Thursday, July 3, 2025
Homeलेखबातमीदारी करताना भाग ७

बातमीदारी करताना भाग ७

बातमीदारी करताना हे सदर दर शुक्रवारी प्रसिद्ध होत असते. पण गेल्या शुक्रवारी ग दि मा यांच्या व शनिवारी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विशेष लेख असल्याने हे सदर आज प्रसिद्ध करीत आहोत.
– संपादक

डाकूफेम आशा गोपाल
वृत्तसंस्थेच्या पुण्याच्या बातमीदाराला पुणे शहराखेरीज सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि अहमदनगर अशा शेजारच्या जिल्ह्याच्या घटनांकडे लक्ष ठेवायला लागते. त्याचप्रमाणे ग्वाल्हेरच्या बातमीदाराला ग्वाल्हेरखेरीज मोरेना, भिंड, शिवपुरी आणि दतिया या लगतच्या जिल्ह्यांमध्ये काही महत्त्वाचे घडत असेल तर त्याचे कव्हरेज त्याने करणे अपेक्षित असते.
मी तेथे असताना मला शेजारच्या उत्तर प्रदेशच्या झांसी कडे देखील नजर ठेवणे अपेक्षित होते.

एकदा तर उत्तर प्रदेशच्या आग्रा स्टेशन मध्ये मध्यरात्रीनंतर मोठा रेल्वे अपघात झाला. त्यासाठी मला दिल्लीच्या संपादकांनी ‘त्वरित जा’ असा फोन वरून संदेश दिला. पूर्ण दिवस मी त्या कव्हरेज मध्ये गुंतून पडलो होतो.  पण असे प्रसंग थोडे….

एकदा मला शिवपुरी या जिल्ह्याच्या ठिकाणी माधवराव शिंदे (सिंदिया) यांच्याबरोबर एका कार्यक्रमासाठी जायची संधी मिळाली होती. त्यांना ‘महाराज’ असेच म्हणत. संस्थानचे भूतपूर्व संस्थानिक आणि लोकसभा सदस्य या नात्याने त्यांना अजूनमधून शिवपुरी ला देखील जावे लागे. ग्वालियर च्या स्थानिक बातमीदारांना सोबत घेऊन ते जायचे. या भागात प्रवास केला की काँग्रेसच्या या तरुण नेत्याची लोकप्रियता किती आहे हे कळायचे.

माझ्या लक्षात राहिलेली एक छोटीशी गोष्ट मला सांगावीशी वाटते. ती म्हणजे माधवराव महाराजांच्या राजवाड्यातून आलेला जेवणाचा डबा खूप साधा असे. मुख्य म्हणजे इतरांसाठी चपाती, रोटी, भात, बटाट्याची भाजी असे पदार्थ असत. पण एकदा माझ्या घरी करतात तशीच मेथीची कोरडी भाजी आणि ज्वारीची भाकरी असा डबा होता. यात त्यांची व्यक्तिगत आवडनिवड किती साधी होती हा तर भाग होताच पण त्याखेरीज शिंदे यांचे महाराष्ट्राशी असलेले नाते हे देखील दिसून येत असे. ग्वाल्हेरच्या वास्तव्यात चार-पाच वेळाच आमची भेट झाली असेल पण मी मराठी आहे हे लक्षात ठेवून ते थोडे फार मराठी मुद्दाम माझ्याशी बोलायचे.

त्या काळात शिवपुरीचं एक मोठं कव्हरेज मी केलं. पण ते मुख्यतः माझ्या ग्वाल्हेरच्या कार्यालयातून शिवपुरी च्या पोलीस स्टेशनला फोन वरून मिळालेल्या माहितीच्या आधारे. त्या कव्हरेज साठी श्रीमती आशा गोपाल या डॅशिंग पोलीस ऑफिसरला भेटून खूप काही लिहायची माझी इच्छा होती. पण प्रत्यक्षात या बाईंना भेटायची संधी मिळालीच नाही.

आशा गोपाल यांची ख्याती पूर्ण मध्य प्रदेश मध्ये झालेली होती. त्या वेळी देशभरात फक्त सोळा महिला आय पी एस अधिकारी होत्या. दिल्लीला किरण बेदी ह्यांचे नाव तेव्हा झाले होते. अगदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बेकायदा पार्किंग केलेल्या गाड्या क्रेनने स्वतः दिल्लीच्या प्रमुख रस्यावर उभे राहून जप्त करण्यामुळे त्या प्रसिद्ध झाल्या होत्या. तशीच कीर्ति आशा गोपाल यांची देखील माझी बदली तेथे होण्या आधीच झाली होती.

शहराच्या रोड रोमिओना जरब बसेल अशा पद्धतीने त्यांनी साध्या सिव्हिल ड्रेसमध्ये धडाकेबंद कारवाई सुरु केली होती. सामान्य तरुणी वाटेल असा त्यांचा पेहेराव असायचा. महिलांची छेडछाड करणाऱ्या लफंग्याची सिनेमा थिएटर मध्ये अचानक शिरून त्या भरपूर धुलाई करत. त्या स्वतः आणि त्यांच्या हाताखालचे, साध्या कपड्यातले पोलीस कॉन्स्टेबल या गुंडांना बडवत चित्रपटगृहाबाहेर बाहेर सर्वांसमक्ष घेऊन जात. त्याचा परिणाम शहरभर होत असे. भरभरून बातम्या आणि फोटो येत.

अगदी लहान चणीची असलेलेही ही तरुण अधिकारी त्यामुळे सामान्य लोकात अतिशय लोकप्रिय झाली होती. भुरटे गुन्हेगार लपून छपून वावरायला लागले होते. पण हे विषय सर्व खूप स्थानिक पातळीचे असल्यामुळे मला यात रोज लिहावे असे काही नव्हते.

माझं ग्वाल्हेरचं कार्यालय आणि शिवपुरी शहर यात ११६ कि मी अंतर होतं. रस्ते तेव्हा धड नव्हते. त्यामुळे श्रीमती आशा गोपाल यांना आज-उद्या सवडीने भेटू असं करीत भेटायचं राहून गेलं. भेटलंच हवं होतं अशी वेळ आली तेव्हा बाईंनी केलेल्या मोट्या पराक्रमाची माझ्या स्थानिक पत्रकार मित्राने सकाळीच टीप दिली तेव्हा.

शिवपुरी च्या निबिड जंगलात रात्रीच्या अंधारात लपत छपत सुमारे शंभर सव्वाशे शस्त्रधारी पोलिसांचं नेतृत्व करीत आशा गोपाल यांनी पाच दरोडेखोरांचा खातमा केला अशी ती खबर होती.

देवी सिंग याच्या गॅंगला जिवंत अथवा मृत पकडून देणाऱ्यास हजार रुपयाचे पारितोषिक शासनाने जाहीर केले होते. गँगचा म्होरक्या देवीसिंग याने चंबळ खोऱ्यात आणि आसपासच्या भागात दहशत निर्माण केली होती.

उसाच्या शेतात लपून बसलेल्या या गॅंगला आशा गोपाल यांच्या टीमने रात्री घेरले . ‘मुकाट्याने शरण या’ असे ललकारले. उजाडे पर्यंत वाट पाहिली. डाकूंनी गोळीबार सुरु केला.तेव्हा पोलीसानी प्रत्युत्तर देणे सुरु केले. एका पाठोपाठ एक असे चार डाकू मरून पडले. पाचवा नंतर शेतात मरून पडलेला आढळला. डाकूंची प्रेतं चकमक संपल्या नंतर मोकळ्या जागेत ठेवलेली फ़ोटोत पाहायला मिळाली.

एका अठठावीस वर्षाच्या आय पी एस महिला अधिकाऱ्याने स्वतः सशस्त्र एन्काऊंटर करणे हे भारतात प्रथमच घडले होते. स्वाभाविकपणे वर्तमानपत्रात माध्यमातून आशा गोपाल यांचे आणि एकूणच महिला वर्गाचे कौतुक सर्वत्र वारंवार होऊ लागले. फक्त रोड रोमिओ ला जरब बसविणारी महिला अधिकारी ही प्रतिमा यानंतर मिटली. लहान थोर स्त्री पुरुष त्यांना भेटायला- निदान पाहायला- रस्त्यावर येऊ लागले.

मध्य प्रदेश मध्ये बातमीदारी मी एक-दीड वर्षेच केली. नंतर बदली झाली आणि आशा गोपाळ यांना भेटायचे राहूनच गेले.

प्रा. डॉ. किरण ठाकुर

– लेखन : प्रा डॉ किरण ठाकूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments