Friday, July 4, 2025
Homeलेखज्येष्ठांनो सावध !

ज्येष्ठांनो सावध !

२१ सप्टेंबर – जागतिक अल्झायमर जागरुकता दिन असतो. या निमित्ताने हा विशेष लेख…

ज्येष्ठ बंधू भगिनींनो, अल्झायमर असा आजार आहे ज्यावर मात करून त्याला बरा करण्यासाठी आजही ठोस वैद्यकीय उपचार पद्धती नाही. तथापि, त्याची तीव्रता अर्थातच त्यातील लक्षणे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खबरदारी, पथ्ये पाळून कमी केली जाऊ शकतात. स्मृतीभ्रंश ज्याला अल्झायमर (डिम्नेशिया) असेही म्हटले जाते. याला विसरण्याचा, विस्मरण होण्याचा एक असामान्य प्रकार म्हटलं जातं. स्मृतीभ्रंश(अल्झायमर) म्हणजे ज्यावेळी तुमची स्मरणशक्ती ही तुमच्या तर्क, निर्णय, भाषा अन् अन्य विचारांच्या प्रक्रियेत व्यत्यय आणते, तेव्हा त्या अवस्थेला स्मृतीभ्रंश म्हटले जाते. यात जुन्या वा अगदी अलिकडील गोष्टीदेखील विसरायला होतात. तसेच विचार करण्याची क्षमता कमी होणे, लहान-मोठे निर्णय घेण्यास अडचणी येणे, कुठलेही काम करण्यात असमर्थता, तणाव नैराश्य येणं या बाबींचा खासकरून यात समावेश होतो.

स्मृतीभ्रंश हा मेंदूशी संबंधित आजार असून, त्यापासून आपला बचाव व्हावा अन् आपल्या मेंदूची क्षमता जीर्ण होऊ नये, यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून नित्यनेमाने वाचन करण्यावर (कादंबऱ्या, आध्यात्मिक ग्रंथ, पुस्तके वगैरे) अधिक भर द्यावा. याशिवाय बुद्धिबळ, कॅरम, पत्तेसारखे बैठे खेळ कुटुंबाच्या वा ज्येष्ठ नागरिक संघातल्या सदस्यांबरोबर खेळणे तसेच एकाकी जीवन न जगता (Loneliness) मित्रपरिवारात वेळ घालवून विविध विषयांवर चर्चाविमर्श करणे अशी दिनचर्या केल्यास मेंदूला चालना मिळून आपले एकूण आरोग्य उत्तम राहते, असे बहुमूल्य मार्गदर्शन ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉ.दुष्यंत भादलीकर यांनी महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघाने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात केलं.

याशिवाय नेत्रदान, देहदान, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, प्लास्टिक हटाव मोहीम अशा तत्सम सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे,जेणेकरून वार्धक्यातील ताणतणाव, एकाकीपणा दूर होऊन मन प्रसन्न तर, शरीर चपळ राहते.

Prevention is better than cure या तत्त्वानुसार स्मृतीभ्रंशसारखा असह्य व बरा न होणारा मानसिक आजार आपल्याला जडू नये, यासाठी उर्वरित आयुष्यात सक्रिय राहणे अगत्याचे आहे. ज्येष्ठ नागरिकांनी संतुलित चौरसआहार, पुरेशी विश्रांती, झेपेल तेवढा व्यायाम (फिरणे, योगा – प्राणायाम) तसेच आध्यात्मिक उपक्रमांमध्ये आवडीने भाग घ्यावा, त्यातून मनाला दिलासा मिळून सकारात्मक विचारसरणी वृद्धिंगत होण्यास चालना मिळेल.

वास्तविक पहाता, अल्झायमर(स्मृती भ्रंश) आजारात प्रामुख्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असतो. नुकत्याच घडलेल्या घटना न आठवणे, आपला नेहमीचा रस्ता विसरणे, आपल्या वस्तू कोठे (चष्मा, मोबाईल वगैरे) वेगवेगळ्या प्रकारचे भास होणे, कधी कधी आपल्या लोकांवर आक्रमक होणे त्याचबरोबरच बोलणे, चालणे, वाचणे व लिहिण्याची क्षमता कमी होणे, नैसर्गिक विधी कळून न येणे, त्यावरील नियंत्रण जाणे, ह्या गोष्टी घडून सदर व्यक्तीच्या हालचाली मंदावतात अन् ती व्यक्ती बिछान्यावर खिळून राहते. भारतात सुमारे साडेचार दशलक्ष रुग्ण अल्झायमर व तत्सम आजार असलेले आहेत. सामन्यात: ८० वर्षांवरील वयाचे ५० टक्के वृद्ध अल्झायमरग्रस्त असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे.

मुंबई सेंट्रल वोक्हार्ड हॉस्पिटलच्या न्योरोलोजी अँड स्ट्रोक डिपार्टमेंटचे ग्रुप डायरेक्टर डॉ.शिरीष हस्तक यांच्या मते, चोर पावलांनी येणारा हा स्मृतीभ्रंश (अल्झायमर) आजार वाढत्या वयोमानानुसार ज्येष्ठांच्या जीवनात प्रवेश करण्याची शक्यता असते. अल्झायमर आजाराचे सुरुवातीस निदान करणे कठीण असते. वयपरत्वे विसराळूपणा समजून त्याकडे सहजगत्या दुर्लक्ष होते. विशेष म्हणजे वार्धक्य अन् आनुवंशिकता या कारणांमुळे हा आजार होऊ शकतो. काही प्रतिबंधात्मक उपाय नित्यनेमाने पाळून वडीलधारीमंडळी ह्या आजाराला दूर ठेऊ शकते.

साठी ओलांडल्यावर आपापल्या जीवन पद्धतीत स्वतःहून बदल करून घेतला पाहिजे. दुसऱ्याचे विचार समजून घेणे, ते योग्य असल्यास मान्य करणे, समजुदार होणे, विचारांचे आदानप्रदान करणे, समोरच्याला प्रोत्साहित करणे, जमल्यास हास्य क्लबला जाणे, सहलींना जाणे, तीर्थ क्षेत्रे व एतिहासिक स्थळांना भेटी देणे, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, दिवाळी पहाटसारख्या कार्यक्रमांत हिरिरीने सहभागी होणे, अशा उपक्रमांमध्ये मनापासून सामील झाल्यास, आपल्या मेंदूच्या चेतापेशींना चांगला व्यायाम मिळून त्या कार्यक्षम व सजग राहतात, हे लक्षात घेऊन ज्येष्ठ स्री-पुरुषांनी आपल्या उर्वरित जीवनाची मार्गक्रमणा करावी.

अंतत: आपल्या मेंदूची कार्यक्षमता आणि ज्येष्ठ नागरिकांनी आपणहून घेतलेली प्रकृतीची काळजी यावर सर्वकाही विसंबून असते. उल्लेखनीय बाब म्हणजे विविध शासकीय आणि सेवाभावी संस्थां कडून अशा रूग्णांना व त्यांच्या कुटुंबियांना मदतीसह मार्गदर्शनही केलं जातं. परंतु खरी गरज आहे ती अशा वृद्धांना कुटुंबातील सदस्यांच्या मानसिक आधाराची अन् शारीरिक मदतीची. अशा वृद्धांचे मनोबल शाबूत ठेवण्यासाठी त्यांच्याबद्दल सहानुभूती, आपुलकी ठेऊन त्यांच्या पाठीशी कुटुंबियांनी खंबीरपणे उभे राहणे, अत्यंत गरजेचं आहे.

या पार्श्वभूमीवर घरातील तरुण मुला-मुलींनी आपापल्या घरातील अल्झामेयरग्रस्त ज्येष्ठांना वेळीच मदतीचा हात देऊन डॉक्टरांकडे उपचारांसाठी ज्या ज्या वेळी आवश्यकता आहे, त्या त्या वेळी घेऊन जाणं, हे तुमचं कौटुंबिक कर्तव्यच आहे. ज्यांनी आपल्याला घडवलं, त्यांच्या खांद्यावर आपण खेळलो, ज्यांचे बोट धरून आपण चालायचे शिकलो, अशांना मदतीचा हात दिल्याने तुमच्या हातून खऱ्या अर्थाने पुण्यकर्म देखील होते, हे लक्षात घ्यावे. वास्तविक पहाता, पिकलेलं पान…..ही घरची शान असते !

– लेखन : रणवीर राजपूत
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments