जगभर कोरोनासारखा आजार आला आणि या आजाराने सर्वांची झोप उडवून दिली. नव्हे अनेकांचे प्राण या आजाराने घेतले आहेत.
पहिली लाट, दुसरी लाट सगळ्यांनीच अनुभवली आहे. आता तिसर्या लाटेचाही सामना करावा लागतो की काय ? अशी परिस्थिती आहे.
कोरोना एवढे भयावह रुप धारण करेल, असे कुणालाही वाटले नव्हते. थोडक्यात निसर्गाच्या असमतोलाचा हा एक भाग असावा, असे वाटू लागले आहे.
या सर्व परिस्थितीचा विचार केला तर असे लक्षात येईल की, निसर्गाचे संतुलन बिघडले आहे, ग्लोबल वॉर्मिंगचा शास्त्रज्ञांनी इशारा दिलाच आहे. त्याचीच तर ही चाहुल नसेल ना ? अशी शंका वाटू लागली आहे.
वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असल्याची ओरड अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. जेवढ्या प्रमाणात वृक्षतोड झाली त्याप्रमाणात ती भरून काढण्यात आली, याबद्दल खात्रीने कुणी सांगत नाही.
सध्या दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत आघाडीचा कलाकार म्हणून नावारुपास आलेला मराठमोळा सयाजी शिंदे मात्र झपाटल्यागत वृक्ष लागवडीबाबत बोलत असतो. नुसतेच बोलत नाही तर कृतीही करतो.
सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये संस्थेने वृक्ष लागवडीचे क्षेत्र कमी असलेल्या बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे. इतकेच नाही तर जशी साहित्य संमेलने भरविली जातात तसे बीड जिल्ह्यात वृक्ष संमेलन भरवून सयाजी शिंदे यांनी लोकांमध्ये वृक्ष लागवडीबाबत जाणीव जागृती निर्माण केली. असे संमेलन भरवणारा एकमेव अभिनेता म्हणजे सयाजी शिंदेच असावा.
वृक्ष लागवडीचे प्रमाण वाढले पाहिजे, यासाठी 28 हजार गावातील सरपंचांना पत्र लिहून गावात वृक्षांचा शतक महोत्सव भरविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. वास्तविक कलेच्या आणि अभिनयाच्या क्षेत्रात पारंगत असलेल्या सयाजी शिंदे यांचा वृक्ष लागवडीबाबत अर्थाअर्थी तसा संबंध नाही. पण सामाजिक जाणीव आणि भान असले पाहिजे, म्हणून ते हे सर्व काही करीत असतात. झपाटल्यागत ते वृक्ष लागवडीबाबत सदैव तत्पर असतात. म्हणूनच आगामी काळात वृक्ष लागवड करणे, ते वाढवणे, रोपांची जोपासना करणे आणि त्याचे एका विशाल वृक्षात रुपांतर होणे आदी गोष्टी कराव्या लागतील. कारण मानवाला आॅक्सीजनशिवाय पर्याय नाही. पाऊस आणि झाडे यांचा अनन्य संबंध आहे.
जमिनीची धूप थांबवण्यात वृक्ष मोठी भूमिका बजावतात. परिणामी ढग तयार होऊन पाऊस पडण्यास मदत होते. निसर्गाच्या विरोधात मानवाची पावले पडत असल्याने त्याचे संतुलन बिघडले आहे. वृक्षांची मोठ्या प्रमाणावर तोड, विकासाच्या नावावर डोंगरचे डोंगर पोखरून रस्त्यासाठी लागणारी खडी आणणे, नदीतून वाळूचा खुलेआम उपसा करणे, जंगलांना आगी लावणे अथवा लागणे, रस्त्यासाठी लागणारी जमीन संपादित करुन शेतीसंपदा नष्ट करणे, नद्यांमध्ये कारखान्याचे रासायनिक पाणी सोडणे, वाहनांच्या सहाय्याने निर्माण होणारा धूर आणि त्यामुळे तयार होणारे प्रदूषण, प्राण्यांची शिकार करणे आदी निसर्ग विरोधी कारवाया आपण करू लागल्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडत आहे.

– लेखन : शेषराव वानखेडे
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
“शाश्वत जीवन ” या लेखा मध्ये मानवा द्वारे होणाऱ्या
निसर्गाच्या ह्रासा मुळे मानवी जीवनावर कशी संकट येत आहेत, हेच या लेखातून वास्तविकता लेखकानं मांडली आहे. आणि हा निसर्गाचा ह्रास कमी करण्यासाठी सयाजीराव शिंदे सारखी व्यक्ती सामाजिक जाण आणि भान ठेवून ; झपाटल्ययागत वृक्ष लागवड करून निसर्गाचा समतोल ठेवण्याचं कार्य करीत आहेत, ते इतरांसाठी निश्चितच प्रेरणादाई आहे. लेखकाला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.
निसर्गाच जतन करण्यासाठी मानसाला जाग करणारा जेष्ठ पत्रकार शेषराव वानखेडे यांचा शाश्वत जीवन हा लघुलेख वास्तव सत्य सांगणारा ! खुपच च्छान !
सन्माननीय अभिनेते सयाजी शिंदे यांचा निसर्गजागर प्रशंसनीय ! प्रेरणादायी 🙏
नमस्कार,
नैसर्गिक संतुलन साधण्यासाठी वृक्ष लागवडीची आवश्यकता,व महत्व सांगणारा लेख अप्रतिम आहे.तसेच
‘सह्याद्री देवराई’ या संस्थे मार्फत सामाजिक कार्य करणारे , जेष्ठ अभिनेते,सयाजी शिंदे यांच्या
अतिशय मोलाच्या कार्याची माहिती देणारे आदरणीय संपादक लेखक यांचे हार्दिक अभिनंदन.