१ ऑक्टोबर हा जागतिक जेष्ठ नागरिक दिन आहे. या निमित्ताने मित्रत्वाचे सल्ले देणारी, सर्वांचे डोळे उघडणारी ही जेष्ठ नेत्रतज्ञ डॉ मधुकर लहाणकर यांची कविता….
मनात खूप साचलं की
कुणाजवळ तरी बोला,
ऐकणाऱ्याचा खांदा
होऊ द्या की ओला.
धरण पूर्ण भरल्यावर
जसे दरवाजे उघडतात,
माणसं तसं वागत नाहीत
म्हणून तब्येती बिघडतात.
त्यामुळेच आग्रह आहे
मन मोकळं करा,
एखाद्या तरी मित्राचा
हात हातात धरा.
जे वाटतं ते बोलून टेन्शन
करा कमी,
व्यक्त होण्यातच
आरोग्याची हमी.
जर कुढत बसाल तर
विपरीत परिणाम होणारच,
बीपी, शुगर, ईसीजी
कमी जास्त होणारच.
दुःख सांगायला कोणी नसणे
जागतिक समस्या आहे
अनेक रोगांचं कारण
हे कुढत बसणं आहे.
रडायला जर जागा नसेल
लावा प्रॉपर्टीला काडी
काय करायचं सोनं चांदी
बंगला फ्लॅट गाडी
हजार वेळेस सांगितलं
माणसं जोडायला शिक
तुला वाटतं पैसा करील
सगळं काही ठीक.
जे होईल ते होईल म्हणून
झुगारून टाका भीती
प्रत्येक क्षण जगून घ्या
नका म्हणू
आत्ता उरले किती ?

– रचना : डॉ. मधुकर लहानकर.