भक्तिभावे पुजूनिया तुज करितो आरती |
आशिष देई तव कृपेचे हे मंगलमूर्ती || धृ. ||
तनुज तू शिव-पार्वतीचा |
अनुज तू श्री कार्तिकेयाचा |
वर शोभसी रिद्धि-सिद्धिचा |
देव शोभसी तू बुद्धीचा || १ ||
लाल फूल प्रिय,शमी अन् दूर्वा |
शेंदूर भाळी शोभतो बरवा |
मोदक अति प्रिय गणपती देवा |
भक्तांची मनोकामना पुरवा || २ ||
भाद्रपद मासी शुक्ल चतुर्थी |
बहुउल्हासे साजरी करिती |
प्रतिष्ठापिती मृत्तिकामूर्ती |
यथाशक्ती पूजन करिती || ३ ||
गजानना हे सिंदूरवर्णा |
तुंदिलतनू तू हे गजकर्णा |
प्रार्थितो तुज भवभयहरणा |
‘श्रीशालिसुत’ मंदार चरणा || ४ ||

– रचना : मंदार श्रीकांत सांबारी.