘

अश्या प्रकारची निस्पृह, निराभिमानी वृत्ती असणारे हे कवीवर्य. इतके दर्जेदार काव्य प्रसवून त्याच्या कर्तेपणाचे श्रेय स्वतःकडे न घेणारे हे कवीवर्य !

मृत्युपत्र‘ नावाची अखेरची कविता साकार करून, ८ सप्टेंबर १९९१ रोजी  कवीवर्य वा. रा. कांत, ज्या अंबराची त्यांना ओढ लागली होती त्या अंबरी प्रस्थानकर्ते झाले. त्यांचे; आपली मती गुंग करणारे लेखन आणि कोणत्याही प्रसिद्धीच्या झोतामागे न धावता केवळ स्वतःच्या काव्याचा घेतलेला शोध ह्यातून मी खूप काही शिकते आहे.

गंधवार्ता‘ च्या प्रस्तावनेत भाव काव्याकडून दीर्घ काव्याकडे ते का वळले आणि त्याची निर्मिती कशी केली याबद्दल वर्णन करताना कविवर्य म्हणतात,  “यातून मला काय साधलं, काय साधलं नाही हे माझ्या रसिक वाचकांनी ठरवायचं आहे. माझ्यापुरतं म्हणाल, तर साधण्या-गवसण्याचा हा प्रश्न गौण आहे; कला ही गवसण्यापेक्षा शोधच अधिक असते. तो शोध, ते असमाधान अजूनही चालू आहे. तोच माझा आनंदही आहे.”

मला वाटतं, ‘ कविता ‘ हाच मुळी शोधापासून बोधापर्यंतचा प्रवास आहे. भोगापेक्षा योग आहे. त्यामुळे त्यात गवसणं असूच नये. गवसलं म्हणजे इतरांपेक्षा वेगळी उंची प्राप्त होते आणि ही उंची प्रवासाचा आनंद संपवून टाकते.

कविवर्य, आज मी आपल्या चरणी, ‘मला कधी गवसूच नये, कधी उमगूच नये, मी कायम शोधातच रहावं आणि अतृप्तीत परमोच्च तृप्ती प्रदान करणारा हा प्रवास अखंड चालू रहावा’ ही प्रार्थना करते आणि असा माझा ‘प्रवास‘ आपले चरणी अर्पण करते🙏🏻

प्रवास
अबोध कोवळ्या पावलांचा  सुरू होतो वाट प्रवास,
‘मी निराळी, कृती समर्थ ‘ ; धरी कीर्ती नगांचा ध्यास.

अजाण चरणा भुलवित होत्या नाद ब्रह्म खुणा,
पांथस्थ वत्सल स्वरे व्यंजने करती निर्धार दुणा.

अस्थिर चंचल कल्पनाभूमी तोल ढाळीत होती,
तरी प्रेमे मज सावरण्या अक्षरे उभीच होती.

अज्ञात वाटी कित्येक रुतले पुनरावृत्ती कंटक देही,
आसवात सुमने फुलवाया शब्दरूपे धावले स्नेही.

अच्युत निश्चय गतीस मैलाची वाक्ये प्रेरित होती,
‘परत फिरावे’ असल्या शंका हवेत विरूनी जाती.

अखेर प्रवासांती मग मी प्रसिद्धी गिरीवर जाते,
मात्र तेथे साजरी होण्या मी एकटी उभी होते.

अतुल्य साथ लाभली मजला स्वराक्षर पंक्तीची,
तिष्ठीती ते परी पाऊलवाटी रुजवून रोपे भक्तीची.

अस्वस्थ करी एकाकी उंची; वाटे मजला भिती,
वनवासच भासे; जिथे स्वजन विलगाची क्षती.

अर्पावी ही मज पाऊलवाटच; इथे लाभले शब्द सांगाती,
नकळत इथल्या वर्ण स्वरांशी मानसे जोडीली नाती.

अहिल्या मी पाषाण मती;  प्रतीक्षारत लीन होईन,
शब्द परब्रह्म उद्धरील मजला याची वाट पाहीन !

डॉ गौरी जोशी – कंसारा

– लेखन : डॉ. गौरी जोशी कंसारा
– संपादन : देवेंद्र भुजबळ,+91 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४