गदिमा
आज १ ऑक्टबर. शब्दप्रभू ग. दि. माडगूळकर यांची जयंती. त्यानिमित्ताने आजची मनातील कविता,त्यांना समर्पित…..
शब्दप्रभू गजानन दिगंबर माडगूळकर
अर्थात, ग. दि. माडगूळकर
अर्थात, गदिमा
कविश्रेष्ठ ग. दि. माडगूळकर यांनी २००० हून अधिक चित्रपट गीते लिहिली. गीतकार, कथासंवादकार आणि अभिनेते म्हणून एकत्रित संख्येने सुमारे १५८ अधिक मराठी चित्रपट केले. कथासंवादकार म्हणून सुमारे पंचवीस हिंदी चित्रपट केले. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी लिहिलेल्या गीतांचा ‘ चैत्रबन ‘ ह्या नावाचा संग्रह आहे याशिवाय ‘ जोगिया ‘, ‘ चार संगीतिका ‘ , ‘ काव्यकथा ‘ , ‘ गीत रामायण ‘, ‘ गीत गोपाल ‘, ‘ गीत सौभद्र ‘ असे काव्यसंग्रह, ‘ कृष्णाची करंगळी ‘ , ‘ तुपाचा नंदादीप ‘, ‘ चंदनी उदबत्ती ‘ असे कथा संग्रह, ‘ आकाशाची फळे ‘ नावाची कादंबरी, ‘ मंतरलेले दिवस ‘, ‘अजून गदिमा’ आणि ‘ वाटेवरल्या सावल्या ‘ असे आत्मचरित्र पर लेखन आहे.
मराठी साहित्य आणि मराठी चित्रपट ह्यात ग. दि. माडगूळकरांना अनन्यसाधारण महत्व आहे.
शब्द म्हणजे काय?
तर अक्षरांचा असा समूह ज्यास काही अर्थ प्राप्त आहे. आपले, निदान माझे शब्द तरी केवळ ह्या व्याख्येपुरते सीमित आहेत.
पाच मूलभूत तत्वे आहेत ज्यापासून पंचमहाभूतांची उत्पत्ती होते. ‘ शब्द ‘ म्हणजे आकाश महाभूताची तन्मात्रा! आकाशाचे मूलतत्त्व म्हणजे शब्द. ज्यापासून आकाश निर्माण होते तो ‘शब्द’.
‘ ज्यात साऱ्या भावना विहरू शकतील ‘ असे आकाश निर्माण करण्याची दैवी क्षमता असणारे शब्द म्हणजे कवीवर्य ग. दि. माडगूळकर यांचे शब्द!
केवळ अर्थप्राप्त अक्षरसमुहापुरते मर्यादित न रहाता ज्यांच्याद्वारे आपल्याला इतर तत्वे म्हणजे ‘ स्पर्श ‘, ‘ रूप ‘, ‘ रस ‘, ‘ गंध ‘ ह्या साऱ्याचीच प्रचिती येते आणि केवळ श्रोत्रेंद्रियालाच नव्हे तर इतर चतुरेंद्रियांनाही भावनेची अनुभूती होते, असे शब्द म्हणजे १ ऑक्टोबर १९१९ रोजी जन्मलेल्या शब्दप्रभू ग. दि. माडगूळकर यांचे शब्द!
माझे मन भावनेने उचंबळून आले आहे…
मागील आठवड्यात मी, ‘ मनातील निर्मळ इच्छा, त्यासाठी झटणारे ब्रह्मांड आणि जुळून येणारे योगायोग ‘ याबद्दल लिहिले. कवीवर्य केशवसुत आणि कवीवर्य गोविंदाग्रज यांच्या जोडीस भगवान श्रीराम आणि परमवीर हनुमंत यांची उपमा दिली आणि आज, सुंदर योगायोग… ग. दि. माडगूळकर नाव धारण केलेल्या आधुनिक वाल्मिकींबद्दल लिहिते आहे…
‘ ज्ञानियाचा वा तुक्याचा
तोच माझा वंश आहे
माझ्या रक्तात थोडा
ईश्वराचा अंश आहे…’
हे कवीवर्य माडगूळकरांचे शब्द.
मी एक ‘ शब्दपंगू ‘ आहे. ह्या शब्दप्रभूंचे आणि त्यांच्या काव्याचे वर्णन करण्यासाठी मला त्यांच्याच शब्दांचा आधार घ्यावा लागणार ह्यात शंका नाही. त्यांचे वर्णन वरील त्यांच्याच शब्दांत यथार्थ करता येईल. खरोखर हा ईश्वरी अवतार आहे.
कवी, गीतकार, कथाकार, पटकथाकार, अभिनेता, संवादलेखक, नाटककार, संपादक, वक्ता, स्वातंत्र्यसेनानी या प्रत्येक उपाधीचे मानकरी असणे, नवरसांपैकी प्रत्येक छटा दाखवणारी २००० हून अधिक चित्रपटगीतांची रचना करणे, कविता, बाल कविता, भक्तीगीते, भावगीते यांची रचना करणे हे सारे अलौकिक आहे, ईश्वरी आहे. त्यांच्या प्रत्येक कवितेचा किंवा गीताचा उल्लेख करणं अशक्य आहे. शब्दांत मावणारे हे व्यक्तीमत्व नव्हे. शब्द गदिमांची ओळख देवू शकत नाहीत तर गदिमा शब्दांना ओळख देतात.
ज्या ‘ गीत रामायणाने ‘ गदिमांना प्रत्येक घरातच नव्हे तर प्रत्येक मनात पोहोचवले त्याचा उल्लेख मी सर्वप्रथम करते. गीत रामायणाचे शब्द, छंद भारावून टाकतात किंबहुना त्या शब्दांचे योग्य कौतुक करणारे शब्द अस्तित्वातच नाहीत. मला ज्या कारणाने गीत रामायणाची गोडी लागली, अगदी वेड लागले ती म्हणजे त्या शब्दांतून होणारी भावविश्व निर्मिती. रामायण कथांचे आणि वक्तींचेच वर्णन परंतू ते असे की, त्या वर्णनापलिकडे जावून काहीतरी जागृत करणारे…
‘ स्वये श्री रामप्रभू ऐकती
कुश लव रामायण गाती…
सोडून आसन उठले राघव
उठून कवळीती अपुले शैशव
पुत्र भेटीचा घडे महोत्सव…
ह्यात आहे ते दरबारात घडणाऱ्या त्या अभूतपूर्व घटनेचे केलेले वर्णन. मात्र ह्यापुढल्या ओळीत ‘ परि जो उभया नच माहिती ‘ म्हणत अंतःकरणाला केलेला स्पर्श!
दैवी आहे हे सगळं!
‘ राम जन्मला ग सखी…
पेंगुळल्या आतपांत जागत्या कळया
‘ काय काय ‘ करित पुन्हा उमलल्या खुळ्या
उच्चरवे वायु त्यांस हसुंन बोलला…’
सृष्टीत आलेले चैतन्य, निसर्गास आलेली संतोषाची जाग आपल्याच धमन्यात वहाते आहे असे वाटू लागते. याचे एकमेव कारण म्हणजे एक प्रभू जन्म घेत होते आणि एक प्रभू त्याचे वर्णन करणाऱ्या शब्दांना जन्म देत होते.
‘ माता न तू वैरिणी…
तुला पाहतां तृषार्त होते या खड्गाची धार
श्रीरामाची माय परि तू, कसा करू मी वार?
कुपुत्र म्हणतील मला कैकयी, माता दोघी जणी…’
भरताचा क्रोध, श्रीरामावरचे त्याचे प्रेम आणि केवळ कैकेयी त्यांचीही माय म्हणवते ह्यामुळे बांधले गेलेले त्याचे हात, ह्यात टोकाचे वेळी देखील भरताने राखलेला धर्म आणि राखलेला संयम, त्याची स्वतःच्या मातेबद्दल निर्माण झालेली अलिप्ततेची भावना आणि सावत्र मातांबद्दल असलेला परमादर… हे सगळं ह्या शब्दांनी जन्माला घातलेलं…
‘ दैवजात दुःखे भरतां दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा…
ह्याची प्रत्येक ओळ म्हणजे दिव्य तत्वज्ञान
‘ जिवासावें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात
दिसे भासतो तें सारे विश्व नाशवंत
काय शोक करिसी वेड्या, स्वप्निंच्या फळांचा?…
दोन ओंडक्यांची होते सागरात भेट
एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाहिं गांठ
क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा…’
ह्यात शब्दांच्या रचना तर इतक्या सुंदर केलेल्या आहेत. ‘ चौदा वर्षे संपल्यावर मी परत येईन ‘ हे सांगताना कवीवर्य यमक आणि छंद दृष्टीने चौदा ऐवजी ‘ दशोत्तरी चार ‘ असा प्रयोग करतात.
‘ धन्य मी शबरी श्रीरामा!
लागलीं श्रीचरणे आश्रमा…’
ह्यात रचनाकार केवळ शबरी आणि रघुरायांचा विचार न करता…
‘ का सौमित्री, शंकित दृष्टी?
अभिमंत्रित तीं, नव्हेत उष्टीं…’
या शब्दांद्वारे लक्ष्मणाच्या मनात त्यावेळी झालेली चलबिचल ही दाखवून देतात. प्रत्येक ओळीत, प्रत्येक रचनेत त्या प्रसंगात घडणारी बाह्य घटना आणि त्यातील व्यक्तींच्या मनात उठलेले वादळ ह्याचा असा हा अनुपम मिलाफ !
गीत रामायणात अश्या शेकडो जागा आहेत. लिहीन तितके अपुरे आहे. माझ्यात ती क्षमताच नाही. ब्रह्माकृत नाट्यवेद सामान्यांना अनाकलनीय असल्याने भरातमुनिंनी नाट्यशास्त्राची निर्मिती केली आणि त्याची गोडी वाढवली. त्याप्रमाणे वाल्मिकी ऋषीकृत रामायण आम्हां सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘ ग. दि. माडगूळकर ‘ नावाच्या तपस्वीने जन्म घेतला आणि त्याची गोडी वाढविली. त्यांच्या भाषाशैलीवर आणि छंद योजनेवर काही भाष्य करावे इतकी माझी पात्रता नाही. माझ्यासारखीने केवळ त्यांची आरती गावी.
आता त्यांच्या कवितांकडे वळते…
माझी, माझीच का, प्रत्येकच स्त्रीची, प्रत्येक कन्येची अत्यंत जवळची कविता म्हणजे ‘ माहेर ‘. नदीचे सागरास मिळणे, त्यांचे चिरंतन प्रेम, सर्वस्वार्पण भाव याबद्दल कितीतरी काव्यरचना आहेत परंतु महाकवी गदिमा लिहितात…
‘ सारे जीवन नदीचे
घेतो पोटात सागर,
तरी तिला आठवतो
जन्म दिलेला डोंगर…’
असे म्हणून मुलीच्या मनातील माहेरची ओढ, जन्मदात्यांचे मनातील अढळ स्थान आणि त्यांचे विषयीचे कधीही न आटणारे प्रेम वर्णितात.
‘ डोंगराच्या मायेसाठी
रूप वाफेचे घेऊन
नदी तरंगत जाते
पंख वाऱ्याचे लावून.
पुन्हा होउन लेकरु
नदी वाजवते वाळा,
पान्हा फुटतो डोंगरा
आणि येतो पावसाळा. ‘
‘ सागराशी ‘ मिलन झालेल्या माझी देखील काही तक्रार नाही. तरीही, माझाही ‘ डोंगर ‘ मला अखंड स्मरत रहातो, अखंड खुणावत रहातो. मी देखील वाट पहाते आहे त्या दिवसाची, जेव्हा असेच स्वच्छ, शुभ्र पंख फुटलेली मी तरंगत जाईन, माझ्या जन्मदात्याला पुन्हा एकदा कडकडून भेटेन आणि पुन्हा एकदा लेकरू होऊन त्या ‘ डोंगराचे ‘ पोटी जन्म घेईन.
गदिमांची कविता ही व्याकरण, भाषा, वृत्ते, स्वरूप, प्रतीक, प्रतिमा ह्या साऱ्या साऱ्या पलिकडची आहे.
आत्मा अमर असतो, तो केवळ शरीर बदलतो.
‘ भाव ‘ हा गदिमांच्या काव्याचा आत्मा आहे. मग कधी ते शब्द कवितेचे रूप घेतात, कधी गीतांचे, तर कधी बालगीतांचे. कविता, चित्रपट गीते, बालगीते, लावण्या… रूप कोणतेही असो, त्याचा परम पवित्र आत्मा म्हणजे भावनात्मकता! ती गदिमांच्या शब्दांत चिरंतन आहे.
‘ जसा जन्मतो तेज घेऊन तारा!
जसा मोर घेऊन येतो पिसारा!
तसा येई घेऊन कंठात गाणे!
असा बालगंधर्व आता न होणे!…’
असे उद्गार आपल्या कवितेत गदिमा यांनी बालगंधर्वांबद्दल काढले आहेत. कवीवर्य स्वतःच शब्द सृष्टीचे गंधर्व आहेत. कवीवर्य, क्षमा असावी परंतु ‘ असा शब्दगंधर्व आता न होणे ‘ हे देखील तितकेच सत्य आहे.
‘ जोगिया ‘
‘ कोन्यात झोपली सतार, सरला रंग
पसरली पैंजणे सैल टाकूनी अंग,
दुमडला गालिचा, तक्के झुकले खाली
तबकात राहीले देठ, लवंगा, साली…’
गदिमांच्या शब्दांची जादू, त्यांची मोहिनी काही विलक्षण असते. त्यांचे काव्य स्वतःच एक व्यक्तीमत्व असते. त्यात केवळ शब्द नसतात तर ती एक परिपूर्ण कलाकृती असते. त्यात केवळ शब्द नसतात तर त्याबरोबरच दुमडलेल्या गालीचांचा आपल्या बोटांना झालेला स्पर्श असतो, तबकात उरलेल्या नागवेलीच्या पानाच्या देठांचा, लवंगांचा अनुभवलेला हलकासा गंध आणि रस असतो, चलचित्राप्रमाणे ही दृश्ये आपल्याला रूप दाखवतात.
‘ जोगिया ‘ ही एक न सजलेली मैफिल आहे. कदाचित शून्यात नजर लावून बसलेली गणिका त्यात आहे, जिच्या मनात आता एक मैफिल सजली आहे, रोम अन् रोम त्याची साक्ष देत आहेत, जिला केवळ एक विचार, एक आठव व्याकूळ करतो आहे आणि जलमय नेत्र आणि स्वरांत ती आता एक ‘ जोगिया ‘.आळवित आहे…
” मी देह विकुनीया मागून घेते मोल,
जगविते प्राण हे ओपुनीया ‘अनमोल’,
रक्तांत रुजविल्या भांगेच्या मी बागा,
ना पवित्र, देही तिळाएवढी जागा.
शोधीत एकदा घटकेचा वि़श्राम
भांगेत पेरुनी तुळस परतला श्याम,
सावळा तरुण तो खराच गं वनमाली
लाविते पान…तो निघून गेला खाली
अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव
पुसलेही नाही मी मंगल त्याचे नाव;
बोलला हळू तो दबकत नवख्यावाणी
‘मम प्रीति आहे जडली तुजवर राणी’
नीतिचा उघडिला खुला जिथें व्यापार
बावळां तिथें हा इष्कां गणितो प्यार;
हांसून म्हणाल्यें, ‘दाम वाढवा थोडा…
या पुन्हा, पान घ्या…’ निघून गेला वेडा!
आयुष्याने दाखवलेले क्षण कधी कधी मानवी मनाला अगदी मिट्ट अंधारात लोटून देतात. एकदा बऱ्या वाईटाच्या जाणीवा मेल्या की उरतो तो केवळ शरीरधर्म. अश्या जिवंत कलेवरात प्राण ओतण्याचे, त्याचा आत्मा पुनर्जीवित करण्याचे सामर्थ्य जर कशात असेल तर ते खऱ्या प्रेमात. मग कधी हा सोहोळा असतो जन्मभराचा, कधी चार क्षणांचा!
प्रेम नको का असतं कुणास? पण कधी कधी वास्तविकता इतकी भयाण असते की हे उमलू पहाणारे फूल आधीच आगीत होरपळून जाते.
वरवर पहाता ‘ त्याच्या ‘ प्रेमाचा ‘ तिने ‘ केलेला अव्हेर किंवा दिलेला नकार आणि अंतरी मात्र केवळ त्या एका दिवसाच्या, त्या एका क्षणाच्या, त्या एका आठवणीच्या पवित्र चैतन्य ज्योतीमुळे तेवणारा तिचा प्राण!
‘ तो हाच दिवस, हीच तिथी, ही रात,
ही अशीच होत्यें बसलें परि रतिक्लांत,
वळुनी न पाहतां, कापित अंधाराला
तो तारा तुटतो – तसा खालती गेला.
हा विडा घडवुनी करितें त्याचे ध्यान,
त्या खुळ्या प्रीतिचा खुळाच हा सन्मान;
ही तिथी पाळितें व्रतस्थ राहुनि अंगे
वर्षात एकदा असा ‘जोगिया’ रंगे.”
ह्या कवितेच्या रंगास काय नाव देवू? त्याचे काय वर्णन करू?
आयुष्याच्या संध्याकाळी रंगणाऱ्या मैफिलीही अश्याच असाव्यात कदाचित… आयुष्यातल्या बरबटलेल्या कर्मांचे चित्र आणि त्यात हातातून निसटून गेलेल्या कोवळ्या, साजऱ्या न होवू शकलेल्या क्षणांच्या आणि आत खोल दाबून ठेवलेल्या भावनांच्या उजळण्या…अटळ असा हा ‘जोगिया ‘ कळत नकळत तेंव्हा प्रत्येकजण गात असेल.
‘ जन्म – मृत्यू ‘ नावाची कवीवर्यांची एक सुंदर कविता! साऱ्या अध्यात्माचे दर्शन एका कवितेत घडते. जन्माचे आंधळेपण आणि मृत्यूचे डोळसपण आणि ह्यात मध्ये झुलणारे एक स्वप्न, एक मिथ्य म्हणजे आयुष्य!
‘ भास स्वप्नातील काही
सुखवीती त्याच्या मना
त्याच मनातील दुःखे
जाळीती त्या जीवना
प्रेम, नाती, लाभ, हानी,
कीर्तिसुद्धा कल्पना.
देव आणि दैव याही,
सत्य ना, संकल्पना…’
मनुष्याला भ्रमातून जागे करून भौतिक जगाच्या पोकळपणाची जाणीव करून देणारी ही कविता!
साध्या सोप्या शब्दांत मनुष्य जीवनाचे किंवा आत्मोन्नतीचे तत्वज्ञान सांगण्याची कवीवर्यांची अगाध शैली. अश्याच रंगाची आणखी एक कविता म्हणजे ‘ सुख ‘
‘ एका वटवृक्षाखाली, बसुनिया दोन श्वान
एकमेकांना सांगती, अनुभव आणि ज्ञान…’
एक वयाने जरा मोठा, अनुभवी असणारा श्वान आणि एक नुकतेच जगाची रीत शिकू पहाणारा, वयाने बालक असणारा. त्यांचा हा संवाद,त्यांनी एकमेकांना सांगितलेल्या सुखाच्या व्याख्या.
” मला वाटते आजोबा, सुख माझ्या शेपटात
सदाचाच झटतो मी, त्यास धराया मुखात
माझ्या जवळी असून, नाही मज गवसत
उगाचच राहतो मी, माझ्या भोवंती फिरत ”
ऐहिकाचे आकर्षण कुणालाच टळत नाही. तीच आपली सुखाची कल्पना असते. कित्येकदा आपल्या मनाच्या गाभाऱ्यात सुख ओथंबून वहात असतानादेखील मन असे बाह्य जगात सुख शोधत रहाते. आणि मग सारा जीवनानुभव गोळा केलेल्यांना अवगत होते ते हे…
‘ बाल श्वानाच्या प्रश्नाला देई जाणता उत्तर –
तुझे बोलणे बालका, बिनचूक बरोबर –
परि शहाण्या श्वानाने, लागू नये सुखापाठी
आत्मप्रदक्षिणा येते, त्याचे कपाळी शेवटी.
घास तुकडा शोधावा, वास घेत जागोजाग
पुढे पुढे चालताना पुच्छ येते मागोमाग.’
जन्माला आल्यानंतर ईश्वराने नेमून दिलेले कर्म, आपल्या अवताराचा धर्म सांभाळणे हेच महत्वाचे, सुखे आपोआप मागे येतात. परंतू असे न करता भलत्या सुखाच्या मागे लागणे म्हणजे ह्या जन्मोजन्मीच्या फेऱ्यांमध्ये अडकून पडणे. अधिकारी पुरुष, गुरू तरी ह्याहून वेगळा कोणता अनुग्रह देतात? हे ज्ञान ह्याहून सोप्या पद्धतीने, ह्याहून सोप्या रूपकांनी सांगता येईल कोणाला? हीच कवीवर्यांची श्रेष्ठता आहे.
‘ शपथ ‘ नावाची शृंगार रसाचा मोहक आविष्कार असणारी कविता असो, ‘ मृग ‘ नावाची रमणीय निसर्गपर कविता असो गदिमांची प्रतिभा तेजस्वी सूर्याप्रमाणे झळझळते.
‘ मेघदूत ‘ ही आणखी एक माझी अतिशय लाडकी कविता…
मेघा समवेत प्रेमाचे, विरहाचे संदेश पाठवणारे काव्य आपण अनेक वाचले आहे. कवीवर्यही मेघाबरोबर एक संदेश पाठवतात परंतू तो काळीज पिळवटून टाकणारा…
‘ जा घेउन संदेश!
मेघा, जा घेउन संदेश!…
रणांगणावर असतिल जेथे
रणमर्दांची विजयी प्रेते
गगनपथाने जाउन तेथे
प्राणसख्याच्या कलेवराचा निरखुन बघ आवेश…’
वीर, शृंगार, करुण सगळ्या रसांची ही अशी परमेश्वरी शब्दांत होणारी आकारणी. यापुढे जावून कवितेतील नायिका म्हणते…
‘ अर्धविलग त्या ओठांवरती
जलबिंदूचे सिंचून मोती
राजहंस तो जागव अंती
आण उद्याच्या सेनापतिला जनकाचा आदेश…’
एका मातेचे हे अकल्पनीय धैर्य. पतीस रणांगणी गमावलेले असताना त्यास धाडलेला अखेरचा संदेश कोणता तर पोटातल्या गर्भासाठी जगण्याचे आणि भविष्यासाठी एक नवा सैनिक निर्माण करण्याचे वचन देणारा.
‘ हे राष्ट्र देवतांचे ‘, ‘ जिंकू किंवा मरू ‘, ‘ सैनिक हो तुमच्यासाठी ‘, ‘ वेदमंत्राहून आम्हां वंद्य वंदे मातरम् ‘ यासारख्या देशप्रेमपर गीतांचे रचनाकार तेच, ‘ आई मला नेसव शालू नवा ‘, ‘ ऐन दुपारी यमुनातीरी ‘, ‘ बुगडी माझी सांडली ग ‘, अश्या अनेक लावण्यांचे रचनाकारही तेच आणि ‘ इंद्रायणी काठी देवाची आळंदी ‘, ‘ कानडा राजा पंढरीचा ‘, ‘ कुंभारासारखा गुरू नाही रे जगात ‘, ‘ रामा रघुनंदना ‘, ‘ तुझे रूप चित्ती राहो ‘, ‘ उठ पंढरीच्या राजा ‘ यासारख्या अनेक भक्ती गीतांच्या रचना देखील त्यांच्याच.
अश्या सहस्त्राहून अधिक अनमोल रचना करणाऱ्या ह्या शब्द गंधर्वाने १४ डिसेंबर १९७७ रोजी आपले इहलोकीचे अवतार कार्य पूर्ण केले.
माझ्यासारख्या कित्येकांच्या बालपणीच्या संस्कारांचा काळ हा ‘ गदिमा मय ‘ आहे. परमेश्वर भक्तीचे एक निरतिशय आगळे रूप ज्या गीतांनी मला शिकवले त्यातली बहुतांशी गदिमांच्या लेखणीतून अवतरलेली आहेत. अभंगांच्या रचना परमेश्वराच्या स्तुतीसाठी झाल्या ह्यावर माझा विश्वास नाही. परमेश्वरी रूप स्वतःत अवतरावे म्हणून त्यांचे प्रयोजन आहे.
परमेश्वराची चरित्रे वाचायची, गायची कशासाठी? तर त्यातले मर्म ओळखून त्याप्रमाणे आपला स्वभावधर्म घडावा ह्यासाठी.
‘ देव देव्हाऱ्यात नाही देव नाही देवालयी ‘…हे गदिमांचे शब्द माझ्या मनावर अगदी पक्के ठसले आहेत आणि म्हणूनच गीत रामायणाच्या शब्दांनी नकळत एक ‘ रामालय ‘ ‘ आत ‘ उभे करण्याची प्रेरणा दिली आहे. शब्दप्रभू गदिमा, ह्या ‘ रामालयाचे ‘ भूमिपूजन, पाया भरणी आणि उभारणी सोहोळ्यांची स्फूर्ती आपल्या शब्दांनी मला दिलेली आहे. आपल्या चरणी वंदन करून मी आज आपल्या जयंतीचे दिवशी त्याचे द्वार उघडते आहे 🙏🏻
रामालय
राघव कथेचा अर्थ; मी मजपुरता एक सांधला,
साकल्य स्नेह भावनांचा शाश्वत सेतू बांधला
मर्यादेस मार्दवासी हा दिव्य सेतू जोडतो,
ईश्वरी कार्यास करण्या कोटी लाभती हात हो
ध्यास जेंव्हा भूमिजेसी ; व्योमास दे आलिंगने,
मार्गी तेंव्हा छल विपदांची उपद्रवी दशानने
अवतरे अंतरी रघुराय; धैर्य शौर्य धर आयुधे
रक्षिण्या पावित्र्य अस्मितेचे; दृढता निश्चय विधे
शक्ती आणि शांती आता रामालयासी नांदती
उभे सकल वेदही तयाची नित्य गाया आरती
कर्तव्य रूपी राम आणिक प्रीत रूपी जानकी,
मिलन त्यांचे घडविणारा हा प्राण माझा वाल्मिकी !

– लेखन : डॉ. गौरी जोशी-कंसारा, अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800
मनःपूर्वक आभार 🙏🏻
गदिमा वरील सुंदर लेख वाचला. त्यांच्या काव्यातील शब्द ,ताकद जबरदस्त!