Saturday, July 5, 2025
Homeयशकथाममता : महिला पहिलवान

ममता : महिला पहिलवान

बहुधा पहिली भारतीय महिला पहिलवान असलेल्या ममता सदगीर हिचा जन्म सुमारे 125 वर्षांपूर्वी, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पाटोळे येथे झाला.

ममताचे वाडवडील दूध दुभत्याचा व्यवसाय करायचे. त्यांच्याकडे मोठ्या संख्येने गुरे होती. ते मूळचे कानडी गवळी समाजाचे असल्यामुळे त्यांनी परंपरागत व्यवसाय स्वीकारलेला होता.

ममताच्या वडिलांचे नाव खंडूजी आणि आईचे नाव रंभाबाई होते. गावाबाहेरील डोंगरावर हे कुटुंब अगदी आनंदाने राहत असे. ममताचा जन्म झाला त्यावेळी तिचे वडील खूप नाराज झाले. त्यांना पहिल्या मुलानंतर दुसराही मुलगा अपेक्षित होता. परंतु तसे घडले नाही. खंडूजी स्वतः पैलवान असल्यामुळे आपल्या मुलांनी पैलवानकीचे धडे घ्यावे आणि मोठं नाव कमवावे त्यासाठी ते आपल्या मुलाला तसा व्यायाम शिकवीत असत.

ममता हळूहळू लहानाची मोठी होऊ लागली. आपले वडील मोठ्या भावाला व्यायाम कसा शिकवितात याकडे तिचे लक्ष जाऊ लागले आणि अवघे चार वर्षे वय असताना ती आपल्या मोठ्या भावासोबत व्यायाम करू लागली.

एक मुलगी असूनसुद्धा मुलीच्या कुठल्याही खेळात तिला रस नव्हता. तिची आई साधी भोळी होती. तिला पुरुषांप्रमाणे मुलीने व्यायाम करू नये असे वारंवार सांगत असे. परंतु ऐकणार ती ममता कसली ?

आपल्या आईला बोबड्या शब्दात सांगायची, “मना दादांसालखा व्याम कलायचा’..!
ममता जसजशी मोठी होऊ लागली तसा तिचा व्यायामाचा वेगही वाढत होता.

खंडूजीनी आपल्या मुलाला उत्कृष्ट पैलवान होण्यासाठी कोल्हापूरला रवाना केले. या वेळी ममताचे वय अवघे बारा ते तेरा वर्ष असावे. तिने आता ठरवून टाकले होते की आपल्याला दादासारखी कुस्तीपटू व्हायचे. त्यांचा घरासमोर पुरातन काळातील खंडोबाचे छोटेसे मंदिर होते. त्या घरातील सर्वांना खंडोबाची भक्ती होती. तशी ममताही नित्यनेमाने खंडोबाची आराधना करीत असे. तिचं चालणं, बोलणं, वागणं अगदी मुलाप्रमाणे होतं. ती कपडेही मुलाप्रमाणे घालू लागली.

याच दरम्यान तिला मासिक पाळी आली. पहिल्यांदा मुलीला ह्या गोष्टी कळत नाही. तिने आईला सांगितले. आईने तिला याविषयी संपूर्ण माहिती देऊन तीन ते चार दिवस वेगळे राहायला सांगितले आणि व्यायामाचा सरावही बंद करायला सांगितला. तिने कसे तरी चार दिवस चार वर्षासारखे काढले. पण पाचव्या दिवशी सकाळी थेट मंदिरात गेली आणि आपले आराध्यदैवत असलेल्या खंडोबा सोबत भांडू लागली.

तिने या वेळपर्यंत एकही दिवस न चुकता आपला सराव बंद पडू दिला नव्हता. आणि एकदम चार दिवस तिला व्यायामाशिवाय राहावे लागले याची प्रचंड चीड तिला आली. तिने देवाशी भांडता भांडता त्याला ठणकावून सांगितले, की व्यायाम म्हणजे माझी भक्ती आहेस आणि त्याला लागणारी शक्ती तू पुरवतोस, याद राख…! यापुढे जर मला मासिक पाळीच्या त्रास झाला तर मी त्याच अवस्थेत तुझ्या कळसावर चढून तुझं पावित्र्य भंग करून टाकीन…! आणि तेव्हापासून मरेपर्यंत ममताला पाळी आली नाही हे सत्य आहे.

वाढत्या वयानुसार मुलींच्या शरीराचे अवयवही वाढू लागतात. त्याची वाढ थांबवणे हे कोणत्याही मुलीच्या हातात नसते. परंतु छातीचे अवयव जर वाढले तर आपल्याला कुस्ती खेळता येणार नाही कारण त्या काळात पुरुषांची मक्तेदारी या खेळात होती. तिला महिला म्हणून नव्हे तर पुरुष म्हणून कुस्तीत उतरायचे होते.

आपल्या छातीवरील अवयव वाढू नये म्हणून ममता विटांनी आणि दगडांनी छातीवर मारा करायची. हळूहळू तिने पुरुषांप्रमाणे पोलादी ढालीसारखी आपली छाती तयार केली.

ममता हळूहळू डोंगरावरून खाली उतरून पाटोळे येथे आणि जवळच असलेल्या सिन्नर तालुक्यात लोंढे गल्लीतील तालमीमध्ये सराव करायला जायची. तिचा व्यायामातील उत्साह पाहून खंडूजींचे मत परिवर्तन झाले आणि ही साधारण मुलगी नाही तर ही मुलीच्या रुपात माझा मुलगाच आहे हा विश्वास त्यांना आला. त्यामुळे त्यांनीही आपले कौशल्य पणाला लावून ममताला तयार करण्यावर जास्त भर दिला.

दादा कोल्हापूरवरून काही दिवसांनी परत आला, आणि कोल्हापूरचा ढाण्या वाघ म्हणून परिसरात लवकरच नावलौकिक मिळवला. त्यासोबत ममताही आपल्या मोठ्या भावासोबत कुस्तीला आखाड्यात
“ममत्या पैलवान” उतरू लागली. आणि प्रत्येक ठिकाणावरून कुस्ती जिंकून येऊ लागली. परंतु दादांना आपली बहीण एक पुरुष म्हणून कुस्ती खेळते हे मान्य नव्हते.

एकदा सिन्नर परिसरात मनेगावचा मोठा हंगाम भरायचा. त्या आखाड्यात ममता आणि दादा दोघेही बहीण भाऊ गेले. दोघांनीही कुस्त्या जिंकल्या. परंतु यामध्ये ममता अव्वल ठरली आणि गावकीची मोठी कुस्ती ममता उर्फ ममत्याने खेळावी असे ठरले. ममताचा खेळ पाहून कोणताही पैलवान तिच्यासोबत कुस्ती खेळण्यास येत नव्हता. अचानक एकाच्या लक्षात आले की दादा कोल्हापूरवरून शिकून आला आणि त्याला हरवणेही भल्याभल्यांचे काम नाही म्हणून दादाला कुस्ती खेळावयास तयार केले.

यावेळी दादाची भावना संकुचित झाली आणि पुढचा पैलवान आपली बहीण आहे आणि तिच्याविरुद्ध मी कुस्ती कशी खेळावी हा प्रश्न त्याच्यासमोर उभा होता. जिंकलो तर बहिणीला हरवून जिंकलो म्हणजे जिंकूनही हरल्यासारखे होईल आणि हरलो तर आपल्याच बहिनीकडून आपला पराभव झाला हे सहन होणार नाही. याच द्विधा मनस्थितीत असताना दादाला मैदानात नेले आणि कुस्ती जाहीर केली. दोघांचेही नावे पुकारल्या गेली. दोन बहिण भाऊ एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकले. अवघ्या ठरलेल्या काही मिनिटातच कुस्ती झाली आणि जे व्हायचे नव्हते तेच झाले ममता कडुन दादा पराभूत झाला. ममताचा मैदानात जंगी सत्कार झाला. दोघेही घरी परतले.

वडिलांच्या कानावर गोष्ट गेली आणि दादावर वडिलांचे रागावणे सुरू झाले. ममतावरून दादाची मान खाली झाली. ममताने कुस्ती खेळू नये असा आग्रह दादांनी आपल्या वडिलांना केला, परंतु तिला थांबवणे आता अशक्य होते. यावर दोघा बापलेकाचे नेहमी भांडण होऊ लागले. एक दिवस भांडण इतके विकोपाला गेले की खंडूजीनी सरकारी इंग्रज अधिकाऱ्याकडून बक्षीस मिळालेल्या परवानाधारक बंदुकीतुन गोळी दादाच्या छातीत घुसली आणि दादाचा जागीच तळमळून प्राण गेला.

इथून पुढे खंडूजीना 20 वर्ष तुरुंगवास झाला. परंतु सरकारी दप्तरात वेगवेगळ्या अधिकाऱ्याच्या ओळखीचा फायदा म्हणून त्यांची पाच वर्षे सजा कमी झाली. या दरम्यान ममतावर खूप मोठा आघात झाला. तिने सलग 15 वर्ष कुस्ती खेळणे बंद केले,आणि पुरुषांप्रमाणे शेती करीत असताना परिसरात होणाऱ्या प्रत्येक हंगामाची खबरबात ती घेत असे.

वडील तुरुंगवास भोगून परतल्यावर ममता पुन्हा कुस्तीकडे वळाली. एकदा हरलेला पैलवान पुन्हा तिच्याशी कुस्ती खेळत नसायचा. इतका धसका ममताचा इतर पैलवान घेऊ लागले.

एकदा कुस्ती खेळताना एका पैलवानाचा हात तिच्या जांघेत लागला आणि त्याला जशी जाणीव झाली तसा तो कुस्ती सोडून बाजूला झाला. आणि आपला प्रतिस्पर्धी कुणी पुरुष नसून ती एक महिला आहे असे सांगितले. पंचांनी ममताला जाहीरपणे विचारले आणि ममताने न डगमगता निःसंकोचपणे “आपण एक महिला आहे” हे सांगितले. उपस्थित सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले.

तेव्हापासून ममताने कुस्तीत माघार घेतली नाही तर ज्या भागात आपण महिला आहे हे माहिती नसेल त्या भागात कुस्ती खेळण्यास जाऊ लागली. येवला, नांदगाव, लासलगाव, कोपरगाव, अकोले, नाशिक, सिन्नर, नारायणगाव, जुन्नर, कोल्हार, भिमाशंकर यासोबतच चाळीसगाव, पाचोरा, जळगाव इत्यादी अनेक भागात ममता जाऊ लागली. परंतु हळूहळू सगळीकडे तिची “बाई” असण्याची चाहूल लागत होती. त्यामुळे तिला कुठेच गडी मिळेना. त्यानंतर ती बऱ्याच वेळा हंगामाच्या ठिकाणी कपडे काढून फक्त लंगोटवर कड्याजवळ जाऊन बसत असे. परंतु तिला पुढे कधी गडी मिळाला नाही आणि ममताची कुस्ती संपुष्टात आली.

पुढचे उर्वरित आयुष्य तिने आपली चुलत बहीण येवला तालुक्यातील प्रसिद्ध कीर्तनकार, प्रवचनकार हभप रुखमाबाई सदगीर यांच्यासोबत आध्यात्मिक क्षेत्रात घालविले.

नाशिक सिंहस्थ कुंभमेळा पर्व चालू असतांना १९८४ साली ममदापुर ता.नांदगाव जि. नाशिक येथे वयाच्या ९० व्या वर्षी ममताची प्राणज्योत मालवली आणि भारतातल्या प्रथम महिला कुस्तीपटूचा जीवनपट इतिहासजमा झाला.

(टीप – ममता सदगीर या महिला कुस्तीपटूचा जीवनप्रवास सर्व समाजासमोर यावा ही भावना ठेऊन समशेरपूरचे माझे मित्र डॉ. हरीश बेनके आणि विष्णूमामा जोरवर यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, प्रत्यक्ष त्या भूमीत जाऊन, त्यांच्या नातेवाईकांना भेटून – देशातील पहिली महिला कुस्तीपटू -ममता पहेलवान – जीवन चरित्र साकारले आहे. हे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. माझ्या अल्पबुद्धीने या आगळ्यावेगळ्या चरित्राला पूर्णतः न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.. बाकी वाचकच ठरवतील)

– लेखन : रणजित पवार
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments