निसर्ग सफारी
मनापासून आवड असेल, तर सवड नक्कीच मिळते, अशी एक म्हण आहे. खरच ! तथ्य आहे हया म्हणीत!
आर्थिक दृष्ट्या, आम्ही बरेच सावरलो होतो. कच्च्या घराचे रूपांतर आता पक्क्या घरात झाले होते. वन प्लस वन, अशी घराची सुंदर उभारणी झाली होती. वरचा मजला फक्त क्लाससाठी वापरण्यात येऊ लागला होता. क्लाससाठी नवनवीन उपकरणे व मुलांसाठी डेस्क- खुर्च्या टाकण्यात आल्या होत्या. उपयोगी पुस्तकांचे संग्रह होऊ लागले होते. सोबत क्लासच्या नावे, मुलांसाठी क्लास- बॅग तयार करून, आम्ही मुलांना देण्यास सुरुवात केली होती. किंचितसे आमच्या ज्ञानदान मंदिराला, सुबक व सुटसुटीतपणाचे रूप प्राप्त झाले होते.
ज्ञानासोबत, निसर्ग रुपी ज्ञान व मोकळ्या जगाची ओळख, मुलांना व्हावी, हया हेतूने, मुलांसाठी दरवर्षी सहल आयोजन करण्याचे आम्ही ठरवले होते. क्लासची पहिली सहल, “नॅशनल पार्क” येथे नेली होती. अगदी इयत्ता पहिली पासूनचे छोटे विद्यार्थी, हया सहलीत सहभागी झाले होते. त्यावेळी सकाळी निघताना, मैदानात एकमेकांच्या हातात हात धरून, लांबलचक केलेली साखळीयुक्त रांग आजही डोळ्यासमोर उभी राहते. आमच्या नगरातून प्रथमच अशी सहल निघालेली पाहून, सारे नगरवासी कुतुहलाने पाहत होते. कौतुकाने आम्हांस शुभेच्छा देत होते.
“माथेरान” सहलीचा उपक्रम, एक दिवसाचे वास्तव्य करण्याचा होता. सहलीत सर्व मुले सहावीच्या वर्गापुढील घेतली होती. पैशाचे नियोजन करत, ह्यावेळी ट्रेनने प्रवास केला होता.
माथेरानच्या पायथ्यापासून काही मुले, सरांसोबत वर चढण्यासाठी पायी निघाली होती व बाकी मुली माझ्या सोबत मिनी ट्रेनने निघाले होतो. आम्ही लवकर पोहचलो व वाट पहात एका झाडाखाली बसलो होतो. अचानक दोन माकडे आली व बाजूलाच ठेवलेल्या, माझ्या तीन महिन्याच्या बाळास दुपटे तोंडात धरून ओढत नेऊ लागले. सारा प्रकार पाहून आम्ही पार घाबरलो होतो. तेवढ्यात त्या आजूबाजूच्या गावातील मुले आली व त्यानी एका विशिष्ट युक्तीने त्या माकडांना हाकलले होते. आमच्या संरक्षणासाठी प्रत्येकाच्या हाती काठ्या, सोपवल्या होत्या. ही सहल आमच्यासाठी विस्मरणीय ठरली होती. मुलांमधील व्यवहारीपणा व चाणाक्षपणाची ओळख, अश्या सहलीतून आम्हाला मिळण्यास मदत होत असे. सहल व्यवस्थापन करताना सहल वर्गणीचा बोजा पालकांवर वाढू नये, ही काळजी घेऊनच आम्ही सहल खर्चाचे आयोजन करत असू. त्यामुळे आमच्यावरील, मुलांची व पालकांची विश्वसनीय निष्ठा आम्हाला लाभत असे.
“वज्रेश्वरी” सहलीला घडलेला तो किस्सा, आजही आम्हाला चांगलाच आठवतो ! या सहलीत शेजारील एक बंगाली कुटुंब सहभागी झाले होते. वज्रेश्वरीच्या त्या वाहत्या नदीत, त्यांच्या मुलीने आनंदाच्या जोशात उडी घेतली आणि तिथे तिचा तोल जाताच ती पडली. नाकातोंडात पाणी शिरले हे पाहून मुले ओरडली ! क्षणाचाही विलंब न करता, माझे पती पाण्यात शिरले, तिला उचलून बाहेर काढले व उपडे ठेवून, तिच्यापाठीवर दाब देत तिला व्यवस्थित शुद्धीवर आणले होते. त्या प्रसंगाने तर माझ्या व तिच्या पालकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. त्यानंतर मात्र पाण्याकाठच्या सहली काढण्यास, मन धजावत नव्हते.
“एकविरा कार्ला” ची सहल होती. या सहलीत माझ्या भावाचे कुटुंब व माझ्या सासूबाईंना आम्ही नेले होते. एकविरा मातेच्या दर्शनाने ही सहल मात्र सर्वांची आनंदाची सहल झाली होती. त्यावेळी एकविरा मातेच्या दर्शनासाठी पायऱ्या चढून जावे लागत असे. पण आज त्या ठिकाणी सुंदर चढणीचा रस्ता तयार झाला आहे. त्यामुळे भाविकांना आपल्या गाड्या एकवीरा माता मंदिराच्या पायथ्याशी नेता येऊ लागल्या आहेत. त्यामुळे पायी वर चढण्याचे श्रम, भाविकांचे वाचले आहेत.
“एलिफंटा केव्हज” स्थळी, काढलेली सहल फक्त मोठ्या मुलांसाठी आखली होती. हया सहलीत केलेला प्रवास, अगदी अविस्मरणीय आहे. वडाळा ते व्ही.टी. पर्यंतचा प्रवास, मुलांसह आम्ही सकाळी लवकर रेल्वेने केला होता. व्ही. टी. स्टेशन पासून पुढे, गेटवे ऑफ इंडिया पर्यंतचा प्रवास बसने केला होता. त्यानंतर एकाच लॉंच मधे आमच्या क्लासच्या मुलांना जागा मिळावी, यासाठी तेथील तिकिट खिडकीवर, “ही सहल क्लासची आहे, त्यामुळे आमची व्यवस्था एकाच लॉंच मधे करावी.” अशी आम्ही विनंती केली होती. आमच्या विनंती प्रयत्नांना यश मिळाले होते. आमच्यात फक्त दोन- तीन परदेशी व्यक्ती बसल्या होत्या. लॉंचने किनारा सोडताच, समुद्राच्या लाटांवर मुलांनी गाण्याचे सूर धरले होते. आनंदी उत्साहात मुलांसोबत सरांनी नाच-गाण्यात ठेका धरला होता. हया मज्जावात ते गोरे परदेशीही आमच्यात सामील झाले होते. समुद्रातील तो प्रवास मुलांना, एक आगळा-वेगळा आनंद मिळवून देत होता.
एलिफंटा केव्हज, किनारा कधी आला, ते कळलेच नव्हते. मुलांना नियमांची शिस्त बंधता, समजावून आम्ही सारे गुंफेत शिरलो होतो. पैशाचे नाणे चिकटवून मनी इच्छा धरून, ती पूर्ण व्हावी, असा गमतीदार खेळ, मुलांनीही मनसोक्त लुटला होता. मुले एकमेकांना मोठ्या आवाजात, नावाने हाका देत होते. तो आवाज काळ्या गुंफांमधे घुमत होता. गुंफांवर कोरलेली प्राचीन कलाकृती, भारताची संस्कृती दर्शवत होती.
आजही त्या सहलीचे अल्बम उघडले की, सहलीच्या आठवणी ताज्या होतात. आता क्लासची मुले मोठी झाली आहेत, पण शिक्षक दिनी ही सर्व मुले, आमच्या राहत्या घरी येऊन आम्हाला भेटतात. बालपणातले ते क्लासचे दिवस, आवडीने पुन्हा डोळ्यासमोर उभे करतात. सरांनी केलेल्या शिक्षा, त्यांनी सांगितलेल्या त्यांच्या बालपणीच्या गोष्टी, मला न आवरता येणारा राग, कधी-कधी आमच्यात होणारी भांडणे व त्यातून उसळणारा राग, मुलांवर काढला जात असे. हे सारे आठवून मुलं खूप मजा घेतात. पुन्हा त्या दिवसांमध्ये पोहोचल्याचा आभास जाणवतो.
आवडी रुपी दुसरी सवड मिळाली ती, म्हणजे फुलझाडे फुलवण्याची ! क्लासच्या पुढील बालकनीत सरांनी सुंदर फुलांची बाग सजवली होती. गुलाब, मोगरा, पैशाची वेल, जास्वंद, रातराणी अश्या सुंदर मोहक फुलांचा, दरवळणारा सुगंध व त्यात मुलांनी भरलेला क्लास !
मुले आणि फुले तंतोतंत सांगड बसली होती. झाडांसाठी जागा अपुरी होती, पण हृदयात बहरलेले झाडांवरील प्रेम, आनंदी ठेवा होता.
निसर्गप्रेम वेडाने, दोघांचे मन पुन्हा एकदा गावाकडे खुणावू लागले होते. आमचे स्वर्गमय कोकण डोळ्यासमोर तरळू लागले होते. गणपती आगमनाचे निमित्त साधत, आम्ही गावाकडे जाण्याचा बेत पक्का केला होता. अगदी खूप वर्षांनी असा योग जुळून आला होता.
लग्नानंतर प्रथमच मी सासरच्या गावी जाणार होते. तिथे माझ्या चुलत सासू, चुलत जावा, चुलत दीर असे कुटुंब सणासुदीला गावाकडे येत असत. त्यामुळे आमचे वास्तव त्यांच्याकडे होणार होते. माझी मुलेही आनंदून गेली होती. गाव कसा असतो ? याचे दर्शनी उत्तर त्यांना पहावयास मिळणार होते. गावाच्या ओढीने मनी उत्साह ओसंडून वाहू लागला होता. अगोदरच, खाजगी बसची तिकिटे बुक करून घेतली होती. त्यावेळी हया बसेस, परेल डेपोच्या आसपासहून सुटत असत. आम्हाला ट्राफिकमुळे सहा वाजता सुटण्याऱ्या बस साठी, पाचच्या आधीच वडाळयाहून निघावे लागत असे. आज मात्र हया बसेसचा, आमचा वडाळा पिकअप थांबा झाला आहे. हा आहे, महाराष्ट्र परिवहन मंडळासमोर उभा ठाकलेला स्पर्धक काळ !
क्लासला दहा दिवसांची सुट्टी देवून, आम्ही गावी निघालो होतो. पहाट होता- होता, आम्हाला गावाचे दर्शन घडले होते. ‘टप-टप करत, सुंदर पाऊस पडत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी हिरवीगार शेते पसरली होती. मातीचा सुंदर वास दरवळला होता. मधेच झाडाझुडपांवरील पक्षांचे थवे उडू लागले होते. छोट्या- छोट्या रंगीबेरंगी फुलांचा मंद सुगंध पसरला होता. वातावरणातून हवेचा थंडगार झोत, अंगाला झोंबत
होता. आजूबाजूची लाल-लाल माती भिजून, अधिक दाट रंग पांघरूण, शोभून दिसत होती. दूर-दूर डोंगर पळताना दिसत होते. मधेच एखादा सूर्याच्या किरणाचा कोवळा कवडसा, चमकत होता. डोंगरातून बस खाली उतरताना, मधूनच अथांग समुद्र व त्याला येऊन मिळणाऱ्या नागमोडी नद्या, खूप मोहक वाटत होत्या. हातात काठी हलवत व तोंडाने गुरांना आवाज देत, गावातील माणूस सकाळीच आपली गुरे घेऊन चरावयास निघाला होता. घरासमोरील अंगणात पडलेला पालापाचोळा, बायका झाडताना दिसत होत्या. मुंबईची बस पाहून हातातले काम थांबवून, बस मधील खिडकीकडे उत्सुकतेने पहात होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरील छटेत, नाविन्य पूर्वकतेची उभारी दिसत होती.
निसर्गाचे सौंदर्य पाहून, डोळ्यांचे पारणे फिटल्या सारखे वाटले होते. गावातील बरीच कुटुंबे, घरात वावरताना दिसत होती. एरवी दरवाज्यांना कूलूपे असलेली घरे, पोरा-बाळांनी भरलेली दिसत होती.
प्रथमच गावी आल्याने, घाटी उतरताना आमचे पाय लटपटत होते. आम्हाला पाहून घाटीवरील घरातून, वयस्कर माणसे लगबगीने अंगणात आली होती. आणि त्यांच्यात कुजबुज सुरू झाली होती. “कोन गे, ही घाटी उतारतत ? ओळकीची दिसत नाय ! पयल्यानदाच गावात दिसतत !”
हे ऐकून माझे पती थांबले व म्हणाले,
“ओ, आबानू ! गे काकू !
“मी, महेंद्र ! श्रीधर भाबलाचो मोठो झील !”
“ही माझी बायको नि पोरा.”
“ओळकश्याल कशी ? लय वर्षांनी ईलय !”
“मी महेंद्र श्रीधर भाबल.”
“सात चुलीतलो !”.
काकू म्हणाल्या,
” होय काय !”
“आता आमका दिसत नाय बाबा ।!”.
“तुझी आवस पण, कधी येयत नाय गावाक !”.
“मगेन तुमका तरी कशी ओळकणार ?”
“गणपतीक इलस !”
“बरा केलस.”
“जावा, हळू जावा.”
हे संवाद ऐकून,
त्यांच्यातील प्रेमळ उत्कंठा जाणवली. किती उत्सुकता असते हया जुन्या माणसांमधे !
आमचे मोठे घर “सात चुलींचे” म्हणून ओळखले जाते. मी आज प्रत्यक्षात ते पाहणार होते. आमचे वास्तव चुलत दिरांकडे होते. सारे आवरुन, प्रथम सात चुलींच्या मोठ्या घरात आम्ही शिरलो होतो. पडवी पार करून ओटा लागला होता. गणपतीची सजावट छान केलेली होती. त्या दरवाजातून आत जाताच, लांबलचक व्हरांडा लागला होता. आणि तिथेच एका रांगेत, सात खोल्या कुलूप लावलेल्या होत्या. लागूनच एक देवाची खोली होती. त्याच्या उंबरठ्याबाहेर मी थांबले व देवाला नमस्कार केला. माझ्या पतीनी, आत जाऊन देवासमोर अगरबत्ती लावली होती. देवाचा आशीर्वाद घेऊन पुढील मोठया दालनात आलो होतो. तिथे रांगेत सात चुली मांडलेल्या होत्या. त्यातील आमची चूल कोणती ? व खोली कोणती ? हे माझ्या चुलत सासूने दाखवून दिले होते. सारे नवखे वाटत होते. एवढे अवाढव्य घर असून, चुली मात्र शांत पहुडल्या होत्या.
त्या वर्षी, देव बदलण्याचे कार्य असल्याने, पूजेचा घाट घातलेला होता. त्यामुळे गणपती उत्सव व सत्यनारायण पूजा, हया दोहोनी जुळून आलेल्या योगात, सर्व चुली त्या दिवशी धगधगत्या आगीने बहरल्या होत्या. मोठमोठे टोप चुलीवर मांडले होते. पक्वान्नांच्या वासाने पूर्ण घर दरवळले होते. पदर खोचून साऱ्या बायका कामाला लागल्या होत्या. मलाही काम आवरण्याची चांगलीच मुभा मिळाली होती. विहिरीवरून पाणी आणणे, धुण्यापासून ते स्वयंपाकापर्यंत, मी कामात छान उतरले होते. हे पाहून मी “सासुरवाशीण ” परीक्षेत पूर्णपणे पास झाले होते. तोंड भरून माझे कौतुकही झाले होते. माझ्या आई वडिलांच्या संस्काराचा, पहिला वारसा मी दाखवून देण्यात, यशस्वी झाले होते.
गणपतीचे दिवस अगदी आनंदात गेले होते. विसर्जनाच्यावेळी आम्ही साऱ्याजणी, सुंदर नटलो होतो. वाजत-गाजत सारे गणपती, घाटीने एकामागोमाग निघाले होते. सुंदर देखावा होता तो ! बांधावर (जेटी) गणपती रांगेत मांडून आरत्या केल्या होत्या.
“गणपती बाप्पा मोरया ! पुढच्या वर्षी लवकर या !”
अश्या गर्जना देत, सारे बाप्पा मोठ्या होडीत बसवले होते. आम्ही दुसऱ्या होडीतून बाप्पांना सोडण्यास नदीच्या मध्यावर गेलो होतो. नदीच्या चारी बाजूने, प्रत्येक गावाचे गणपती, विसर्जन सोहळयात फार विलोभनीय दिसत होते. चारी बाजूंनी गर्द हिरवे डोंगर आणि त्यांच्या कुशीत विसावलेला आमचा, “आंबेरी गाव”! जिवंतपणी उपभोगता येणारा जणू स्वर्ग वाटावा!गावाच्या निसर्गात व दादांच्या (दीर) कुटुंबासह, मनमोकळे पणाने व आपुलकीच्या छायेत, दिवस कसे सरले ? कळलेच नाही.
सासुरवाशीण परीक्षेत पास झाल्याचे प्रशस्तीपत्र म्हणून, माझ्या आत्या सासू कडून, गावठी तांदळाची भेट मला मिळाली होती. माझ्यासाठी ती पुरचुंडी, खूप मायेने भरलेली आठवण होती.
मुंबईला परतताना माझ्या माहेरी वीरात गेलो होतो. खूप वर्षांनी डोळे भरून शाळेला पाहिले होते. ओहोळात जाऊन वाहत्या पाण्यात, मनमुराद हुंदडले होते. नदीच्या काठावर उभी राहून, बालपणीच्या आठवणी पदराच्या ओटीत भरून घेतल्या होत्या.
कोकणचे स्वर्ग डोळ्यात भरून, मनात पुन्हा निसर्गाची आवड ताजी झाली होती. त्यामुळे मुलंही मे महिन्याची वाट पाहत असत. आम्हाला सारखे, आमचे गाव खुणावू लागले होते. मे महिना म्हटला की कोकणचा राजा आंबा, साऱ्यांनाच वेडा करून सोडतो. खाडीतील कालवे (शिंपल्यातून काढलेल्या मांसाहारी जीवाचे नाव), ताजी मासळी आणि सोबत आंबे, फणस, काजू, करवंदे असा कोकणचा मेवा ! स्वस्थ बसू देत नसे.
मे महिन्यातही आम्ही चार-पाच दिवसांसाठी गावी जाऊ लागलो होतो. हळूहळू गावाची ओढ मनाला भिडत होती. त्यामुळे आपले स्वतःचे काही हक्काचे असावे, असे राहून राहून वाटू लागले होते.
निसर्गाच्या वेडाने, मुंबईच्या घरी माझ्या पतीनी, फुलांची छोटी बाग फुलवली होती. फुल झाडांवरील प्रेम पाहून, आजूबाजूलाही आमच्या शेजाऱ्यांनी, फुलझाडांची लागवड करण्यास सुरुवात केली होती. खरंच ! शिवनेरी चाळीला अप्रतिम लुक आला होता. माणसांच्या प्रेमात, फुलांना- वेलींना प्रेम देण्याचे भाग्य, आमच्या चाळीत वावरू लागले होते.
थोडक्यात ! आवडीच्या प्रेरणेतून सजीव सृष्टीला, प्रेम देण्याचा एक प्रयास, माझे पती करू लागले होते व तो संदेश अगदी मनामनात पोहचला होता.

– लेखन : सौ. वर्षा महेंद्र भाबल.
– संपादन : अलका भुजबळ 9869484800
वर्षा भाबल यांनी जुन्या आठवणीचे लेखन खूपच सुंदर केले आहे. 🙏धन्यवाद