“प्रश्नचिन्हसारख्या ज्या संस्था महाराष्ट्रात व भारतात कार्यरत आहेत अशा संस्थांच्या पाठिंशी सामाजिक बांधिलकीच्या लोकांनी खंबीरपणे उभे राहून त्यांना तन-मन-धनाने सहकार्य केले पाहिजे”. अशी अपेक्षा सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या व नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या श्रीमती मेधाताई पाटकर यांनी व्यक्त केली.
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा याठिकाणी असलेल्या प्रश्नचिन्ह या शाळेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पालक विद्यार्थी मेळाव्यात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष व समाजवादी नेते श्री पन्नालाल सुराणा होते. या मेळाव्याचे उद्घाटन कर्तव्यदक्ष शिक्षक आमदार श्री कपिल पाटील यांनी केले.
श्रीमती पाटकर पुढे म्हणाल्या, आम्ही नंदुरबार या आदिवासी जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये विद्यार्थ्यांसाठी जे काम करतो, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जो आम्ही ध्यास घेतला आहे त्याचे प्रतिबिंब मला मतीन भोसले यांच्या या प्रश्नचिन्ह शाळेमध्ये दिसत आहे. अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये ही शाळा उघडली आहे. या शाळेमुळे अनेक मुलांच्या जीवनामध्ये प्रकाशाचे किरण आल्याशिवाय राहणार नाही असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
श्री कपिल पाटील यांनी आपल्या भाषणात प्रश्नचिन्ह शाळेचा गौरव करून या शाळेच्या संदर्भातील समस्या सोडवण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. नागरिकांचे मूलभूत प्रश्न आहेत ते प्रश्न महाराष्ट्र शासनाने अग्रक्रमाने सोडवले पाहिजेत. प्रश्नचिन्ह शाळेच्या संदर्भातील जे जे काम मंत्रालयामध्ये प्रलंबित आहे ते पूर्ण करण्यासाठी मी माझी पूर्ण ताकत लावणार आहे. तसेच या ठिकाणी संस्थेचे जे नुकसान झालेले आहे त्याचा मोबदला देखील एका वर्षभरात मी खेचून आणणार आहे. असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संपूर्ण महाराष्ट्राचे वैभव असलेले माननीय श्री सत्यपाल महाराज सप्त खंजेरीवादक यांनी पत्रिकेत नाव नसताना स्वतः श्री संदीप पाल महाराज यांच्या समवेत उपस्थित राहून या कार्यक्रमात आगळेवेगळे चैतन्य निर्माण केले. आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत. समाजात ज्या चांगल्या गोष्टी घडतात त्याला आम्ही पाठिंबा दिला पाहिजे, म्हणून मी स्वतःहून प्रश्नचिन्हच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो आहे, आपल्या तरुण वयात श्री मतीन भोसले यांनी प्रश्नचिन्ह निर्मिती करून जी उंच भरारी घेतली आहे, अनेक संकटावर मात केली आहे, ती महत्त्वाची आहे. अनेक संकटे येऊनही तो खचला नाही. अजूनही लढत आहे व लढत राहणार आहे. परंतु अशा संस्थेच्या पाठीशी आम्ही सर्वजण सामुहिकपणे उभे राहणार आहोत असेही त्यांनी सांगितले.
नागपूरचे सुप्रसिद्ध पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते श्री प्रमोद काळपांडे यांनी आपल्या भाषणामध्ये नागपूरचा आपला पूर्ण सामाजिक समूह मतीन भोसले यांच्या प्रश्नचिन्ह शाळेसाठी तन-मन-धनाने कार्य करेल असेल आश्वासन दिले.
प्रारंभी प्रश्नचिन्ह शाळेचे संस्थापक व आदिवासी फासेपारधी सुधार समितीचे अध्यक्ष श्री.मतीन भोसले यांनी प्रास्ताविक केले.
याप्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांनी आपल्या भाषणातून प्रश्नचिन्ह शाळेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे सांगितले. विशेष म्हणजे पावसाळी वातावरण असताना हा कार्यक्रम प्रश्नचिन्ह शाळेच्या भव्य पटांगणात आयोजित केला होता. या कार्यक्रमास अनेक मान्यवर, तसेच पालक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामामुळे संपूर्ण महाराष्ट्रात अल्पावधीत नावारूपास आलेल्या प्रश्नचिन्ह या शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त विचारपीठावर एवढ्या पाहुण्यांची उपस्थिती ही मतीन भोसले यांच्या कामाची पावती देऊन गेली.

– लेखन : डॉ. नरेशचंद्र काठोळे.
संचालक, मिशन आयएएस, अमरावती
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800