Thursday, July 3, 2025
Homeसाहित्यमनातील कविता

मनातील कविता

गोविंदाग्रज

कवीवर्य गोविंदाग्रज अर्थात राम गणेश गडकरी, हे मराठी कवी, नाटककार आणि विनोदी लेखक होते.
‘गोविंदाग्रज’ ह्या टोपणनावाने त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या. त्यांनी विनोदी लेखनही केले.  ‘एकच प्याला’, ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’, आणि  ‘भावबंधन’ ही चार पूर्ण नाटके आणि ‘राजसंन्यास’,
‘वेड्यांचा बाजार’ ही दोन अपुरी राहिलेली नाटके लिहिली.

‘वाग्वैजयंती’ हा गडकरींचा एकमेव काव्यसंग्रह आहे. ह्यात रचना, भाव, बंध ह्या दृष्टीने अतिशय वैविध्यपूर्ण कविता आहेत.
कवी गोविंदाग्रजांना ‘प्रेमाचा शाहीर’, ‘महाराष्ट्राचे शेक्सपियर’ अश्या अनेक पदव्या मिळालेल्या आहेत.

गोविंदाग्रजांचे आयुष्य अवघे ३४ वर्षांचे होते. मात्र इतक्या अल्प काळातील त्यांची साहित्य संपदा भव्य आहे. मराठी साहित्य सृष्टीत त्यांना आणि त्यांच्या साहित्यास मानाचे स्थान आहे.

काहीवेळा असे योगायोग घडतात की आपल्या इच्छापूर्तीचा भार जणू ब्रम्हांडाने उचलला आहे असं वाटू लागतं. आपण मात्र ते योगायोग अचूक हेरावेत, अगदी प्राणपणाने जपावेत आणि त्यांचे ऋणी रहावे.

आज एक असाच योगायोग आहे. म्हटलं तर अगदी लहानसा, अगदी साधा, म्हटलं तर अद्भुत वाटणारा !
स्वामीभक्तीची अनेक उदाहरणे आपल्याला ठावूक आहेत. स्वामी आणि भक्त अशा अनेक जोड्या आपल्या इतिहास आणि पुराणात आहेत. ह्यात सर्वात अग्रगण्य म्हणजे प्रभू रामचंद्र आणि परमवीर हनुमान. चैत्राच्या नवमीला श्रीरामप्रभुंचा जन्म आणि त्याच्या पुढल्या आठवड्यात येते हनुमानजयंती.

मागल्या आठवड्यात मी कवीवर्य केशवसुत ह्यांच्या काव्याबद्दल लेखन केले…कलाकृतीचा जन्मच तो एक प्रकारचा…आणि आज, म्हणजे त्याच्या पुढल्या आठवडयात, केशवसुतांना आपला स्वामी मानून, त्यांची भक्ती करणाऱ्या साहित्य विश्वातील ह्या परमवीर हनुमंतांबद्दल लिहीते आहे.

रामायणात हनुमंताने विविध भूमिका पार पाडल्या. रामास स्वामी मानले. रावण दरबारी विनोद निर्मिती केली आणि लंकेमध्ये शक्ती सामर्थ्याचे नाट्य प्रदर्शन केले. मात्र ह्या अश्या बलशाली, सामर्थ्यवान शरीराचे आत एक भावाने ओथंबलेले ह्रदय होते ज्याचे दर्शनही जनांस घडले.

आजचे साहित्य सृष्टीचे हनुमंत म्हणजे ज्यांनी कवीवर्य केशवसुतांना स्वामी मानले, बाळकराम नावाने विनोद निर्मिती केली, राम गणेश गडकरी नावाने नाट्य निर्मिती केली आणि गोविंदाग्रज नावाने अंतरीचे भावविश्व आपल्याला उलगडून दाखवले.

२६ मे १८८५ रोजी जन्मलेले कवीवर्य गोविंदाग्रज यांची कविता म्हणजे उत्कट भावनेचे कल्पनारम्य विश्व. अनुभवाने समृद्ध असलेली, सहज सुंदर शब्द घेवून आलेली आणि केशर युक्त तीर्थाचे प्राशन केल्यानंतरही तळहातावर उरणाऱ्या त्याच्या रंग आणि गंधाप्रमाणे; वाचन झाल्यावरही मनात दरवळत राहणारी !

‘ती कोण ?‘ नावाची त्यांची एक अतिशय सुंदर कविता!

निरपेक्ष प्रेमाचे पावित्र्य सर्वांनीच मान्य केलेले असते. त्याचे स्थान अत्युच्च मानले जाते. मात्र फार क्वचित त्या तोलामोलाचे स्थान सापेक्ष प्रेमास मिळते.

कवीवर्य गोविंदाग्रज यांनी मात्र आसक्तीसही तितकाच परमोच्च दर्जा दिला आहे. मानवी मनाचा, भाव विश्वाचाच एक पैलू तो, त्यास नाकारणे अयोग्य नाही का ?

आयुष्यात सापेक्ष प्रेमाचे महत्त्व सांगणारी, प्रिय व्यक्तीचे आपल्या नजरेस दिसणे, तिचे असणे ह्याची जिवंत राहण्यास असलेली नितांत गरज भावपूर्ण शब्दात व्यक्त करणारी ही कविता ! ह्यातील दुसरे कडवे असे…

‘जीवाचे जगणे असेच असते सापेक्ष प्रेमावरी !
डोळे भेट दुरून; भाव अथवा आशाहि त्याला पुरे !
मी हे पाहुनि जीवबंधन असे शोकार्त होतो परी,
का की या मम लक्ष्यशून्य हृदयी काही न आशा स्फुरे !…’

‘आले हे भरुनी रिते ह्रदयही देऊ कुणाच्या करी ?
आला दाटुनि कंठ – हाय ! रडुनी कोठे करू मोकळा ?

जी माझ्यास्तव, मी जिचे सकलही, आधार जी जीवनी
देवा ! भेटवि – दाखवी तरि मला ती कोण देवी जनी ? ‘

‘ ती ‘ अशी जी एकमेव, जी जीवन जगण्याचे कारण, जी देते प्रेरणा, जी देते साथ, जी दिठीत आणि मिठीत…ती…आणि ‘ ती ‘ दिसत नसल्याने आलेली व्याकुळता. किती सुंदर प्रेम! आसक्त प्रेमाचे चित्रदेखील सर्वत्र पावित्र्याचा रंग घेवून आलेले. अनेक व्यक्तींमध्ये आसक्ती ठेवून असलेल्या हिडीस मनोवृत्तीस प्रेम म्हणणाऱ्या लोकांना दाखवलेला हा खऱ्या प्रेमाचा रंग !

अल्लड प्रेमास ‘ नावाची प्रेमाची आणखी एक छटा दाखवणारी कविता! जगाच्या फसव्या प्रेमावर केलेली टीका आणि त्यात भांबावून जाणारे एक हळवे, संवेदनशील मन !

‘ क्षणभर वेड्या प्रेमा थांब !
अधीर मनासह  जासी कोठें ?
चुकशिल-संकटीं पडशील वाटे,
जग हे सारे बा रे खोटें !
हृदया सोडुनि गड्या म्हणोनी, जाई न कोठे लांब !

जग हे सगळें देखाव्यांचे!
गुलाम केवळ रे स्वार्थाचे !
स्मशान की हे शुद्धत्वाचें
शुद्ध भाबडे, सरळ रोकडें, अशांत करिशिल काय ?…

म्हणुनि लाडक्या! कुठें न जाई,
या हृदयांतचि लपुनी राही,
योग्य मित्र नच सुख तरि नाहीं !
कुसंगतीहूनि, वेड्या ! मानीं, फार बरा एकान्त ! ‘

किती त्रिकालाबाधित काव्य आहे हे !११० हून अधिक वर्षे झाली असतील ह्या कवितेस. आज तरी काय बदललं आहे?
Deceptive, manipulative, toxic आणि mind games खेळणाऱ्या कितीतरी व्यक्ती आपल्या सहवासात येतात. तेंव्हा एखाद्या निष्कपटी जीवाच्या आत ह्याच ओळी उमटत असतील.

गोविंदाग्रज स्वतःस ‘केशवसुतांचा चेला‘ म्हणत.

‘कुणी मनाचा असेल कच्चा
करील त्यालाही मनशूर
या गाण्याचे गाउनि सूर
केशवपुत्राचा महशूर
गोविंदाग्रज चेला सच्चा…’

कवीवर्य केशवसुतांच्या कवितांचा प्रभावही कवीवर्य गोविंदाग्रजांच्या कवितांवर दिसतो. ‘ तुतारी ‘ कवितेवरून स्फुरलेली ‘ दसरा ‘ ही कविता त्याचेच उदाहरण आहे.

‘टाकुनी सीमा मृत धर्माच्या
दंभाच्या ह्या अंधपणाच्या
जुनेपणाच्या, अहंपणाच्या
सीमोल्लंघनकालचि दसरा !
जुन्या मतांचा जाळा कचरा…’

धर्म, रूढी आणि अनाठायी परंपरांच्या काळोखास भेदण्यासाठी पुरोगामित्वाचे, आधुनिकतावादाचे लावलेले असे शब्द दीप.

इतकेच नव्हे तर केशवसुतांवर त्यांनी एक अखंड काव्य रचले आहे ‘केशवसुत मेले ?‘ अशा नावाचे.

‘ जगतास जागवायला केशवसुत गाऊनी गेले !

एकेका शब्दें भरले काव्याचे अद्भुत पेले
ज्यांसाठी मानव झटले सुधाकुंभ भरलेले
वाग्देवी वरूनी टाकी केशवसुत हृदयी झेले

‘अनुभवूनि निजानंदाते
मग त्यांचे केले गाणें
श्वासाच्या कारंज्याने
चहुंकडे उधळूनी दिधले केशवसुत गाउनि गेले…

हे तुषार पडता अंगी बिंदूचे सिंधू झाले !
निजलेल्या जागृती आली, हो ताजें जें थकलेले !
मरणासचि आले मरणें, मग केले त्यानें काळे !…’

कोणत्याही व्यक्तीचे आणि मुख्यतः कलाकाराचे मोठेपण म्हणजे त्याच्या ठायी असणारा आत्मगौरवी वृत्तीचा; आत्मप्रौढीचा अभाव! नतमस्तक होण्याची सहजशीलता! तीच त्याची खरी ओळख. वर्णन जरी कवीवर्य केशवसुतांचे असेल तरी त्यामागची भावना, त्यासाठी योजलेले शब्द हे सारे कवीवर्य गोविंदाग्रजांचे कवीपण आणि माणूसपण किती असामान्य होते ह्याचा दाखला देतात.

‘ मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा…’

असे म्हणत पवित्र असलेल्या महाराष्ट्राच्या भूमीच्या वैविध्यपूर्णतेचे केलेले वर्णन आणि त्याच्या गौरवाची गायलेली ही आरती !

कधी‘ नावाची एक अतिशय वेगळी कविता…मर्म शोधण्याचा प्रयत्न करणारी…त्यातही शेवटी मानवी जीवनात प्रेम प्राप्तीतून येणारी तृप्ती आणि साफल्य असे वर्णन आहे. त्या काही ओळी अश्या…

‘ चित्रपटावरि रम्याकृतिच्या सीमारेषा परोपरी ;
रंग कधी वठतील परी ?
कानाला आनंद देति हे झुळझुळ गाउनि गोड झरे ;
अर्थ कधी कळणार बरे ?…

प्रतिरात्री ही स्वप्ने दाविति इच्छाचित्रे जीवाची
सृष्टी कधी होईल त्यांची ?
– आणि वल्लभे ! दिलीस वचने; गोड अहा ती किती तरी ! खरी कधी होणार परी ?…’

त्यांच्या काही कविता निसर्ग वर्णनपरही आहेत. त्याची भाषा अप्रतिम आहे. सुंदर सुंदर कल्पनांचा त्यात आविष्कार आहे. चैतन्य आहे !

याशिवाय ‘ मुरली ‘, ‘अरुण ‘, ‘ विरामचिन्हे ‘, ‘ हलत्या पिंपळपानास ‘ अश्या कित्येक अजरामर कविता आहेत.

राजहंस माझा निजला‘ नावाची एक हृदयद्रावक कविता. जिच्या अपत्यास अकाली मृत्यु आला आहे, जिच्या मांडीवर त्या बालकास मरण आले, त्याचे शव अजूनही तिच्या मांडीवर आहे, मात्र ह्या भयंकर शोकाने तिची अवस्था भ्रमिष्टाप्रमाणे झालेली आहे आणि ती हे जाणण्याच्या अथवा मानण्याच्या परिस्थितीतच नाही…आणि अंगाई गीताप्रमाणे ती गाते आहे…

‘ हें कोण बोललें बोला ? ‘राजहंस माझा निजला !’

दुर्दैवनगाच्या शिखरीं। नवविधवा दुःखी आई !
तें हृदय कसें आईचें । मी उगाच सांगत नाहीं ।
जें आनंदेही रडतें । दु:खांत कसें तें होइ–

हें कुणी कुणां सांगावें!
आईच्या बाळा ठावें !
प्रेमाच्या गांवा जावें–
मग ऐकावें या बोला । ‘राजहंस माझा निजला!”

मांडीवर मेलें मूल । तो हृदया धक्का बसला ।
होउनी कळस शोकाचा । भ्रम तिच्या मानसीं बसला ।
मग हृदय बधिरची झालें । अति दुःख तिजवि चित्ताला ।…’

करुण रसाची परमोच्च साकारणी. दुःखाने मानवी मनास आलेले बाधीर्य शब्दांत उतरविले आहे. ही कविता अनुभवजन्य असावी. कवीवर्यांच्या बालपणीच त्यांचे वडील निधन पावले आणि त्यानंतर काही काळाने त्यांच्या धाकट्या भावाचेही (गोविंद) निधन झाले. म्हणून कदाचित कवितेत  नव विधवा आणि तिच्या मांडीवर मृत्युमुखी पडलेल्या अपत्याचे असे विदारक चित्र त्यांनी शब्दांकित केले.

कवितेचा जन्म जेंव्हा स्वानुभूतीतून होतो त्यावेळी ती परम पवित्र असते. त्यांच्या प्रेमकवितांमधूनही प्रामुख्याने विरहाची वेदना व्यक्त झाली. प्रेमासाठी जीव उधळून टाकणारा हा काव्याविष्कार आहे.
‘प्रेमविरहित जगण्यापेक्षा मरण मान्य ‘असा भाव रूजवणारे हे काव्य आहे.

‘ प्रेम आणि मरण ‘ … एक महावृक्ष, ज्याचा आजुबाजूस त्याला बिलगण्यासाठी झुरणाऱ्या कित्येक वेली आणि रोपे, मात्र त्याचे वेडे होणे आहे एका विद्दुल्लतेसाठी ! तीहून इतर काही त्यास नको.

‘ त्यासाठी मैदानात ।
किति वेली तळमळतात ॥ सारख्या ॥
परि कर्माचे विंदान ।
काहीं तरि असते आन ॥ चहुकडे ॥
कोणत्या मुहूर्तावरती ।
मेघात वीज लखलखती । नाचली ॥
त्या क्षणी । त्याचिया मनी ।तरंगति झणी ।
गोड तरि जहरी । प्रीतीच्या नवथर लहरी ॥ न कळता ॥ ‘

त्या वृक्षास आता न पर्जन्य मान्य, न हिरवेपण. कारण त्याचे चैतन्य आता त्यात नव्हते…त्याचे चैतन्य होते ते त्या सळसळणाऱ्या वीजेत. एकदा ती आपलीशी केली, तिला कवटाळले म्हणजे खरे जगणे सुरू…

‘ इष्काचा जहरी प्याला ।
नशिबाच्या ज्याच्या आला ॥ हा असा ॥
टोकाविण चालू मरणे ।
ते त्याचे होते जगणे ॥ सारखे ॥
ह्रदयाला फसवुनि हसणे ।…’

ज्या व्यक्तीत आपले प्राण आहेत ती जर जवळ नसेल तर निष्प्राण जगणेच ते! मग सगळं वरवर…हसणं, बोलणं… अगदी आत्मा विरहित असल्याप्रमाणे.

“निष्प्रेम चिरंजीवन ते ।
जगि दगडालाही मिळते ॥ धिक तया ॥
क्षण एक पुरे प्रेमाचा ।
वर्षाव पडो मरणांचा। मग पुढे ॥”

आणि अखेरीस त्या वृक्षाच्या हट्टापुढे देवांचीही नामुष्की होवून त्या वीजेचे त्या वृक्षास भेटणे, तो वीजेचा स्पर्श… तडिताघात…त्या वृक्षाचे उन्मळून पडणे…आणि दुभंगताना एक क्षणभर नसानसात नाचलेले चैतन्य!

‘ तो योग । खरा हटयोग । प्रीतिचा रोग ।
लागला ज्याला । लाभते मरणही त्याला ॥ हे असे ॥ ‘

कवीवर्य गोविंदाग्रज आपण धन्य आहात. आपल्याला मी साहित्य विश्वातील भगवान हनुमानाची उपमा दिली… हनुमानास अमरत्व आहे ना ? आपण जरी केवळ ३४ वर्षांचे आयुष्य व्यतीत करून २३ जानेवारी १९१९ रोजी जगाचा निरोप घेतलात तरी आपले काव्य अमर आहे. आपल्याला माझा प्रणाम🙏🏻

आपल्या काव्यानेच आम्हांला ‘ पहिले चुंबन ‘ अशी हळूवार ओळखही करून दिली आहे. अपार सुंदर प्रणयाच्या आराधनेचे आपण केलेले वर्णन वाचून अजूनही मनाच्या आणि अधरांच्या नाजूक पाकळ्या हलकेच थरारतात.

जवळ येणे- जवळ घेणे, त्यातील उत्कटता आपण आम्हाला सांगितली. अशीच उत्कटता, हवेहवेसे वाटणे, संकोच आणि काहीसे भय ह्या साऱ्या भावांचे ‘ लेणे ‘ ल्यायलेला हा ‘ शृंगार ‘ आपल्या चरणी अर्पण.

शृंगार लेणे

सख्या जपूनी मिठीत घे रे, नव्हाळीचे हिरवे अंकुर,
बावरलेली मी लज्जेने, आणिक दाटे मनात हुरहुर

स्वप्नाळू हे साज साजरे
मनी आळवी गीत लाजरे
ओठांवरी अबोली गजरे
तव स्पर्शाने पापण्या झुकुनि हलकीच जरा करिती थरथर
बावरलेली मी लज्जेने, आणिक दाटे मनात हुरहुर

चांदण्यात ही रात पाहिली
नभी प्रितीची खूण राहिली
चंद्रास मुके शपथ वाहिली
कवेत मला घेशील तेंव्हा, कोजागिरीच व्हावी सत्वर
बावरलेली मी लज्जेने, आणिक दाटे मनात हुरहुर

शृंगाराचे हेची लेणे
संकोचून स्वाधीन होणे
श्वासांचे मोहक गुणगुणणे
जाणशी तू; म्हणुनी घालिशी मज गालांवर हलके फुंकर
बावरलेली मी लज्जेने, आणिक दाटे मनात हुरहुर

सख्या जपूनी मिठीत घे रे, नव्हाळीचे हिरवे अंकुर,
बावरलेली मी लज्जेने, आणिक दाटे मनात हुरहुर

डॉ गौरी जोशी – कंसारा

– लेखन : डॉ. गौरी जोशी – कंसारा
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800

Previous article
Next article
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments