कवयित्री पद्मावती गोळे
सर्व रसिक वाचकांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !
‘नवरात्री‘ हा आहे स्त्री-शक्ती सोहळा.
‘शक्ती’ ची व्याख्या, केवळ ‘हातात धारदार शस्त्रे घेवून’ किंवा ‘मुखात धारदार शब्द घेवून’ ‘दुष्टाचे दमन करणे’ इतकी संकुचित आपल्या परंपरेने मानलेली नाही आणि म्हणूनच त्रिशूलधारी दुर्गादेवी बरोबरच वीणा पुस्तक धारिणी अशा देवी सरस्वती आणि मनोल्हादिनी अशा देवी लक्ष्मी यांनाही आपण शक्ती रूप मानतो आणि त्यांचे पूजन करतो.
दुष्टांचे दमन पोलादी शस्त्रांपेक्षा, शिक्षण, शालीनता, शुचिता आणि शांती ह्या शस्त्रांनी अधिक होते असे मला वाटते. प्रेम, दृढता, सामंजस्य, निष्कपटता, ही सारी शक्ती रुपे आहेत आणि म्हणूनच संवेदनशील अंतर्मन असणारी आणि दया-क्षमा-शांती या गुणांनी युक्त असलेली प्रत्येक स्त्री दुष्ट प्रवृत्तीचे दमन करण्यास सक्षम आहे. अशी प्रत्येक स्त्री ‘शक्ती रूप‘ आहे.
आज ह्या शक्तीपूजनाचे निमित्ताने एका कवयित्री बद्दल लिहिते आहे आणि तेदेखील अश्या कवयित्री बद्दल की ज्यांनी आपल्या कवितांद्वारे आणि लेखनाद्वारे स्त्रीवादाचाच पुरस्कार केला.
ज्येष्ठ कवयित्री पद्मावती गोळे या मराठी कवयित्री, लेखिका आणि नाटककार होत्या.
त्यांचे ‘आकाशवेडी’, ‘श्रावणमेघ’, ‘प्रीतिपथावर’,
‘निहार’, ‘स्वप्नजा’ असे कवितासंग्रह आणि ‘स्वप्न’, ‘रायगडावरील एक रात्र’, ‘नवी जाणीव’ नावाची नाटके आहेत. ‘वाळवंटातील वाट’ नावाची कादंबरीही आहे.
‘श्रीमंत’ घराण्यात जन्माला आलेल्या, महात्मा गांधींच्या चळवळीने प्रेरणा घेतलेल्या आणि स्त्रीच्या मनाचे भावविश्व आपल्या कवितांद्वारे मांडणाऱ्या पद्मावती गोळे ह्या कवयित्री खूप थोर आहेत.
स्त्री संवेदनेचा एकेक पदर हळूवार उलगडणारी कविता म्हणजे १० जुलै १९१३ रोजी या पृथ्वीवर अवतरून ‘आकाशवेड’ जोपासणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री पद्मावती गोळे यांची कविता.
‘ मी एक पक्षिण आकाशवेडी
दुजाचे मला भान नाही मुळी
डोक्यात माझ्या असे एक आकाश
श्वासात आकाश प्राणा तळी…’
‘ कविता ‘ आणि ‘ लेख ‘ यातला मुख्य फरक म्हणजे, लेखात ‘ जे ‘ आणि ‘ जेवढं ‘ म्हटलंय ‘ ते ‘ आणि ‘ तेवढंच ‘ म्हणायचं असतं पण कविता म्हणजे ज्ञानेश्वरीची कन्या ! अमृताचे रोप आणि अमूर्ताचे रूप ! जेवढी ओठी आहे त्याहून कितीतरी अधिक तीव्र पोटी आहे.
कवयित्री पद्मावती गोळे यांच्या ‘ आकाशवेडी ‘ कवितेच्या वरील चार ओळी स्त्रीच्या स्वप्नांची, सबलतेची साक्ष देणाऱ्या मात्र प्रत्येकीच्या ‘आकाशाची’ ओळख तिची तिची स्वतंत्र, स्वतःची ! त्याची इतरांनी केवळ कल्पना करायची. सदनापासून गगनापर्यंतची तिची झेप, तिचा प्रवास, केवळ तिचा तिला ठाऊक. तिचे निघणे आणि पोहोचणे देखील तिलाच ठाऊक.
‘ किती उंच जाईन पोहचेन किंवा
संपेल हे आयु अर्ध्यावरी
आकाशयात्रीस ना खेद त्याचा
निळी जाहली जी सबाह्यांतरी. ‘
अश्या आकाशाच्या दिशेने जाण्यापूर्वी शोधावे लागणारे स्वत्व पद्माताई मांडतात ते ‘ मी घरात आले ‘ ह्या कवितेतून…कवितेच्या शेवटच्या ओळी अश्या…
‘ सून झाले, बायको झाले,
आई झाले, सासू झाले,
माझी मला हरवून बसले
आता सोंगे पुरे झाली;
सारी ओझी जड झाली.
उतरून ठेवून आता तरी
माझी मला शोधू दे;
तुकडे तुकडे जमवू दे.
विशाल काही पुजू दे.
मोकळा श्वास घेऊ दे.
श्वास दिला, त्याचा ध्यास
घेत घेत जाऊ दे ! ‘
कवयित्री पद्मा गोळे ह्या नाटककारही होत्या. नाटकांमध्ये स्वगताची वाक्ये असतात…ते केवळ भावनांचे वहाणे असते, भावनांचे उतार चढाव असतात आणि आपल्याच प्रश्नांना आपणच दिलेली उत्तरे असतात. मला पद्माताईंची कविताही तशीच वाटते. एकीतून दुसरीचा जन्म होतो ! एकीला पडलेला प्रश्न दुसरी सोडवते ! दुसरीचे मन तिसरी कुरवाळते !
त्यांच्या कवितांच्या अमूक दोन चार ओळी निवडता येतच नाहीत मुळी. संपूर्ण कविता ही एका श्वासात म्हटलेली ओळ असते किंवा प्रत्येक ओळ ही श्वासासवे जन्माला आलेली स्वतंत्र कविता असते.
‘ कधी कधी ‘ नावाची कविता. ही कविताही प्रतिबिंब आहे प्रत्येक स्त्री मनाचे.
‘ कधी कधी होवूनी राधिका
तुझ्या बन्सीने वेडें व्हावें
कधी रुक्मिणी होउन पत्रीं
प्रेमे तुज आवाहन द्यावे
परी कधीं हे पुरुषा ! अद्या !
रामस्वरूपी तुला बघावें
भूमीगत सीताच होउनी
एकाकीपणिं तुज रडवावें…’
सीतेचा त्याग आणि क्लेशपूर्ण जीवन, जे तिच्या नशिबी आलं दुर्दैवाने…अपेक्षा कदाचित केवळ एकच असेल…श्रीरामांनी तरी कवेत घ्यावे परंतू…अखेर तिचा संयम संपला आणि ती भूमीगत झाली. असे संयम संपल्याने, आदर आणि प्रतिसाद या दोन्हीच्या अभावाने भूमीगत होणाऱ्या कितीतरी दुहिता असतील. कधी हे भूमीगत होणे असते शारीरिक तर कधी भावनिक !
स्त्रीच्या मौनाचेही किती किती अर्थ असतात…’ बोलायचंय खूप पण ऐकणाऱ्यास पर्वा नाही ‘, ‘ बोलायचंय खूप पण योग्य शब्द सापडत नाहीत ‘, ‘ बोलायचंय खूप पण ‘हे व्रत’ आता मोडवत नाही ‘, ‘ बोलायचंय खूप पण कदाचित जे बोलू नये असं ‘….
असे मौनव्रत मग पद्माताई मनातल्या मनात सोडतात आणि ‘ चाफ्याच्या झाडा ‘ समवेत गूज करतात…
‘ चाफ्याच्या झाडा…
पानात, मनात खुपतंय ना
काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय
तुलाही कळतंय… कळतंय ना
चाफ्याच्या झाडा…चाफ्याच्या झाडा
हसून सजवायचं ठरलंय ना
कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं
फुलांनी ओंजळ भरलीये ना…’
त्यांच्या ओंजळीत कदाचित असावीत ती ‘ बकुळीची फुलं ‘ जी त्यांना आणून देत होता ‘ तो ‘…
‘ तूच आणून देत होतास मला बकुळीची फुलं
आणि त्या फुलांबरोबर तसंच सुगंधित
पण अव्यक्त असंही काही देत होतास ना !
होय, बकुल फुलांसारखंच :
सुकलं तरी सुगंधच देणारं,
तुझ्या प्रेमळ आठवणीसारखं
आणि… आणि… तुझ्यासारखं ! ‘
‘ आताशा मी नसतेच इथे…’ नावाची कविता…सखोल आणि बहुस्तरीय.
आताशा मी नसतेच इथे..
जरी माझी इथे जा – ये असली तरीही
आताशा मी नसतेच इथे’
कुठे म्हणून काय विचारता…
जसे काही तुम्हाला माहीतच नाही
बाकी नसेलही म्हणा…
कारण त्या गावाच्या वाटेला
फारसे कुणी जातच नाही…’
कवयित्री सांगताहेत,
“माझ्या घराला भिंतीच नाहीत, उंबरठ्यावर वाहणारी नदी आहे, नदीत खेळणारे चंद्र आणि चांदण्या आहेत. कवयित्रीचे अस्तित्व आहे ते काठाने वाहणाऱ्या निर्माल्यात आणि ताज्या ताज्या स्वप्नांतही…”
हे असे ‘ असणे ‘ कल्पनाविश्वास दर्शविणारे की मृत्योपरांतच्या प्रवासाची ओळख करून देणारे ?
’ सोबत ना ? आहे की
आपल्या त्या ह्यांची…
नावही आहे त्यांना
पण मला की नाही, काही आठवतच नाही’
आताशा मी नसतेच इथे…
वस्त्र केंव्हाच गेलीयेत कदंबावर अंतरपाट होण्यासाठी
मी झाले नीळं गाणं
निळ्या नदीत वाहणारं
निर्माल्याबरोबरच…
आताशा मी नसतेच इथे…’
निळेपण म्हणजे मुक्ती…कोणती मुक्ती कवयित्रीस खुणावत होती ? सृजनाची की श्वसनाची ?
आता माझी आवडती कविता…
‘आणि ओ दिली नाहीस म्हणून ‘.
मी यापूर्वी स्त्रीच्या मौनाचे इतरांस न उलगडणारे अर्थ सांगितले. ‘ इतर ‘ हा शब्द मी फार जाणीवपूर्वक वापरते आहे. हे मौनाचे अर्थ न समजू शकणारे ते असतात ‘ इतर ‘. मात्र ‘ एक ‘ असतो असा, जो मौन आणि मन दोन्ही वाचू शकतो. मग त्याच्या समोर अगदी रिते व्हायचे… त्याने ओ दिली नाही तर मनात त्याचा रागही करायचा आणि पुन्हा मनातल्या मनात त्याच्याच छातीवर डोके ठेवून अश्रूंना वाट मोकळी करून द्यायची…
‘ सगळंच काही लिहिता येत नाही कागदावर;
पण न लिहिलेलंही वाचता येतं तुलाच !
सगळंच काही बोलता येत नाही शब्दांत;
पण अशब्दातलं सगळं समजतं तुलाच !
सगळेच अश्रू काही डोळ्यांतून ओघळत नाहीत;
पण न ओघळणारे दिसतात तुलाच !
असाच विश्वास ठेवते, वेळी अवेळी हाक मारते,
तुझ्या कानी ती जाणार नाही अशी काळजी घेते,
आणि ओ दिली नाहीस म्हणून दोषी ठरवते
तेही तुलाच ! ‘
पद्मा ताई, आपण खरोखर स्त्री मनाचे अंतर्बाह्य दर्शन सर्वांना करून दिलेत. १२ फेब्रुवारी १९९८ रोजी आपण चाफ्याच्या झाडाला उमललेल्या चाफ्याच्या सुगंधात विलीन झालात. आपली कविता हे प्रत्येक स्त्री चे स्वगत आहे. हा एक स्वगताचा सोहोळा आहे. हा खऱ्या अर्थाने शक्ती सोहोळा आहे. आपल्याला माझा प्रणाम 🙏🏻
आपण म्हटलं आहे,
‘शब्दांचं महाभारत सोसायला पाठीशी कृष्ण हवा ‘…असे आवाहन प्रत्येक स्त्रीचे असते, तिच्या तिच्या कृष्णासाठी… ज्याच्याकडून तिला मिळते शक्ती…व्यक्त होण्याची…कधी कधी अव्यक्तातूनही !
अशी, मी ‘ माझ्या कृष्णास ‘ केलेली विनंती…प्रेमाज्ञा… ‘ प्रणयाराधना ‘ आपले चरणी अर्पण 🙏🏻
प्रणयाराधना
माझी गीते, माझी स्वप्ने;
खरीच माझी का रे ?
की तुला गाया, पहावयाला
रचले बहाणे सारे ?
प्रपंच रिती आडव्या येती
क्षण न सारे अपुले,
मग एकांती शोधित फिरते
रोमांचांची मुकुले.
कधी शंकांची उठवी वादळे
क्षणभर तुझे दुरावे,
तुझीच असल्याचे मग मज
श्वासातच मिळती पुरावे !
तव भेटीच्या आसेवरती
हृदयी पडतो ठोका,
अर्थ अपुल्या ह्या प्रेमाचा
अनाकलनीय लोका !
शपथ तुला, घे मिठीत मजला,
उलगड त्यांसी नाम,
वेडी कृष्णमय राधा मी;
की, तू राधामय श्याम !

– लेखन : डॉ. गौरी जोशी- कंसारा, अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
गौरी कंसारा the best✔️💐👏👏👏👏
आपले मनापासून आभार 🙏🏻