२७ सप्टेंबर या जागतिक पर्यटन दिनानिमित्त करू या महाराष्ट्र भ्रमण…..
पर्यटन म्हणजे खऱ्या अर्थानं देशा-देशात परस्पर सहकार्य, संस्कृतींचे आदानप्रदान करुन शांततामय सहजीवनासाठी द्विपक्षीय संबंध दृढ करणे होय. याशिवाय विविधतेतून एकता प्रस्थापित करून विश्वशांतीचा संदेश देण्याचे पर्यटन हे प्रभावी माध्यम देखील आहे. महत्वाचे म्हणजे पर्यटन हे क्षेत्र देशाच्या अर्थकारणाचा पाया असून, त्यातून रोजगारनिर्मिती केली जाते. इतकेच नव्हे तर, पर्यटनाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर देशा-देशात सांस्कृतिक देवाणघेवाण केली जाते.
वास्तविक पहाता, जागतिक पर्यटन दिन साजरा करून त्याद्वारे आंतरराष्ट्रीय समुदायात सामंजस्य, ऐक्य व विश्वासाचे वातावरण निर्माण केले जाते. पर्यटनाच्या माध्यमातून वैश्विकस्तरावर औद्योगिक विकासाच्या दृष्टीने उभय देशांत सामंजस्य करार होऊन नवनवीन उद्योग उभारणीस चालना मिळू लागली आहे. या सर्व गोष्टीं विचारात घेऊन संयुक्त राष्ट्र संघटनेने १९८० साली सर्वानुमते निर्णय घेऊन अखेर २७ सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले.
जागतिक पातळीवर पर्यटन क्षेत्राची गरिमा जपण्यासाठी या संघटनेने काही स्थायी नियम लागू केले असून सदर नियम वैश्विक पर्यटकांसाठी मैलाचा दगड मानले जातात.
महाराष्ट्र हे देशासह परदेशातील पर्यटकांसाठी पहिल्या पसंतीचे पर्यटन क्षेत्र आहे. पर्यटन करताना अधिकाधिक मजा लुटता यावी अन् त्यातून त्यांचा आनंद द्विगुणित व्हावा, राज्यातील प्रेक्षणीय स्थळे त्यांच्या कायमस्वरुपी स्मरणात रहावीत, या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवे धाडसी पर्यटन धोरण-२०२१ जाहीर केलं आहे.
नवे धोरण हे पर्यटन विभागाच्या माध्यमातून राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेलं आहे.या पर्यटन धोरणात विविध २५ खेळांचा समावेश आहे. त्यात पॅराग्लायडिंग, ट्रिकिंग, वॉटर ऱ्यापलिंग, रिव्हर राफ्टिंग, बायकिंग, रॉक क्लंबिंग, स्कुबा डायविंग आदी खेळांचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे हे खेळ खेळत असताना कोणालाही इजा पोहोचू नये तसेच कोणाच्या जिवाला धोका पोहोचू नये, यासाठी पर्यटकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन, यासंदर्भात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पुरेपूर दक्षता ठेवली आहे.
पर्यटकांसाठी अनुभवी प्रशिक्षक अन् दर्जेदार साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. या धोरणाची परिणामकारक अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने राज्यस्तरीय व विभागीयस्तरीय समित्या गठीत केल्या आहेत.
एमटीडीसीकडून देशी व विदेशी पर्यटकांना उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, जेणेकरून ते पुन्हा- पुन्हा महाराष्ट्रात पर्यटनासाठी यावेत, म्हणजे महाराष्ट्र हे पर्यटनाचे नंदनवन आहे, हे सिद्धीस येईल.
पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळून, ती बळकट होण्यास मदत होईल, असा मानस पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
जागतिक पातळीवर कोरोना आजार, त्यावर प्रतिबंधक उपाय व नियमावली, लसीकरणाची अट, विमान व रेल्वे वाहतुकीवर निर्बंध या सर्व जाचक गोष्टींमुळे उद्भवलेल्या परिस्थितीने पर्यटन क्षेत्राचे मोठं नुकसान झालं आहे.
आता कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याने पर्यटन क्षेत्र नव्याने सज्ज झाले असून, राज्यातील पर्यटन विभागाने पर्यटनाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कंबर कसली आहे. राज्यासह देशी व विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या लाभदायक असे विविध प्रकारचे आकर्षक “पॅकेज” जाहीर केले आहेत, त्यामुळे पर्यटन क्षेत्राला नवी उभारी येण्यास हातभार लागेल, हे निश्चित.
पर्यटकांनो, आपणास कळकळीचे आवाहन करण्यात येते की, तुम्ही जेव्हा छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड, सिंहगड, शिवनेरी, विजयदुर्ग, पुरंदर, तोरणा, कर्नाळा, पन्हाळा, प्रतापगड आदी ऐतिहासिक स्थळांना पर्यटक म्हणून भेटी देता, छत्रपतींच्या पवित्र स्मृतींना वंदन करून त्यापासून प्रेरणा घेता, अशा स्थळांचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी या ठिकाणी धूम्रपान, नशा करणे, अभद्र लिखाण करणे, भोजन झाल्यावर प्लेट्स, बाटल्या, खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक पिशव्या तेथेच टाकणं, अभद्र- अश्लील व्यवहार करणे ह्या असभ्य गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात.
कारण हे सर्व लाजिरवाणे प्रकार जेव्हा परदेशी पाहुणे पाहतात, त्यातून आपल्या राज्यासह देशाची प्रतिमा मलिन होऊन देशाच्या ऐतिहासिक वास्तूंचा एका अर्थाने अवमान होतो. वास्तवात हे केवळ किल्ले नव्हेत तर, आपली मराठी अस्मिता आहे, आपली पवित्र व अभिमानाची स्थळे आहेत. गडकिल्ले हे आपल्या भारतीय संस्कृतीचे अलंकार आहेत.
आपण सर्व महाराष्ट्रीय खरोखर भाग्यवान आहोत की, आपल्याला गडकिल्ल्यांचा वैभवशाली इतिहास लाभला आहे, याचे स्मरण करून पर्यटनाचा आनंद लुटावा. या वास्तूंची आन-बान-शान अबाधित राहील, याची पुरेपूर दक्षता घ्यावी.
आपला समृद्ध महाराष्ट्र हा सह्याद्री, सातपुडा, बालाघाट अशा पर्वत रांगांनी वेढलेला आहे. तर, लांबच लांब समुद्र किनाऱ्यांनी आच्छादलेली कोकणपट्टी अशा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे.
शिल्पकलेचा आविष्कार असलेल्या अजंठा – वेरूळ, एलिफंटा केव्हज आणि महाबळेश्वर, लोणावळा, खंडाळा, माथेरान, तोरणमाळ सारखी थंड हवेची ठिकाणे पर्यटकांना भुरळ घालतात.
त्याचप्रमाणे मुंबईतील मरीन ड्राईव्ह, गेट वे ऑफ, नेहरू तारांगण, गिरगाव चौपाटी, जुहू बीच, हँगिंग गार्डन, राणीची बाग ही प्रेक्षणीय स्थळे पाहून पर्यटनाची मजा लुटल्याची खऱ्या अर्थाने अनुभूती येते.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, राष्ट्रीय ताडोबा अभयारण्य, कर्नाळा, मेळघाट, भामरागड, पैनगंगा, पेंच येथील अभयारण्ये अन् व्याघ्र प्रकल्प पर्यटकांना आश्चर्य चकित करतात.
याशिवाय ठोसेघर, माळशेज घाट, आंबोली, मुळशी येथील नयनमनोहर धबधबे पाहून पर्यटक हे पाण्यात बेभान नाचून आनंद लूटतात.
विशेष म्हणजे आध्यात्मिक पर्यटन करायचे झाल्यास
रुध्दपूर अंबरनाथचे प्राचीन शिव मंदिर, शिर्डीचे साईबाबा, प्रतिकाशी प्रकाशा, पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, वणीची सप्तशृंगी, मुक्तिधाम,रामकुंड, शेगावचे गजानन महाराज देवस्थान, शनी शिंगणापूर, आळंदी, तुळजापूरची भवानी माता या धार्मिक स्थळांना महाराष्ट्र शासनाने पर्यटनाच्या धर्तीवर विकसित केले आहे. त्याप्रमाणेच चैत्य भूमी, दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस या धार्मिक स्थळांना देखील बौद्धधर्मीयांसह देश- परदेशातील पर्यटक भेटी देऊन मानवंदना देतात.
ही सर्व प्रेक्षणीय व विलोभनीय स्थळे पाहिल्यावर महाराष्ट्र हे पर्यटनाच्या दृष्टीने देशातील अग्रेसर राज्य आहे, हे सिद्धीस येते.
शिव छत्रपतींच्या महाराष्ट्राला त्रिवार मानाचा मुजरा !
जय महाराष्ट्र ! 🚩
– लेखन : रणवीर राजपूत
निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800