Tuesday, September 16, 2025
Homeयशकथाआकाशाएवढे अण्णा

आकाशाएवढे अण्णा

कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज १३४ वी जयंती आहे. त्यामुळे हा विशेष लेख….

तुम्ही तसे कोणत्याच उपमेत बसणारे नाहीत… जसे, प्रिय, आदरणीय, तिर्थस्वरुप वगैरे पेक्षाही मोठे आहात आणि आम्हाला तुम्हाला देवस्वरुप म्हणायचं नाही कारण देवस्वरुप म्हटले की कर्तृत्वापेक्षा श्रध्दा श्रेष्ठ ठरतात….

तुम्ही जे काही करुन ठेवलय ते तुमच्या द्रष्टे पणाची साक्ष आहे ….. तुमची ओळख अशी फार वेळ लपवून ठेवू शकत नाही ……… तुम्हाला समाज कर्मवीर भाऊराव पाटील म्हणून ओळखतो ….. तसाच मीही तुम्हाला ओळखत होतो. मग आज तुम्ही माझ्यासाठी अण्णा कसे झालात ? असा प्रश्न माझ्या स्नेही जणाना होईल !

तर मित्रहो ….. अण्णाची पणती दिपाली पाटील मी भारती विद्यापीठात असताना माझी सहकारी होती. (दुर्दैवाने ती अकाली कॅन्सरने गेली). तेंव्हाच अंतरंगातले कर्मवीर भाऊराव पाटील आम्हाला कळले आणि जेंव्हा नातू डॉ.अनिल पाटील (दिपालीचे काका) वेळोवेळी भेटले, त्या बोलण्यातून तुमचे आणि आमचे नाते चक्क आम्ही अण्णा म्हणण्यापर्यंत जवळ झाले.

अण्णा बाकी तुमचा इतिहास जगाला माहित आहे हो, पण तुमच्या सुविद्य पत्नी लक्ष्मीबाई यांच्या अंगावरले १२० तोळे सोने रयतच्या उभारणीसाठी खर्ची घातले. लक्ष्मीबाईचा दागिना तुम्हीच आहात हे त्यांना माहित असल्यामुळे त्यांनी सुवासिनीचं प्रतिक असलेलं मंगळसूत्रही बोर्डिंग उभारणीसाठी तुमच्या हातात ठेवलं …

तुमचं मन ना किर्लोस्करांच्या कंपनीत रमलं ना कूपर यांच्या बरोबरच्या भागीदारीत …अण्णा लोकांना तो काळही माहिती व्हावा म्हणून सांगतो, मित्रहो तो काळ होता १९२५ च्या आसपासचा…त्यांनी कंपनीच काढायची ठरवली असती तर त्यांच्याच भागातले किर्लोस्कर, कल्याणीच्या बरोबरचे उद्योगपती झाले असते. पण डोक्यात बहुजनांची लेकरं शिकली पाहिजेत ही छत्रपती शाहूंची तळमळ त्यांच्या मनातून डोक्यापर्यंत गेली होती. म्हणून महाराष्ट्रातील अती दुर्गम भागात पायपीट करुन शाळा सुरु केल्या. १८ पगड जातीसाठी एकत्र शाहू बोर्डिंग सुरु केली.

१९२७ ला महात्मा गांधीच्या हस्ते शाहू बोर्डिंग म्हणून नामकरण केले. १९२९ ते ३७ पर्यंत ३७८ शाळा काढल्या. तुम्ही तुमच्या बहुजनांच्या मुलांसाठी देशातच नव्हे तर लंडन मध्ये बोर्डिंग सुरु करण्याचं स्वप्न पाहिलं आणि अशक्य प्राय वाटणारं स्वप्न १९५० साली पूर्ण झालं. १३ विद्यार्थ्यांना त्याकाळात रयतच्या फंडातून लंडनला पाठवलत …

दलित कुटुंबातले भिंगारदिवे आणि अप्पालाल शेख यांनी आपल्या कर्तृवावर असामान्य काम करुन तुमच्या तळमळीचं सोनं केलं.

अण्णा तुम्ही तुमचा हा वटवृक्ष लावून १ मे १९५९ ला तुमच्या मनीचे अनेक स्वप्न बोलून दाखवून जगाचा निरोप घेतलात. महात्मा गांधी ग्रामीण विद्यापीठ उभं करायचं हेही एक तुमच स्वप्न होत. त्याची पूर्तता होण्याचा क्षण आला आणि तुमच्या रयतची अनेक महाविद्यालय आज अभिमत विश्वविद्यालयं झाले आहेत. आता रयत क्लस्टर विश्वविद्यालय होतं आहे. आज तुमची 134 वी जयंती आहे. या प्रसंगी तुमच्या या अतिथोर कार्यास माझे शतशः अभिवादन ……!!

– लेखन : युवराज पाटील, जिल्हा माहिती अधिकारी
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. कर्मवीर भाऊराव पाटील (आण्णा) यांच्या वरील लेख अतिशय भावला.

  2. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३४व्या जयंती निमित्त भावपूर्ण आदरांजली.
    लेखक पाटील साहेब यांना धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments