Tuesday, September 16, 2025
Homeलेखसेक्स टॉइज : नवे स्वातंत्र्य, नवे प्रश्न ?

सेक्स टॉइज : नवे स्वातंत्र्य, नवे प्रश्न ?

उद्याचा मराठवाडा” या दिवाळी अंकात २०१९ प्रसिद्ध झालेला “काम स्वातंत्र्यपर्व” – २०१९ हा लेख या विषयाचे महत्व, गांभीर्य लक्षात घेऊन येथे देत आहोत.
– संपादक

सेल्फ प्लेझर – लैंगिक स्व-सुख या मानवी कामजीवनातील पैलूपासून बहुतांश लोक अनभिज्ञ नाहीत. सेक्स टॉइजच्या रूपाने लैंगिक स्व-सुखाचा आणखी एक आयाम आता खुला झाला आहे.

आज भारतात सेक्स टॉइजविषयीची जागृती वाढते आहे. सेक्स टॉइज ऑनलाइन खरेदीही करता येऊ शकतात. लैंगिक स्वातंत्र्याच्या संकल्पनेला समांतर अशी एक लैंगिक स्वावलंबनाची संकल्पना उभी करण्याचं सामर्थ्य या पर्यायामध्ये आहे.

सेक्स टॉइजचा वापर उपयुक्त ठरतो यात शंकाच नाही, पण एखादं उत्पादन वापरण्यापूर्वी त्याबाबतची आनुषंगिक माहिती घेणं जसं गरजेचं असतं तसंच ते याही बाबतीत म्हणता येईल. सेक्स टॉइजशी संबंधित काही कळीच्या मुद्द्यांवर चर्चा करणारा हा लेख.

‘सेल्फ प्लेझर’ हा विषय आजही आपल्याकडे निषिद्ध मानला जातो. ‘न बोलण्याच्या गोष्टी’ या कॅटेगरीत मोडला जाणारा हा विषय. ‘सेल्फ प्लेझर’ असं म्हटलं की भुवया उंचावल्या जातात. असं का बरं होत असावं ? मनाच्या गरजांबद्दल निदान आपण आज उघडपणे बोलायला लागलो आहोत, पण शारीरिक गरजांबाबत बोलताना संकोचल्यासारखं होतं.

सेल्फ प्लेझर किंवा हस्तमैथुन ही पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही शारीरिक आनंद देणारी क्रिया. कित्येकदा स्त्रियांना संभोगानंतरही ऑरगॅझम अनुभवता येत नाही. पुरूषांच्या बाबतीत इजॅक्युलेशन झाल्यावर त्यांना ऑरगॅझमिक प्लेझर अनुभवता येतं पण स्त्रियांच्या बाबतीत तसं होत नाही. त्यामुळे कित्येकदा स्त्री शारीरिकरीत्या असंतुष्ट राहते आणि कित्येक स्त्रियांना हे आपल्या साथीदाराला उघडपणे सांगायलासुद्धा संकोच वाटतो. बऱ्याच स्त्रियांना तर संपूर्ण आयुष्यात ऑरगॅझम म्हणजे काय असतं हे अनुभवतादेखील येत नाही कारण कित्येकदा जोडीदाराला केवळ स्वतःचं प्लेझर महत्वाचं वाटतं आणि स्त्रीच्या शारीरींक गरजा कायम दुय्यम स्थानावर ठेवल्या जातात. जसं पुरुषाला हस्तमैथुन करावसं वाटतं, तो ते करतो हे स्त्रिया मान्य करतात तसंच स्त्रियांना सुद्धा ते करावंसं वाटतं हे किती टक्के लोक मान्य करतात ? स्वतः स्त्रिया तरी हे मान्य करतील का ? हा खरा प्रश्न आहे.

इंडियाना विद्यापीठाने ‘नॅशनल सर्व्हे ऑफ सेक्शुअल हेल्थ अँड बिहेव्हिअर’ या सर्वेक्षण अहवालात असं नमूद केलं आहे की २० टक्के पुरूष आठवड्यातून तीन ते चार वेळा सेल्फ प्लेझर अनुभवतात आणि स्त्रियांच्या बाबतीत हे प्रमाण केवळ ५ टक्के इतकंच आहे. आपल्याकडे असं सर्वेक्षण तरी होऊ शकेल का इथून सुरूवात आहे. कारण एकूणच शारीरिक गरजा, त्यावर खुलेपणाने चर्चा, योग्य पद्धतीने त्याकडे बघण्याच्या दृष्टीकोनाचा अभाव. मुळात सेक्शुअल प्लेझर अनुभवावसं वाटणं यात चूक आहे का, हा कळीचा मुद्दा. विशेषतः स्त्रियांचा याकडे बघण्याचा दृष्टीकोन हा आजही परंपरावादी आहे. आणि वर म्हटलं तसं सेल्फ प्लेझर अनुभवणारे पुरुष आपल्या जोडीदाराला सुद्धा ते अनुभवण्याची मुभा आहे हे मान्य करतील हा मुद्दा आहेच.

सेल्फ प्लेझरमधील हस्तमैथुन या क्रियेचा पुढचा एक टप्पा म्हणजे ‘सेक्स टॉइज‘. आज भारतीय बाजारपेठेत सेल्फ प्लेझरसाठी अनेक सेक्स टॉइज उपलब्ध आहेत. हे ‘असं काही’ असतं पासून, कोणी भारताबाहेर जात असेल तर ‘तू आण’ इथपासून ते सेक्स टॉइजची ऑनलाईन खरेदी हा आपल्याकडचा प्रवास नक्कीच आशादायक म्हणायला हवा ! सेक्शुअल वेलनेस इंडस्ट्री ही भारतात आज आघाडीवर आहे आणि सेक्स टॉइजच भारतातलं मार्केट हे अतिशय जलद गतीने वाढत चाललं आहे.

वेबसाईट्सवर स्त्री आणि पुरुष अशा दोघांसाठीही वेगवेगळे सेल्फ प्लेझरचे टॉइज बघायला मिळतात. ऑनलाईन विक्रीचे रेकॉर्ड्स पाहता यात ४० टक्के सहभाग स्त्रियांचा आहे. अर्थात एका विशिष्ट वर्गाबद्दल हे मर्यादित असलं तरीही सेल्फ प्लेझरबद्दलची सजगता येत आहे हे मात्र नक्की. उदाहरणार्थ २०१५ साली सुरू झालेली ‘लव्हट्रीट्स ‘ नावाची एक वेबसाइट. युरोपमधली उटे आणि भारतातला बाला या जोडप्याने सुरू केलेलं हे व्हेंचर.

सेक्स टॉइजचं ऑनलाईन शॉप उघडण्याचा मानस आणि त्यामागचे या दोघांचे विचार मला इंटरेस्टिंग वाटले. उटे म्हणते, “भारतात सेक्स या विषयावर उघडपणे बोलणं अवघड आहे. त्यातही स्त्रियांच्या लैंगिक गरजांबद्दल बोलणं, त्यांना सुद्धा लैंगिक स्वातंत्र्य मिळायला हवा आहे याबद्दल बोलणं हे अत्यंत अवघड काम.” बाला सांगतो की “बिझनेस करायचा या हेतूने आम्ही ही कंपनी सुरू केलीच नव्हती. हा बिझनेस होऊ शकतो असं आम्हाला वाटलं देखील नाही. जानेवारीमध्ये आम्ही पहिली ऑर्डर पाठवली आणि डिसेंबरमध्ये तो आकडा ४०० झाला.” उटे तिच्या टेड टॉकमध्ये स्त्रियांना सेल्फ प्लेझरचा, लैंगिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे यावर छान बोलली आहे.

उटे आणि बाला यांनी कंपनी सुरू करण्याच्या आधी जवळपास १०० स्त्रियांचं सर्वेक्षण केलं, त्यातून त्यांच्या असं लक्षात आलं की काँडोम्स किंवा ल्युब्रिकंट्स विकत घेताना कित्येक स्त्रियांना वाईट अनुभव आले. असं असलं तरीही बहुतांश स्त्रियांना सेक्शुअल वेलनेस प्रॉडक्टसबद्दल उत्सुकता होती, ते वापरून बघायची इच्छा होती आणि आपलं लैंगिक आयुष्य अधिक समाधानाने जगायची इच्छा होती. या दोघांचा हा व्यवसाय असला तरी त्या निमित्ताने केवळ पुरूषांना नाही तर स्त्रियांनादेखील हे अनुभवावसं वाटणं, त्याबद्दल मनात कोणतीही अपराधीपणाची, शरमेची भावना न येणं यावर बोललं जातंय ही आशादायक बाब आहे.

आज आपण सगळेच धावतं आयुष्य जगत आहोत. मोठ्या शहरांमध्ये तर आज ‘सिंगल’ असं लेबल लावून जगणाऱ्या लोकांचं प्रमाण लक्षणीय आहे आणि ते वाढत चाललंय. रात्री घरी उशिरा येणं, नेटफ्लिक्स सारखी करमणुकीची सधन एका बोटावर असणं, विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची आमिषं, कामाचा स्ट्रेस हा आयुष्याचा भाग बनत चालला आहे.

स्त्री पुरुषांमधील समागम हा दोघांसाठी लैंगिक ऊर्जा मुक्त करण्याचा एक मार्ग आहे. पण लग्नाशिवाय शारीरिक सुख अनुभवण्याचा दुसरा कोणता पर्याय उपलब्ध नसताना, सेक्स टॉइज सारखा पर्याय ‘स्ट्रेस बस्टर’ ठरू शकतो. आजच्या काळात सेक्शुअल फ्रस्टेशन कमी करण्यात सेक्स टॉइज एक महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत हे नाकारता येणार नाही. केवळ सिंगल किंवा लग्न न करण्याचा निर्णय घेऊन राहणारे लोक इथपर्यंतच त्यांचा वापर मर्यदित नाहीये खरं तर. लग्न झालेल्या जोडप्यांना सुद्धा सेक्स टॉइजचा फायदा होऊ शकतो.

असं म्हणतात की, ‘मॅरेजेस आर मोनोटोनस’. लग्न ही व्यवस्था कालांतराने एकसुरी आणि काहीशी नीरस होऊन जाते. एकमेकांची इतकी सवय होऊन जाते की कालांतराने सेक्स लाइफ मधली पॅशन, वेड हे कमी होत जातं. आपल्या जोडीदाराबरोबर सेक्स करण्याची इच्छा कमी होत जाते. अर्थात लग्न म्हणजे केवळ शारीरिक संबंध आणि त्यातलं सुख नव्हे; पण सुखी लग्न आणि निरोगी लैंगिक स्वास्थ्यासाठी दोघांच्या इच्छेनुसार शारीरिक संबंध येणं आणि त्यातलं सुख दोघांनाही अनुभवता येणं हे अत्यंत गरजेचं. मग अशा वेळी लग्न झालेली जोडपी एकमेकांच्या संमतीने सेक्स टॉइजचा ‘फोरप्ले’ मध्ये समावेश करून सेक्स लाइफ अधिक रंगतदार करू शकतात.

वैवाहिक आयुष्य ‘स्पाइस अप’ करण्यासाठी सेक्स टॉइजचा उपयोग होऊ शकतो. फक्त त्यासाठी आपल्याला आपल्या विचारांची कवाडं थोडी अजून उघडावी लागतील. लैंगिक स्वातंत्र्य हा मुळातच फार मोठा विषय. याला अनेक कंगोरे आहेत. थोडक्यात सांगायचं झाल्यास लैंगिक स्वातंत्र्य म्हणजे प्रस्थापित चौकटी, रूढीवादी विचारांच्या बेड्यांपासून मुक्त होऊन लैंगिक अभिव्यक्ती मोकळेपणाने करता येणं.

लैंगिक स्वातंत्र्य म्हणजे सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, सांस्कृतिक दबावाशिवाय आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, ज्या पद्धतीने ते करू इच्छितो त्यानुसार कायदेशीररित्या प्रेम करण्याचा परवाना. आज जगभर सेक्शुअल रिव्होल्यूशन म्हणजेच लैंगिक क्रांतीचं वारं वाहायला लागलं आहे. संततिनियमन, समलैंगिकता, कायदेशीर गर्भपात, हस्तमैथुन यासारख्या गोष्टींचं सामान्यीकरण करणं, समाजामध्ये यांचा बाऊ न करता, एक निकोप, सजग, संवेदनशील समाज उभा करणं हा यामागचा हेतू. सेक्स टॉइजसारखे मार्ग स्त्री आणि पुरूषांना लैंगिक मुक्तीच्या मार्गाकडे नेणारे आहेत असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

सेक्स टॉइज, सेल्फ प्लेझर वगैरे आपल्या संस्कृतीच्या विरोधात आहे असं कित्येकांना वाटतं.. यावर वेगवेगळ्या देशांची संस्कृती काय सांगते असं थोडं चाचपून पाहिलं. इजिप्शियन संस्कृतीत हस्तमैथुनाबाबत नोंदी आहेत आणि क्लिओपात्रा ही स्त्री असूनही सेल्फ प्लेझरचे मार्ग अवलंबायची यावर लिहिलेलं आढळलं. ज्यूडाइझममध्ये हस्तमैथुन पूर्णतः निषिद्ध आहे. ग्रीक संस्कृतीत जर स्त्री जवळ नसेल तर पुरूषांच्या विफलतेवर नैसर्गिक उपाय म्हणजे हस्तमैथुन असं म्हटलं आहे, तसंच ऑलिस्बॉस म्हणजेच डिल्डोचा उल्लेख ग्रीक साहित्यामध्ये आढळतो. चिनी संस्कृतीत ताओइझममध्ये स्त्री आणि पुरूषांसाठी संपूर्ण ‘सेक्स मॅन्युअल’ जरी असलं तरीही हस्तमैथुनामुळे जीवनावश्यक मूलतत्वांचा नाश होतो असं म्हटलं आहे. भारतीय संस्कृतीत कामसूत्र आणि खजुराहो सारख्या कलाकृतीत पुरूष आणि स्त्री दोघांसाठी हस्तमैथुनाचा उल्लेख आढळतो.

हे असं असलं तरीही दोन शरीरं, दोन मनं एकत्र येऊन जे अनुभवता येतं ते सेक्स टॉय सारख्या मशीनने वा वस्तूने अनुभवता येऊ शकतं का ? मला स्वतःला समाधान देण्यासाठी कोणाचीही गरज नाहीये हा अ‍ॅटिटयूड ‘कूल’ असला तरीही सेक्स ही मुळात दोन व्यक्तींमध्ये घडणारी क्रिया आहे. एकमेकांच्या जवळ येण्यातून केवळ शारीरिकच नाही तर मानसिक जवळीकदेखील निर्माण होत असते. दुसऱ्या व्यक्तीच्या जिवंत सहवासाने, स्पर्शाने मन मोहरणं आणि बाह्य मॅकेनिकल मशीनच्या साहाय्याने सुखानुभूती येणं या दोन गोष्टी सारख्याच असू शकतात का ?

लैंगिक स्वातंत्र्य हा बराच गुंतागुंतीचा विषय आहे. त्याला अनेक पदर आहेत स्वावलंबन व एकाकीपणा यांच्यामध्ये एक पुसटशी रेषा आहे आणि लैंगिक स्वातंत्र्यावर बोलताना या रेषेचं भान विचारात घेतलं गेलं पाहिजे. आपण जेंव्हा या विषयावर बोलतो तेंव्हा स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यासाठी जी वैचारिक प्रगल्भता लागते ती आपल्याकडे आहे का हे तपासून बघणं गरजेचं ठरतं. लैंगिक क्रांती ही सहजासहजी घडणार नाहीच. लैंगिक शिक्षण, शारीरिक संबंध ठेवताना स्त्रीच्या मताचा, तिच्या गरजेचा आदर, बायकांकडे फक्त उपभोगाची वस्तू म्हणून बघण्याच्या प्रवृत्तीचा विरोध आणि स्त्रीच्या लैंगिकतेचा समीकरणामध्ये समावेश यासारख्या बाबी जेव्हा आपण विचारात घेऊ, त्यादृष्टीने जेव्हा पाऊल उचलू तेव्हाच लैंगिक क्रांतीकडे आपली वाटचाल योग्य मार्गाने होऊ शकेल.

मी पोर्न बघते, मी सेक्स टॉइज वापरते, मला शारीरिक समाधानासाठी कुणा व्यक्तीची गरज पडत नाही असं नुसतं म्हणणं म्हणजे लैंगिक स्वातंत्र्य नव्हे !

सेल्फ प्लेझरसाठी सेक्स टॉइजची गरज आपल्याला लैंगिकदृष्ट्या स्वावलंबी बनवत असली तरीही आपली माणूस म्हणूनची वाटचाल नक्की कोणत्या दिशेने होते आहे याकडे लक्ष देणं गरजेचं वाटतं. सेक्स टॉइज लैंगिक स्वातंत्र्याची नवी वाट दाखवत असले तरी नवीन प्रश्न सुद्धा उभे करत आहेत. शेवटी नैसर्गिक जवळीक, सहवास यांना ‘रिप्लेस’ करता येणं शक्य आहे का ? तसं करावं का ? हे असं स्वातंत्र्य माणसाला अजूनच एककल्ली तर नाही करणार ना ? तंत्रज्ञानाचा वापर किती आणि कसा करायचा याचं तारतम्य असणं म्हणूनच खूप गरजेच वाटतं.

नाती, प्रेम, सहवास, जवळीक या सगळ्या गोष्टीना वेळ द्यावा लागतो. केलं, झालं, उरकलं केवळ असाच विचार केला तर नातेसंबंध निर्माण कसे होणार ? ते मुरणार कसे आणि मग आत्मिक समाधान कसं लाभणार ? आपण माणसाला, मानवी स्पर्शाला रिप्लेस करून लैंगिक स्वातंत्र्य मिळवू बघत असलो तर त्याचे दूरगामी परिणाम काय होऊ शकतील याचाही विचार करायला हवा.. दोन व्यक्तींमध्ये सेक्समुळे जी जवळीक निर्माण होते, जे नातं निर्माण होतं, त्या नात्याचं संपूर्ण गतिशास्त्र सेक्स टॉइजसारखे पर्याय बदलू पाहत आहेत का हेसुद्धा चाचपडून पाहायला हवं.

अतिरेक मग तो कोणत्याही गोष्टीचा असो शेवटी वाईटच. सेक्स टॉइजचा तत्कालिक गरजेसाठी वापर करणं ठीक, पण माणूस म्हणून, समाज म्हणून आपली वाटचाल कोणत्या दिशेने चालू आहे, ती कोणत्या दिशेनं असायला हवी याविषयी जागृत राहून विचार करत राहणं महत्त्वाचं आहे. आपल्या गरजांशी प्रामाणिक राहून, आपापल्या परीने स्वतःचा आणि समाजस्वास्थ्याचा शोध घेत जगता आलं तर ते अधिक रास्त ठरेल.

– लेखन : सानिया भालेराव
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments