नमस्कार
“ओठावरलं गाणं” या सदरात रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत ! डोंबिवलीचे कवी मधुकर जोशी यांचं एक गाणं आज मला आठवलं. पूर्वी रेडीओवर हे गाणं सकाळच्या मंगलप्रभात कार्यक्रमात किंवा अकरा वाजताच्या “कामगारांसाठी” या कार्यक्रमात हमखास लागत असे. गाण्याचे शब्द आहेत
“माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविसी
तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी”
माणसानं कितीही माज केला तरी काही उपयोग नाही. कु़ंभार मडकी घडविण्यासाठी जी माती लागते ती चांगली एकजीव व्हावी म्हणून ती आपल्या पायांनी तुडवतो जेणेकरून त्या मातीपासून बनणा-या वस्तू सुबक आणि सुंदर आकर्षक आकार घेतील. पण तीच माती त्याला सांगते आहे तू जरी आज मला पायाखाली तुडवत असलास तरी शेवटी तू ही माझ्यातच मिसळणार आहेस हे त्रिकालाबाधित सत्य कधीही विसरू नकोस.
मला फिरविशी तू चाकावर
घट मातीचे घडवी सुंदर
लग्नमंडपी असेन मी पण कधी शवापाशी
एका बाबतीत मात्र तुला दाद द्यायलाच हवी. तू जरी मला पायाखाली तुडवलं ना तरी तुझ्या हातात असं काही कौशल्य आहे कि तू माझ्या गोळ्याला चाकावर ठेवल्यावर तुझ्या हातांनी अशी काही जादु करतोस कि माझ्यापासून निरनिराळ्या आकाराची सुंदर मातीची भांडी तयार होत जातात. मी प्रत्येक भांड्यामधे आत्मारूपाने वास करत असतेच फक्त नशिबात जे असेल त्याप्रमाणे कधी माझी जागा लग्न मंडपात असते तर कधी ती एखाद्या शवापाशी सुध्दा असते.
वीर धुरंधर आले गेले
पायी माझ्या इथे झोपले
कुब्जा अथवा मोहक युवती अंती मजपाशी
मोठमोठे राजे महाराजे असोत, जग जिंकण्याची भाषा करणारे रथी महारथी असोत कि आणखी कोणी असो प्रत्येकाला शेवटी माझ्या पायाशी लोळण घ्यावी लागते, माझ्यातच मिसळून जावं लागतं. यांच्याप्रमाणेच सुंदर स्त्री असूदे, कुब्जा असूदे कि आणखी कोणी, या सगळ्यांना शेवटी माझ्याच कुशीत येऊन विश्रांती घ्यायची आहे.
गर्वाने का ताठ राहशी
भाग्य कशाला उगा नासशी
तुझ्या ललाटी अखेर लिहिले मीलन माझ्याशी
तू आकाशात कितीही भरा-या मारल्यास आणि अगदी अंतराळ संशोधनातही प्रगती केलीस तरी गर्वाने फुगून जाऊ नकोस. आकाशात जरी कितीही विहार केलास तरी तुझे पाय जमिनीवर राहू देत नाही तर तुझ्याच हातांनी तुझ्या भाग्याला गालबोट लावशील म्हणून माझं तुला कळकळीचं सांगणं हेच आहे कि शेवटी तुझं मीलन हे माझ्याशीच होणार आहे, माझ्यातच तुला एकरूप व्हायचं आहे हे कधीही विसरू नकोस.

गोविंद पोवळे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत त्यांच्या सुरेल आवाजात ऐकताना आपण जेव्हढे त्यात रंगून जातो तेव्हढाच गाण्याचा अर्थही मनामधे उलगडत जातो.

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800
विकासजी…
तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी..
हेच जीवनातील खरे सत्य आहे.
अश्या गाण्यातून बरेच काही शिकता येते.
आपले रसग्रहण उत्तम झाले आहे.
कवी मधुकर जोशी यांचे खूप सुंदर गीत. गोविंद पोवळे यांचे गायन संगीत अप्रतिम असे.
धन्यवाद विजयजी🙏
अतिशय सुंदर रसग्रहण झाले आहे.
छान लिहीले आहे
धन्यवाद स्नेहा मॅडम 🙏
गाणे तर सूंदर आहेच पण रसग्रहण करतांना जीवनाचे सत्यही खूप छान उलगडले आहे
धन्यवाद विराग🙏
माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविशी तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी. मधुकर जोशी यांची एक सुरेख रचना. गोविंद पोवळे यांचे संगीत व गायन. ह्या अजरामर गीताची आपण रसग्रहणासाठी निवड केली त्याबद्दल धन्यवाद. आपण प्रत्येक कडव्याचा अर्थ उत्तम रित्या उलगडून दाखवला आहे. गाजलेल्या गाण्याचे रसग्रहण हा आपला हातखंडा आहे.
धन्यवाद विवेकजी🙏
रसग्रहण सुंदर. मातीशी असलेलं नातं किती छान पद्धतीने सांगितले आहे.
धन्यवाद नीलाक्षी 🙏