सून ले बापू ये पैगाम
राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची २ ऑक्टो. रोजी १५३ वी जयंती. या निमित्त बापुजींना विनम्र अभिवादन.
म.गांधीजी आणि त्यांच्या विचारांची संपूर्ण जगावर आज ही मोहिनी आहे. साहजिकच सिनेमा माध्यमातून त्यांचे जीवनदर्शन होत असते.
रिचर्ड एटंनबरो दिग्दर्शित बेन किंग्जले अभिनित सुमारे आठ ऑस्कर प्राप्त गांधी (१९८२) चित्रपटापासून ते ‘बापुकी अमर कहाणी’ ते कमाल हसन यांच्या
” हे राम “(२०००) आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ (२००६) पर्यंत त्यांचा विचार जगभर विविध कलाकृतीतून निनादत असतो.
बापूचे आवडते भजन आणि प्रार्थना, विशेष करून त्यांची संदेश देणारी विविध गाणी करोडो श्रोत्यांच्या मनात घर करून आहेत.काही निवडक हिंदी गीतांचा आजच्या सदरात मागोवा.
‘सुमन कल्याणपूर’ यांच्या आवाजातील बालक (१९६९) सिनेमातील हे गाणं. मनमोहन कृष्ण आणि सारिका या कलाकारांवर चित्रित मधुर गीत.
‘सून ले बापू ये पैगाम/ मेरी चिठ्ठी तेरे नाम/ चिठ्ठी मे सबसे पहले/ लिखता तुझको राम राम / काला धन काला व्यापार/ रिश्वत का है गरम बाजार/सत्य अहिंसा करे पुकार/लुट गया चरखे का तार/तेरे अनशन सत्याग्रह के/ बदल गये असली बर्ताव/ एक नई विद्या उपजी है/ जिसको कहते है घेराव/ तेरे कठीण तपस्या का/ ये कैसे निकला अंजाम/..
एक विद्यार्थिनी शालेय कार्यक्रमात आपल्या अवती भोवती जे भ्रष्टाचार, काळाबाजार आणि लाचखोरीचे वातावरण आहे ते पाहून दु:खी होत बापुजींना एक पत्र लिहून वेदना कळवीत आहे, असे चित्रीकरण आहे. संपूर्ण भारतीयांच्या मनातील या भावना आजही कायम आहे.
* जागृती(1954) सिनेमा आठवतो तो त्यातील ‘आओ बच्चों तुम्हे दिखाये झांकी हिंदुस्थान की/ इस मिट्टी से तिलक करो ये धरती है हिंदुस्तान की’या कवी प्रदीप यांनी लिहिलेल्या गीतामुळे.याच सिनेमातील ‘आशा भोसले’ यांचा आवाज आणि हेमंत कुमार यांनी संगीत दिलेले, ‘दे दी हमे आजादी तूने खडग बिना ढाल /साबरमती के संत तूने कर दिया कमाल/ आंधी मे जलती रहे गांधी तेरी मशाल/ हे गीत खूपच प्रेरक आहे. गांधीजींच्या पुतळ्यासमोर एका अपंग विद्यार्थ्यासह गायलेले हे समूह गीत रोम रोम पुलकित करणारे, या महात्म्याने केलेल्या कार्याचे गुणगौरव करणारे देशभक्तीपर गीत आहे.
* ‘सुनो सुनो ये दुनिया वालो/ बापू की ये अमर कहाणी’ हे बापू की अमर कहाणी (१९४८)सिनेमातील एक सदाबहार गीत.मोहमद रफी यांच्या आवाजातील आणि हंसराज भगतराम यांनी संगीत दिलेले गीत.गांधीजींच्या संपूर्ण जीवन आणि कार्याचे वर्णन करणारे हे गीत खूपच लोकप्रिय गीत,आज नव्या पिढीला फारसे माहित नाही.
पण संजय दत्त, विद्या बालन, अर्शद वर्षी बोमन इराणी आणि दिलीप प्रभावळकर यांनी अभिनय केलेला ‘लगे रहो मुन्ना भाई’ मात्र गांधीच्या सत्याग्रह विचाराची महती पटवून देण्यात यशस्वी झाला.विनोदी आणि मसालापटाची झालर असली तरी अन्यायाचा प्रतिकार कोणताही हिंसाचाराचा मार्ग न अवलंबिता, सत्याचा आग्रह धरीत कसा करायचा हे शिकवून गेला. त्यातील ‘बंदे मे था दम’ हे सोनू निगम आणि श्रेया घोशाल यांनी गायलेले गीत तर लाजबाब. गीत आहे .. ओ आजा रे ओ आजा रे / माटी पुकारे तुझे देश पुकारे/ आजा रे अब राह दिखा रे/ वंदे मातरम .. स्वानंद किरकिरे, विधू चोप्रा लिखित हे गीत शांतून मोइत्र यांनी सजविले आहे.
‘गुण धाम हमारे गांधीजी’(१९६०) या सिनेमातील ‘गुण धाम हमारे गांधी जी शुभनाम हमारे गांधीजी/ ये भारत माता के प्यारे गांधीजी/ हे एस डी बर्मन यांनी आवाज आणि संगीत दिलेले एक दुर्मिळ गीत आहे.
‘वैष्णव जन तो तेने कहिये’ हे महात्मा गांधी यांचे आवडते भजन. बापूनी लोकाना एकत्र करण्यात आणि त्यांचा स्वातंत्र्य चळवळीत सहभाग वाढविण्यासाठी प्रार्थना सभांचा उपयोग केला. प्रचार ,प्रसाराची मर्यादित साधने असताना आपले विचार व संदेश जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी हे तंत्र वापरले गेले. त्यांचे आवडते भजन.. ‘वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीर पराई जाणे रे/ पर दु:खे उपकार करे तोये, मन अभिमान न आणे रे/ सकाळ लोक मा सहुने वंदे, निंदा न करे केनी रे/ संत नरसी मेहता लिखित लताजीच्या आवाजातील हे भजन आजही श्रवणीय आहे. त्याचा अर्थ समजावून घेतला तर त्यातील एक एक शब्द मनात प्रकाश पेरतो.
’रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम’ हे अनुप जलोटा यांच्या आवाजातील असेच एक लोकप्रिय भजन. गांधीजी एक विचार आहेत.विचार कधी मरत नाहीत. ते कालातीत असतात. भारताला स्वातंत्र मिळवून देणारे आणि सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह यांचा आग्रह धरणारे गांधीजी आजही त्यामुळे लोकांच्या मनात रुतून आहे. सिनेमा माध्यमाने त्यांचा हा विचार प्रसार करण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे.

– लेखन : डॉ. त्र्यंबक दुनबळे
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800