डॉ. वसंत बागुल यांच्या निधनाची बातमी कळली आणि पोटात खड्डा पडावा असे झाले. त्यांचे वय ७५ होते आणि अनेक दिवस आजारीही होते. पण तरीही ते इतक्या लवकर जातील असे वाटले नाही.
मला आयुष्यात बरेच अवलिये भेटले. पण बागुलांइतका संपूर्ण वेडा कोणीच नाही. मराठी लेखकांत त्यांचे नाव फ़ारसे ऐकू येत नाही. साहित्य विश्वात त्यांची दखल घेतली गेली नाही. १९ भरभक्कम ग्रंथ त्यांच्या नावे असूनही ! याचे कारण म्हणजे त्यांचे साहित्यविषयक आणि आयुष्यविषयक खरे खुरे वेड.
डॉ. वसंत बागुल हे मुळचे मालेगावच्या शाळेतील शिक्षक. नोकरी करतानाच त्यांनी एम ए केले. आणि मग वाचन व लेखनाच्या वेडाने झपाटलेले बागुल सर नाटककार इब्सेनच्या प्रेमात पडले. त्यांना इब्सेनचे इंग्लीश भाषांतरित साहित्य काही पचेना. म्हणून त्यांनी मूळ नॉर्वेजिअन शिकायचे ठरवले.
नॉर्वेजिअन भाषेचा अभ्यास करायला त्यांनी नॉर्वे गाठले. नॉर्वेजिअन भाषेचा अभ्यास केला. तिथे मराठी एम ए लायक काही काम नव्हते. तेव्हा पोटासाठी अंगमेहनत करत नॉर्वे युनिव्हर्सिटीत इब्सेनच्या नाटकांवर पीएचडी मिळवली. इब्सेनच्या बारा नाटकांचा मराठी अनुवाद केला.
नॉर्वेमधे त्यांचा जसा जम बसला तसे ते अस्वस्थ झाले. त्यांच्यातला जिप्सी जागा झाला. ते परत भारतात आले आणि गेले जपानला. जपानमधे नॉर्वेजिअन आणि मराठीला कोण विचारतो ? मग तिथेही अंग मेहनतच. पुन्हा जपानी भाषा शिकून परिकथांचा अभ्यास केला. जपानमधे कुटुंबाला स्थैर्य मिळाले. आणि यांना काही चैन पडेना.
तिथून ते गेले अमेरिकेला. अमेरिकेच्या सुदूर भागातील मॉटेलमध्ये वॉचमनचे काम करत तिथल्या मूळ परिकथांचा अभ्यास व अनुवाद केला. वयाची साठी ओलांडल्यानंतर हल्लीहल्ली ते परत भारतात आले. मुले त्या देशांतच शिकून स्थाईक झाली. पण बागुल सर पुन्हा महाराष्ट्रात आले. आणि आपल्या आयुष्यभराचे १९ पुस्तकांचे ऐश्वर्य ई साहित्यच्या मार्फ़त मराठी वाचकांवर विनामूल्य उधळून महायात्रेला गेले.
साहित्याच्या अंगणात अशी उदाहरणेही असतात हे सांगायलाच त्यांची भेट झाली. त्यांना कोणताही पुरस्कार मिळाला नाही. कधीही वृत्तपत्रांनी किंवा साहित्य संस्थांनी त्यांची दखल घेतली नाही. स्वतः सर व्यवहारी जगापासून फ़ारच दूर होते. वाचकांची पत्रं आली की खुश. बाकी काही अपेक्षाच नव्हत्या. ते मनासारखे जगले. हवं होतं ते मिळवलं. इतरांशी तुलनाही नाही आणि स्पर्धाही नाही. तेव्हा जयही नाही आणि पराजयही नाही.
मला तर हेवा वाटतो त्यांचा. आपल्याला तर एक अख्खा दिवस जगाचा विचार न करता स्वतःच्या मनासारखा जगणे जमत नाही.
बागुल सरांना श्रद्धांजली. अगदी मनापासून कडक सॅल्युट सर.
– लेखन : सुनील सामंत
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800