Monday, September 15, 2025
Homeसाहित्यओठावरलं गाणं

ओठावरलं गाणं

नमस्कार 🙏
“ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत. दूरदर्शनचा जन्म व्हायच्या कितीतरी आधीपासून रेडिओ हे आपलं मनोरंजन आणि हक्काचं एकमेव साधन होतं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. लहानपणापासून कितीतरी छान छान गाणी ऐकवण्याचं पुण्यकर्म या रेडिओनं केलं आहे. गायक, कवि आणि संगीतकार या तिघांच्याही कौशल्यामुळे हे गाणं केंव्हाही ऐकलं तरी आपल्या हृदयावर राज्य करतं, आणि थोडाफार काळ का होईना, भक्तीचा मळा आपल्या चंचल मनामधे फुलत रहातो.

मित्रहो, या गाण्याचे शब्द आहेत, शब्दप्रभू गदिमा अर्थात ग दि माडगूळकर यांचे. भक्ती अशी असावी, दृढ विश्वास असा असावा कि परमेश्वर तुमच्या मदतीला धावून यायलाच हवा. ग दि माडगूळकर एका ओळीत हेच सांगतात…….

“कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम”.
“भाबड्या या भक्तासाठी देव करी काम
कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम”

भक्त हा भाबडा असावा. परमेश्वरावर अढळ विश्वास आणि निस्सीम भक्ती …. जी कोणत्याही प्रसंगात जराही डळमळीत होत नाही. भाबडा म्हणजे असा माणूस जो आपली सर्व कामं करताना “ईश्वरेच्छा बलियेसी” असा विचार करून प्रत्येक ठिकाणी ईश्वराचं अधिष्ठान आहे अशी मनाची पक्की बैठक तयार करतो.

एक एकतारी हाती भक्त गाई गीत
एक एक धागा जोडी जानकीचा नाथ
राजा घनश्याम … कौसल्येचा राम

कबीराची श्रीरामांच्या प्रती असलेली भक्ती एवढी श्रेष्ठ दर्जाची आहे कि एकतारी घेऊन प्रभू रामचंद्रांची स्तुती भजनं म्हणताना तो देहभान विसरून जात असे. प्रल्हादानं लहान वयात केलेल्या भगवंत भक्तीचं फळ म्हणून विष्णूने नृसिंहरूप धारण करून प्रल्हादाचं रक्षण केलं आणि त्याचा भक्तीमार्ग निष्कंटक केला तर नामदेवाच्या हट्टापुढे प्रत्यक्ष पांडुरंगाला सगुण रूपात येऊन प्रसाद भक्षण करावा लागला. प्रभू रामचंद्रांनी कबीराची त्यांच्याप्रती असलेली निर्मळ भक्ती पाहून एकतारीच्या पार्श्वभूमीवर एकेक धागा विणत कबीराचं काम करण्यात कोणताही कमीपणा मानला नाही. तुमचा भक्तीभाव आणि भक्तीमार्ग जर खरा असेल तर देवही तुमचं काम करतोच करतो हा विश्वास या घटनेमधून सामान्य माणसाला मिळतो.

दास रामनामी रंगे राम होई दास
एक एक धागा गुंते रूप ये पटास
राजा घनश्याम कौसल्येचा राम

नामाचा महिमा हा फार मोठाअसतो हे सर्व संतांनी सांगून ठेवलं आहे. राघवाचा निस्सिम भक्त कबीरही आपल्या एकतारीची सुंदर साथ घेत रामनाम घेण्यामधे अगदी रंगून गेला आहे. भक्तांची काळजी देवाला असते असं म्हणतात आणि म्हणूनच कबीराचं काम पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी पुढाकार घेतला आहे. श्रीरामांच्या पवित्र हातातून धाग्याला धागा जोडला जातोय आणि हळूहळू कबीराचा शेला आकार घेतो आहे. पण कबीराला मात्र या गोष्टीचं भान नाहीये. “दास रामनामी रंगे राम होई दास” या शब्दांमधून गदिमांची काव्यप्रतिभा आणि शब्दयोजना या दोन्ही गोष्टींचा एकत्रित अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो‌.

विणुन सर्व झाला शेला पूर्ण होई काम
ठायी ठायी शेल्यावरती दिसे रामनाम
लुप्त होई राम कौसल्येचा राम

खरी भक्ती आणि खोटी भक्ती यातला फरक माणसाला जरी समजला नाही तरी परमेश्वराला तो निश्चितच कळतो. त्याप्रमाणेच परमेश्वर आपल्या भक्तांसाठी, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांना मदत करायची कि नाही हे ठरवत असतो. कबीराची श्रीरामांवर असलेली श्रद्धा आणि भक्ती सर्वज्ञात तर होतीच पण प्रभू रामचंद्रांनाही त्याच्या भक्तीविषयी खात्री पटली म्हणूनच कबीराची आणखी कोणतीही परीक्षा न घेता स्वहस्ते मदत करून शेला विणून पूर्ण केला. अर्थात प्रभू रामचंद्रांनी स्वहस्ते विणलेल्या त्या शेल्यावर जागोजागी रामनामाची मोहोर उमटली होती. संपूर्ण शेला विणून कबीराचं काम पूर्ण केल्यानंतर मात्र प्रभू श्रीराम तिथून अदृश्य झाले.

हळूहळू उघडी डोळे पाही जो कबीर
विणुनीया शेला गेला सखा रघुवीर
कुठे म्हणे राम कौसल्येचा राम

श्रीरामांच्या भजनामधे तल्लीन होऊन गेलेला कबीर काही काळानंतर भानावर आला. विणून पूर्ण झालेल्या संपूर्ण शेल्यावर जेंव्हा त्याने “श्रीराम” “श्रीराम” अशी अक्षरं पाहिली, तेंव्हा त्याच्या लक्षात आलं कि आजुबाजूचं जग विसरून ज्या दैवताच्या भजनपूजनात तो रंगून गेला होता त्या प्रभू श्रीरामांनी आपल्या हातांनी कबीराचा शेला विणून, एकप्रकारे त्याचीच सेवा केली होती.

माणिक वर्मा यांच्या आवाजातीलदेव पावला” चित्रपटातील  या गाण्याला संगीत दिलं आहे महाराष्ट्र भूषण पु ल देशपांडे यांनी. गदिमांनी लिहिलेलं हे गाणं माणिक वर्मा यांच्या गोड आवाजात ऐकताना मनाला ख-या भक्तीची साक्ष पटत जाते.

विकास मधुसूदन भावे

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800

RELATED ARTICLES

11 COMMENTS

  1. विकासजी
    गदिमांचे खूप सुंदर भक्तीगीत…माणिक वर्मा यांनी गायलेले…
    भाबड्या भक्ताची देवावर श्रद्धा आणि विश्वास असल्यावर देवालाही त्याच्या धावेस हाक द्यावीच लागते…
    अश्या अर्थाचे गीताचे आपण खूप सुंदर रसग्रहण केलेत
    त्यामुळे अजून छान समजण्यास मदत होते.
    👌🙏🌹

  2. अर्थ तुम्ही चांगला उलगडून सांगितला आहे. काव्य , चाल छान आहे आणि माणिकताईंनी ही रचना गाऊन अजरामर केली आहे.

  3. माणिक बाईं चीअप्रतिम पेशकश. सुरेख विवेचन विकास

  4. माणिक वर्मा यांच्या सुमधुर आवाजातील, ग.दि.मा. यांनी लिहिलेल्या या गाण्याला पु.ल. देशपांडे यांनी दिलेल्या संगीतामुळे हे गाणे अजरामर झालं आहे. आपण अशी गाणी रसग्रहणाद्वारे आमच्या पर्यंत पोहोचवता त्यासाठी धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments