पान सिंग तोमर
मी ग्वालियर येथे बातमीदार म्हणून १९८१ मध्ये राहायला गेलो, तोपर्यंत मला पान सिंग तोमर यांचे नाव देखील माहीत नव्हते. पोलिसांच्या चकमकीत -एन्काऊंटर मध्ये- त्याला मृत्यू आल्याची बातमी एक ऑक्टोबर १९८१ ला मी दिली खरी, पण त्यामध्ये स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये आलेला तपशील नव्हता. परंतु युनायटेड न्यूज ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेच्या गरजेनुसार मी आणि माझ्या भोपाळच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या बातम्या माझ्या स्पर्धक पीटीआय पेक्षा चांगल्या होत्या.
भारतीय लष्करात सुभेदार असलेल्या पान सिंग ने अडथळ्याची शर्यत (Steeplechase) या क्रीडाप्रकारात १९५८ च्या आशियाई गेम्स मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणून तीन हजार मीटरच्या अडथळ्याच्या शर्यतीत त्याचा राष्ट्रीय विक्रम नऊ मिनिटं आणि दोन सेकंद असा होता. तो सात वर्षे अबाधित राहिला.
तो क्रीडापटू असल्यामुळे त्याला १९६२, १९६५ आणि १९७१ च्या युद्धात भाग घ्यावा लागला नाही.
क्रीडापटू म्हणून १९७२ मध्ये त्याची कारकीर्द समाप्त झाली, तर लष्करातील त्याची सेवा १९७७ मध्ये समाप्त झाली. सैन्य सोडून मूळ गावी परत आला तेव्हा चुलत भावंड एकमेकांच्या जीवावर उठले. लष्करातून निवृत्त झाल्यानंतर गावच्याच नातेवाईकांबरोबर जमिनीच्या मालकीबाबत वाद झाले. म्हाताऱ्या आईवर जीवघेणा हल्ला झाला. तेव्हा मोरेना जिल्ह्यातील पोलिसानी त्याच्या तक्रारींची दाखल देखील घेतली नाही. त्यामुळे पानसिंग तोमर ने चंबळ खोऱ्याचा आश्रय घेऊन तो दरोडेखोरांच्या एका टोळीचा म्होरक्या बनला. मध्य प्रदेश पोलिसांशी लढत राहिला. आपण डाकू, दरोडेखोर नाही, तर बागी / विद्रोही आहोत असा त्याचा दावा होता. पण त्याला जिवंत अथवा मृत पकडणाऱ्याला शासनाने मोठं मोठ्या रकमांची पारितोषिके जाहीर केली होती, पोलीस रात्रंदिवस त्याच्या आणि त्याच्या टोळीच्या मागावर असत. त्यात अखेर एक ऑक्टोबर १९८१ मध्ये भिंड जिल्ह्याच्या राठियापुरा या गावी आपले प्राण गमवावे लागले. अशी माहिती असलेल्या बातम्या आणि लेख त्यावेळी मी आणि माझ्या सहकाऱ्याने दिल्या होत्या
आमचे हे कव्हरेज चांगले होते, हे दुसऱ्या दिवशी आमच्या दिल्लीच्या संपादकांनी पाठवलेल्या इम्पॅक्ट रिपोर्ट वरून समजले. त्यामुळे तसा मी खुश होतो.
पानसिंगच्या मृत्यू नंतर काही दिवस विशेषत: मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आणि दिल्ली या भागांमध्ये वर्तमानपत्रांमध्ये वेगवेगळ्या अँगलने कव्हरेज येत राहिले. माझ्या कामाचा भाग म्हणून जितकी माहिती गोळा करणे आणि त्यावर बातम्या आणि लेख लिहिणे आवश्यक होते तितके काम मी इमानेइतबारे केलं.
नंतर हळूहळू मी आणि त्या भागातील पत्रकार देखील पानसिंगला विसरणे स्वाभाविकच होते. तसे त्याला विसरलो. ग्वालियर सोडून मी नंतर पुण्याला परतलो. कित्येक वर्षे उलटली. मग ‘पानसिंग तोमर’ या नावाचा हिंदी सिनेमा २०१२ मध्ये आला.
इरफान खान ने पानसिंग ची दमदार भूमिका केली होती. त्याच्या अभिनयाला आणि चित्रपटाला अवॉर्ड्स देखील मिळालीत. तरी चित्रपट फार गाजला नाही. हिंदी, इंग्रजी वर्तमानपत्रात आलेली परीक्षणे आणि अनुषंगिक लेख सोडले तर फार त्याची दखल निदान मुंबई पुण्याकडे घेतली गेली नाही हे खरे. पण त्याचे नाव वर्तमानपत्रात आणि सोशल मीडिया मध्ये अधून मधून येत असतं.
मी हा चित्रपट पाहिला अगदी अलीकडे. मूळ सत्यकथेशी इमान राखणारा तो आहे. पण हिंदी चित्रसृष्टीशी तुलना केली तर बॉंलीहुड चा मालमसाला, संगीत, नाचगाणी अजिबात नसल्याने प्रेक्षकांनी न्याय दिला नाही. जिस देशमे गंगा बहती हैं, गंगा जमूना, मदर इंडिया, मुझे जिने दो या सारख्या चित्रपटांच्या तुलनेत तो फिका पडला यात नवल नाही. हॉलीवूड च्या वेस्टर्न सिनेमा च्या ग्लॅमर पुढे तर बोलायचेच नाही.
इतकी वर्षे उलटली पण पान सिंग तोमर ची कहाणी अधून मधून वर्तनमानपत्रात येत राहाते. अगदी अलीकडे, चारेक वर्षांपूर्वी त्याची नातवंडं-पतवंडं अजूनही भीतीच्या छायेखाली वावरत आहेत हे सांगणारी बातमी आली. आता त्या एन्काऊंटर मध्ये नेतृत्व करणारे पोलीस अधीक्षक विजय रमण यांची मुलाखत युट्यूबवर बघायला मिळते आहे.
पोलीसांची बाजू घेणारे आणि टीका करणारे पत्रकार हिरीरीने आपापली आपली भूमिका बघायला मिळतात. त्या अर्थाने पानसिंग अमर झाला आहे का ?

– लेखन : प्रा डॉ किरण ठाकूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800