कर्वेरोडला आठवड्यातून तीनदा तरी माझी चक्कर असते. रस्ता ओलांडण्यासाठी सिग्नलला ३-४ मिनिटे तरी उभं राहावं लागतं. तेव्हा फुटपाथच्या कोपऱ्यावर २५ ते ३० वयाची एक बाई आणि तिची दोन मुले फिरताना, वावरताना मला दिसत.
हळहळू त्यांचे निरीक्षण करण्याची मला सवयच लागली. बाई अगदी नीटनेटकी, हातात एक ढोलकी. लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठीच त्याचा वापर करणार आणि त्याच तालावर मुलांना नाचायला सांगणार.
मुलगा कधी नाचणार, कधी गाड्यांसमोर उभं राहून लोकांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करणार. चेहेऱ्यावर रोज वेगळा मेकअप केलेला. कधी डोक्याला टोपी, कधी रुमाल बांधणार, तर कधी मिशा काढून नौटंकी करणार. आविर्भाव असा कि आपल्या माकडचेष्टानी जणू तो जगच जिंकायला निघाला आहे.
मुलीच्या हातात विकण्यासाठी कधी फुले, कधी भिंगऱ्या, आणि ख्रिसमसच्या दिवसात सांटाक्लॉजच्या टोप्या. गाड्यांच्या मधून लोकांना आग्रह करीत बिनधास्तपणे फिरणार. आपल्या जीवाची पर्वा तिला किंवा त्याला नसावीच हे त्यांच्या चेहेऱ्यावरून कळून यायचं.
त्या निर्व्याज मुलांमधील जिद्द, चिकाटी माझी नजर खिळवून ठेवायची. बाईही तशीच बेफिकीर, चेहेरा कधीही दुर्मुखलेला नाही. मधूनच मुलांच्या हातावर काहीतरी खाऊ ठेवायचा, प्लॅस्टिकच्या पिशवीतून चहा आणून घोटघोट द्यायचा.
सारा संसार रस्त्यावर. पाण्याची बाटली, एक पिशवी आणि नटूनथटून बसलेली ही, तिघं घराचा आसरा नसूनही मोठ्या मजेत चालणारी त्यांची हि धडपड मनाला अंतर्मुख करून जाई.
रस्त्याच्या पलीकडे गेल्यावर तिथल्या फुटपाथवर अशाच तीनचार बायका दिसत. दोन मोठ्या दोन मध्यमवयीन. चापूनचोपून नेसलेली गडद रंगाची साडी, त्यावर तसंच भडक रंगाचं पोलकं, अंबाडा, मोठ कुंकू. तिथंच बसून दुसरीची वेणी घालून देणार, वेणीवर झोकदार प्लास्टिकचं फुल. आरशात बघून तल्लीन होऊन पावडर फासणार, नाकात खडा, कपाळावर वेधक टिकली आणि अगदी निर्भय चेहेरा. जामानिमा पूर्ण झाला कि शोभेची फुले, गाडीच्या खिडकीला लागणाऱ्या जाळ्या, काचा साफ करायचा ब्रश अशा वस्तू घेऊन गाडीवाल्यांच्या मागावर राहणार. दुपारी तिथंच बसून दाब खाणार, जरा विश्रांती घेऊन परत विक्रीला जाणार.
दिवसभर ह्यांचे चेहेरे इतके टवटवीत कसे दिसू शकतात ? हे कोडं काही मला सुटत नाही. जगण्याचं समाधान ह्या कसं घेऊ शकतात ? चिंता ह्यांच्याकडे फिरकतच कशा नाहीत ? असे विचार मनात घोळवत मी त्यांचे निरीक्षण करीत राहते. वाट्याला आलेले जीवन आनंदात जगण्याची त्यांची वृत्ती मनाला चटका लावून जाते.
परवाच मी ‘त्या’ मुलांच्या जवळून येत होते, बाई तिथंच बसलेली. माझ्याकडे पाहून हसली. मुलगी जवळच उड्या मारीत होती. मुलगा कुठे दिसला नाही म्हणून इकडेतिकडे बघत होते. तर पलीकडे ८-१० महिन्याचं बाळ मातीत रांगत होतं..
विस्फारलेल्या डोळ्यांनी मी बघतच राहिले, आश्चर्याने तोंडाचा आ वासला गेला. तिच्याकडे नजर टाकली तर ती तशीच शांतपणे रहदारी बघत बसलेली, कशाचच देणंघेणं नसल्यासारखी !
किती सुरक्षित राहतो आपण आपल्या घरट्यात ? तरीही चिंता काही सुटत नाहीत. अनेक प्रश्न समोर उभे ठाकलेलेच असतात. जन्मतःच त्यांना हे बाळकडू मिळत असेल का कि आयुष्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोनच आपल्यापेक्षा उदात्त आहे ? काहीही कळत नाही. पण त्या मार्गानी गेले कि त्याच उत्सुकतेने त्यांच्याकडे बघत मी मार्गक्रमण करते. क्वचित कधी त्यांच्या चेहेऱ्यावर व्यथा दिसेल का ? हाच तर माझ्या निरीक्षणाचा उद्देश नसेल ना ?

– लेखन : सुनंदा पानसे
– संपादन:देवेंद्र भुजबळ, 9869484800
शेवट फार चटका लावणारा. लेख फारच आवडला.
नमस्कार मित्रांनो,
” जीवन कोडं ” रस्त्यावरचं जीवन जगणाऱ्या आणि आपल्या कलागुणांनी रस्त्यावर ढोलकी वाजवत लोकांचं लक्ष वेधून घेणा-या लहान मुले व त्यांच्या बेफीकीरं आईचे रस्त्यावरील वास्तववादी जगण्याचं चित्रण सुनंदा पाणसे यांच्या सकस लेखणीतून चितारलेले आहे. ही समाजातील विदारक परिस्थितीचे चित्रण आपल्याला विचार करायला लावणारे आहे.
राजाराम जाधव,
सहसचिव सेवानिवृत्त
महाराष्ट्र शासन
छान लेख. सगळं चित्र डोळ्यांसमोर उभे करणारा व शेवटी वास्तवाची जाणीव करून देणारा. हार्दिक अभिनंदन.