माह्या जगाचा पोशिंदा
कसा झाला हवालदिल
निसर्गाच्या कोपापायी
गेला सारा त्याचा माल !! १ !!
हाती आलेले त्याचे पीक
सारी मातीमोल झालं
कशी नशीबाची ही थट्टा
पोशिंदा झालायं अबोल!! २ !!
सांगु कोणाला माझी व्यथा
करू कोणापुढे आक्रोश
शेती सारी खरडून गेली
देऊ कोणाला मी दोषं !! ३ !!
केले रात्रंदिन कष्ट
नाही मेहनतीत खोटं
उभ्या शेतातील राजा
पिकं झाली आता नष्ट !! ४ !!
माह्या संसार फाटका
लावू किती मी ठिगळं
एकीकडे शिवतांना बा
माही फाटकी वाकळं !!५ !!
अंगी घालाया ना धडका
घरं झालं या पडका
माझा संसार फाटका बी
आता मोजतो मी घटका !!६ !!
नको कोणाची मला दया
नको फुकाचे उपकार
कणा ताठ आहे माझा
फक्त पीकू दे माह्यं शिवारं !! ७ !!
फक्त पीकू दे माह्यं शिवारं !!

– रचना : राजाराम जाधव