Saturday, July 5, 2025
Homeलेखबातमीदारी करताना - भाग - ४

बातमीदारी करताना – भाग – ४

अंत्यसंस्कारातही जातपात !
त्या वेळी मी ऑब्सर्व्हर ऑफ बिझिनेस अँड पॉलिटिक्स या मुंबईच्या दैनिकाचा पुण्याचा बातमीदार होतो. मुंबई वगळता महाराष्ट्र असे माझे कार्यक्षेत्र होते.

ही गोष्ट कोणत्या गावची, कोणाशी संबंधित, कोणत्या तारखेची हे मी मुद्दाम आज लिहिणार नाही. कारण या तपशीलाला आज फार महत्त्व देण्याचे कारण नाही.  परिस्थिती बदलली आहे. संदर्भ कदाचित पूर्ण बदलले असतील, ज्या कारणासाठी मला ते सांगावेसे वाटते ते मला आजही महत्त्वाचे वाटते.

एवढे मात्र सांगतो की पश्चिम महाराष्ट्रातील सधन पट्ट्यातील ही घटना आहे.  साधारण  पन्नास वर्षांपूर्वीची मधील आहे. लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या दोन बसना अपघात झाला आणि त्यात नवरदेव- नवरीसह तीस स्त्री-पुरुषांचा आणि मुलांचा जीव गेला अशी ती बातमी होती.

पुण्याहून बातमी कव्हर करायला गेलो उशिरा रात्री पर्यंत सर्व तपशील घेऊन फोनवरून माझ्या मुंबई कार्यालयातील सहकाऱ्याला बातमी दिली. घरी पुण्याला पोहोचायला रात्री खूप उशीर झाला.

दुसऱ्या दिवशी परत निघालो. ते वऱ्हाडाच्या मूळ गावात कसं वातावरण होतं हे कव्हर करायला गेलो. त्या छोट्याशा गावात बहुतेक सर्व  घरं सधन होती.  गावात आदल्या दिवशीचं लग्नाचं वातावरण होतं. हार, रांगोळ्या आणि तोरणे कोमेजून गेलेले दिसत होते.  प्रत्येक घरामध्ये आक्रोश ऐकायला येत होता.

नवरदेव नवरीच्या घरात तर ऐकणाऱ्याचे हृदय पिळवटून जात होतं. प्रत्येक घरात कोणीही कोणाचेही ऐकण्याच्या आणि बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं.
नवरदेव नवरी, त्यांचे आई- वडील यांच्या सकट आणखी दोघे मृत्युमुखी पडले होते. घाटामध्ये दोन्ही
वाहनांमधील एकूण तीस जण मरण पावले होते.

मिळेल तशी माहिती घेत मी त्या गावच्या नदी काठावर पोहोचलो.  नदीला फार पाणी नव्हते.  विदारक दृश्य होते.  वाळवंटावर मृत देह जाळल्याची चिन्ह दाखवणारी राख आणि विझत आलेले निखारे पाहत मृतांचे आकडे मोजत मी पुढे सरकत गेलो.

शेवटच्या प्रेताजवळ पोचलो तेव्हा एकोणतीसचा आकडा आला. माझ्या सोबत गावचा एक युवक चालत होता. शेवट आला तेव्हा एक जळालेले प्रेत त्याच रांगेत पण जरा स्वतंत्र ठिकाणी पुढे जळून गेलेले पाहीले. त्या युवकाला मी विचारले की या प्रेताला सुटे, स्वतंत्र का ठेवले. त्याने अगदी सहज सांगावे तसे मला सांगितले की तो न्हावी होता ना !

माझं बालपण खेड्यात गेलेले असल्यामुळे मला याचे अधिक स्पष्टीकरण आवश्यक नव्हते. ग्रामीण भागात लग्नाचं वऱ्हाड दुसऱ्या गावी जातं तेव्हा नातेवाईक आणि मित्रपरिवार यांच्यासोबत गावचा न्हावी लग्नाच्या त्या तीन-चार दिवसासाठी नेण्याची प्रथा असायची. अजूनही कोठे कोठे ती आहे. नवरदेव आणि मानकरी यांच्या सोबत इतरांचीही दाढी कटिंग करणे यासाठी त्याला नेणे आवश्यक मानले जाते.  त्याबद्दल त्याला भरघोस मोबदला मिळतो. त्यामुळे या गावचा न्हावीदेखील लग्नाला होता. त्याला सर्व पंगतीना मानाने बसवले असणार. चांगला आहेरही दिला असणार. पण या सगळ्या आनंदीआनंद वातावरणाची अखेर वऱ्हाडातील इतरांसारखीच त्याचीही झाली. अंत्यसंस्कार करताना मात्र गावकऱ्यांनी त्याची जात बरोबर लक्षात राहिली तो ‘खालच्या जातीचा,’ त्यामुळे त्याला लांब दूरवर ठेवण्याचे त्यांनी कटाक्षाने पाळले.

विषण्ण  होऊन मी पुण्याला परत यायला निघालो.  तेव्हा जातीभेदाची पाळेमुळे अजून किती खोलवर रुजली आहेत याचा विचार करतच.

अंत्यसंस्कार कव्हर करणारा मी काही एकटा पत्रकार नव्हतो पुण्याचा. सगळ्यांनीच त्या छोट्याश्या गावावर कोसळलेल्या दुःखाच्या डोंगराच्या बातम्या लिहिल्या.  मी देखील त्यातलाच एक होतो. फक्त मी एक स्वतंत्र चौकट केली. या जातिभेदाचा ठळकपणे उल्लेख करणारी बातमी त्या चौकटीत मी लिहिली होती.

प्रा. डॉ. किरण ठाकुर

– लेखन : प्रा डाँ किरण ठाकूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments