खडतर परिस्थितीवर मात करून चार्टर्ड अकौंटंट झालेले, धाकट्या भावांना पुढे आणणारे, समाजहित दक्ष नारायणराव जवकर यांच्या पंचाहत्तरी निमित्ताने त्यांच्या धाकटया बंधूनी व्यक्त केलेल्या या हृद भावना….
एन. जे. जवकर म्हणजे आमचे सर्वांचे लाडके दादा यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस 🎂🎂त्यानिमित्त दादांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा🌹🌹
दादा म्हणजे एक प्रेमळ व्यक्तिमत्व. प्रचंड मायेचं आगर. प्रेम आणि सदभावनेचा अखंड वाहणारा झरा. मर्यादा पुरुषोत्तम. रामाचा आशीर्वाद असलेले
दादासाहेब खरोखर आम्ही खूप भाग्यवंत आहोत आपण आमचे वडीलबंधू आहात. आमचा आधार, आमच्या पाठीशी राहून आम्हाला आकार देऊन स्वयंशिस्तीचे धडे देऊन स्वतःच्या पायावर भरभक्कम उभे करून स्वावलंबी बनविले.
सतत कार्यमग्न व सातत्याने प्रयत्नशील असणारे दादासाहेब. एक प्रतिभावंत, प्रतिभासंपन्न,
दिलखुलास, मनमिळाऊ सुस्वभावी उद्यमशील, विनयशील, सक्षम व दूरदृष्टीचा द्रष्टेपणा, साधी राहणी उच्च विचारसरणी. याचबरोबर अचाट निर्णयक्षमता व कर्तुत्ववान आणि यशवंत व्यक्तीमत्व ही दादासाहेबांच्या यशस्वी जीवनाचे महत्वपूर्ण असे पैलू होत. समाजासाठी महत्वपूर्ण योगदान देणारा, ज्ञानाची ज्योत अखंड तेवत ठेवणारा एक सच्चा समाजसेवक. 🌺समाजासाठी काही तरी देणे लागतो ही भावना मनामध्ये कायम जोपासणारा, प्रसंगी तन मन धनाने समाजसेवा करणारा समाजाचा एक सच्चा मित्र म्हणावे लागेल.
सतत चांगले प्रयत्न, चांगले विचार चांगल्या भूमिका, चांगले ध्येय हा त्यांचा स्थायी स्वभाव. लोकांच्या मनात विश्वास निर्माण करून त्यांना योग्य दिशा देण्याचे काम करत असताना त्यांना मदतीचा हात पुढे करून त्यांना उत्तम मार्ग दाखवणे अश्या अनेक भूमिका ते श्रद्धापूर्वक व कर्तव्यनिष्ठेने पार पाडत असतात.
अश्या या थोर व्यक्तीचा जन्म ५ ऑक्टोंबर, १९४६ रोजी बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर या गावी कासार घराण्यात झाला. वडील कै. श्री.जगन्नाथ गोविंदराव जवकर भांडी व बांगडी व्यावसायिक होते तर आई, कै. श्रीमती यमुनाबाई उत्तम गृहिणी होत्या. त्याही बांगडी व्यवसायात मदत करीत असत. आम्ही सर्व जण आईस जिजी तर वडिलांना तात्या असे म्हणत असू. गावात सर्व जण त्यांना जिजी व तात्याच म्हणत. गावात त्यांना फार मोठा आदर होता.

वडील श्री.जगन्नाथराव यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकदा स्वातंत्र लढ्यात सहभाग घेऊन तर कधी भूमिगत राहून लढा दिला. या कामात श्रीमती यमुनाबाई यांचाही मोठा सहभाग होता. स्वातंत्र्याच्या चळवळीत सतत संघर्ष करावा लागत असे. यामुळे बऱ्याचदा व्यवसाय व कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असे.
१५ ऑगस्ट, १९४७ रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले परुंतू मराठवाड्यात निजामाची जुलमी राजवट होती ती अजून संपुष्टात आली नव्हती. लोकांचा खूप छळ होत असे. यासाठी देखील जनतेला मोठा संघर्ष उभा करावा लागला. सर्व हिंदूची ताकद एकवटली व १७ सप्टेंबर, १९४८ रोजी मराठवाडा निजामाच्या राजवटी पासून मुक्त झाला. त्या दिवशी निजामाच्या जुलमी व जाचक राजवटीतून मुक्तता झाली म्हणून तो दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो.
तात्यांनी स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानाची महाराष्ट्र सरकारने दखल घेऊन त्यांना स्वातंत्र्य सैनिकांचा किताब देऊन गौरविले .
तात्यांना प्रपंच सांभाळून मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी पार पाडावी लागत असे. ते स्वतः कमी शिकले. पण मुलांना उत्तम शिक्षण मिळेल याची त्यांनी पुरेपूर खबरदारी घेतली.आम्हा सर्वांवर उच्च कोटीचे संस्कार केले.
तात्यांचे श्री.नारायणराव हे थोरले चिरंजीव. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण धारूर येथेच झाले.
धारूर गावात चांगले शिक्षण घेऊन पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी आंबेजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालय येथे वाणिज्य शाखेत त्यांनी मेरिट नुसार प्रवेश मिळवला. पुढे वाणिज्य शाखेत तिसऱ्या वर्षाला म्हणजेच बी.कॉम. फायनल परीक्षेत मराठवाडा युनिव्हर्सिटी मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. मराठवाडा युनिव्हर्सिटी मध्ये ते डोमिनियन फर्स्ट येऊन गोल्ड मेडलिस्ट ठरले. त्यावेळेस मराठवाड्यातील अग्रगण्य वृत्तपत्रात नारायण जगन्नाथ जवकर यांचे नाव झळकले. त्यावेळी धारूरला आनंदाचे वातावरण पसरले होते.
आंबेजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक यांनी धारूरला घरी येऊन त्यांचा सत्कार केला. त्यावेळी धारूर शहराचे देवदूत डॉ बा म. पटवर्धन काका हजर होते. या सत्कार सोहळ्याचे नियोजन व मार्गदर्शन डॉ साहेबांनी केले. नारायण या मुलाने मिळविलेले नेत्रदीपक यश सर्वांच्या कौतुकाचा विषय होता. या सत्कार समारंभास गावातून सर्वजण हजर होते, ही गोष्ट धारूर वासिया करता फार मोठी अभिमानाची होती हे वर्ष १९६६ चे होय.
पुढे ते सीए च्या उच्च शिक्षणासाठी विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे येथे गेले. तेथेही त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत खूप मेहनत घेऊन कठोर परिश्रम घेतले. रात्रंदिवस अभ्यास केला व सीएची परीक्षा उत्तीर्ण होऊन चार्टर्ड अकाउंटंट ही सनद मिळवली. तो काळ 1970 चा होय.
चार्टर्ड अकाउंटंट झाल्यावर ते महाराष्ट्र शासन अंगीकृत शासकीय कंपनी असलेल्या महाराष्ट्र यंत्रमाग महामंडळ मर्यादित मुंबई येथे वित्त सल्लागार व मुख्य लेखाधिकारी या उच्च पदावर (क्लास वन अधिकारी)
नोकरीस रुजू झाले.
याच उपक्रमात पुढे त्यांनी कार्यकारी संचालक पदाची धुरा सात वर्ष सांभाळली. त्यांच्या कार्यकाळात त्यांचा मंत्रालयात कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री यांचा कामा निम्मित्त जवळचा संबंध यायचा. त्यांनी अनेक लोकांना उत्तम मार्गदर्शन करून आणि बऱ्याच लोकांना नौकरीस लावले. बऱ्याच जणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आणि एक उत्तम राष्ट्रीय कार्य पार पाडले. हे सर्व काम त्यांनी निःस्वार्थी पणाने केले.
2005 साली ते नियत वयपूर्तीनुसार शासकीय कंपनीतून निवृत्त झाले.
निवृत्तीनंतर स्वस्थ न बसता त्यांनी स्वतःची सीए फर्म डोंबिवली येथे सुरू केली. त्यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे ऑडिट तीन वर्ष होते. त्यानिमित्ताने जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी ,
पंचायत समिती, तहसील, ग्रामपंचायत यांच्याशी त्यांचा सतत संपर्क यायचा.
पुढे त्यांना बीड जिल्ह्याच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे ऑडिट मिळाले. तेथेही ही असाच जिल्हाधिकारी ते ग्रामपंचायत पर्यंत त्यांचा संपर्क येत असे. त्यांची कारकीर्द अतिशय पारदर्शक व चांगली राहिली. त्यामुळे जनसामान्यांचा विश्वासू अधिकारी अशी ओळख झाली. त्यांच्याकडे काम करीत असलेले अधिकारी, कर्मचारी वर्ग कार्यालयीन स्टाफ त्यांना देव माणूस म्हणत.
त्यांच्या या उत्तम कामगिरीत पत्नी सौ. कै. लतिका यांचा मोलाचा वाटा होता. त्यांचा मुलगा चि. निलेश हा देखील कम्पनी सेक्रेटरी असून एका नामांकित कंपनीत नोकरीस आहे. त्यांची कन्या सौ.निता प्रशांतराव इटकर ही परभणी येथे असून जावई श्री प्रशांत जी इटकर महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम विभागात उप अभियंता या पदावर हिंगोली येथे कार्यरत आहेत.
त्याच बरोबर सर्व भावंडाना योग्य मार्गदर्शन करून कर्तृत्ववान बनविले. धारूर गावाबद्दल त्यांना खुप प्रेम आहे. आजही त्यांची धारूर गावाशी तीच नाळ जोडलेली आहे. तसेच आजही धारूर वासियांना त्यांच्या बद्दल खूप आपुलकी व कौतुक आहे ही आम्हा जवकर कुटुंबासाठीही अभिमानाची बाब आहे.
खरचं जीजी, तात्यांनी आम्हा सर्वांवर उच्चकोटीचे संस्कार केले आहेत. त्यांनी दादांना उत्तम शिकवण दिली. तिच शिकवण व मार्गदर्शन आम्हा सर्व भावंडाना व परिवारास दादा साहेब देत आहेत. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करून त्यांनी आम्हाला कर्तृत्ववान बनविले. आपल्या जीवनात त्यांनी कुटुंबाकरिता मोठा त्याग व संघर्ष करून आमच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिलेत. आमच्या सर्वांच्या प्रगतीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. जीजी व तात्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वाच्या पाठीशी आहेच.

जीजी तात्यांची पुण्याई व आपले आशीर्वाद असल्यामुळेच आम्ही सर्वजण यशस्वीपणे घडलो.
दादा, तुमचे उपकार आम्ही सर्वजण या जन्मात कधीही फेडू शकणार नाहीत. खरचं you are a great for us. आम्ही सर्वजण आपले सदैव ऋणी आहोत.

असा हा दादासाहेबाचा जीवन प्रवास किंबहुना जीवनपट सर्वांना मार्गदर्शक तर ठरेलच परंतु प्रेरणा दायी व स्फूर्तिदायी, एक सकारात्मक ऊर्जा देणारा ठरेल असे मनापासून वाटते. दादासाहेब, आपणास वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा देतानाच आपणास उदंड, उत्तम व निरोगी आयुष्य लाभो, आपणास स्थैर्य, मनःशांती लाभो व आपले पुढील आयुष्य सुखाचे समाधानाचे आनंदाचे ऐश्वर्याचे जावो हिच आम्हा सर्वांची सदिच्छा प्रार्थना. 🌸🌸🌹🌹🌸🌸
– लेखन : दीपक जवकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
जवकर दादा तुमच्या 75व्या वाढदिवस निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपणास उदंड आयुष्य लाभो निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना