पंचामृती घाली स्नान नेसवीले शालु शेले
आले गौरीँ ना पाहण्या रवी किरणांचे झेले
तेजःपुंज चेहऱ्यास आली सोन्याची झळाळी
डोळा काजळ कपाळी चंद्रकोर हसलेली
काळी गळसरी गळा हार अन् मोहनमाळ
चिंचपेटी तन्मणी अन् श्रीमंत हाराची माळ
लाल अग्रमणी शोभे कटी कंबर पट्ट्यास
नाग घाटी वाकी आणि पायी सोन्याचे चाळ
कुड्या मोत्यांच्या कानात शोभे नथ झोकदार
वेणी घालिता राहिले हे कुंतल झोके चार
दिसे रुप गौराईंचे त्यामुळेच अवखळ
मोगऱ्याची वेणी शोभे अग्रफुला मान फार
गोठ पाटल्या सहीत वाजले हिरवे चुडे
गोड तिखट फराळ चांदीच्या ताटात पुढे
सोळा भाज्या करंज्या अन् पुरणपोळी मोदक
जेवा सांगते गौरींना उभी घेऊन मी विडे
रूप देखणे गौरींचे मी दृष्ट काढते जरा
आनंदाचा मांगल्याचा दिवस आजचा खरा
रोज देते साक्ष गौरी कोयरीच्या कुंकूवात
स्वर घुमतो अजुनी आरतीचाच कानात

– रचना : डॉ नीलांबरी गानू
गौरी ची आरास अत्यंत सुंदर अप्रतिम सुरेख कविता 👌👌👌🙏डोळ्यासमोर देखावा आला.