दगड व्हावं मन..
मग फूटणार नाही
पाझर डोळ्याला
उद्विग्न, हतबल होऊन
वेळेअगोदरच संहिता संपवून..
पडद्याआड जाणारी पात्र पाहताना
होणार नाही ..उद्रेक भावनांचा..
सर्वत्र माजलेले काहूर, आकांत
नाही ऐकू येणार तीक्ष्ण कानांना
म्हणून दगड तरी व्हावं मन..!
प्राणांसाठी चाललेल्या लढाईत
हरलेले असंख्य मृतदेह
दहनासाठी काही ताटकळलेले
अन् काही पेटलेले ..चितेवर
त्या चितेतून उडणाऱ्या ठिणग्या
अन् धगही जाणवु नये म्हणूनच..
दगड तरी व्हावं मन…!
उद्ध्वस्त झालेली कुटुंब अन्
पोरकी झालेली चिमुकली
त्यांच्या डोळ्यातील आसवांच्या पुरात
आता तरी वाहून जावा मीपणा
समाजाचा, राजकारण्यांचा
किंबहुना उभ्या माणुस जातिचा…
आणि मागे फक्त…उरावं
दगड झालेलं मन… माणसाचं
भावनिक युद्धासाठी..!

– रचना : काव्य नीता ✍️
Apratim 👍
सुंदर कविता